गाणे  मनातले !

सायली पानसे-शेल्लीकेरी
सोमवार, 21 जून 2021

कव्हर स्टोरी

येत्या सोमवारी, २१ तारखेला जागतिक संगीत दिन आहे. संगीत म्हणजे अगदी एकट्या माणसापासून ते माणसांच्या समूहापर्यंत सगळ्यांना आनंद देणारं वरदानच. गाणाऱ्या, गाण्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी प्रत्येक दिवसच ‘म्युझिक डे’ असतो. शास्त्रीय  संगीतातल्या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका अभ्यासक- गायिकेच्या मनात संगीत दिनाच्या निमित्ताने उभ्या राहिलेल्या भावनांना मिळालेले हे शब्दरूप... 

या  सगळ्या ‘डे’जचं लॉजिक अजून काही मला कळलं नाही बाबा! त्या त्या ‘डे’च्या दिवशी त्या त्या गोष्टी करायच्या म्हणे, आणि मग सोशल मीडियावर नुसता पूर. ‘वर्ल्ड टी डे’ला चहाचा, ‘रोझ डे’ला गुलाबाच्या फुलांचा, ‘मदर्स डे’ला आयांचा आणि ‘म्युझिक डे’ला गाण्यांचा. मग बाकीच्या दिवशी आपण चहा प्यायचा सोडतो की काय? का अमेरिकी लोकांसारखं आईवरचं प्रेम फक्त ‘मदर्स डे’ला? आणि गायकांच्या रियाजाचं तरी काय? एक दिवस तरी चुकला आहे का तो? मग कसलं बरं कौतुक त्या एका दिवसाचं? 

मला वाटतं हे दिवस बहुतेक इतरांसाठीच असावेत. ज्यांनी या गोष्टी कधीच केल्या नाहीत त्यांच्यासाठी! चहा न पिणाऱ्यांनी ‘टी’डेला खुशाल एक कटिंग मारावा आणि म्युझिक ‘डे’ला मनसोक्त गावं. गाण्यातलं सुख आहे तरी काय याचा मनमुराद अनुभव घ्यावा. असो! ‘वर्ल्ड म्युझिक डे’च्या मनापासून शुभेच्छा! 

‘डे’ कुठलाही असो सच्चा कलाकार मात्र अखंड रियाजात असतो. कार्यक्रम असो किंवा नसो, दिवसभर काम असो, प्रवास असो, लॉकडाउन असो, रियाजात खंड काही पडत नाही, कारण एका वेगळ्याच विश्वात सफर करायची चटक त्याला लागलेली असते. अन्यांच्या तुलनेत कलाकाराचे आयुष्यही तसे मनोरंजकच म्हणायला हवे. प्रत्येक कार्यक्रमाचे नवीन अनुभव, वेगवेगळ्या ठिकाणचा प्रवास, नवीन देश, नवीन भाषा, नवनवीन पद्धती, नवीन लोकांचा परिचय, त्यांचं भरभरून प्रेम.. सगळंच रोमांचकारी! हा अनुभव घ्यायला जोडीला आपल्याच क्षेत्रातले कलाकार. मग प्रवासात संगीतावर चर्चा, गप्पा, किस्से, मार्गदर्शन, नवीन काहीतरी करण्याचे प्लॅन्स, एकमेकांच्या जोडीने नवीन काहीतरी करण्याची ऊर्मी.. सगळंच रंजक! हा सांगितिक दौरा भारताबाहेर असेल तर मग तर विचारायलाच नको. दिवसा रियाज, प्रॅक्टिस, रिहर्सल्स. संध्याकाळी शहरात चक्कर किंवा एखाद्या पर्यटन स्थळाला भेट आणि सुट्टीच्या दिवशी कार्यक्रम. आमच्या अमेरिकेच्या दौऱ्यात आम्ही सगळ्या कलाकारांनी मिळून एक गाणं शब्द आणि संगीतबद्ध करून गायलं होतं आणि भारतात आल्यावर रेकॉर्ड केलं होतं. आजही ते गाणं म्हटलं की त्या गाण्याचा सगळा प्रवास डोळ्यांसमोर येतो.

संगीताचा श्रोता जगात सर्वत्र आहे, पण संगीताच्या आपल्या परंपरा जाणून घेण्याचं कुतूहल बाहेरच्या देशात खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतं. त्यांना संगीताबद्दल वाटणारी उत्सुकता, त्यातून मिळणारा आनंद आणि त्याबद्दल जाणून घ्यायची ही ओढ अचंबित करणारी आहे. आपल्याला आपली कला जेवढी जवळून अनुभवता येते तेवढी त्यांना ती सहज उपलब्ध नसते आणि म्हणूनच कलाकार आणि त्यांच्या कलाकृतींचं त्यांना विशेष अप्रूप असतं, त्याबद्दल अत्यंत उत्सुकता असते. आज अनेक बाहेरचे विद्यार्थी भारतात येऊन संगीत शिकत आहेत.

खरं म्हणजे आपल्याकडे लहानपणी प्रत्येक पालक आवर्जून आपल्या पाल्याला एखादी कला शिकवत असतात. एखादं गाणं तोंडपाठ झालं, किंवा वाद्यावर एक गाणं वाजवता आलं की त्याचं कोण बाई कौतुक! कुणी ओळखीचं भेटलं रे भेटलं, की ''कविता म्हणून दाखव, गाणं तरी म्हण, नाच करून दाखव’चा हट्ट, तो ही अगदी मूल वयात येईपर्यंत. आणि हेच मूल मोठं होऊन मी गाणं करतो, किंवा नृत्यातच काहीतरी करतो असं म्हटलं की त्याच आई-वडीलांचे डोळे पांढरे! बऱ्याचजणांच्या लेखी या कला आवड म्हणून ठीक असतात पण करिअर म्हणून निवडल्या की मात्र बरेचसे पालक खचून जातात. 

सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने ते कदाचित योग्यही आहे. म्हणा, ज्या क्षेत्राचा अनुभव नाही त्या क्षेत्रात उडी मारायची भीती वाटणं स्वाभाविक आहे. शिवाय कला जोपासणं आणि वृद्धिंगत करणं, म्हणावं तितकं सोपं नाही. आधी ती कला आत्मसात करण्याचा काळ, त्यात प्रभुत्व मिळवण्याची जिद्द, त्यासाठी लागणारी चिकाटी, पुढे कार्यक्रमांची अनिश्चितता. त्यात मुलगा असेल तर घर चालवण्याची जबाबदारी आणि मुलगी असेल तर संसाराची! आई वडील कलाकार असतील तर हे थोडं सुलभ होतंही, मात्र असांगितिक परिवार असेल तर असे निर्णय घ्यायला हिंमत आणि सर्वांना आपला निर्णय पटवून द्यायची क्षमता असणं फारच महत्त्वाचं ठरतं. 

खरे पाहता क्षेत्र कुठलेही असो, ठरावीक काळ शिक्षणात घालवावाच लागतो. आपलं वेगळेपण सिद्ध करण्याचे कष्ट घ्यावेच लागतात. आपले निर्णय योग्य आहेत हे पडताळून पहावेच लागतात. योग्य मार्गदर्शन आणि कष्टाची तयारी असेल तर क्षेत्र कुठलं ही असो यश हे मिळतंच ! संगीत क्षेत्रही त्याला अपवाद नाही. 

कलाकाराबद्दल मुळातच सर्वांना कुतूहल वाटत असतं. मग असा एखादा कलाकार घरात असेल तर पर्वणीच की! पण म्हणतात ना क्रांती व्हावी पण शेजारच्या घरी, तशातलीच ही गत! 

कलाकारांवर श्रोत्यांचं विशेष प्रेम असतं. त्यात कार्यक्रम झाला की मग तर अजूनच प्रेम वाढतं. जवळचे लोक काय प्रेम करतील असा प्रेमाचा वर्षावही अनोळखी लोकं करतात. शुभेच्छा देतात, आशीर्वाद देतात. प्रेमाने चौकशी करतात, एखादी स्वतः केलेली भेटवस्तू आणतात. वाढदिवस वगैरे सारखे दिवस लक्षात ठेवून आवर्जून प्रेमाचा वर्षाव करतात. कार्यक्रम संपला की श्रोते भेटायला येतात, तोंड भरून स्तुती करतात. सह्या घेतात, आजकाल ज्याचं फॅड वाढलं आहे, तो सेल्फी घेतात. अनेक नवं कवी, लेखक आवर्जून आपली पुस्तकं वाचायला देतात. कधी कधी खरंच चांगली उत्तम पुस्तकं वाचायला मिळतात तर कधीतरी अपेक्षाभंग होतो. कधीतरी त्यांच्या निरागस उत्साहाचं कौतुक वाटतं. अशा प्रेमळ रसिकांचे अनेक अनुभव कलाकारांना सारखेच येत असतात. अशा अनुभवांच माझंही गाठोडं काही कमी मोठ्ठं नाही!

काही आठवणी मात्र मनात अगदी ताज्या असल्यासारख्या राहतात. 

कार्यक्रमासाठी कायमच रात्री अपरात्री प्रवास करावे लागतात. अशीच एकदा गोव्याच्या कार्यक्रमासाठी पहाटेच एअरपोर्टवर पोचले. पहाटे पाचची फ्लाइट म्हणजे तसंही झोपेचं खोबरं!  सगळे सोपस्कार उरकून एकदाची विमानात जागेवर जाऊन बसले. आता मला काहीही लागणार नाही असं एअरहोस्टेसला आठवणीनं सांगून डोळे मिटले. भोवतालच्या आवाजात झोप लागेपर्यंत विमान गोव्यात उतरलंदेखील!

घ्यायला कोणी येणार आहे का, याचा अंदाज घेईपर्यंत संयोजकांचा फोन आला, “तुम्हाला घ्यायला गाडी पोचली आहे.” मी बरं म्हणून बाहेर पडले आणि माझ्या नावाचा बोर्ड शोधू लागले. गोव्यात तेव्हा फिल्म फेस्टिव्हल चालू असल्याने खूप गर्दी होती. अनेक जण बोर्ड हातात घेऊन पिकअपसाठी उभे होते. 

सायली पानसे ...हाच तो माणूस मला न्यायला आलेला. त्याच्या दिशेनी जाणार एवढ्यात शेजारच्या बोर्डवर नजर गेली… ए.आर. रेहमान... डोळ्यांवर झोप होती म्हणून डोळे चोळले आणि परत एकदा नाव वाचलं तर परत तेच नाव..! माझा आनंद गगनात मावेना... रेहमान इथे येणार आहेत आत्ता? आणि मला त्यांना बघता येणार आहे? 

मग वाटलं रेहमान येणार असतील तर केवढा तरी लवाजमा असणार, शिवाय त्यांना घ्यायला कोणी एकचजण थोडाच येणार, आणि त्यांच्यासारख्या माणसाला ओळखायला डोंबलाचा बोर्ड लागतोच कशाला? माझी उत्सुकता मला तिथून निघू देईना. मी, मला अपेक्षित होता त्या ‘रेहमान’जींची आशेनी वाट बघत उभी राहिले आणि काहीच क्षणात तो आलाच.

न कुठला लवाजमा, न कुठला अॅटिट्यूड. रेहमान अतिशय साधेपणानी तिथे आले आणि कुणाचं लक्ष जायच्या आत तिथून निघूनही गेले आणि मी बघतच राहिले.

ते निघून गेले पण माझ्या डोक्यातून त्यांचे विचार जाईनात, इतक्या कलाकारांना मी जवळून बघितलं आहे. त्यात अर्ध्या हळकुंडानी पिवळे होणारेच जास्त. स्वतःबद्दलच्या सूचनावजा मागण्याच जास्त. 

अशाच एका कार्यक्रमात झाकिर हुसेनजींना भेटायचा योग आला. त्यांच्या कार्यक्रमाआधी मला गायचं होतं. 

कार्यक्रम संपला आणि त्यांच्या भोवती एकच झुंबड उडाली. ह्या गर्दीत शिरावं तरी कसं आणि त्यांच्याशी बोलावं तरी काय ह्या संभ्रमात मी लांबच उभी राहिले पण या देवमाणसाला भेटल्याशिवाय जाता कामा नये असंही वाटत होतं. निघायची वेळ झाली, जाता जाता नमस्कार तरी करावा या विचारांनी मी पुढे सरसावले. आठवण म्हणून त्यांच्या बरोबर एखादातरी फोटो असावा म्हणून मैत्रिणीकडे कॅमेरा दिला आणि गर्दीत त्यांच्या समोर जाऊन उभी राहिले.

मला बघताच म्हणाले, “अच्छा गाती हैं आप मैने सुना अभी आपका गाना.” मी ऐकतच राहिले. एवढा मोठा माणूस माझ्या गाण्याची दखल घेतोय ..? माझी हिंमत जरा वाढली आणि हळूच एकच फोटो काढू का म्हणून विचारलं. ते हो म्हणतील अशी खात्री वाटत नव्हती. पण देव फारच उदार होता, माझ्या प्रश्नावर त्यांनी मलाच उपप्रश्न केला, “क्या मुझे आपके साथ एक फोटो मिल सकती है, सायलीजी?”

ते एका जुन्या पारंपरिक ठुमरीबद्दल मला सांगत होते. एवढ्यावर ते थांबले नाहीत. “क्या मैं आपकी तारीफ वो ठुमरी गाके सुनाऊँ..?” एव्हाना मी ढगातच होते.. आणि ते गुणगुणले, “रंग रसिली छबीली ऐसी नार, वो तो नैन के सैन से मारत बान ..” 

ती आठवण आयुष्यभरासाठी माझ्याकडे कैद राहिली.

दोन मोठे कलाकार. त्यांचा मोठेपणा फक्त त्यांच्या कलेत आणि त्यांच्या कामात नव्हता तर त्यांच्या वागण्यात ही पुरेपूर भरला होता. अशा कलाकारांचा आदर्श सर्व कलाकारांनी घेतला, तर कलाकार आधी उत्तम माणूस होईल आणि त्याची कला अजून अजून वृद्धिंगत होत राहील अनेक जन्म!

अशा अनुभवांनी कलाकार श्रीमंत होत असतो. सध्या मात्र सादरीकरणाची नशा, रंगलेल्या मैफलीचा आनंद आणि समाधान या सगळ्याला कलाकार मुकत आहेत. प्रत्यक्ष मिळणाऱ्या टाळ्या आणि श्रोत्यांच्या 'वाहवा’ला कलाकार पारखे झालेत. एखादी जमून आलेली मैफल आणि उत्स्फूर्त निघालेली 'दाद’ म्हणजे कलाकाराचा ‘ऑक्सिजन’च, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही आणि सध्या तर सर्वांनाच त्याची कमतरता भासत आहे. कलाकार तरी त्यातून कसे सुटणार!

सध्या कार्यक्रम नाहीत, ऑनलाइन शिक्षणात मन रमत नाही म्हणून विद्यार्थी कमी झालेत, पण तरीही सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कलाकार कलेत रममाण आहेत. आपल्या कलेतूनच पॉझिटीव्हीटी मिळवत आहेत. कार्यक्रम होत नसले तरी सर्जनाची भूक त्यांना शांत बसू देत नाही हे खरं. मग या ठाणबंदीचा सच्चा कलाकारांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. अनेकांनी घरी रेकॉर्डिंग सेटअप लावला. नवीन गाणी रेकॉर्ड केली, नवीन संगीत निर्माण केलं, व्हिडिओ केले आणि आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवले. काही कलाकारांनी सुंदर सुंदर चित्रे काढली. काहींनी नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ केले, तर काहींनी इतर विद्यार्थ्यांसाठी संगीताची वर्कशॉप घेतली. काही कलाकारांनी ज्येष्ठ कलाकारांच्या मुलाखती घेतल्या तर काहींनी आपल्या अनुभवांचे लेखन केले. लॉकडाउनच्या कृपेने माझ्याही हातून दोन पुस्तकांचे लिखाण झाले आणि संगीत क्षेत्रात नव्या रूपाने योगदान देता आले. कलाकार हा शांत बसणारा प्राणी नाहीच. त्याची प्रतिभा या न त्या मार्गाने वाट काढतेच. शेवटी कलाकाराला समाधान मिळणार ते कलाकृतीतूनच. 

या सगळ्या परिस्थितीमुळे अजून एक मोठा फायदा असा झाला की सगळ्या कलाकारांना रियाज करायला, चिंतन, मनन करायला मनसोक्त वेळ मिळाला. आता सर्व कलाकार नव्या उत्साहाने आणि उमेदीने, नवीन काहीतरी घेऊन तुम्हा सर्वांना आनंद द्यायला उत्सुक आहेत. तेव्हा लवकरच प्रत्यक्ष भेटू!!

संबंधित बातम्या