सिंधुदुर्गाची पर्यटन उभारी

शिवप्रसाद देसाई 
बुधवार, 28 मार्च 2018

महाराष्ट्राचा विचार करता तळकोकणातील सिंधुदुर्ग एक वेगळी ओळख निर्माण करून आहे. खरे तर ठाणे, रायगडपासून थेट केरळपर्यंतचा चिंचोळा पट्टा निसर्गसंपन्नतेच्या बाबतीत बऱ्याच अंशी साम्य जोडून आहे; पण यातही सर्वाधिक संपन्नता सिंधुदुर्गात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. फक्त इथल्या क्षमतांचा पुरेपूर वापर झाला नाही. पर्यटनाच्या माध्यमातून या क्षमता बऱ्यापैकी वापरता येऊ शकतात, अशी संकल्पना काही वर्षांपासून रुजवली जात आहे. याची फळे आता दिसू लागली आहेत. सिंधुदुर्ग खऱ्या अर्थाने पर्यटन क्षेत्रात उभारी घेत आहे. 

महाराष्ट्राचा विचार करता तळकोकणातील सिंधुदुर्ग एक वेगळी ओळख निर्माण करून आहे. खरे तर ठाणे, रायगडपासून थेट केरळपर्यंतचा चिंचोळा पट्टा निसर्गसंपन्नतेच्या बाबतीत बऱ्याच अंशी साम्य जोडून आहे; पण यातही सर्वाधिक संपन्नता सिंधुदुर्गात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. फक्त इथल्या क्षमतांचा पुरेपूर वापर झाला नाही. पर्यटनाच्या माध्यमातून या क्षमता बऱ्यापैकी वापरता येऊ शकतात, अशी संकल्पना काही वर्षांपासून रुजवली जात आहे. याची फळे आता दिसू लागली आहेत. सिंधुदुर्ग खऱ्या अर्थाने पर्यटन क्षेत्रात उभारी घेत आहे. 

सिंधुदुर्गाची स्थापना १ मे १९८१ रोजी रत्नागिरीचे विभाजन करून झाली. कृषी, मत्स्योत्पादन ही येथील अर्थव्यवस्थेची प्रमुख दोन अंगे मानली जातात. येथील निसर्गसंपन्नता, विविधता लक्षात घेऊन पर्यटन विकासाची संकल्पना सिंधुदुर्गात रुजू लागली. याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे ३० एप्रिल १९९७ ला देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गाची घोषणा झाली; पण बराच काळ हा पर्यटन जिल्हा केवळ कागदावरच राहिला. पर्यटन विकासासाठी मोठमोठ्या राजकीय गप्पा जिल्हावासीयांनी ऐकल्या; पण पर्यटनातून आर्थिक उन्नती दृष्टिपथात आली नव्हती. 

गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रामधील चित्र मात्र बदलत आहे. देशभरातील पर्यटक सिंधुदुर्गातील देखण्या समुद्रकिनाऱ्यांकडे आकर्षित होऊ लागले आहेत. यातून सुसज्ज हॉटेल्स उभी राहिली. पर्यटनाचा केंद्रबिंदू मालवण ठरले आहे. त्या पाठोपाठ वेंगुर्ले, देवगड या भागातही पर्यटक वळत आहेत. अर्थात, ही प्रगती पूर्ण पर्यटन विकासाच्या दृष्टीने पोषक आहे, असे म्हणता येणारी नव्हती. मात्र, आता या क्षेत्रात नवनव्या संकल्पना आणि स्थानिकांचा सहभाग खूप वेगाने वाढत आहे. त्यामुळे पर्यटन विकास दृष्टिपथात आला, असे म्हणायला संधी आहे. 

एखाद्या विकास प्रक्रियेत स्थानिकांचा सहभाग वाढतो तेव्हा एकूण प्रगतीचा वेगही कित्येक पटींनी वाढत असतो. सिंधुदुर्गाच्या पर्यटनाबाबतही याची प्रचिती येत आहे. उदाहरणाचा विचार करायचा झाल्यास मालवणमध्ये पर्यटकांनी एकत्र येत लाखो रुपये गुंतवून समुद्रातील वॉटर पार्क प्रकल्प साकारला आहे. ग्लासबॉटम पर्यटन बोटी स्थानिकांनी खरेदी केल्या आहेत. अनेक गावांमध्ये स्थानिकांनी हॉटेल्स, होम स्टे उभारले आहेत. या सगळ्यात झालेली गुंतवणूक कोट्यवधींच्या घरात आहे. स्कुबा डायव्हिंगसारख्या उपक्रमाला मालवणबरोबरच देवगड आणि वेंगुर्ले अशी नवीन ठिकाणे मिळत आहेत. गेली काही वर्षे केवळ किनारपट्टीकडे पर्यटन एकवटल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगा, ऐतिहासिक गडकिल्ले अशा अनेक संधी पर्यटन क्षेत्रात आहेत. तिथपर्यंत पर्यटन पोचणे आवश्‍यक आहे; पण हे बदलही आता दिसू लागले आहेत. केवळ थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या आंबोलीत आता वर्षा पर्यटन अधिक विस्तारले आहे. देशभरातील पर्यावरणाचे अभ्यासक आंबोलीत येऊ लागले आहेत. पिंगुळीसारख्या ठिकाणी खासगी पर्यटन प्रकल्प उभा राहिला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्येही पर्यटनासाठी लोक पुढे येऊ लागले आहेत. चौकुळमध्ये लोकसहभागातून उभे राहिलेले ग्रामपर्यटन हे याचे उदाहरण म्हणता येईल. पांग्रडसारख्या एका टोकाला असलेल्या गावात लोकांनी पर्यटन विकासासाठी उचल खाल्ली आहे. ही सगळी उदाहरणे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राच्या उन्नतीत सुरू असलेल्या चढत्या आलेखाची आहेत.  

सिंधुदुर्गात भविष्यात पर्यटनाच्या माध्यमातून नवी समांतर अर्थव्यवस्था निर्माण होण्याच्या दृष्टीने हे सगळे बदल दिसू लागले आहेत. या आधी पर्यटनासाठी गोव्याचा आदर्श सांगितला जायचा. गोव्याचा जिल्ह्याला शेजार लाभला; मात्र गोव्यातील पर्यटन सिंधुदुर्गला अपेक्षित नाही. येथे सोज्वळ, कुटुंबवत्सल पर्यटन वाढायला हवे. जिल्हावासीयांची मानसिकताही तशीच आहे. विशेष म्हणजे त्याच दिशेने या भागाची वाटचाल सुरू आहे. गोव्यात गेल्या काही वर्षांत पर्यटनाचा आलेख उतरता राहिला आहे. विशेषतः येथील गजबजाटामुळे उच्चभ्रू परदेशी पर्यटक नवे पर्याय शोधू लागले आहेत. सिंधुदुर्ग हा यासाठी चांगला उतारा ठरू शकतो. त्यादृष्टीने धोरणात्मक निर्णय आणि प्रभावी प्रयत्न होणे आवश्‍यक आहेत. 

पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेत खूप मोठी आर्थिक क्रांती घडविण्याची क्षमता आहे. मात्र, पर्यटन रुजण्यासाठी आवश्‍यक प्राथमिक क्षमता सिंधुदुर्गात ठासून भरलेल्या आहेत. लोकांची मानसिकताही बदलत आहे. या सगळ्याचा एकत्र विचार करून जिल्ह्याच्या पर्यटनात नवी क्रांती घडविण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होणे आवश्‍यक आहेत.

 

फोटो फीचर

संबंधित बातम्या