सहज सोपे केक

सुजाता नेरुरकर
सोमवार, 21 डिसेंबर 2020

आता नाताळ आला आहे तेव्हा बाजारात विविध प्रकारचे केक उपलब्ध होतात. पण आपण घरीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सहज सोपे केक करू शकतो. अशाच केकच्या काही सोप्या सोप्या पाककृती... 

बेसिक केक 
साहित्य : आठ टेबलस्पून मैदा, ७ टेबलस्पून पिठीसाखर, ६ टेबलस्पून डालडा अथवा लोणी, २ अंडी, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, १ टीस्पून बेकिंग पावडर, पाव कप दूध. 
कृती : प्रथम केक ज्या भांड्यात करायचा आहे त्या भांड्याला लोणी लावून त्यावर मैदा भुरभुरून ठेवावा. मैदा व बेकिंग पावडर चाळून घ्यावी. साखर मिक्सर मधून बारीक करून घ्यावी. अंडी फोडून काट्याने अथवा एग बीटरने चांगली फेटून घ्यावीत. ओव्हन गरम करायला ठेवावा. लोणी व पिठीसाखर चांगली फेसून घ्यावी. लोणी व पिठीसाखर आपण जेवढी फेसू तेवढा केक हलका होतो. फेसलेल्या मिश्रणात हळूहळू मैदा व फेटलेले अंडे घालून पुन्हा चांगले फेसून घ्यावे. मिश्रण चांगले फेसून झाल्यावर त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स व दूध घालून मिश्रण एकसारखे करून लोणी लावलेल्या केकच्या भांड्यात ओतावे. ओव्हन आधीच गरम करून घ्यावा व लगेच केकचे भांडे ओव्हनमध्ये बेक करायला ठेवावे. केकचा रंग गोल्डन ब्राऊन झाला, की केकमध्ये सुई खुपसून तपासून पाहावे. केक झाला की लगेच बाहेर काढावा व थंड झाल्यावर कापावा.
टिप : समजा काही कारणामुळे केक लगेच बेक करता आला नाही, तर मिश्रण बेकिंग पावडर न घालता काही वेळ तसेच ठेवावे. ओव्हनमध्ये केक ठेवताना बेकिंग पावडर घालून मग केक ओव्हनमध्ये ठेवावा.

मुलांसाठी एगलेस मारी बिस्कीट केक 
साहित्य : दीडशे ग्रॅम मारी बिस्किटे किंवा दीड कप मारी बिस्किटांची पावडर, अर्धा कप पिठीसाखर, पाव कप तेल, १ टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून वेलची पावडर, २ टेबलस्पून काजू बदाम तुकडे.
कृती : साखर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यावी. ड्रायफ्रूट्सचे तुकडे करून घ्यावेत. नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये एक स्टँड ठेवावा. आपण गरम भांडी ठेवायला वापरतो तो स्टँड ठेवावा. पॅन १५ मिनिटे मंद विस्तवावर गरम करावा. ज्या केकच्या भांड्यात केक करायचा आहे, त्या भांड्याला तूप लावावे.
मारी बिस्किटांचे तुकडे करून मिक्सरच्या भाड्यात घेऊन ग्राइंड करावे. ग्राइंड केलेली पावडर एका मोठ्या आकाराच्या बोलमध्ये घ्यावी. त्यामध्ये पिठीसाखर व बेकिंग पावडर घालून मिक्स करावे. त्या मिश्रणात तेल घालावे व परत मिक्स करून घेऊन थोडे थोडे दूध घालून परत मिक्स करावे. मग त्यामध्ये वेलची पावडर व ड्रायफ्रूट्स घालावेत.
आत्तापर्यंत पॅन चांगला गरम झाला असेल. त्यामध्ये केकच्या मिश्रणाचे भांडे ठेवून त्यावर झाकण ठेवावे. मग मंद विस्तवावर ४०-४५ मिनिटे केक बेक करावा. केक बेक झाल्यावर बाहेर काढून थंड करायला ठेवावा. थंड झाल्यावर मुलांना खायला द्यावा.

सुपर लेमोनेड केक
साहित्य : आठ टेबलस्पून मैदा, ७ टेबलस्पून पिठीसाखर, ६ टेबलस्पून लोणी किंवा वनस्पती तूप, १ टीस्पून बेकिंग पावडर, १ मोठे लिंबू, २ टेबलस्पून दूध, ३ अंडी, लेमन इसेन्स.
कृती : मैदा व बेकिंग पावडर तीन वेळा चाळून घ्यावी. साखर मिक्सरमध्ये बारीक करावी. लिंबू किसून त्याचे साल बाजूला ठेवावे. लिंबू रस काढून बाजूला ठेवावा. अंडी फोडून काट्याने फेटून घ्यावीत. एका बोलमध्ये लोणी व पिठीसाखर चांगली फेसून घ्यावी. मग त्यामध्ये फेसलेले अंडे घालून मिक्स करावे. अंडे घातल्यावर मिश्रण नासल्यासारखे दिसेल. मग त्यामध्ये मैदा घालून परत हलक्या हाताने फेसून घ्यावे. त्यामध्ये लिंबाची साले, लिंबू रस, लेमन इसेन्स घालून हलक्या हाताने मिक्स करावे. केकच्या भांड्याला आतून बटर पेपर लावावा व त्यावर केकचे मिश्रण ओतावे. प्रथम ओव्हन गरम करून घ्यावा. मग त्यावर केकचे भांडे ठेवून ३०-३५ मिनिटे केक बेक करून घ्यावा.

मग केक 
साहित्य : चार टेबलस्पून मैदा, ४ टेबलस्पून पिठीसाखर, १ अंडे, ३ टेबलस्पून तेल, ३ टेबलस्पून दूध, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, १ टेबलस्पून कोको पावडर, १ चिमूट मीठ, २ थेंब व्हॅनिला इसेन्स.
कृती : एक मोठ्या आकाराचा मग घ्यावा, म्हणजे ओव्हनमध्ये केक बाहेर येणार नाही. मगमध्ये एक अंडे फोडून त्यामध्ये तेल व दूध घालून काट्याने चांगले फेटून घ्यावे. मग त्यामध्ये मैदा, पिठीसाखर, बेकिंग पावडर, कोको पावडर, मीठ व व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा चांगले फेटून घ्यावे. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये हाय पॉवरवर दोन मिनिटे सेट करून मधोमध मग ठेवून बेक करावे. मुलांना गरम गरम मग केक खायला द्यावा, कारण हा गरमच चांगला लागतो.

मिनी बोरबॉन चॉको लाव्हा केक
साहित्य : लाव्हा करण्यासाठी : पन्नास ग्रॅम डार्क चॉकलेट कंपाऊंड (किसून), २ टेबलस्पून दूध (अगदी गरम).

केक करण्यासाठी : बारा बोरबॉन बिस्किटे, अर्धी वाटी दूध, १ टेबल स्पून तेल आप्पे पात्राला लावण्यासाठी.
कृती : लाव्हा करण्यासाठी : प्रथम एका छोट्या बोलमध्ये किसलेले किंवा बारीक तुकडे केलेले डार्क चॉकलेट कंपाऊंड घ्यावे. त्यामध्ये अगदी गरम दूध हळूहळू घालून चांगले मिक्स करावे. मिश्रण पातळ झाले की मग फ्रीजरमध्ये दहा मिनिटे ठेवावे.
बोरबॉन बिस्किटांचे तुकडे करून मिक्सरमध्ये ग्राइंड करून पावडर करावी. मग एका बोलमध्ये पावडर काढून त्यामध्ये थोडे थोडे दूध घालून चांगले मिश्रण करावे. ते अशा पद्धतीने फेटावे, की वरून खाली सोडताना रिबिनीसारखे पडेल. आप्पे पात्राला तेल लावावे. मग एकेक टेबलस्पून मिश्रण आप्पे पात्रामध्ये घालून वरून एक टीस्पून लाव्हा मधोमध घालावा. त्यावर परत एक टेबलस्पून मिश्रण घालावे. मंद विस्तवावर आप्पे पात्र ठेवून त्यावर झाकण ठेवावे व सात मिनिटे बेक करून घ्यावे. झाकण काढून बघावे आणि गरज पडल्यास अजून दोन-तीन मिनिटे बेक करावे. मिनी बोरबॉन चॉको लाव्हा केक एका प्लेटमध्ये काढून सर्व्ह करावा.

बिन अंड्याचा कस्टर्ड केक
साहित्य : एक कप मैदा, पाव कप कस्टर्ड पावडर, अर्धा कप पिठीसाखर, अर्धा कप बटर, पाव टीस्पून व्हॅनिला इसेन्स, दीड टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा कप दूध.
कृती : कुकर गरम करायला ठेवावा. त्यामध्ये एक कप मीठ घालून एक स्टँड ठेवावा. कुकर दहा-बारा मिनिटे कमी विस्तवावर गरम करायला ठेवावा. केकच्या भांड्याला आतून बटर व थोडा मैदा लावून घ्यावा. मैदा, कस्टर्ड पावडर व बेकिंग पावडर चाळून घ्यावी. एका बोलमध्ये बटर व पिठीसाखर मिक्स करून चांगली फेटून घ्यावी. पिठीसाखर पूर्ण विरघळून मिश्रण चांगले एकजीव झाले पाहिजे. त्यामध्ये चाळलेला मैदा घालून मिक्स करावे व हळूहळू दूध घालावे. मग त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करावे. तयार झालेले मिश्रण केकच्या भांड्यात ओतावे.
कुकर चांगला गरम झाला की लगेच त्यामध्ये केकचे भांडे ठेवावे. झाकणाची शिट्टी व रिंग काढून ठेवावी.  झाकण लावून प्रथम तीन-चार मिनिटे विस्तव मोठा ठेवावा. मग थोडा कमी करून ३५-४० मिनिटे केक बेक करायला ठेवावा. ३५ मिनिटे झाली की सुरी किंवा सुई केकमध्ये खुपसून बघावी. जर सुईला मिश्रण चिकटले नाही तर केक झाला असे समजावे. नाहीतर अजून पाच मिनिटे बेक करावा. मग झाकण काढून केक थंड करायला ठेवावा. कस्टर्ड केक थंड झाल्यावर सर्व्ह करावा.

बनाना ओट्स मफिन्स 
साहित्य : तीन मध्यम आकाराची पिकलेली केळी, अर्धा कप दूध, पाव कप तेल (कोणतेही चालेल), दोन टीस्पून व्हॅनिला इसेन्स, पाव कप ब्राऊन शुगर (किंवा नेहमीची), सव्वा कप मैदा, अर्धा कप ओट्स, १ टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून दालचिनी पावडर, चिमूटभर मीठ, १ टेबलस्पून व्हिनेगर किंवा लिंबू रस.
कृती : ओट्स मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावेत. एका मध्यम आकाराच्या बोलमध्ये केळी कुस्करून घ्यावीत. मग त्यामध्ये दूध, तेल, व्हॅनिला इसेन्स, साखर चांगली मिक्स करावी. गरज पडल्यास हँड मिक्सर वापरावा, पण अगदी कमी स्पीडवर. दुसऱ्‍या एका मोठ्या बोलमध्ये मैदा, ओट्स, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दालचिनी पावडर, मीठ घालून चाळून मिक्स करावे. त्यामध्ये दूध तेलाचे मिश्रण घालून चांगले मिक्स करावे. मग त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबू रस घालून परत हलक्या हाताने मिक्स करावे. ओव्हन प्रीहीट करून घ्यावा. मग छोट्या छोट्या केकच्या साच्यात एक टेबलस्पून मिश्रण घालावे व वरून ओट्स व ड्रायफ्रूट्स घालून सजवावे. मफिन्स ओव्हनमध्ये ३०-३५ मिनिटे बेक करावेत. गरम गरम हेल्दी एगलेस, शुगरलेस, बनाना ओट्स मफिन्स चहाबरोबर किंवा कॉफीबरोबर सर्व्ह करावेत.
टिप - मफिन्स वेळवेगळ्या प्रकारे करता येतात. आपण नाश्त्याला किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणूनही खाऊ शकतो. केळ्यामुळे टेस्ट निराळीच लागते व साखरसुद्धा कमी लागते. ब्राऊन शुगरऐवजी आपण साधी साखरसुद्धा वापरू शकतो. पण ब्राऊन शुगरमुळे त्याची टेस्ट अजून छान लागते. केळी व ओट्स हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत.

चॉकलेट रम बॉल 
साहित्य : पाचशे ग्रॅम डार्क बेस चॉकलेट, अर्धा कप डेसिकेटेड कोकनट, १० ओरिओ बिस्किटे (चुरा), २ टीस्पून रम किंवा वाईन (रम/वाईनचे प्रमाण ५०० ग्रॅम बेससाठी आहे), चॉकलेट सॉस.
कृती : चॉकलेट बेस घेऊन डबल बाँयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावा. एका चमच्याने हलवून पाच मिनिटे थंड करायला बाजूला ठेवावा. मग त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट, ओरिओ बिस्किटांचा चुरा, रम किंवा वाईन घालून मिक्स करावे. त्या मिश्रणाचे गोळे करून त्यावर थोडा चॉकलेट सॉस घालावा. मग फ्रीजमध्ये पाच मिनिटे ठेवावे व नंतर खावेत.

डलगोना केक 
साहित्य : केकसाठी : एक कप मैदा, अर्धा कप पिठीसाखर, पाव कप तेल, अर्धा कप दूध, १ टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून बेकिंग सोडा, पाव टीस्पून व्हॅनिला इसेन्स, १ टीस्पून कॉफी, १ टीस्पून पिठीसाखर, १ टीस्पून गरम पाणी. 
आयसिंगसाठी : अडीच टेबलस्पून कॉफी, चार टेबलस्पून पिठीसाखर, २ टेबलस्पून गरम पाणी. 
कृती : प्रथम मैदा, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा चाळून घ्यावा. एका छोट्या बोलमध्ये कॉफी, पिठीसाखर व पाणी चांगले मिक्स करावे. एका मोठ्या आकाराच्या बोलमध्ये तेल व पिठीसाखर चांगले फेटून घ्यावे. मग त्यामध्ये चाळलेला मैदा, मिक्स केलेली कॉफी, व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करावे. मग त्यामध्ये हळूहळू दूध घालून मिक्स करावे. एका बाजूला हिंदालियमचे भांडे गरम करायला ठेवावे किंवा मोठ्या आकाराची कढई गरम करायला ठेवली तरी चालेल. त्यामध्ये एक छोटा स्टँड ठेवावा. भांडे चांगले गरम होऊ द्यावे. केकच्या भांड्याला तेल लावून मग मैदा लावावा व भांडे बाजूला ठेवावे. केकचे मिश्रण तयार झाले की केकच्या भांड्यात ओतावे व एकदा हळुवारपणे ओट्यावर आपटावे, म्हणजे मिश्रणात हवा असेल तर निघून जाईन. आता भांडे गरम करायला ठेवलेल्या भांड्यात ठेवावे. भांड्यावर झाकण ठेवावे. बाजूने वाफ जाता कामा नये. मंद विस्तवावर ४०-४५ मिनिटे बेक करावे. ४० मिनिटे झाल्यावर तपासून पाहावे. केक तयार झाला की विस्तव बंद करावा. भांडे तसेच राहू द्यावे. पाच-सात मिनिटे झाल्यावर भांडे बाहेर काढावे. केक थंड होऊ द्यावा. मग त्याचा वरचा फुगीर भाग कापावा. आयसिंग करण्यासाठी कॉफी, पिठीसाखर व गरम पाणी चांगले मिक्स करून घेऊन फ्रीजमध्ये दहा मिनिटे ठेवावे. मग फ्रीजमधून काढून केकवर आयसिंग करावे. वरून चॉकलेटने किंवा आवडेल तशी सजावट करावी. आपण डेझर्ट म्हणून किंवा दुपारी चहाबरोबर सर्व्ह करू शकतो. 

गव्हाच्या पिठाचा केक
साहित्य : एक मोठी वाटी गव्हाचे पीठ (आटा), १ वाटी गूळ, १ वाटी दही, अर्धा कप दूध, दीड चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, १ टेबलस्पून चॉकलेट सॉस, ड्रायफ्रूट्स.
कृती : एका भांड्यात गूळ विरघळवून घ्यावा. एका बोलमध्ये गव्हाचे पीठ, गूळ, दही, दूध, बेकिंग सोडा व बेकिंग पावडर घालून चांगले मिक्स करावे. एका ॲल्युमिनियमच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये तयार केलेले मिश्रण व ड्रायफ्रूट्स घालावीत व वरून चॉकलेट सॉस घालावा. विस्तवावर नॉन-स्टिक भांडे (पॅन) ठेवावा व त्यामध्ये दोन वाट्या मीठ घालून दहा मिनिटे गरम करावे. भांडे चांगले गरम झाले की त्यावर एक स्टँड ठेवावा. त्यावर केकचे भांडे ठेवावे. भांड्यावर/पॅनवर झाकण ठेवून मंद विस्तवावर ४० मिनिटे केक भाजावा. ४० मिनिटे झाल्यावर सुरी खुपसून केक झाला की नाही ते पाहावे. नाहीतर अजून दहा मिनिटे ठेवावे. मग विस्तव बंद करून १५ मिनिटे तसाच थंड करायला ठेवावा. पौष्टिक गव्हाच्या पिठाचा केक थंड झाल्यावर कापून सर्व्ह करावा.

गहू व गाजराचा केक 
साहित्य : एक कप गव्हाचे पीठ, १ कप मैदा, १ कप गाजर (किसून), अर्धा टीस्पून दालचिनी पावडर, १ चिमूट मीठ, १ कप बटर, पाऊण कप दही, पाव कप दूध, १ कप पिठीसाखर, २ टेबलस्पून तेल, १ टीस्पून बेकिंग पावडर, १ टीस्पून बेकिंग सोडा, पाव टीस्पून व्हॅनिला इसेन्स, ड्रायफ्रूट्स सजावटीसाठी.
कृती : गाजर धुऊन, सोलून किसून घ्यावे. प्रथम गव्हाचे पीठ, मैदा, दालचिनी पावडर, मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळणीने चाळून घ्यावा. कुकर गरम करायला ठेवावा. कुकर गरम झाला की त्यामध्ये मीठ घालून एक स्टँड ठेवावा. केकच्या भांड्याला थोडे बटर व मैदा लावावा. एका बोलमध्ये बटर, पिठीसाखर, दही, तेल व दूध मिक्स करून एग बीटरने चांगले फेटून घ्यावे. मग त्यामध्ये किसलेले गाजर, चाळलेला मैदा घालून हलक्या हाताने मिक्स करावे. त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालावा. मिश्रण जास्त घट्ट वाटले तर थोडेसे दूध घालून मिक्स करावे. तयार झालेले मिश्रण केकच्या भांड्यात घालून एकदा टॅप करून त्यावर ड्रायफ्रूटने सजवावे.
कुकरमध्ये स्टँडवर केकचे भांडे ठेवावे व कुकरच्या झाकणाची शिट्टी व रिंग काढून झाकण लावावे. एक मिनिट विस्तव मोठा करून मंद कमी करावा. मंद विस्तवावर ४०-४५ मिनिटे केक बेक करावा. केक बेक झाला की नाही ते झाकण काढून सुरी खुपसून बघावे. केक झाला असेल तर विस्तव बंद करून दहा मिनिटे केक कुकरमध्येच ठेवावा. दहा मिनिटांनंतर कुकरमधून केक बाहेर काढून थंड करायला ठेवावा. थंड झाल्यावर कापून सर्व्ह करावा.

मॅंगो केक 
साहित्य : एक कप मॅंगो पल्प, अर्धा कप साखर, दीड कप मैदा, दीड टीस्पून बेकिंग पावडर, १ कप दूध, अर्धा कप तेल, अर्धा कप पिठीसाखर, अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स. 
कृती : प्रथम आंब्याचा रस काढून मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यावा. एका छोट्या कढईमध्ये अर्धा कप साखर व एक कप मॅंगो पल्प मिक्स करून गरम करायला ठेवावे. साखर पूर्ण विरघळून त्याला ग्लेझ आली पाहिजे. मिश्रण थोडे आटले पाहिजे, म्हणजे त्यातील पाण्याचा अंश निघून जाईल. मग विस्तव बंद करून मिश्रण थंड करायला ठेवावे. 
मैदा, बेकिंग पावडर चाळून घ्यावे. नॉन स्टिक पॅन गरम करायला ठेवावा. केकच्या भांड्याला तेल व मैदा लावावा. एका बोलमध्ये दूध, तेल व पिठीसाखर चांगली फेटून त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करावे. त्यामध्ये मैदा व चार टेबल स्पून मॅंगो पल्प (आपण केलेला) घालावा व हळुवारपणे मिक्स करावे. तयार झालेले मिश्रण केकच्या भांड्यात ओतावे. केकचे भांडे गरम नॉनस्टिक पॅनमध्ये ठेवावे व झाकण ठेवावे. ४० मिनिटे मंद विस्तवावर बेक करावे. ४० मिनिटांनंतर केक तपासून पाहावे व मगच केकचे भांडे बाहेर काढून थंड करायला ठेवावे. केक थंड झाल्यावर वरचा भाग थोडा कापावा. त्यावर आपण तयार केलेला मॅंगो पल्प घालून एकसारखा करावा. वरून चेरीने सजवावे. थोडावेळ फ्रीजमध्ये थंड करून मस्तपैकी सर्व्ह करावा. 

केक चांगला होण्यासाठी काही टिप्स
केक करताना काही टिप्स लक्षात घेतल्या, तर आपला केक हमखास चांगला होतो. केक करताना मैदा, लोणी, बेकिंग पावडर व अंडी ताजी वापरावीत. केक करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घ्या:

  • केक करताना आपल्याला जे साहित्य लागते ते प्रमाणबद्ध म्हणजे बरोबर मोजून घ्यावे.
  • केक करण्याआधी ओव्हन नीट चालतो का ते सुरू करून बघावे. केक ओव्हनमध्ये ठेवण्याआधी ओव्हन गरम करून घ्यावा, मगच भांडे आत ठेवावे.
  • केक करताना मैदा ताजा व चांगल्या प्रतीचा वापरावा.
  • केक करताना अंडी व लोणी फ्रीजमधून आधी थोडा वेळ बाजूला काढून ठेवावीत. अंडी वापरताना चांगली फेटून घ्यावीत.
  • केकचे मिश्रण करण्याआधी भांड्याला लोणी लावून ठेवावे.
  • केक करताना लोणी घरगुती अथवा बाजारातील पांढरे लोणी वापरावे. पूर्ण लोणी वापरणे शक्य नसेल तर निम्मे लोणी व निम्मे डालडा वापरावे. केक करताना साजूक तूप वापरू नये. लोण्याऐवजी मार्गरीन किंवा वनस्पती तूप वापरावे.

केक न फुगण्याची काही महत्त्वाची कारणे -

  • केकचे मिश्रण चांगले फेसले गेले नसल्यास
  • ओव्हन नीट गरम झाला नसल्यास किंवा व्होल्टेज पुरेसे नसल्यास
  • साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास केक फुगत नाही किंवा फुगला तर थंड झाल्यावर परत चपटा होतो.
  • बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा जुना वापरल्यास किंवा दिलेल्या प्रमाणापेक्षा बेकिंग पावडर जास्त झाल्यास केक फुगत नाही.

संबंधित बातम्या