‘प्रवास’ सुरू होईल...(?)

संजय दाबके 
सोमवार, 6 जुलै 2020

कोरोना संसर्गाचा सर्वांत पहिला फटका पर्यटन क्षेत्राला बसला. सर्व देशांनी आपापल्या सीमा बंद केल्या आणि सर्वांचा प्रवास थांबला! हा प्रवास पुन्हा सुरू करण्यासाठी आणि पर्यटन व्यवसायाला पूर्वपदावर आणण्यासाठी देशांतर्गत पर्यटनाची मदत होईल.

चीनमधल्या कोरोनाच्या साथीच्या बातम्या २०२० च्या जानेवारीतच जगभर अगदी ठळकपणे सांगायला सुरुवात झाली होती. पण, जे होते आहे ते चीनमध्ये.. आपल्याला काय त्याचे? अशी भावना जगभरात सगळीचकडे होती. चीनमध्ये शहरेच्या शहरे बंद होत होती. आमच्या काही कन्साईनमेंट्स तिथून यायच्या होत्या, त्याचा थोडा खोळंबा झाला होता खरा; पण होईल सर्व काही ठीक, या पलीकडे फारशी काळजी वाटत नव्हती. तिथल्या मित्रांकडून परिस्थितीचा गंभीरपणा समजत होता. फेब्रुवारीमध्ये संपूर्ण चीनमध्ये ‘स्प्रिंग फेस्टिव्हल’ असतो. सगळ्यांना दोन आठवडे सुटी असते आणि या काळात सगळा चीन देश रस्त्यावर असतो. सगळी हॉटेले, पर्यटन स्थळे, थीम पार्क्स ओसंडून वाहात असतात. हायवेवर गाड्यांची संख्या इतकी असते, की सरकार या दिवसांत सगळे टोलनाके बंद करून टाकते! एका क्षणात निर्णय झाला, की या वर्षीचा ‘स्प्रिंग फेस्टिव्हल’ सरकारने रद्द केला आहे. हे कळत होते, तरीही हे सगळे चीनमध्ये चाललेय.. थांबेल थोड्या दिवसांनी.. असा विचार करून जगाचे रहाटगाडगे पुढे चालले होते. 

फेब्रुवारी उजाडला. मला आता या महिन्यात तीन परदेश प्रवास होते. फेब्रुवारी १० ला मी ॲमस्टरडॅमला गेलो. तीन दिवस काम होते, ते संपवून म्युनिकला गेलो. ॲमस्टरडॅमच्या कॉन्फरन्समध्ये कोरोनाच्या भीतीमुळे हस्तांदोलन किंवा शेकहॅण्ड बंद झाले होते. तरी सोशल डिस्टन्सिंग हे शब्द अजून प्रचारात यायचे होते. इथे चिनी व्यावसायिक खूप प्रमाणात होते. इटलीमध्ये हा रोग फैलावतोय अशा बातम्या यायला सुरुवात झाली होती. म्हणजे मी जिथे होतो, तिथून हा रोग जवळच्याच अंतरावर पसरत होता, पण तरीही हे तेवढ्यापुरतेच असणार, असा रागरंग होता. हॉलंड आणि जर्मनी दोन्ही देशांमध्ये टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये, आता कोरोना आणि कोविड १९ या शब्दांना बातम्यांच्या ‘प्राइम टाइम’वर महत्त्व प्राप्त झाले होते. १८ फेब्रुवारीला मी म्युनिकहून परत आलो. भारतात या गंभीर संकटाचा अजून कोणाला पत्ताही नव्हता. पुढच्याच तीन दिवसांत मी एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी चीनमधल्या झिगॉंग या गावी जाऊन येणार होतो. पण युरोपमध्येच मला एकंदर अनुभवाने जाणवले होते, की आत्ता चीनचा शिक्का पासपोर्टवर बसला, तर पुन्हा युरोपमध्ये प्रवेश मिळणे कठीण आहे. त्यामुळे मी केलेली सगळी विमान आणि हॉटेल्सची आरक्षणे रद्द करून टाकली. कारण लगेचच इंग्लंडचा प्रवास होता. 

मी २३ फेब्रुवारीला लंडनला पोचलो.. आणि वाटले होते तसेच झाले. इमिग्रेशनचा शिक्का बसायच्या आधी, चीन किंवा पूर्वेकडच्या देशात ज्यांनी नुकताच प्रवास केलाय अशांना आणि त्यातल्या त्यात चिनी वंशाच्या दिसणाऱ्या प्रत्येक माणसाला जर तो आशिया खंडातून आला असेल, तर वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय इंग्लंडमध्ये प्रवेश बंद करण्यात आला होता. आता रोज BBC वर कोरोनाच्या बातम्यांचा रतीब सुरू झाला होता. पण अजूनही इटली, स्पेन आणि फ्रान्स इथेच तो जास्त प्रमाणात आहे अशी सगळ्या ब्रिटिश जनतेचीसुद्धा समजूत होती. तो आठवडा मी इंग्लंडमध्ये प्रवास करत होतो. हळूहळू सगळे जग जागे होत होते. हे संकट आता कुठल्याही क्षणी आपल्यापर्यंत पोचणार हे सगळ्यांनाच समजले होते. ३ मार्चला मी भारतात परत आलो आणि त्याच सुमारास दुबई आणि इतर गल्फ देशांमध्ये मोठ्या प्रमाणात या रोगाची लागण झाल्याच्या बातम्या यायला लागल्या. आता इथून भारत कितीसा लांब आहे! रोज सुमारे दीडशेपेक्षा जास्त विमाने भारतातून या भागात ये-जा करत असतात. धडाधड तिथून लोक यायला लागले आणि म्हणता म्हणता आगीसारखा हा रोग सगळ्या भारतात पसरला. याचा पहिला फटका अर्थातच पर्यटनाला बसला. सगळ्या देशांनी आपापल्या सीमा बंद करायला सुरुवात केली. अर्थातच विमानप्रवास संपुष्टात आला. उन्हाळी मोसमाच्या सुट्या असल्याने तोपर्यंत अनेक जणांनी पैसे भरून पर्यटन संस्थांतर्फे देशात, परदेशात उन्हाळ्यातल्या सहली आयोजित केल्या होत्या. त्या सगळ्यांना ग्रहण लागले. प्रवासाचे साधनच नाही, तर तिथे जाणार कसे? हॉटेल्सची बुकिंग्स रद्द व्हायला लागली. तरी मार्च संपेपर्यंत काही विमाने सुरू होती. पण साधारण ५३ टक्के जागतिक वाहतूक कमी झाली होती. आता जगाला आपापल्या घराकडे परत यायची ओढ लागली होती. त्या परतीच्या प्रवाशांचाच फक्त प्रवास सुरू होता. 

देशांतर्गत परिस्थितीतही फरक जाणवायला लागला होता. १२ मार्चला निघून मी दिल्ली - नागपूर - पुणे असा प्रवास करून १७ मार्चला पुण्याला पोचलो आणि २० मार्च या तारखेपासून देशांतर्गत वाहतूकसुद्धा पूर्णपणे ठप्प झाली. विमाने, रेल्वे, बस, गाड्या सगळे काही जागच्या जागी थांबले! एप्रिल आणि मे महिना हा पर्यटनासाठी अत्यंत भयानक दुःस्वप्न ठरला. आताही जागतिक वाहतुकीच्या ९७ टक्के वाहतूक बंद आहे. पर्यटन क्षेत्र म्हटले, की त्यात अनेक गोष्टी येतात. विमाने, रेल्वे, बस, खासगी गाड्या, प्रवासाची साधने, पर्यटन स्थळे, थीम पार्क्स, हॉटेल्स, जगभर चालणारे नाना प्रकारचे इव्हेंट्स किंवा व्यावसायिक संमेलने. फेब्रुवारीपर्यंत नक्की होणार याची खात्री असणाऱ्या या सगळ्या गोष्टींना अचानक खीळ बसली आणि पर्यटन क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले. पर्यटन क्षेत्रात वर उल्लेख केलेल्या सेवा तर येतातच; पण त्या शिवाय बुकिंग एजंट्स, स्थानिक वाहने, तिकीट विक्री करणारे, देवस्थान असेल तर पुजाऱ्यांपासून ते फुले विकणारे, प्रसाद विकणारे, चपला सांभाळणारे ते पार्किंगपर्यंत अनंत व्यवसाय करणारे असे अनेक लोक येतात. हा आकडा या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकृत नोकरदारांपेक्षा कित्येक पटींनी जास्त असतो. एक उदाहरण माहिती आहे म्हणून सांगतो... रामोजी फिल्मसिटी या हैदराबादच्या प्रसिद्ध थीमपार्कमध्ये सगळे मिळून साधारण ३००० लोक कामाला असतील. पण हैदराबादमध्ये या पार्क्सशी निगडित; पण थेट नोकरीत नसलेले सुमारे ४५ हजार लोक आहेत, की ज्यांची उपजीविका एका अर्थाने रामोजी फिल्मसिटीवर अवलंबून आहे. त्या सगळ्यांच्या आयुष्यात अंधःकार पसरला! देशात दार्जिलिंगपासून महाबळेश्वर, उटीपर्यंतच्या थंड हवेच्या ठिकाणांवर स्मशान शांतता पसरली. 

सिंगापूर, थायलंड, दुबई, अबुधाबी, मॉरिशस, मालदीव बेटे, सायप्रस, कॅरेबियन बेटे असे काही देश, की जिथे संपूर्ण देश पर्यटनावर चालतो; त्यांची अवस्था वेगळी नव्हती. मुळात सामान्य माणूस पर्यटनाचा जो विचार करतो त्यापेक्षा कितीतरी अधिक कंगोरे या विषयाला आहेत. उदाहरणार्थ, पर्यटनाचा एक महत्त्वाचा आधार म्हणजे व्यावसायिक संमेलने (ट्रेड शोज), जी जगात सतत कुठे ना कुठे तरी सुरू असतात. लंडन, पॅरिस, दुबई, सिंगापूर, गोंझाऊ, कान, लास वेगास, ओरलँडो या शहरांमध्ये एक झाले, की दुसरे अशी श्वासाची फुरसत न घेता हे शोज सुरू असतात. एका आठवड्याच्या काळात हे सर्व रद्द झाले. अगदी आजपर्यंत हे शोज सादर करणाऱ्या कंपन्या अंदाज घेत आहेत, आपापल्या सरकारांबरोबर बोलत आहेत; पण डिसेंबरपर्यंत यातला एकही शो पुन्हा सुरू होईल याची कोणालाच खात्री वाटत नाही. यातल्या काही शोजना लाख लाख लोकांची उपस्थिती असते. यातले बहुतेक सगळे दुसऱ्या देशांमधून प्रवास करून येतात, हॉटेलात राहतात, टॅक्सीने स्थानिक प्रवास करतात, रेस्टॉरंट्समध्ये खातात, पितात, दुकानांमधून खरेद्या करतात... या सगळ्या शहरांची अर्थव्यवस्था या शोजवर अवलंबून असते. हे सगळे आत्तातरी संपले आहे. या फक्त अशा ट्रेड शोसंबंधित काम करणाऱ्या जवळ जवळ ५० लाख लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. 

एक ऑस्ट्रियासारखा छोटासा देश. या देशात दरवर्षी २२ हजार प्रदर्शने असतात. ती सगळी रद्द करावी लागली आहेत. हे जर एका लहानशा देशाचे चित्र असेल, तर जगभर काय नुकसान झालेय याची कल्पना येते. 

दुबईचे उदाहरण देतो. २०२० च्या ऑक्टोबरपासून त्यांनी अत्यंत भव्य असे सहा महिने चालणारे एक्स्पो किंवा प्रदर्शन आयोजित केले होते. याची जाहिरातच गेली चार वर्षे सुरू आहे. १३५ देशांची अतिभव्य दालन तिथे बांधली जात आहेत. दुबईसारख्या छोट्या देशासाठी ही फार मोठी उडी होती. आज ही उडी पूर्णपणे हुकली आहे. ज्या एक्सपोमुळे दुबईत साधारण दोन कोटी पर्यटक येतील असा अंदाज होता ते प्रदर्शनच आता २०२१ मध्ये ढकलावे लागले आहे. यात कल्पना येणार नाही असे नुकसान झाले आहे.  

आता तीन महिन्यांनंतर परिस्थिती अगदी हळूहळू, पण निश्चितपणे पूर्वपदावर यायचा प्रयत्न करत आहे. या साथीवर औषध नाही आणि त्याच्या प्रसारामुळे जर आणखी काही काळ देशच्या देश बंद केले, तर होणारे अपरिमित नुकसान सोसायची आता कोणाचीच तयारी नाही. काहीही करून अर्थव्यवस्था सुरू झाल्याच पाहिजेत असा निश्चय बहुतेक देशांनी केलेला आहे. यातल्या कित्येक देशांच्या GDP च्या ३० टक्के उत्पन्न हे पर्यटनातून येत असल्याने पर्यटन क्षेत्र खुले करण्याशिवाय पर्यायही नाही. त्यामुळे अनेक देश, अनेक पद्धतीने विचार करत आहेत. काही देशांनी ‘ट्रॅव्हल बबल्स’ म्हणजे काही विशिष्ट भागापुरते ‘प्रवासी संकुल’ तयार केले आहेत. नुकताच एस्टोनिया, लॅटव्हिया आणि लिथुआनिया या देशांनी फक्त या तीन देशांच्या नागरिकांना आपापल्या सीमा खुल्या करून दिल्या आहेत. त्यामुळे या प्रवाशांना इथे विनादिक्कत प्रवास करता येणार आहे. असाच प्रयत्न न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी सुरू केला आहे. तैवान, कोरिया अशाच प्रयत्नांत आहेत. 

युरोपमधल्या बहुतेक देशांत आज जर तुम्ही गेलात, तर १४ दिवसांचे क्वारंटाईन सक्तीचे आहे. पण असे ठेवले तर पर्यटन संपलेच! म्हणून युरोपमधल्या बहुतेक देशांनी ज्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना प्रवेश हवा आहे अशांनी त्यांच्या देशातून येताना ‘कोरोना निगेटिव्ह’ असल्याचे प्रमाणपत्र आणणे गरजेचे आहे, असे जाहीर केले आहे. हे म्हणजे पूर्वी अमेरिका - इंग्लंडला जाताना काळ्या, पिवळ्या तापाची इंजेक्शने घेऊन जायला लागायची तसा प्रकार आहे. त्यातही हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेआधी जास्तीतजास्त चार दिवस आधी घेतलेले असले पाहिजे असाही नियम बहुधा येतोय. आता अशी बनावट प्रमाणपत्रे मिळायला लागतील का? आणि ती स्वीकारली जातील का? हेही प्रश्न आहेतच. समजा तुम्ही असे प्रमाणपत्र घेऊन १० तासांचा प्रवास करून लंडनला पोचलात आणि तिथे इमिग्रेशनच्या टेबलावर ते प्रमाणपत्र स्वीकारलेच नाही, तर? 

या कुठल्याही प्रश्नांची उत्तरे आत्ता कोणाकडेच नाहीत. पुढच्या दोन महिन्यांत बऱ्याचशा गोष्टी सुरळीत होतील आणि एक नवीन आंतरराष्ट्रीय सिस्टीम किंवा कार्यपद्धती निश्चितपणे तयार होईल. या बाबतीत प्रत्येक देशाची वेगळी पद्धत, असे होऊ शकत नाही. जगभरच्या विमान कंपन्या जशा एकाच पद्धतीने चालतात तशीच ही सिस्टीम सगळीकडे चालेल. 

बऱ्याच हवाई कंपन्या १५ जुलैपासून आपली आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरू करत आहेत. सुरुवातीचे काही महिने तरी त्यांना खूप तोटा सोसून धंदा करायला लागणार आहे हे निश्चित. मात्र, सर्वसामान्य माणसाच्या मनातली या साथीची भीती काही अंशाने तरी कमी होत नाही, तोपर्यंत लोक प्रवास करायला धजावणार नाहीत. व्यावसायिक कामासाठी प्रवास करणारे माझ्यासारखे जे असंख्य लोक आहेत, ते थोडा धोका पत्करूनही कदाचित प्रवास करतील पण तेही ‘आपण तिथे अडकून पडणार नाही’ याची खात्री होत नाही तोपर्यंत प्रवास करणार नाहीत. 

डिस्नेलँड, युनिव्हर्सल स्टुडिओज, लेगोलँड, सिक्स फ्लॅग्स या सारखी थीमपार्क्स जिथे रोज लाखांनी लोक जमतात ती पूर्णपणे बंद होती. भारतातही रामोजी फिल्मसिटी, एस्सेलवर्ल्ड, इमॅजिका यांची हीच परिस्थिती झाली आहे. पर्यटन हा गर्दी जमवायचाच व्यवसाय असल्याने सर्वांत शेवटी हा व्यवसाय उघडणार हे निश्चित आहे. नुकताच नितीन गडकरी यांनी या क्षेत्रातल्या लोकांची मीटिंग घेऊन त्यांना करता येईल तितकी मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे. कारण पर्यटन हा जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणारा व्यवसाय आहे, याची सरकारलाही जाणीव आहे. 

त्यामानाने आपल्या देशातल्या देशातले (देशांतर्गत) पर्यटन मात्र लवकर पुन्हा पूर्ववत व्हायची संधी खूप अधिक आहे. एकतर आपल्या भारतीय लोकांची देवावर श्रद्धा अफाट आहे. आपले ७० टक्के पर्यटन हे देवाचे दर्शन घ्यायला होते. कुटुंबेच्या कुटुंबे हा प्रवास, चार धाम, वैष्णोदेवी ते शिर्डी ते तिरुपती बालाजीपर्यंत असंख्य देवस्थानांकडे करत असतात. या साथीतून थोडीशी सुटका जरी झाली, तरी माझ्या अंदाजाने देवदर्शनासाठी तुफान गर्दी उसळेल. ती कशी नियंत्रित करायची हाच मोठा प्रश्न असेल. त्यामुळे गाड्या, रेल्वे, विमाने यांची स्थिती काही प्रमाणात तरी पूर्ववत व्हायला मदत होईल. आंतर्देशीय विमान कंपन्यांनी या आधीच थोडा अंदाज घेत उड्डाणे सुरू केली आहेत. जे जगाला लागू होते तेच आपल्या देशाला; त्यामुळे, प्रत्येक राज्याने आत्तापर्यंत तरी वेगवेगळे निर्णय घेतल्यामुळे या कंपन्यांसाठी उड्डाणे चालवणे जिकिरीचे होत आहे. परंतु लवकरच यावर तोडगा काढावा लागेल आणि संपूर्ण देशाचे एकच असे धोरण भारताला ठरवावे लागेल. दुर्दैवाने नेमक्या याच काळात कोरोनाच्या केसेस प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने यात अनंत अडचणी येणार आहेत. भारतीय माणसाला परदेशी प्रवेश मिळणेसुद्धा याच कारणामुळे पुढच्या काही काळासाठी अवघड होणार आहे. 

पण येणारा काळ हा सणावारांचा काळ आहे. याच काळात देशाची जनता आणि त्यातूनही मध्यम आणि गरीब वर्ग वेगवेगळे व्यवसाय करून चार पैसे मिळवतो आणि त्यातूनच थोडाफार खर्चही करतो हे लक्षात ठेवूनच सरकार या पुढचे निर्णय घेईल असे वाटते. आगामी गणपती, बंगालची दुर्गापूजा आणि देशभरची दिवाळी आणि त्यानंतरचा नाताळ याच गोष्टी देशाच्या पर्यटन व्यवस्थेला थोडा तरी हातभार लावतील आणि पूर्वपदावर आणायला मदत करतील. 

जागतिक तज्ज्ञ आत्ता ३ प्रणाली किंवा मॉडेल्स सांगत आहेत... 

  • पर्यटन जुलैच्या मध्यावर-अखेरीस सुरू करणे-यामुळे २०२० चे पर्यटन क्षेत्राचे होणारे नुकसान हे ५२ टक्के असेल. 
  • पर्यटन सप्टेंबर अखेरीस उघडणे-यातून हाच तोटा सुमारे ७२ टक्के असेल आणि जर 
  •  हे डिसेंबरपर्यंत लांबले तर हा वार्षिक तोटा सुमारे ९० टक्क्यांपर्यंत जाईल. साहजिकच या क्षेत्राशी संबंधित प्रत्येक जण ही प्रार्थना करत आहे, की लवकरात लवकर या साथीचा प्रादुर्भाव कमी व्हावा आणि पर्यटनाचा आनंद पुन्हा जगभर पसरावा... 
  •  साधारण दीड कोटी लोकांचा रोजगार आणि २ ट्रिलियन डॉलर्सचा व्यवसाय करणारी ही इंडस्ट्री तेव्हाच सुटकेचा निःश्वास टाकेल!

प्रतिक्रिया
डोमेस्टिक टुरिझमला प्रमोट करावे
कोरोनाचा सगळ्यात पहिला फटका बसला तो पर्यटन क्षेत्राला आणि आता सर्वात उशिरा सुरू होणारे क्षेत्रही पर्यटन क्षेत्रच असेल. कारण पर्यटन हा विषय काही जीवनावश्यक भाग नाही. मनःशांतीसाठी, आनंदासाठी माणूस पर्यटन करत असतो. मग ते स्थानिक पर्यटन असेल, राष्ट्रीय असेल किंवा आंतरराष्ट्रीय पर्यटन असेल. सध्या जीवनावश्यक गरजा पुरवणारी इतर क्षेत्रे सुरू झाली आहेत. पर्यटन उद्योजक तर तयारच आहेत. परंतु, सध्या लोकांची पर्यटनाला जाण्याची मानसिकता नाहीये. अशावेळी सरकारने जर वेगळ्या पद्धतीने लोकांना आवाहन केले, तर कदाचित पर्यटन क्षेत्र पुन्हा उभारू शकेल. 

 खरे तर भारतातील पर्यटन वाढवण्यासाठी ही एक मोठी संधी आहे. मागील १० वर्षांमध्ये पर्यटनाला जायचे म्हणजे परदेशातच जायचे असे होते. त्यामुळे परदेशी विमान कंपन्या, हॉटेल्स यातून मोठ्या प्रमाणात महसूल परदेशात जात होता. मात्र आता परदेशात जाणे थोडे रिस्की असल्यामुळे सरकारने भारतातील पर्यटनाला चालना द्यावी. लोकांची मानसिकता बदलावी. लोकांच्या मनातील भीती काढावी. भारतातील पर्यटनाचा विचार केला, तर भारतात सर्वच प्रकारची ठिकाणे आहेत. उदा. हिमालय आहे, वाळवंट आहे, रेन फॉरेस्ट आहेत, धार्मिक स्थळे आहेत, कृषी पर्यटन, शैक्षणिक पर्यटन मोठ्या प्रमाणावर आहे. यांना जर आत्ताच्या काळात प्रमोट केले, तर डोमेस्टिक पर्यटन वाढेल. शिवाय याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल.

  सध्याची परिस्थिती बघता आपल्याला कोरोनाबरोबर राहावे लागणार आहे. त्यामुळे टुरिझम कंपन्यांनीही योग्य ती काळजी घेतली तर पर्यटन सुरू करता येईल. सरकारने पर्यटनाला प्रमोट करताना डोमेस्टिक टुरिझमला प्राधान्य दिले पाहिजे. यातून महसूल तर जमा होईल; शिवाय लोकांना रोजगारही उपलब्ध होईल आणि त्यातून अर्थचक्र सुरळीत होईल. पर्यटनाची नव्याने सुरुवात करताना ग्रामीण पर्यटनाला नक्कीच प्राधान्य देता येईल. कारण पर्यटन क्षेत्र पूर्वपदावर येण्यासाठी आणखी वर्षभराचा तरी वेळ लागेल. फॉरेन टुरिझम बराच काळ बंदच राहील. तसेच भारतातील काही ठिकाणी जाण्यासाठी विमानसेवा, रेल्वेसेवा लागू शकते. अशावेळी जवळ असणारी कृषी, ग्रामीण पर्यटनाची काही ठिकाणे निवडता येतील आणि हळूहळू पर्यटनाची सुरुवात होऊ शकेल. आज जवळपास लाखोंच्या संख्येत या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत आणि ते गेल्या चार महिन्यांपासून घरात बसले आहेत. यांना कुठेतरी थोडाफार आर्थिक हातभार लागेल, त्यासाठी त्यांना काम हवे आहे. या आर्थिक विवंचनेत सापडलेल्या वर्गाला वर येण्यासाठी पर्यटन काही प्रमाणात का होईना सुरू होणे आणि पर्यटनाला सरकारने प्रमोट करून चालना देणे गरजेचे आहे.   
- कॅप्टन निलेश गायकवाड

ग्रामीण पर्यटनातून मिळेल चालना 
हॉंगकॉंगसारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशानेही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून कोरोनाला पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवले आहे. तेच आपणही करू शकतो. त्यामुळे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सरकारने पर्यटनाला लवकरात लवकर परवानगी द्यावी. शिवाय लोकांनीदेखील मनातील भीती काढून टाकायला हवी. अर्थात प्रत्येकाच्या आयुष्याचे मोल आहेच. पण बघायचे झाले तर मलेरिया या आजारावर लस आहे, मात्र तरीही वर्षाला होणारे मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे. 

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे व्हॉट्सअॅप असेल, टीव्ही असेल या मीडिया पॅनिकमुळेही लोकांमध्ये भीती वाढत आहे, हेही कमी व्हायला पाहिजे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग अशी सर्व प्रकारची काळजी  घेऊन पर्यटन पहिल्यासारखे सुरू करावे. रेल्वे, विमानसेवाही सुरू करावी, असे माझे वैयक्तिक मत आहे. एकूण परिस्थिती बघता लोकांमधील भीती जशी जाईल, तसे पहिले डोमेस्टिक टुरिझम सुरू होईल आणि टप्याटप्याने इंटरनॅशनल सुरू होइल. पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्रामीण पर्यटनाचा उत्तम पर्याय आहे. कारण ग्रामीण ठिकाणी हवा खेळती असते. त्यामुळे कृषी पर्यटन सुरू करायला हरकत नसावी. कारण या क्षेत्रावरही अवलंबून असलेले अनेक छोटे मोठे व्यवसाय आहेत. - विवेक गोळे, भाग्यश्री ट्रॅव्हल्स

डोमेस्टिक टुरिझमला संधी 
पर्यटन पूर्वपदावर येण्यासाठी एक तर सरकारकडून लोकांना विश्वास दिला जावा. तसेच काही करांमध्ये सवलती देता आल्या, तर द्याव्यात. शिवाय पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही सरकारची मदत लागणार आहे. ट्रॅव्हल एजन्सी म्हणून आम्हालाही लोकांना तो विश्वास द्यावा लागेल, की ज्या बसने तुम्हाला घेऊन जाणार आहोत, ती बस पूर्णपणे सॅनिटाईज केलेली असेल, आमचे ड्रायव्हर सॅनिटाईज्ड असतील, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल. ही सर्व काळजी घेऊन पर्यटन सुरू करण्यास पर्यटकांचीही हरकत नसावी. कारण जग हे वेगवेगळ्या प्रकारे अनुभवण्यासाठी आपण पर्यटन करत असतो. म्हणजे जर तुम्ही प्री-कोविड दुबई बघितले आहे, तर आता कोविडनंतरचे दुबई बघू शकता. लोकांकडे ही एक आठवण राहणार आहे. पर्यटन ही थांबणारी गोष्ट नाहीये, ती अखंड सुरू राहणारी गोष्ट आहे. एकदा पर्यटनाला सुरुवात झाली, की लोकांमध्ये तो विश्वास येईल.        

सध्याच्या काळात डोमेस्टिक टुरिझमला खरोखरच संधी आहे. कारण जगभरात भारताचे कौतुक आहेच. फक्त कमी एकच आहे, ती म्हणजे आपले इन्फ्रास्ट्रक्चर आंतरराष्ट्रीय लेव्हलचे नाहीये. पर्यटनासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती इन्फ्रास्ट्रक्चर. पण आता काही प्रमाणात ते डेव्हलपही होत आहे.  

- झेलम चौबळ, केसरी टूर्स

संबंधित बातम्या