महानगरे आणि महापूर

सुलक्षणा महाजन
सोमवार, 12 जुलै 2021

कव्हर स्टोरी

वादळे, पाऊस, पूर किंवा दुष्काळ यामुळे वस्त्या आणि मनुष्य जीवनाची हानी हे चक्र अनेक शतके अव्याहतपणे चालू आहे. अलीकडच्या काळात पाऊस-वादळे-पूर यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मनुष्य वस्त्यांची वाढलेली संख्या, शहरांमध्ये एकवटलेले नागरिक आणि  शहरांमधला सर्व प्रकारच्या संपत्तीचा साठा सुरक्षित राखणे हे मोठे आव्हान झाले आहे. त्यासाठी सर्व महानगरांना अविरत आणि अनोखे प्रयोग करणे, मार्ग शोधणे आवश्यक झाले आहे. 

जगातील बहुतेक सर्व महानगरे नद्या, महानद्या आणि समुद्र किनाऱ्यांवर वसली आहेत. म्हणूनच महापूर न आलेले महानगर बहुधा जगात कोठेही सापडणार नाही! समुद्र किनारे आणि लहान-मोठ्या बेटांवर असलेल्या जुन्या वस्त्या, नदीकाठच्या अनेक महानगरांचे अस्तित्व हजार-दोन हजार वर्षे तरी ज्ञात आहे. इजिप्त, मेसापोटेमिया, सिंधू अशा प्राचीन मानवी संस्कृती नदी किनारी असल्यानेच बहरू शकल्या होत्या. त्यांनाही महापुरांचा शाप होताच. उत्तर भारतामधील अनेक शहरे गंगा, यमुना आणि त्यांच्या उपनद्यांवर वसवलेली आहेत आणि त्यांनी आपले मार्ग अनेकदा बदलून मानवी वस्त्या उद्‌ध्वस्त केल्या आहेत. चीन मधील बहुतेक सर्व प्राचीन महानगरे तेथील यांगत्से सारख्या महानद्यांवर वसलेली आहेत. आजच्या जगातले सर्वात मोठे महानगर, इडो नदीच्या मुखावर असलेले टोकियो तर इंग्लंडमधील थेम्सच्या काठावर असलेले लंडन किमान दोन हजार वर्षे अस्तित्वात आहे. या शहरांनी अनेक महापूर बघितले आहेत. अनेकदा ती शहरे पुराने उद्ध्वस्त होऊनही नव्या जोमाने पुन्हा-पुन्हा उभी राहिली आहेत. गेल्या दोन-चारशे वर्षात ह्यातील प्रत्येक शहराने वादळे, पाऊस, महापूर, आणि महामारीची आवर्तने नोंदली आहेत. या प्रत्येक शहराने प्रत्येक महापुरानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही यशस्वी-काही अयशस्वी प्रयत्न केले आहेत. वसाहतींच्या विस्तार काळात व्यापारी लोकांनी वसवलेली मुंबई सारखी अनेक शहरे पुरापासून बचाव करीत आता महानगरे झाली आहेत. 

जगातील अनेक शहरांना आणि महानगरांना गेल्या काही वर्षांपासून पाऊस, ढगफुटी, पूर, वादळे वाढत असल्याचा अनुभव येतो आहे. पृथ्वीचे वाढलेले तापमान, त्यामुळे होत असलेले हवामानातील बदल, लहरी वादळे, पाऊस आणि पाठोपाठ येणारे पूर, यामुळे शहरात जीवित आणि वित्त हानी खूप होते. त्यातच उत्तर ध्रुवावरचे हिमनग वितळून समुद्र पातळी वाढण्याचा अनेक शहरांना भेडसावत आहे. शहरांची हानी टाळणे, कमी करणे आणि शहरातील संपत्तीचे, नागरिकांचे संरक्षण करणे अशी आव्हाने जगापुढे उभी आहेत. हवामानाचा अंदाज, संदेश यंत्रणा आणि नागरिकांना सजग करून, सुरक्षित स्थळी हलवून जीवितहानी कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत. शिवाय गेल्या साठ -सत्तर वर्षात विज्ञानाच्या आधारे अभियांत्रिकी तंत्रे शोधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करून महापूर नियंत्रित करून वित्त हानी टाळण्याचे नावीन्यपूर्ण प्रयोग झाले आहेत. लंडन आणि व्हेनिस सारख्या शहरात समुद्राच्या भरतीचे पाणी अडविण्यासाठी अभिनव यंत्रणा उभ्या केल्या आहेत. नद्यांवर धरणे बांधून पूर नियंत्रण करण्यात खूप प्रगती झाली असली तर गेल्या काही दशकांमध्ये पानशेतप्रमाणे किमान एक डझन धरणे फुटून, वाहून जाऊन मोठे आर्थिक नुकसानही अनेक शहरांनी अनुभवले आहे. सर्वात अलीकडचे उदाहरण चीनच्या ‘थ्री गॉर्जेस’ धरणाचे आहे. ह्या भव्य प्रकल्पातील एका धरणाचा काही भाग वाहून गेला आणि काठावरच्या शहरांचे नुकसान झाल्याच्या घटना २०१८ आणि २०२० साली घडल्या. अर्थात चीनबाहेर ह्या सर्व घटनांची माहिती पुरेशा प्रमाणात दिली जात नाही आणि तेथील नुकसानीचे तपशीलही समजत नाहीत. मात्र इतर अनेक देशांमध्ये अशा घटनांच्या नोंदी होतात, कारणे शोधली जातात, त्यावर उपाय केले जातात, ते अभ्यासकांना उपलब्ध होतात आणि त्यावर शोधनिबंध लिहून जगाच्या ज्ञान भांडारात भर घातली जाते. 

महापूर नियंत्रणाच्या काही नावीन्यपूर्ण आणि यशस्वी अभियांत्रिकी प्रकल्पांची खरे तर एक संपूर्ण लेखमालाच होऊ शकेल. नमुन्यादाखल सिंगापूर आणि टोकियो येथील अलीकडेच पूर्ण झालेल्या पूर नियंत्रणाच्या प्रयोगांकडे पाहता येईल. जिज्ञासू वाचकांना आंतरजालाच्या माध्यमातून अधिक माहिती मिळू शकेल आणि व्हिडिओही बघता येतील. 

सिंगापूर 
सातशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या सिंगापूर बेटाला अतिवृष्टी, पूर आणि पाण्याचे दुर्भिक्ष ह्या तीव्र समस्या नित्यनेमाने भेडसावत असत. एका शहराचा हा चिमुकला देश १९६५ मध्ये अगोदर ब्रिटिश आणि नंतर मलेशियापासून स्वतंत्र झाला आणि तेव्हापासून ह्या तीन समस्यांचे निराकरण करायला तेथील प्रशासनाने युद्धपातळीवर काम केले. अतिवृष्टीवर नियंत्रण घालणे अजूनही शक्य नसले तरी पूर आणि पाण्याचे दुर्भिक्ष ह्या दोन संकटांपासून आज सिंगापूर पूर्णतः मुक्त झाले आहे. सिंगापूरने अंगीकारलेल्या आर्थिक धोरणामुळे ते शहर श्रीमंत झाले आणि नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी पुरेसे भांडवलही जमा झाले. पूर आणि पाण्याचे दुर्भिक्ष यावर उपाय म्हणून सिंगापूरच्या नद्यांवर समुद्राच्या पाण्यात धरणे बांधली आहेत. जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी वेगाने त्या धरणांच्या क्षेत्रात वाहून नेण्यासाठी जमिनीखालील पाणी-बोगदे, जमिनीवर कालवे आणि नद्या यांचे सुमारे आठ हजार किलोमीटर लांबीचे जाळे निर्माण केले आहे. नदीच्या मुखावर समुद्रात बांधलेल्या धरणात पाणी नेले जाते. त्या जलाशयांतील पाणी शुद्ध करून शहराला पुरवले जाते आणि जास्तीचे पाणी ओहोटी आली की समुद्रामध्ये सोडून दिले जाते. ‘मरीना बराज’ हा  २००८ साली कार्यान्वित झालेला असा पहिला प्रकल्प आहे. त्यानंतर तेथील अनेक नद्यांवर असे प्रकल्प बांधले आहेत. ह्या नियोजनामुळे गेली अनेक दशके मलेशियातून आयात केलेल्या पाण्याची गरज संपून पाण्याच्या बाबतीत सिंगापूर स्वयंपूर्ण झाले आहे. अर्थात त्यासाठी तेथील प्रशासनाने संशोधन, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी प्रकल्पात मोठी गुंतवणूक केली आहे. ह्या शुद्ध आणि पुरेशा पाण्यासाठी तसेच पूरमुक्त सिंगापूरसाठी नागरिकांना मोठी आर्थिक किंमत द्यावी लागली तरी त्यांची तक्रार नसते. येणाऱ्या काळात हवामान बदलामुळे पाऊसमान वाढण्याची आणि समुद्राची पातळी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पुन्हा पुराचे प्रसंग येऊ शकतात. त्यासाठी सध्या वरील बोगदे, कालवे, नद्या रुंद करून त्यांची पाणी-वाहन क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. तर समुद्राच्या पाण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी संशोधन चालू आहे. 

टोकियो : अजस्र पूर नियंत्रण व्यवस्था
जपानच्या आणि टोकियोच्याही दोन हजार वर्षांच्या इतिहासात किती मोठे पूर येऊन गेले असतील त्याला गणतीच नाही. जपानमध्ये १९१० साली आलेल्या पुरांनी जपानचे ४ टक्के वार्षिक उत्पन्न गिळंकृत केले होते. विसाव्या शतकात जपानमध्ये  झपाट्याने नागरीकरण वाढत होते आणि शहरे सतत पाण्याखाली बुडत होती. तेथे १९२० सालापासून पूर नियंत्रणासाठी कालवे काढण्याचे प्रयोग सुरू झाले. १९८० सालच्या पुराने टोकियोच्या मध्य भागातील हजारो घरे नष्ट केली, तेव्हा काही विशेष आणि भन्नाट उपाय करण्याचा विचार सुरू झाला. त्यातून एका प्रकल्पाची कल्पना उभी राहिली. १९९२ साली त्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले. तीस मीटर व्यासाच्या, सत्तर मीटर खोल सहा विहिरी टोकियोत खणल्या आणि बांधून काढण्यात आल्या. जमिनीवर पसरणारे पुराचे सर्व पाणी त्यात गोळा करून ते जमिनीखाली ५० मीटर खोल असलेल्या १० मीटर रुंदीच्या, ६ किलोमीटर लांबीच्या कालव्याला जोडले. हा कालवा शेवटी भूगर्भातील एका महाकाय दालनाला जाऊन मिळतो. ह्या अजस्र दालनाची उंची १८ मीटर तर लांबी-रुंदी  १७७ मीटर आणि ७८ मीटर आहे. त्याचे छत आणि त्यावरील जमीन तोलण्यासाठी ५०० टन वजनाचे काँक्रिटचे ६० खांब आहेत. ह्या सर्व व्यवस्थेमुळे पुराचे वेगाने वाहणारे पाणी संथ होते आणि नंतर पंपाच्या साहाय्याने इडो नदीत सोडले जाऊन ते समुद्राला मिळते. हा प्रकल्प २००८ साली बांधून पूर्ण झाला. स्थानिक आणि परदेशी लोकांना हा प्रकल्प बघता येतो आणि त्यांनीच खांब असलेल्या मोठ्या हॉलला ‘कॅथेड्रल’ हे नाव दिले आहे. जगातला हा सर्वात धाडसी अभियांत्रिकी प्रकल्प मानला जातो. शिवाय ह्या बांधकामासाठी जमिनीतून जी दगड-माती निघाली आहे त्यातून तेथील नदी आणि नाल्यांचे किनारे उंच भिंती बांधून सुरक्षित करण्यात आले आहेत. त्यांच्या किनारी लोकांना फिरण्यासाठी मोकळ्या जागा तयार केल्या आहेत. अतिशय दाटीवाटीने वसलेल्या जगातल्या ह्या सर्वात मोठ्या, ३ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरात त्यामुळे लोकांना फिरण्यासाठी मोकळ्या सार्वजनिक जागाही मिळाल्या आहेत. सुरक्षित नद्यांच्या सान्निध्यात अनेक इमारती बांधल्या गेल्या. ह्यामुळे टोकियो आकर्षक होऊन अधिक लोक तेथे येऊ लागले आणि शहराच्या बाहेर वस्ती वाढून तेथेही पूर नियंत्रणाचा विचार करणे आता आवश्यक झाले आहे. शिवाय हा प्रकल्प करताना आधीच्या काळात बांधलेल्या मोठ्या मोठ्या गटारांची व्यवस्था अबाधित राहिली आहे. 

टोकियोमध्ये दरवर्षी सरासरी पाच महापूर येतात. पण गेल्या काही वर्षात तेथे बारा महापूर आले. सध्या तरी हा प्रकल्प त्या पुरांना तोंड देण्यास समर्थ असला तरी भविष्यामध्ये जागतिक हवामान बदलाच्या काळात ही व्यवस्था पूर्ण पडेल का याची शंका तेथील पूर नियंत्रकांना सतावते आहे. सध्या तरी लोकसंख्येचा महापूर थांबवता येत नसला तरी टोकियोमध्ये पाण्याचा महापूर नियंत्रणात आला आहे असे म्हणता येईल. तरीही बेभरवशाचा पाऊस, पूर आणि महानगरांमधील अभियांत्रिकी उपाय यांची शर्यत माणसाला कायमची जिंकता येईल या भ्रमात न राहता तेथील जीवित आणि वित्त हानी कमी करण्याचे प्रयत्न असेच कायम चालू ठेवावे लागतील असे प्रशासनाचे धोरण आहे.

संबंधित बातम्या