चैतन्याची पालवी!

संतोष शेणई 
सोमवार, 12 एप्रिल 2021

कव्हर स्टोरी

अजून दिशा उजळलेल्याही नाहीत, तोवर सोमेश्वराच्या मंदिरातून ढोलांचा लयदार आवाज घुमू लागलेला असे. त्या आवाजानेच मी जागा झालेला असे. रोजची नौबत अजूनच लवकर सुरू झालेली असायची आणि नौबत संपण्याच्या आधीच ढोलांचा तो वेगळा ताल सुरू झालेला असे. गुढी पाडव्याची आठवण करून देणारा ताल. माझ्या गावात प्रत्येक सणासाठी ढोलांचा वेगळा ताल असतो. तो ताल सणासुदीची आठवण देत जागवतो गावाला. मग मी अंगणात येत असे. दमट हवेने घामेजलेल्या देहाला शीतळ वारा सुखवत राहायचा. आंब्यारातांब्याच्या मोहराचा गंध वाऱ्यावरून यायचा आणि ती पहाट आणखीनच उल्हसित व्हायची. दिशा उजळल्यावरच ढोल विसावत. तासाभराने पुन्हा घुमू लागतील. त्या किंचित प्रकाशातच मी दसवंतीची फुले गोळा करीत असे. विहिरीवर जाऊन थंड पाण्याच्या घागरी शिरी ओतायच्या. घरातल्या देवाची पूजा होईस्तोवर पुन्हा ढोलांचा नाद. पंधरा-वीस मिनिटे वाजतात ढोल आणि पुन्हा विसावतात. मी नाश्ता उरकून मंदिरात जायची तयारी करू लागलेलो असे. पुन्हा ढोल वाजू लागले की मंदिराकडे निघे. डोंगर उतरून, व्हाळ ओलांडून, काजूरातांब्याच्या बागेतील पायवाटांवरून, चिंचेखालच्या पाणंदीतून गाव सोमेश्वर मंदिराच्या दिशेने येत असे. ढोलांचा आवाज गती पकडत टिपेला जाऊन थांबायचा तेव्हा मंदिर गच्च भरलेले असे.

ग्रामगुरू पुराण कथन करू लागत. पुराणकथेनुसार पाडव्याच्याच दिवशी आदिमाता पार्वती आणि आदिनाथ शंकर यांचा विवाह ठरला. याच दिवसापासून विवाहाच्या तयारीला सुरुवात झाली आणि तृतीयेला लग्नसोहळा पार पडला अशी आख्यायिका आहे. असे ही म्हणतात की, प्राचीन काळी मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली ती एका स्त्रीच्या म्हणजेच देवीच्या रूपाची. ही स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. सोमेश्वर मंदिरात पार्वतीचे पाषाण नाहीत, पण आजच्या दिवशी तिची आठवण पुराणिक काढतात आणि शिव-पार्वतीच्या विवाहाची कहाणी कथन करतात. 

पुराण संपले की, मंदिराबाहेर ग्रामगुढी उभारली जाते. मंदिरात दर्शनाला आलेल्याला कडुलिंब आणि साखर प्रसादाच्या रूपात मिळते. कडुलिंब कडू, पण आरोग्यासाठी लाभदायी. त्याचे सेवन करणारा नेहमी निरोगी राहतो. काही विचार कितीही त्रासदायी वाटले तरी जीवनाला उदात्त बनवतात. सुंदर, सात्त्विक विचारांचे सेवन करणाऱ्यास मानसिक आणि बौद्धिक आरोग्य मिळते. त्याचे जीवन निरोगी बनते. मंदिरात मिळणाऱ्या साखर आणि लिंबाच्या पानाच्या प्रसादामागे मधूर भावना असते. जीवनात सुख, दु:ख कधीच एकटे येत नाही. सुखात दु:ख आणि दु:खात सुख दडलेले  असते. कडू-गोडाची चव जिभेवर रेंगाळत असतानाच घरी मी परततो. ढोलांच्या नादाने, शीतळ वाऱ्याने, आंब्यारातांब्याच्या मोहरगंधाने उल्हसित झालेल्या मनात गुढीपाडवा कधीचाच उत्सव मांडून राहिलेला असतो. त्या चैतन्याला जागवत ग्रामगुढी उभारली की सारेजण आपापल्या दारात गुढी उभारायला परततात.

***

लेखिका गिरिजा कीर यांच्या सासरचा कितीतरी मोठा वाडा माझ्या गावी होता. माझ्या लहानपणीच तो निम्माशिम्मा पडून गेला होता, तरीही उरलेल्या वाड्यात एका टोकावरून दुसऱ्या टोकाला हाक द्यायची तर बऱ्यापैकी मोठ्याने द्यावी लागे. पडलेल्या वाड्याच्या जोत्यावरून त्या दुमजली वाड्याची कल्पना यायची. गिरिजा कीर यांचे सासरे नाना आणि माझे आजोबा आना. नाना-आना एकमेकांचे मित्र. नाना कीर यांचे सारे कुटुंब मुंबईला. एक भाऊ, वहिनी व त्यांची मुलगी तेवढी गावी त्या मोठाल्या वाड्यात. मैलभरात दुसरे घर नाही. भोवती रान. छोटीशी पाणंद त्यांच्या घराकडे जाणारी. तुटलेल्या दारांखिडक्यांतून वारा घोंघावताना चित्रविचित्र शीळ ऐकू यायची. मधल्या दालनात प्रकाश पोहोचत नसे. त्या काळोख्या पट्ट्यात मला सतत सर्पसळसळ ऐकू यायची. विहिरीच्या, गडग्यांच्या चिऱ्यांमध्ये सापाची कात लटकलेली दिसायची. भरदुपारीही त्या वाड्यात जायला मी घाबरत असे. नाना कीर यांच्यासाठी माझे आजोबाच त्या वाड्यातील सण व समाधीची पूजा करीत असत. आजोबांनंतर माझे वडील ते सांभाळत असत. म्हणून सणादिवशी त्या वाड्याकडे मला जावे लागे. 

कधी काळी शेशंभर माणसांचा राबता असलेल्या त्या वाड्यात इन मीन तीन माणसे आता राहात होती. वर्षारंभाच्या पहिल्या दिवशी मी एका गड्याला सोबत घेऊन काठी व इतर पूजा साहित्यासह जात असे. अंगण किंचित साफ करून गुढी उभारत असे. बांबूच्या टोकाला तांबडे जरीचे वस्त्र, साखरेची माळ, फुलांची माळ, कडुनिंबाची पाने लावून त्यावर तांब्याचा लोटा ठेवून गुढी उभारायची. भोवती रांगोळी काढायची. कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून घरूनच तयार करून नेलेला प्रसाद दाखवायचा. त्या घरातील तिघांना तो प्रसाद द्यायचा. आपण खायचा. मात्र नेहमीच एक गंमत घडे. एरवी त्या वाड्याची, तेथील समाधीची मला नेहमीच भीती वाटायची. नारायण धारपांच्या कथेतील वाडा नजरेसमोर यायचा. कामापुरता अनिच्छेनेच तेथे जाऊन मी लगबगीने परतत असे. पण गुढीपाडव्यादिवशी त्या वाड्यात जाताना जे दडपण माझ्यावर असे ते नंतर राहात नसे. गुढी उभारल्यानंतरही मी बराच काळ तेथे रेंगाळत राहात असे. 

भोवतालच्या रानगंधाने मला तेथे थांबवून घेतलेले असे. समाधीमागच्या पिंपळाची कोवळी लवलव पाहात राहावीशी वाटे. करवंदीच्या जाळ्यांतून येणारा गंध, रानचाफ्याचा सुवास, काजूच्या बोंडांचा आंबूसगोड गंध एकमेकांत मिसळून गेलेले असत. गारफात लपलेला कोकीळ साद घालत सांगायचा, ‘वसंत आला...’ वेड्या राघूंचा थवा खळ्यात उतरलेला असायचा आणि रानाची हद्द विसरून त्या राघूंच्या आशेने पिवळाधम्मक लांबलचक दिवड खळ्यात फुसांडत आलेला असायचा. हे सारे पाहताना, गंध शोषतांना, मी मलाच विसरून तेथे थांबलेलो असायचो. ‘ऋतूंमध्ये मी कुसुमाकर’ असे भगवान श्रीकृष्णांना का म्हणावेसे वाटले असेल, ते जणू मला तेथे आकळायचे. असे म्हणतात, गुढीपाडव्याला ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. म्हणजे हा सृष्टीनिर्मितीचा पहिला दिवस. पृथ्वीवरील चैतन्यसळसळीचा हा पहिला दिवस. ही चैतन्याची रुजवण माझ्या मनात नकळत होत असेल आणि मी रेंगाळत असेन तो अनुभव आतवर साठवण्यासाठी...

वाडाभर फिरून, त्या राईत हिंड़ून मन तृप्त झाले की, मी पुन्हा खळ्यात येत असे. गुढीला नमस्कार करून म्हणत असे, ‘ओम् ब्रह्मध्वजाय नमः’
***

कोकणात अतृप्त घरे अनेक दिसत पूर्वी. कुटुंबच्या कुटुंब पोटापाण्यासाठी मुंबईला गेलेले असे. उन्हापावसात वाऱ्याला पाठ देत घराच्या भिंती उभ्या राहायच्या प्रयत्नात असत. आता हे चित्र बरेचसे बदलते आहे. कोकण रेल्वे आल्यानंतर तरुण गावातच काही उद्योग सांभाळून राहू लागले आहेत. माझ्या सध्याच्या गावातून मूळ गावी जायचे तर भरडमाळ तुडवत जावे लागत असे. कीरांच्या वाड्यातील गुढी उभारून परतलो की पेज प्यायची आणि मूळ घरी निघायचे. गवळीवाडा ओलांडेपर्यंत वाटेला जाग असायची. नंतर हळू हळू चढाव सुरू व्हायचा. पिवळेधमक करड त्या उन्हात सळसळत असायचे वाऱ्यावर. त्या उघड्याधोप भरडावर करडातून वारा सळसळताना एक रहस्यमय आवाज गुंजावत असायचा. मध्येच एखादा ससा आडवा पळायचा. पायवाटेवरून झपझपा चालत निघायचो. जरा पुढे गेल्यावर एकुलत्या गारफाची हिरवी टोपी दिसू लागे. मग त्या शेजारच्या घराचे छप्पर. मग झाड व घर दिसू लागे. हे घर वर्षभर बंदच असे. कोकणात गणपतीला कुणी ना कुणी येऊन मठी उघडी ठेवतात. पण या घरी तेही नाही. या घरातला पुरुष होळीच्या आदल्या दिवशी यायचा आणि गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी जायचा. त्यामुळे आता त्या घराला जाग आलेली असेल हे माहीत असे.

आता घराच्या दारातील गुढीही दिसू लागलेली असे. गुढीची काठी तेल लावलेली असे. एका टोकाला केशरी वस्त्र. कलशाला पाच गंधाचे पट्टे. मोगऱ्याच्या फुलांचा गजरा बांधलेला, काठीला आंब्याचा डहाळा, निंबाचा पाला बांधलेला. घरामागच्या पांढऱ्या-तांबड्या चाफ्याच्या फुलांची माळ घातलेली. पायाशी अगरबत्ती. रांगोळी रेखलेली. हे चित्र मी नेहमी पाहात आलो. बांबार्डेकरकाकांना मी साद घालतो. शुभ्र तांबडकाठी धोतर नेसलेले काका बाहेर येतात. मोकळे हसून स्वागत करतात. पन्हे आणि पुरण हातात ठेवतात. 

मी एकदा विचारले काकांना, ते गणपतीच्या दिवसात कोकणात नसतात आणि पुढे आंब्याच्या दिवसातही नसतात. याच दिवसात का असतात ते येथे? त्यांच्या घरी गणपती पुजण्याची परंपरा नव्हती आणि आंबे मुंबईतही मिळतात, असे उत्तर देऊन ते थोडा वेळ गप्प राहिले. मग म्हणाले, ‘‘वडिलांना शब्द दिला होता, तो पाळतोय. वडील नवनाथांचे भक्त. एकदा ते मढीला कानिफनाथांच्या समाधीच्या दर्शनाला गेले होते. तेथून परतल्यावर माझ्या जन्माची गोड बातमी त्यांना समजली. त्यांची श्रद्धा होती की, कानिफनाथांच्या आशीर्वादाने माझा जन्म झाला आहे. गेली तब्बल साडेचारशे वर्षे मढीला होळी ते गुढीपाडवा अशी कानिफनाथांची यात्रा भरते. त्या काळात ही मठी उघडी राहावी, अशी त्यांची इच्छा होती.’’ 

गुढीच्या बांबूला तेल लावलेले मी बांबार्डेकरकाकांकडेच पाहात होतो. ही परंपरा आहे का? काका म्हणाले, ‘‘हो. गुढी ही सृष्टीची मज्जासंस्था आहे. ती तेलमालिश करून सज्ज ठेवायची असते.’’ गुढीचे रहस्य उलगडतांना श्रीगुरू बालाजी तांबे यांनी एकदा ‘गुढी म्हणजे मज्जासंस्था...,’ असे सांगितलेले आठवले. 

मी पुढे निघालो, तर काका 

म्हणाले, ‘‘डोके झाकून घे रे बाळा. रुमालाखाली आंब्याची पाने बांधून घे डोक्याला.’’ 

काकांचा शब्द मानून मी पुढे निघालो. मनात आले, मला आता कुणी पाहिले तर गुढी चालते आहे, असेच वाटेल ना! 

***

आठवणीतून या सणामागच्या कहाण्यांना पालव आला. सण नव्हेच, सृष्टीतील चैतन्याला साद देण्याची ही सुंदर रीत आहे. वसंत ऋतूची सुरुवात इथूनच होते. वसंताच्या आगमनामुळे हवामान समशितोष्ण व उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने गळतात, तर वसंत ऋतूत नवीन पालवी येते. 

ही चैतन्याची पालवी सळसळू दे..

संबंधित बातम्या