घराचे 'डिजिटल' जोडीदार 

समृद्धी धायगुडे 
शुक्रवार, 16 मार्च 2018

कव्हर स्टोरी    
 

नवीन घराचे स्वप्न साकार झाले की, लगबग असते ती घर सजवण्याची आणि त्यानिमित्ताने घरात येणाऱ्या नवनवीन वस्तूंची. सध्या मेट्रो सिटीजमधील घरात अत्याधुनिक उपकरणांशिवाय पूर्णत्व येत नाही. आपल्याला दैनंदिन छोटी-मोठी कामे करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. सकाळी किंवा संध्याकाळी स्वयंपाक करताना, सुटीच्या दिवशी साफसफाई करताना लागणारा वेळ वाचविण्यासाठी अत्याधुनिक गॅजेटस खरेदी केली जातात. काही दिवसांपूर्वीच बिल गेटस यांचे आलिशान आणि स्मार्ट फोन चर्चेत आले होते. या घरातील प्रत्येक वस्तू, भिंत, फ्लोरिंग अगदी बागेतील झाडांची निगासुद्धा तंत्रज्ञानाने राखली जाते. यावरून प्रेरणा घेऊन भारतात देखील नवीन घरांमध्ये स्मार्ट होम्सची संकल्पना रुजत आहे.      
आज प्रत्येक घरात दिसणारा टीव्हीचे, फ्रिज, वॉशिंग मशिन यामुळे मानवी 
आयुष्य खूपच सुखकर झाले आहे. आयुष्य सुखकर करणाऱ्या अशाच काही होम गॅजेट्‌सविषयी...

शॉवर हेड विथ वायरलेस स्पीकर
हल्ली घरात अनेक अत्याधुनिक गॅजेट्‌स आपण वापरत असतो. ‘शॉवर हेड विथ वायरलेस स्पीकर’ हे असेच एक नवीन गॅजेट्‌स बाजारात आलेले आहे. हे गॅजेट आपण बाथरूममध्ये लावू शकतो. या गॅजेटमुळे तुमच्या शॉवरला तुमचा स्मार्टफोन ब्ल्यूटूथद्वारे कनेक्‍ट करता येतो. एकीकडे शॉवर घेत असताना, तुम्ही तुमच्या आवडीच्या संगीताचा आनंद घेऊ शकता. या शॉवर हेडची बॅटरी सात तास चालते. म्युझिक, न्यूज आणि इतर बरंच काही मोबाईलद्वारे या गॅजेट्‌सशी आपण जोडू शकतो. 

पॉवर डॉक 
आजकाल घरात कोणी पाहुणे आले की, पहिल्यांदा विचारणा होते ती म्हणजे स्मार्टफोन चार्जिंगची. यासाठी सतराशे साठ चार्जर विविध प्लगवर लावण्याऐवजी एकाच पॉवर डॉकवर पॉवर बॅंक, स्मार्टफोन पाच सहा गॅजेटस आपण एकावेळी चार्ज करू शकतो. या डॉकमधील प्रत्येक पोर्ट दहा वॅटचा आहे. आयफोन, आयपॅडसारखी गॅजेटस या पॉवर डॉकचा वापर करून पटकन चार्ज होतात.

युनिव्हर्सल रिमोट फॉर स्मार्ट होम 
लॉजिटेक या कंपनीने स्मार्ट होमची संकल्पना लक्ष्यात घेऊन एक वैशिष्ट्यपूर्ण रिमोट कंट्रोलची निर्मिती केली आहे. ज्याचा वापर करून घरातील सर्व उपकरणांना नियंत्रित करता येते. या रिमोटने आपण नेस्ट थर्मोस्टॅट, दिवे, स्पीकर, केबल बॉक्‍स, गेम, टीव्ही, मीडिया स्ट्रीमर अशी विविध उपकरणे सहज नियंत्रित करता येतात. 

ब्ल्यूटूथ की-लेस  स्मार्टलॉक
जेव्हा आपण हौसेने घर घेतो तेव्हा त्याच्या सजावटीसोबतच सुरक्षेसाठी देखील काळजी घेणे आवश्‍यक असते. घरातून बाहेर पडताना साध्या कुलपाची नाही तर एका स्मार्ट चावीच्या कुलपाची गरज आहे. हे कुलूप आयओएस, अँड्रॉईड,विंडोज  डिव्हाईसला ब्ल्यूटूथने जोडता येते. हे कुलूप अतिशय सुरक्षित असून यामध्ये तुम्ही घर कधी आलात कधी बाहेर गेलात याची माहिती ठेवते.  

स्मार्ट पॉट 
या कुंडीत लावलेले झाड आणि त्याच्या वाढीची, पाण्याची,तापमानाची काळजी देखील घेते, योग्यवेळी नियंत्रित देखील करते. या कुंडीतील तंत्रज्ञान आपल्या स्मार्टफोनला एका ॲपच्या साह्याने जोडल्यास तुम्ही लावलेल्या झाडाची वाढ स्मार्टफोनवरही पाहू शकता.

स्मार्ट वॉलपेपर्स
गृहसजावटीमध्ये वॉलपेपर्सची क्रेझ वाढली आहे. घरात लावले जाणारे हे साधे वॉलपेपर्स साधारणपणे सहा महिने किंवा वर्षभराने बदलले जातात. यापेक्षा आपल्या खोलीतील प्रत्येक वातावरणाला साजेसे असे वॉलपेपर लावण्यापेक्षा एकच स्मार्ट वॉलपेपर लावला तर घर आणखी स्मार्ट दिसते. लंडन येथील ’सुर्रे’ विद्यापीठातील संशोधकांनी ‘नॅनोटेक्‍चरिंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तंत्राचा वापर करून खूप पातळ ग्रॅफेन शीट तयार केल्या आहेत. ज्याचा वापर वाया जाणाऱ्या प्रकाश किंवा उष्णतेपासून वीज तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. यातूनच स्मार्ट वॉलपेपरची संकल्पना विकसित झाली आहे. परदेशात प्रसिद्ध होत असलेली ही संकल्पना अजून भारतात हळूहळू रुजत आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या