ऑलिंपिक संयोजनाचा भोवरा

संजय घारपुरे
सोमवार, 5 जुलै 2021

कव्हर स्टोरी

जगातील सर्वात मोठा क्रीडा सोहळा समजली जाणारी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा काही आठवड्यांवर आली आहे, तरीही त्याच्यावर अनिश्चिततेची टांगती तलवार अजूनही लटकत आहे. जपानसाठी हे संयोजन एका भोवऱ्यासारखे झाले आहे. सर्व काही खेचून घेणाऱ्या या संयोजनाच्या भोवऱ्यात जपान, ऑलिंपिक पदकाचे स्वप्न पाहणारे खेळाडू आता फसत चालल्याचे चित्र दिसत आहे... 

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा म्हणजे जागतिक एकतेचा सोहळा. पण याच सोहळ्याचा उपयोग अॅडॉल्फ हिटलरने आपण जगावर वर्चस्व दाखवणारे नेते आहोत, हे दाखवण्यासाठी केला; तसेच सोविएत संघराज्य आणि अमेरिका यांनी शीतयुद्धाच्यावेळी आपापली ताकद आजमावून पाहण्यासाठी केला. महायुद्धाचा काळ सोडल्यास ऑलिंपिक कधीही लांबणीवर पडले नव्हते. मात्र कोरोना महासाथीने ही वेळ जपान आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीवर आणली.

गेल्या वर्षीपासून लांबणीवर पडलेले ऑलिंपिक आता टोकियोत होईल, पण तो जगातील सर्वात मोठा क्रीडा सोहळा असणार का, याबद्दल रास्त शंका आहेत. ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन करून कोरोना महासाथीवर मनुष्यजातीने मात केली हे दाखवले आहे, असे स्पर्धा सुरू झाल्यावर सातत्याने सांगितले जाईल. पण तो काही खास सोहळा असणार नाही. २०१९च्या अखेरीस, तसेच २०२०च्या सुरुवातीपर्यंत जपानवासीय ऑलिंपिकला साथ देत होते. एवढेच नव्हे तर जपान, सोपोरा येथे २०३०च्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा संयोजनाचे स्वप्न बघत होते. मात्र परिस्थिती टोकाला गेली. सत्तर टक्क्यांहून जास्त जपानवासीय स्पर्धेला विरोध करीत असल्याचे सर्वेक्षणात दिसण्यास सुरुवात झाली. हे आकडे कमी करण्यासाठी जपानने देशातील लसीकरणास वेग दिला. सहपुरस्कर्ते असलेल्या कंपनीस स्पर्धा ठिकाणी मद्यविक्रीस मनाई केली. त्यांनीही आपल्या कंपनीविरोधात जपानमध्ये वातावरण तयार होऊ नये म्हणून निर्णय स्वीकारला. त्यानंतरही अजूनही या स्पर्धेला सोहळ्याचे स्वरूप काही येत नाही.

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत खेळाडू सुवर्णपदकासाठी लढतात, प्रत्येक विजय आनंद देत असतो. पण यावेळी सामना वेळापत्रक बघताना कोरोना चाचणीत खेळाडूंच्या वाट्याला काय येणार याचीही तयारी करावी लागेल. ऑलिंपिकने ब्राझील, ग्रीस यांच्यावर कर्जाचा बोजा वाढवला. त्यामुळे महागाई वाढली. ऑलिंपिकच्या निमित्ताने होणाऱ्या सुविधांची चर्चा झाली, तरीही स्पर्धा कालावधीत क्वचितच स्पर्धा विरोधी मोर्चे काढण्यात आले. जपानमधील सत्ताधारी ऑलिंपिकचे संयोजन कसे केले हे दाखवण्यास उत्सुक आहे, तर विरोधी पक्ष स्पर्धा संयोजनास विरोध करीत आहेत. पण ते सत्तेत असते, तर त्यांनाही स्पर्धा संयोजनाचा महाकाय पर्वत उचलणे भाग पडले असते, अगदी कोरोनामुळे खीळ बसलेल्या अर्थव्यवस्थेच्या साखळ्या कितीही टोचत असल्या तरीही.

ऑलिंपिक संयोजन हे जपानसाठी इकडे आड तिकडे विहीर असेच झाले आहे. संयोजन समितीतील सदस्य काओरी यामागुची यांनी ‘स्पर्धा घेतली तरी आम्ही टीकेचे धनी आणि नाही घेतली तरी आमच्यावर टीका होईल अशी आमची अवस्था आहे,’ अशी टिप्पणी एका लेखात केली आहे. जपानला स्पर्धा संयोजन देणारी, या स्पर्धेचे सर्वाधिकार असलेली आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, फायदा झाला तर आमचा आणि तोटा झाला तर तुमचा या न्यायानेच यजमानपद देत असते. त्यामुळे स्पर्धा रद्द केल्यास जपानला मोठी नुकसान भरपाई द्यावी लागली असती आणि त्यामुळे ते स्पर्धा रद्द करू शकत नाहीत.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे स्वरूप हे धर्मादाय संस्थेसारखे आहे, पण त्यांचा कारभार कमालीचा व्यावसायिक आहे. प्रक्षेपण हक्क आणि पुरस्कर्त्यांच्या माध्यमातून त्यांचे ९१ टक्के उत्पन्न येते. आता ऑलिंपिक स्पर्धा रद्द झाली तर प्रक्षेपण हक्काच्या तीन ते चार अब्ज डॉलरवर पाणी सोडावे लागेल. ही वेळ येऊ नये, म्हणून आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती संयोजक देशांसह करार करते, त्याची कलमे जास्तीत जास्त समितीस अनुकूल असतात. 

ऑलिंपिक संयोजन हे पांढऱ्या हत्तींचा कळप बाळगण्यासारखे झाले असले तरी अनेक देश त्यासाठी स्पर्धा करतात. आपला मान, प्रतिष्ठा उंचावण्यासाठी हे केले जाते. मात्र जपानसाठी सध्याची स्पर्धा सगळेच धुऊन नेत आहे. स्पर्धा घेतली नाही तर आर्थिक गणित पूर्णच कोसळणार आहे, पण स्पर्धा घेतली तर कुठेतरी ठिगळे लावता येतील हीच या स्पर्धेची अवस्था आहे. दीड वर्षांपूर्वी कोणी हे म्हटले असते तर त्याला वेड्यात काढले गेले असते.

वर्ष २०२०चा सूर्योदय होत असताना ‘उगवत्या सूर्याचा देश’ आत्तापर्यंतची सर्वात महागडी ऑलिंपिक स्पर्धा घेण्यास तयार झाला होता. दुसऱ्या महायुद्धामुळे चांगलाच होरपळला असतानाही जपानने युद्धोत्तर काळात तीन वेळा ऑलिंपिक स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यामुळे सर्वोत्तम ऑलिंपिकसाठी तयार राहा, असे केले जाणारे आवाहनही अतिशयोक्ती वाटत नव्हती. पण आता कोरोनामुळे १४ हजार मृत्यू झालेल्या देशात, काहीशे रुग्ण असल्यावरही आणीबाणी जाहीर करणाऱ्या देशात ऑलिंपिक होणार आहे.

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने देशाचे मार्केटिंग होत असते. पण आता खेळाडू, पदाधिकारी क्रीडा नगरी आणि स्पर्धा ठिकाणी येथेच शटल करीत राहणार. प्रत्येकाच्या हालचालीवर जीपीएसची नजर असणार, पदक क्रमवारीबरोबरच जपानमधील कोरोना रुग्ण, स्पर्धेच्या निमित्ताने असलेले रुग्ण, क्रीडानगरीतील क्लिनिकला भेट देणारे खेळाडू, पदाधिकारी ही आकडेवारी चर्चेत राहणार. स्पर्धेसाठी येणाऱ्या चाहत्यांना खेळ जवळपास हाताची घडी आणि तोंडावर बोट (नव्हे मास्क) या पद्धतीने बघावे लागणार. ना जिंकल्याचा जल्लोष करता येईल, ना पराभवाचे दुःख.

ऑलिंपिक स्पर्धा काही आठवड्यानंतर आली तरी क्रीडा ज्योतीच्या उत्साहाची छायाचित्रे दिसत नाहीत, ना प्रमुख माध्यमांत ऑलिंपिक काऊंटडाऊन. जणू स्पर्धेचे काऊंटडाऊनही ‘बिहाइंड द क्लोज्ड डोअर’ सुरू आहे. स्पर्धा सहभागाचा आनंद खेळाडूंपुरता राहणार, त्यांचा जल्लोष किती होणार हा प्रश्नच आहे. 

ऑलिंपिक असो किंवा इतर कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सोहळा संयोजक संयोजनाच्या बोधचिन्हातील २०२० बदलायला तयार नाहीत. पण एका वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे, त्यापेक्षा पैसा वाहिला आहे. तो वाहून गेल्यामुळे होणारे परिणाम जपानच नव्हे तर अनेक देश काही वर्षे सहन करत राहतील. जखम बुजेल, पण व्रण राहणार आहेत. ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती ही फायद्यास भुकेलेली एक संस्था आहे. अनेक अधिकार असलेली पण खूपच कमी जबाबदारी असलेली ही क्रीडा संस्था आहे. त्यांच्या पाच रिंगच्या भोवऱ्यात अडकल्यास त्या पॉवर गेमचे चटकेच बसतात. आत्तासारखी परिस्थिती उद्‍भवली तर होरपळायलाच होते, हे चित्र आता निर्माण झाले आहे,’ पॅसिफिक विद्यापीठात पॉलिटिकल सायन्सचे प्रोफेसर असलेल्या ज्यूल्स बायकॉफ यांच्या या टिप्पणीची सध्या आठवण येत राहते.

स्पर्धा असावी की....

जपानने स्पर्धा संयोजनासाठी अधिकृतपणे १५.४ अब्ज डॉलर खर्ची घातले आहेत. सरकारी आकडेवारी यापेक्षा कितीतरी अब्ज जास्त आहे. त्यातील ६.७ अब्ज डॉलर जपानमधील करदात्यांकडून आले आहेत. समजा ही स्पर्धा रद्द केली तर जपानला १६ अब्ज डॉलरचा अतिरिक्त बोजा पडेल, असा काही अभ्यासकांचा अंदाज आहे. त्याशिवाय स्पर्धेच्या पुरस्कर्त्यांना ३.३ अब्ज डॉलर परत करावे लागतील 
ते वेगळेच. तिकीटविक्रीतून मिळवलेले ८० कोटी डॉलर वेगळेच आहेत.

...नसावी
जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता असलेल्या जपानलाही हा खर्च जास्त आहे, हे जपानमधील अनेक अभ्यासक मान्य करतात. मात्र या स्पर्धेमुळे जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाची साथ पसरली तरी त्यामुळे होणारे नुकसान किती असेल, पुन्हा आणीबाणी जाहीर करावी लागेल का, अनेक उद्योगांना फटका बसेल, त्यामुळे होणाऱ्या नुकसानीचे काय अशी विचारणा होत आहे.  

...तरी नुकसान भरपाईचे सावट
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचे यजमान असलेल्या जपानने परदेशातील चाहत्यांना स्पर्धेसाठी प्रवेश नाकारला आहे. देशातील प्रेक्षकांच्या संख्येवरही बंदी घातली आहे. त्यामुळे आमचे नुकसान झाल्याची मागणी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचे प्रक्षेपक तसेच पुरस्कर्त्यांनी केली, तर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती संयोजकांकडून नुकसान भरपाईची मागणी करू शकेल. ही नुकसान भरपाई काही अब्ज डॉलर असू शकेल.

स्पर्धा सहभागाचे साहस
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी टोकियोत दाखल होणारे अकरा हजार क्रीडापटू एक प्रकारचे साहस करणार आहेत. टोकियोत दाखल होण्यापूर्वीच ते जैवसुरक्षित वातावरणात प्रवेश करतील, ऑलिंपिक पदकाचे शिखर सर करेपर्यंत असो किंवा त्यातील पहिल्याच टप्प्यावरून परत येणे भाग पडणे असो; त्या जैवसुरक्षा वातावरणातून सुटका नसेल.

ऑलिंपिक स्मृतिचिन्हेही दुरापास्त
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्यावेळी खेळाडूंवर असलेले निर्बंध लक्षात घेतले, तर त्यांना स्पर्धेची स्मृतिचिन्हे खरेदी करण्यासाठीही क्रीडानगरी सोडता येणार नाही. जपान ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष यासुहिरो यामाशिता यांनी तर खेळाडूंसाठी ऑलिंपिक स्पर्धा ठिकाण, सरावाचे ठिकाण तसेच क्रीडानगरी याव्यतिरिक्त कुठेही जाता येणार नाही असे सांगितले. ते म्हणाले, ‘खेळाडूंना स्पर्धेचा तणाव दूर करण्यासाठी तसेच स्पर्धेच्या आठवणी घेऊन जाण्यासाठी वेळच कुठे आहे. खेळाडूंची सुरक्षा सर्वात महत्त्वाची पण काही प्रमाणात त्यांना स्पेस देण्यासाठी प्रयत्न करणार. खेळाडूंचा जपानमधील मुक्काम कमालीचे निर्बंध असलेल्या वातावरणात आहे. आपण क्रीडाप्रेमींनीही हे समजून घ्यायला हवे. स्पर्धेच्या निमित्ताने होणारे सांस्कृतिक आदान-प्रदान यावेळी दिसणार नाही.’

स्पर्धा २०२०ची की २१ची?
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा २०२१मध्ये होत असली तरी टोकियो ऑलिंपिक संयोजन तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने स्पर्धेची ओळख टोकियो २०२० हीच कायम ठेवली आहे. फक्त टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा संयोजकांनीच हे केलेले नाही. जागतिक फुटबॉलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सोहळा असलेल्या युरो फुटबॉलने २०२१ मधील स्पर्धेची ओळख २०२० कायम ठेवली आहे. कदाचित मार्केटिंग करताना ट्वेंटी २० हे ट्वेंटी २१ यापेक्षा जास्त प्रभावी असेल.

 • १५.४ अब्ज डॉलर ः संयोजनाचा मूळ खर्च
 • २.८ अब्ज डॉलर ः स्पर्धा लांबल्याने वाढलेला अंदाजित खर्च
 • ३ अब्ज डॉलर ः स्पर्धा लांबल्याने प्रत्यक्षात वाढलेला किमान खर्च
 • ८१ कोटी ५० लाख डॉलर ः तिकीटविक्रीतून अपेक्षित उत्पन्न. आता ही कमाई किमान निम्म्यावर.
 • ८ लाख ४० हजार तिकिटे ः तिकिटांची रक्कम परत
 • ६० जपानी कंपन्या ः स्पर्धेच्या पुरस्कर्त्या
 • ३ अब्ज डॉलर ः जपानी कंपन्यांकडून लाभलेली पुरस्कार रक्कम, अंदाजे
 • २ कोटी डॉलर ः जपानी कंपन्यांकडून पुरस्कर्ते म्हणून घेतलेली अतिरिक्त रक्कम
 • (टोयोटा, ब्रिजस्टोन, पॅनासोनिक या जपानमधील कंपन्यांचे स्पर्धेसाठी जागतिक करार, हेच कोरियातील सॅमसंगबाबत)
 • ८० कोटी डॉलर ः आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने स्पर्धेसाठी काढलेला विमा
 • ६५ कोटी डॉलर ः स्थानिक संयोजकांकडून काढलेला विमा
 • २ अब्ज डॉलर ः स्पर्धेसाठीचा एकत्रित विमा (त्यात दूरचित्रवाणी हक्क, पुरस्कर्ते, तसेच यजमानपदावर होणारा खर्च)
 • १.२५ अब्ज डॉलर ः स्पर्धेच्या प्रक्षेपणाचे हक्क असलेल्या एनबीसीयुनिव्हर्सलने ऑलिंपिकसाठी मिळवलेले पुरस्कर्ते, पण हे पुरस्कर्ते स्पर्धा लांबणीवर पडण्यापूर्वीचे होते, आता नव्याने शोध
 •  ४.३८ अब्ज डॉलर ः एनबीसीयुनिव्हर्सलची पालक कंपनी असलेल्या कॉमकास्टने २०१४ ते २०२०च्या ऑलिंपिकसाठी अमेरिकेतील मीडिया हक्क मिळवण्यासाठी दिलेली रक्कम
 • ३ कोटी १९ लाख ः २०१९मध्ये जपानला भेट दिलेले पर्यटक, त्यांनी जपानमध्ये एकूण ४४ अब्ज डॉलर खर्च केले
 • ४१ लाख ः २०२०मध्ये जपानमध्ये आलेले पर्यटक, २२ वर्षांतील सर्वात कमी

संबंधित बातम्या