धडाकेबाज मनू

संजय घारपुरे
सोमवार, 11 जानेवारी 2021

नवे वर्ष नव्या आशा घेऊन येत असते. कोरोनामुळे लांबलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारतास अनेक पदकांची आशा आहे; त्यात पी. व्ही. सिंधू, राही सरनोबतसारख्या खेळाडू आहेत. तसेच गतऑलिंपिकच्यावेळी खेळाला सुरुवात केलेली, पण काही वर्षात प्रगती केलेली मनू भाकरही त्यात आघाडीवर आहे. ऑलिंपिकच्या वाढत्या दडपणास आपण सामोरे जाऊ शकतो हे तिने युवा ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून दाखवले आहे....

‘अपरिमित कष्ट केल्यावर त्याचे फळ मिळते, मी कसून मेहनत घेतली, त्यामुळेच मी एवढ्या कमी कालावधीत एवढी प्रगती केली आहे,’ हे अनेक खेळाडूंनी अथवा त्यांच्या मार्गदर्शकांनी अनेकदा सांगितले आहे. पण त्यापैकी खरा अनुभव खूपच कमी क्रीडापटू देतात. मनू भाकर ही त्यापैकीच एक आहे.

चार वर्षांपूर्वी अर्थात २०१६ची रिओ ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा जुलैमध्ये झाली होती आणि मनूने नेमबाजीच्या सरावासाठी एप्रिलमध्ये पिस्तूल हाती घेतले. त्यानंतर झपाट्याने प्रगती करीत तिने केवळ ऑलिंपिक पात्रताच मिळवलेली नाही, तर तिच्याकडून भारताला पदकाची आशा आहे. विश्वकरंडक तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदकाचा सातत्याने वेध घेत तिने अपेक्षा उंचावल्या आहेत. या स्वप्नवत प्रवासाबाबत काय वाटते याबद्दल विचारल्यावर मनू आपण फारसे काही साध्य केले आहे असे आपणास वाटत नसल्याचे सांगितले. ‘मेहनत केल्यास सर्व काही साध्य होऊ शकते यावर माझा विश्वास आहे. तुम्ही जितके जास्त कष्ट करता तेवढे जास्त यश तुम्हाला मिळत असते. त्यामुळे मी ही झेप पटकन घेतली हेच मला मान्य नाही. ही माझी धक्कादायक वाटचाल आहे, हे मला मान्य नाही,’ असे तिने सांगितले.  
कमी वयात मिळवलेल्या यशामुळे आपली ओळख निर्माण झाली आहे, त्याचा आपल्या नेमबाजी या खेळाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडे तिचे आवर्जून लक्ष असते. मात्र हे करताना आपण काही मागणी करीत असल्याचाही तिचा आविर्भाव नसतो. अगदी सहजपणे ती सांगत असते. काही महिन्यांपूर्वी विजयनगर - हम्पी येथील इन्स्पायर इन्स्टिट्यूटला भेट दिल्यावर तिने येथील सुविधा सर्वोत्तम आहेत, पण शूटिंग रेंजच नाही अशी टिप्पणी हसत हसत केली. त्यानंतर लगेचच इन्स्टिट्यूटने शूटिंग रेंज तयार करण्याचे आश्वासन दिले. आता ऑलिंपिकबाबत मला काहीही सांगू नका, मला त्याचा अनुभव पूर्णपणे घ्यायचा आहे, ही तिची विनंती अव्हेरली जात नाही. मनूबरोबरील संवादातून तिची ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेची पूर्वतयारी लक्षात येते. 

- खूपच कमी वयात ऑलिंपिक पात्रता साध्य केलीस, हे साध्य करताना ऑलिंपिक पदकाच्या आशाही निर्माण केल्या आहेस. या स्पर्धेची पूर्वतयारी कशी सुरू आहे?   
मनू भाकर - ऑलिंपिक ही खूपच महत्त्वाची स्पर्धा आहे हे मी कोणाला वेगळे सांगण्याची गरजही नाही. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी पूर्वतयारीही योजनाबद्ध असणे तितकेच महत्त्वाचे आहे. नेमबाजीत स्पर्धा जास्तच असते, त्यामुळे तयारीही कसूनच करावी लागणार. कष्ट घेण्याची तयारी असल्यावर कितीही खडतर लक्ष्य साध्य होते यावर माझा विश्वास आहे. अनेकांना माझ्यात उपजत गुणवत्ता असणार, त्यामुळे मी हे साध्य केले, असेच वाटते. पण मी सकाळी आठ ते रात्री आठ कसून सराव केला आहे. ऑलिंपिकमध्ये खेळणे हे प्रत्येक क्रीडापटूचे स्वप्न असते, त्यासाठी मी कठोर मेहनत घेतली आहे. ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत त्यात सरावात खंड पाडण्याचे काहीच कारण नाही. दहा मीटर पिस्तूल ही नेमबाजीतील आकर्षक स्पर्धा आहे. त्याचबरोबर २५ मीटर स्पर्धेतही भाग घेत आहे. या स्पर्धेतील सरावाचा मला खूप फायदा होतो. मी सरावाबरोबरच फिजिकल ट्रेनिंग तसेच योगाही करीत आहे. 

- ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा एक वर्ष लांबणीवर पडल्याचा काय परिणाम होईल?
मनू भाकर - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा लांबणीवर पडणे मानसिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या नेमबाजीसाठी चांगले नसते. पण कोरोना महामारीविरुद्ध सर्व जग लढत असताना क्रीडा स्पर्धांचा विचार करणेही गैर आहे. ही स्पर्धा लांबणीवर पडण्याची चर्चा सुरू झाल्यावर त्याचा धक्का बसला. मात्र हळूहळू ही स्पर्धा लांबणीवर टाकणे किती मोलाचे होते, त्यामागची कारणे काय आहेत हे समजले. स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे मानसिक त्रास होणे, त्यातही रेंज बंद असल्याने त्याचा त्रास होणे स्वाभाविक होते. मात्र मी याचा माझ्या मानसिकतेवर कोणताही परिणाम होणार नाही याकडे लक्ष दिले. घरातील रेंजवर सराव कायम ठेवला. त्याचबरोबर योगा, मेडिटेशन करीत स्वतःला शांत ठेवले आणि स्पर्धेच्या पूर्वतयारीवरील एकाग्रता ढळणार नाही यास आवर्जून महत्त्व दिले.   

- स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे अपेक्षांच्या दडपणास जास्त सामोरे जावे लागेल असे वाटते का? 
मनू भाकर - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे मला पूर्वतयारीस जास्त वेळ मिळाला किंवा नाही हा प्रश्नच येत नाही. मी या स्पर्धेसाठी त्यावेळीही पूर्ण तयार होते. आता स्पर्धा लांबल्याने त्याच्या सरावास जास्त संधी लाभेल, पण हे सर्वांसाठीच आहे. स्पर्धा लांबल्याने अतिरिक्त दडपण काही नाही. कारण स्पर्धेचे दडपण हे कायमच असणार. ऑलिंपिक एक वर्ष लांबणीवर पडल्यामुळे ते जास्त असेल, असे म्हणणे मला काही मान्य नाही. मी या अपेक्षांच्या दडपणाकडे थोडे वेगळ्या प्रकारे पाहते. जास्त अपेक्षा आहेत, म्हणजे तुमच्यावर जास्त विश्वास आहे. अपेक्षा बाळगणाऱ्या चाहत्यांची तुम्हाला साथ आहे. जागतिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी हुकमत राखल्याचा त्यांनी पुरेपूर आनंद घेतला आहे आणि तो त्यांना अधिकाधिक हवा आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. या अपेक्षा चांगल्या कामगिरीसाठी प्रेरित करतात आणि दडपण असेल, वाढती स्पर्धा असेल तर कामगिरीही जास्त उंचावते.    

- ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा अजूनही अनिश्चित....
मनू भाकर - आता ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेबाबत कोणतीही अनिश्चितता नाही. ही स्पर्धा ठरल्यानुसार २०२१ च्या जुलैमध्ये नक्कीच होणार आहे. मला तरी याबाबत आता कोणतीही शंका नाही. सध्या आपण सर्वच प्रतिकूल परिस्थितीतून जात आहोत, पण मी कधीही नकारात्मक विचार करीत नाही. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा सुरू असताना माझा फॉर्म सर्वोत्तम कसा असेल, त्या स्पर्धेत माझी कामगिरी सर्वोत्तम कशी होईल, याकडे मी लक्ष देत आहे.  

- सरते वर्ष कमालीचे आव्हानात्मक होते. सरावाबाबतही अनिश्चितता होती.
मनू भाकर - नेमबाजीचा सराव माझ्यासाठी ऑक्सिजनसारखा आहे. माझ्या घरी लहान रेंज आहे. मात्र या रेंजवर २५ मीटर स्पर्धेचा सराव करता येत नाही. त्यासाठी अत्याधुनिक रेंजच हवी. त्याचबरोबर एकट्याने सराव केल्यास केवळ सराव केल्याचे समाधान लाभते. स्पर्धेसाठी त्यातून तयारी होत नाही. जेव्हा सहकारी नेमबाजांसह सराव होतो, त्यावेळी एक प्रकारची स्पर्धा असते. राष्ट्रीय संघाच्या शिबिरातून हा स्पर्धांसाठीचा सराव होत असतो. घरी सराव करण्याऐवजी मी कायम प्रमुख रेंजवरील सरावालाच प्राधान्य दिले. त्यामुळे रेंज खुली झाल्यावर लगेच मी त्या ठिकाणी सराव सुरू केला. सरत्या वर्षात स्पर्धा होत नव्हत्या. या परिस्थितीत हा स्पर्धात्मक सराव मोलाचा होता. 

- लॉकडाउनचा परिणाम सरावावर पूर्वतयारीवर झाला असेल.
मनू भाकर - मी याकडे नकारात्मक दृष्टीने बघत नाही. त्यातून मला काय मिळाले ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी वयोगटाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत असल्याने लागोपाठ स्पर्धा होत होत्या, त्यामुळे कित्येक महिने घरापासून दूर राहणे भाग पडले. मला खेळापासून ब्रेक घेण्यासही वेळ मिळत नव्हता. त्यामुळे लॉकडाउन कालावधीत मी खूप काही केले. मी अश्वारोहण केले, ट्रॅक्टर चालवला. रोज एक तास पेंटिंग केले. पुस्तक वाचनास सुरुवात केली. सतत मोबाइलवर राहणे मला आवडत नाही. त्याऐवजी मला टीव्ही बघायला खूप आवडतो. मी लहानपणी रामायण, महाभारत मालिकांबाबत खूप ऐकले होते. या कालावधीत त्याचा एकही भाग मी चुकवला नाही. अर्थात त्याबरोबर सराव सुरूच होता. 

- महामारीमुळे रेंजवरील स्पर्धा थांबल्या, पण ऑनलाइन स्पर्धांना सुरुवात झाली.
मनू भाकर - ऑनलाइन स्पर्धा ही चांगली संकल्पना आहे. त्याचे स्वागतच करायला हवे. लॉकडाउन असताना मी दोन ऑनलाइन स्पर्धांत सहभागी झाले होते. अनेक नेमबाज आपल्या घरी इलेक्ट्रॉनिक टार्गेटवरच सराव करतात. हेच लॅपटॉपला लिंक केल्यावर स्कोअर दिसू शकतात. अर्थात तांत्रिक प्रश्नांवर मात महत्त्वाची आहे. ऑनलाइन स्पर्धांवर कॅमेराद्वारे सहज नियंत्रण ठेवता येते.   

मनू भाकर ऑलिंपिकमध्ये प्रथमच होणाऱ्या मिश्र दुहेरी नेमबाजी स्पर्धेत आपला कस पणास लावणार आहे. तिने सौरभ चौधरीच्या साथीत विश्वकरंडक स्पर्धेत या प्रकारात सातत्याने यश मिळवले आहे. मिश्र दुहेरीप्रमाणेच तिला युवा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत जिंकलेले सुवर्णपदक नक्कीच सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरणा देणार आहे. तिची ऑलिंपिक स्पर्धेसाठी नक्कीच कसून तयारी सुरू आहे. त्यामुळे या स्पर्धेत एकच सुवर्णपदक नव्हे तर अधिकाधिक सुवर्णपदके जिंकण्याचे माझे लक्ष्य आहे, असे मनू सांगते त्यावेळी त्यात अतिशयोक्ती वाटत नाही, तर त्यातून तिचा आत्मविश्वास दिसत असतो. 

मनूची ऑलिंपिकसाठी चांगली पूर्वतयारी सुरू आहे. कमी वयात ती ऑलिंपिकच्या दडपणास किती सामोरी जाऊ शकेल असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र कौशल्याबरोबर दडपणही जास्त असलेल्या राष्ट्रकुल, विश्वकरंडक स्पर्धेबरोबरच युवा ऑलिंपिक स्पर्धेतही तिने यश मिळवले आहे. ऑलिंपिकबाबत अंदाज व्यक्त करता येत नाही. त्यातील प्रत्यक्ष स्पर्धेच्या दिवशी तुमची कशी कामगिरी होते, हे महत्त्वाचे असते. मात्र त्याचबरोबर जगातील सर्वोत्तम स्पर्धकांबरोबर स्पर्धा असते. ऑलिंपिकमधील स्कोअर अन्य स्पर्धांपेक्षा कमी असतात. त्यावेळी दडपणास योग्यप्रकारे सामोरा जाणाराच यशस्वी होतो. मनूची त्यासाठी नक्कीच तयारी होत आहे.
- जसपाल राणा, मनू भाकरचे मार्गदर्श

संबंधित बातम्या