वाहन विम्याचे महत्त्व...

संपदा मराठे
बुधवार, 21 मार्च 2018

प्रत्येक वाहनचालकाने काटेकोरपणे व्यापक स्वरूपाचा विमा उतरवून वाहन चालविले पाहिजे. विमा नसताना जर अपघात झाला, तर त्याची असाधारण अशी भरपाई त्याला स्वतःच्या खिशातून द्यावी लागते.

महाभारतामध्ये महारथी कर्णाला कवचकुंडले होती, असे सांगितले जाते. या कवचकुंडलांमुळे त्याच्यावर कुठल्याही शस्त्राचा परिणाम होत नसे. आधुनिक युगात प्रत्येक वाहनचालकाला आपत्तीमधून सावरण्यासाठीचे सुरक्षा कवच म्हणजे विमा होय. देशात आयुष्याचा विमा आणि सर्वसाधारण विमा असे दोन प्रकार आहेत. आर्थिक उदारीकरणापूर्वी आयुष्याचा विमा उतरविण्यासाठी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही संस्था काम करीत असे. तसेच आरोग्य, वाहन, दुकान, घर यांसाठी सर्वसाधारण विमा उतरविला जात असे. हा विमा उतरविण्यासाठी सरकारी सहभागाच्या चार कंपन्या काम करीत असत. आर्थिक उदारीकरणानंतर मात्र देशात आयुष्य विमा व सर्वसाधारण विमा यांसाठी आज जवळपास ५० पेक्षा जास्त कंपन्या काम करीत आहेत. 

भारतीय मोटार वाहन कायद्यानुसार व वेळोवेळी या कायद्यामध्ये केलेल्या दुरुस्त्यांनुसार मोटारीचा, तसेच दुचाकीचा थर्ड पार्टी विमा उतरविणे प्रत्येक वाहनचालकाला सक्तीचे आहे. वाहन विम्यामध्ये थर्ड पार्टी विमा आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे व्यापक स्वरूपाचा विमा असे दोन प्रकार आहेत. थर्ड पार्टी विम्यामध्ये केवळ वाहनचालक चालवीत असलेल्या वाहनांवर जर दुसऱ्याचे नुकसान झाले, कुणाचा मृत्यू ओढवला तर त्यासंदर्भातील नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळते. मात्र, या स्वरूपाच्या विम्यामध्ये वाहनाचे नुकसान झाले, तर कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही. हा विमा अपुरा असतो, तो म्हणजे वाहनचालकाच्या हिताच्या दृष्टीने. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने आपल्या वाहनाचा व्यापक स्वरूपाचा विमा उतरविणे श्रेयस्कर असते. 

व्यापारी स्वरूपाची वाहने म्हणजे मालवाहतुकीसाठी आणि प्रवासी वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी वाहने ही विम्याच्या वेगळ्या गटामध्ये मोडतात. वैयक्तिक वापरासाठी असलेल्या दुचाकी आणि मोटारी यांच्या विम्याचे दर वेगळे असतात. विम्याचा दर त्या वाहनाची किंमत, तसेच त्याची क्षमता यांवर ठरते. वाहनाच्या इंजिनाची क्षमता लक्षात घेऊन वाहन विम्याचा दर बदलतो. त्याचबरोबर या किमतीमध्ये दरवर्षी साधारणपणे १० टक्के घसारा गृहीत धरला जातो. व्यापक स्वरूपाच्या विम्यामध्ये वाहनाची चोरी किंवा पुरामध्ये, दंगलीमध्ये, तसेच अन्य काही कारणांनी वाहनाचे नुकसान झाले, तर त्याची भरपाई देणे गृहीत धरलेले असते. 

मात्र, वाहन चालविण्याचा आवश्‍यक तो परवाना संबंधित चालकाकडे नसेल, तसेच वाहनचालकांनी अंमली पदार्थाचे सेवन केले असेल, किंवा वाहनाचा वापर बेकायदेशीर कामकाजासाठी केला असेल, तर या परिस्थितीमध्ये वाहनाचे नुकसान भरून दिले जात नाही. 

वाहनाचा विमा उतरविल्यानंतर या विम्याच्या कालावधीची तारीख कसोशीने पाळली जाते. वाहन विमा हा सर्वसाधारणपणे १ वर्षासाठी उतरविला जातो. एक वर्ष संपताना त्याचे नूतनीकरण करणे आवश्‍यक असते. मुदत संपण्यापूर्वी जर या विम्याचे नूतनीकरण केले गेले नाही, तर नव्याने वाहनाचे मूल्यांकन करून संबंधित वाहनाचा विमा उतरवावा लागतो. अशा स्वरूपाच्या केसेसमध्ये काही शुल्क दंड स्वरूपात त्या वाहन चालकाला भरावे लागतील. विमा उतरविल्यानंतरच्या १ वर्षांच्या कालावधीत जर समजा वाहनधारकाने कुठल्याही स्वरूपाचा क्‍लेम कंपनीकडे केला नसेल, तर त्याला पुढील वर्षी विम्याचे नूतनीकरण करताना नो क्‍लेम बोनस मिळू शकतो. 

थर्ड पार्टी विम्यापेक्षा व्यापक स्वरूपाचा विमा उतरविलेला असेल, तर अपघातामध्ये त्या वाहनाचे झालेले नुकसान कंपनीकडून मिळू शकते. तसेच काही पार्टस बदलले असल्यास त्याचाही खर्च मिळू शकतो. त्यासाठी वाहनधारकांनी कंपनीला योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून द्यावी लागते. 

देशातील विमा उद्योगाचे नियमन आयआरडीएकडून केले जाते. ज्याप्रमाणे देशातील मोबाईल कंपन्यांच्या कामकाजाचे नियंत्रण ट्रायकडून केले जाते. तसेच विमा प्राधिकरणाकडून देशभरातील विमा कंपन्यांच्या कामकाजाचे संचालन केले जाते. त्यामुळे विमा कंपनीच्या कारभारात सुसूत्रता राहते. विमा कंपनीने जर काही चुकीचे काम केले असेल, तर त्यासंदर्भात आयआरडीएकडे संबंधित विमाधारक दाद मागू शकतो. 

भारतात दुर्दैवाने विम्याबद्दल फारशी जागरूकता नाही. केवळ मोटार वाहन कायद्यातील तरतुदींमुळे थर्ड पार्टी विमा नाइलाज म्हणून उतरविला जातो. खरे तर प्रत्येक वाहनचालकाने काटेकोरपणे व्यापक स्वरूपाचा विमा उतरवून वाहन चालविले पाहिजे. काही वेळा बेपर्वाईने किंवा दुर्लक्ष झाल्यामुळे थर्ड पार्टी विमासुद्धा उतरविला जात नाही. असे करणे म्हणजे आपण ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेलो आहोत, याची जाणीव प्रत्येक वाहनचालकाने आपल्या मनाशी बाळगावे. विमा नसताना जर अपघात झाला, तर या अपघातात वाहनचालकांकडून दुसऱ्या व्यक्तीच्या जीवावर बेतले असेल, कुणाची हानी झाली असेल, तर त्याची असाधारण अशी भरपाई त्याच्या स्वतःच्या खिशातून द्यावी लागते आणि इतके मोठी रक्कम देणे अशक्‍य असल्याने दोन कुटुंबांचे नुकसान होणे अपरिहार्य असते. आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही बाब केवळ विमा न उतरविल्यामुळे घडू शकते. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने आपल्या वाहनात जसे आपण पेट्रोल किंवा डिझेल भरणे जेवढे आवश्‍यक समजतो, तेवढेच वाहनाचा विमा उतरविणे आवश्‍यक समजले पाहिजे. 

उदारीकरणानंतर आणि संगणकीकरणानंतर आता वाहन विम्यामध्ये व ते उतरविणाऱ्या कंपन्यांच्या कामकाजामध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. त्याप्रमाणे मोबाईल बिले करण्यासाठी जशी वेगवेगळी ॲप्स उपलब्ध झाली आहेत, तशी विम्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांकडून ॲप्स विकसित केली जात आहेत. या ॲप्समुळे कागदपत्रांचे जंजाळ कमी होऊन कामकाजात सुलभता येत आहे. 

परदेशामध्ये आता या ॲप्सचा पुढचा टप्पा म्हणजे वाहनाच्या सिस्टिममध्येच विमा कंपन्यांचे ॲप्स कसे समाविष्ट करता येईल, यावर संशोधन चालू आहे. ज्याप्रमाणे वाहनचालकाविना संगणकाआधारित गाडी तयार करण्याचे काम चालू आहे. तसे विमा कंपन्यांसंदर्भात वाहनांचे अंतर्गत प्रणालीमध्ये हे ॲप बसवून वाहनाला जेव्हा अपघात होईल, तत्क्षणी कंपनीला त्याची सूचना मिळेल, तसेच कंपनीच्या पॅनेलवरील गाडी दुरुस्त करणाऱ्या कंपनीला त्याची सूचना जाईल. संबंधित वाहनचालकापर्यंत तातडीची मदत यंत्रणा पोहोचेल, अशा स्वरूपाच्या सुविधा विकसित करण्याचे काम सध्या परदेशांत संशोधनाच्या अवस्थेत आहे.

आज जरी ही कल्पना वाटत असली, तरी येत्या १५ ते २० वर्षांत हे लोकांच्या आणि कंपन्यांच्या कामकाजाचा अंगभूत भाग असेल. इतकेच नव्हे तर अपघात होताचक्षणी त्या ठिकाणी स्वयंचलित ड्रोन तेथे जावून अपघाताचा सगळा रिपोर्ट तयार करून पंचनामा वगैरे या बाबींना कागदोपत्री पूर्णविराम देईल. सर्व गोष्टी डिजिटली केल्या जातील. 

भारतात या सुविधा येतील तेव्हा येतील, मात्र सध्या तरी प्रत्येक वाहनचालकाने विमा उतरविताना आपण कोणकोणत्या गोष्टींचा विमा उतरवीत आहोत, त्यामध्ये कुठल्या-कुठल्या जोखमीबद्दल भरपाई मिळण्याचा समावेश केला आहे का, याचे भान ठेवले पाहिजे. केवळ वाहन विकणारा वितरक किंवा विमा विकणारा एजंट, वेगवेगळ्या सवलती देत आहेत, म्हणून आंधळेपणाने विमा उतरविता कामा नये. गिफ्ट किंवा सवलत या स्वरूपाच्या आमिषाला बळी न पडताना आपले संरक्षण होणारे हे कवच जास्तीत जास्त बळकट, आपल्याला आपत्तीच्या काळात अधिकाधिक भरपाई मिळवून देणारे कसे असेल, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी जरी विम्याचा हप्ता जास्त वाटला, तरी भविष्याची तरतूद आणि आपल्या सुरक्षा कवचाचा केलेला तो भांडवली खर्च आहे, असे समजले पाहिजे.

एखादा रोग होऊ नये म्हणून जशी आपण लस टोचून घेतो, तीच काळजी विमा उतरविताना प्रत्येक वाहनचालकाने घेतली पाहिजे. कायद्यात सांगितले आहे म्हणून विमा उतरविणे हा उपचार झाला आणि सर्व गोष्टींचा योग्य तो अभ्यास करून वेळप्रसंगी जास्त रकमेचा हप्ता वाटला, तरीही पुरेसा विमा उतरवणे ही योग्य स्वरूपाची वाहन संस्कृती होय. 

 

फोटो फीचर

संबंधित बातम्या