शिबिरांचे बदलते स्वरूप

ज्योती बागल
सोमवार, 29 एप्रिल 2019

सुटी विशेष
 

काही वर्षांपूर्वींचीच गोष्ट असेल, उन्हाळ्याची सुटी लागली, की ठरलेलं असायचं, बॅग पॅक करायची आणि थेट मामाचं गाव गाठायचं! पण हल्ली सुटी लागताच बॅग पॅक करायला घेतली जाते, पण ती मामाच्या गावी जाण्यासाठी नाही, तर खास उन्हाळ्यात मुलांसाठी असणाऱ्या उन्हाळी शिबिरात जाण्यासाठी.

शिबिरांचे बदलते स्वरूप आणि वाढते प्रमाण या दोन्ही गोष्टी सध्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. याला कारणेही तशीच आहेत. लहान मुलांचा टी.व्ही. आणि व्हिडिओ गेम्सकडे वाढता कल पालकांच्या काळजीचा विषय बनत आहे. शाळा सुरू असताना किमान अर्धवेळ तरी मुले शाळेत असतात. पण सुटी लागल्यावर, तर मुले पूर्णवेळ घरी असतात... आणि लहान मुलांची निरीक्षण क्षमता आणि क्रिएटिव्हिटी उत्तम दर्जाची असते. मग दिवसभरातल्या एवढ्या मोकळ्या वेळात मुलांना एंगेज ठेवायचं कसं हा महत्त्वाचा प्रश्न पालकांसमोर असतो. त्यामुळे शाळा संपत नाही, तोच पालक वेगवेगळ्या शिबिरांचा शोध घेऊ लागतात. अर्थात यात एक जागरूक पालक म्हणूनदेखील ते आपली भूमिका पार पाडत असतात. कारण कोणत्याही शिबिराला पाठवायचं म्हणून न पाठवता, त्यांच्या मुलांना इंटरेस्ट असेल त्याच प्रकारच्या शिबिरात मुलांना पाठवायला पालक प्राधान्य देताना दिसतात.  

पूर्वी शिबिरांमध्ये बैठे खेळ जास्त होते, पण हल्ली मुलांच्या शारीरिक हालचाली व्हाव्यात, त्यांच्या मेंदूला चालना मिळावी याचा विचार करून सर्व प्रकारचे खेळ आणि ॲक्‍टिव्हिटी घेतल्या जातात. तसेच साहसी शिबिरांमध्ये शौर्य दाखवणारे असे धाडसी खेळ घेतले जातात; शिवाय मुलांच्या सुरक्षेचादेखील विचार केला जातो. ही जबाबदारीची भावना आयोजकांमध्येदेखील वाढलेली दिसते. हळूहळू शिबिरांचे स्वरूप बदलू लागले आहे. या २ वर्षांत शिबिरांचा कालावधीही वाढला आहे. त्यामुळे हल्ली ही शिबिरे १०-१५ दिवसांचीदेखील असतात. तसेच पूर्वी शिबिरात खेळ आणि कागदी वस्तू बनवणे, यांनाच प्राधान्य दिले जात होते. पण अलीकडे शिबिरांची थीम ठरवून त्यानुसार कार्यक्रम आखले जातात. तसे शिबिरांचे बरेच प्रकार पडतात, जसे की खेळ शिबिरे, ओरिगामी क्राफ्ट शिबिरे, विज्ञान शिबिरे, साहस शिबिरे, चित्रकला शिबिरे इत्यादी.

उन्हाळी शिबिरांची मुलांच्या सुप्त कला गुणांना आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी नक्कीच खूप मदत होते. कारण शिबिरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांहून मुले येतात. प्रत्येकाची कौटुंबिक पार्श्‍वभूमी वेगळी असते. त्यामुळे अशा शिबिरात एकत्र आल्याने मुलांच्यात मैत्रभाव निर्माण व्हायला मदत होते. मिळून मिसळून कसं राहायचं, शेअरिंग कसं आणि का करायचं हे त्यांना कळतं. विविध उपक्रमांतून त्यांचे संवाद कौशल्य वाढते... आणि संवाद हा व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो. तसेच शिबिरातील लहान गट, मोठा गट असे वयोगट ठरलेले असतात. त्यानुसार शिबिरात घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची, खेळांची तीव्रता ठरवली जाते.

मुलांना केंद्रस्थानी ठेवून शिबिरे घेतली जावीत...  
‘शिक्षणविवेक’ लहान मुलांसाठी गेली ३ वर्षे उन्हाळी शिबिरे आयोजित करत आहे. यासाठी आम्ही प्रत्येकवेळी वेगळी थीम ठरवतो. थीम ठरवताना त्या त्या वयोगटातील मुले गृहीत धरूनच थीम ठरवली जाते. यावेळी आमच्या शिबिराचा मुख्य उद्देश मुलांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण करणे हा आहे. त्यामुळे शिबिराची थीम ही ‘कट्टाकट्टी - उन्हाळी शिबिर’ अशी घेतली आहे. यात मुलांना मौज, मजा आणि मस्ती सारे काही अनुभवता येणार आहे. याची मांडणी करताना आम्ही कुटुंबकट्टा, मैत्रीकट्टा, कलाकट्टा, बाजारकट्टा, लेखनकट्टा, वाचनकट्टा, खाऊकट्टा, धमालकट्टा, गप्पाकट्टा अशा कट्ट्यांचा समावेश केला आहे. म्हणजे दर दिवशी वेगळा कट्टा ठेवला आहे आणि त्या अनुषंगाने ॲक्‍टिव्हिटी डिझाईन केल्या आहेत. म्हणजे बाजार कट्ट्यामध्ये मुलांनी स्वतःच बाजार भरवून काही मुलांनी विक्रेते व्हायचे आणि काही मुलांनी ग्राहक व्हायचे. यातून त्यांची बाजाराची संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झाली आणि त्याच बरोबरीने समाजातील एका महत्त्वाच्या गटाची कामाची पद्धतही कळली. गप्पा कट्टयामध्ये मुले मनमोकळेपणाने बोलतात. काही त्यांच्या पालकांविषयी बोलतात, काही त्यांच्या मित्रांविषयी बोलतात, कारण इथे त्यांना रोखणारे कोणी नसते. त्यामुळे ती व्यक्त होतात. खाऊकट्टादेखील ही मुले खूप एन्जॉय करतात. यात मुलांना अगदी सोप्पा आणि गॅसचा वापर न करता  पौष्टिक खाऊ करायला शिकवले जाते. अशा प्रकारे जर मुलांना केंद्रस्थानी ठेवून शिबिरे घेतली, तर त्याचा मुलांना नक्कीच उत्तम फायदा होतो.

मुलांना आनंद देणे हा एकच उद्देश...!
आमची मुलगी अश्‍विनी हिच्या स्मृती प्रीत्यर्थ आम्ही २००६ मध्ये ‘अश्‍विनी जप्तीवाले स्मृती प्रतिष्ठान’ची स्थापन केली. त्यानंतर व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे घ्यायला सुरुवात केली. ही शिबिरे पूर्णपणे मोफत असतात. आतापर्यंत ५१ शिबिरे झाली आहेत. ही शिबिरे फक्त सुट्यांमध्येच घेतो. तसेच वंचित, गरीब आणि गरजू कुटुंबातील मुलांसाठी घेतो. 

माझ्या मुलीला लहान मुलांमध्ये रमायला आवडायचं. ती स्वत: संस्कार शिबिरे घ्यायची. पण २००५ मध्ये अपघातात ती गेली. तिची आठवण राहावी म्हणून आम्ही याप्रकारची व्यक्तिमत्त्व शिबिरे घ्यायला सुरुवात केली. यामध्ये माझ्या सोबत सामाजिक काम करणाऱ्या काही संथा आहेत, काही लोक आहेत, ज्यांची मला मदत होते. अशी ३०-३५ जण तरी आहेत.

आतापर्यंत आम्ही मानव्य संस्था, एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य ज्ञान, अनाथ बालिका आश्रम, बालग्रामच्या काही शाखा, सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघ, सेवा आरोग्य भारतीच्या काही ठिकाणी अशी शिबिरे घेतली आहेत. 

गरीब आणि गरजू मुलांसाठी ही शिबिरे घेताना, ज्या वस्तीत शिबिर घ्यायचे आहे त्याठिकाणी ८ दिवस आधी जाऊन तेथील लोकांना याची माहिती दिली जाते, त्यामुळे पालक मुलांना आवर्जून पाठवतात. शिबिर हे साधारण ३-४ दिवसाचे असते. यात वेगवेगळे लोक येऊन वेगवेगळ्या ॲक्‍टिव्हिटी घेतात. यामध्ये जादूचे प्रयोग, विज्ञान खेळणी, हस्तकला, कार्टून, वारली पेंटिंग्ज, ॲबॅकस, शुभेच्छा कार्डे, नृत्य, खेळ, गाणी, नाट्यछटा, अभिनय कला, चित्रकला, कोलाज अशा गोष्टी शिकवल्या जातात.

वस्त्यांमध्ये शिबिरे घेताना, सुरुवतीला ५०-६० मुले येतात. अधे-मध्ये काही मुले शिबिर सोडूनही जातात. पण जी काही ३०-४० मुले शेवटपर्यंत थांबतात, ती मात्र शेवटच्या दिवशी अजून एक दिवस घ्याना शिबिर, असं म्हणून जेव्हा हट्ट करतात, तेव्हा खूप समाधान मिळतं.

यासाठी आपण कोणाकडून एकही पैसा घेत नाही. आमची मुलगी गेली, तेव्हा तिच्या इन्शुरन्सचे काही पैसे मिळाले, त्याच्यातून आम्ही एक फॅमिली ट्रस्ट केला आहे. त्याच्या व्याजातून आमचा आर्थिक खर्च भागतो. जे काही लोक शिबिरात मुलांना भेटायला किंवा उपक्रम घ्यायला येतात, ते मुलांसाठी खाऊ आणतात... आणि शिबिरांमध्ये जे काही साहित्य लागतं ते सगळं साहित्य मी स्वत: ट्रस्टच्या पैशातून आणते. कोणाकडूनही कसलाही पैसा घ्यायचा नाही हे आम्ही सुरुवातीलाच ठरवलं होतं. या शिबिरांच्या कामात तरुण मुलेमुली स्वयंसेवक म्हणून आवर्जून सहभागी होतात. त्यांना जमेल तसं ते वेळ देतात. यातून मला एक नक्कीच सांगावस वाटतं, की या तरुण मुलामुलींमध्येदेखील सामाजिक भान असते.

या शिबिरांबाबत माझे स्वत:चे खूप छान अनुभव आहेत. कारण आपण घेतानाच ही शिबिरे वंचित आणि गरीब गरजू मुलांसाठी घेतो. त्यामुळे ही मुले खूप खूष आणि आनंदी असतात. घेतलेले उपक्रम एन्जॉय करतात आणि आमचा एकच उद्देश आहे, की त्या मुलांना आनंद देणे. 

‘अश्‍विनी जप्तीवाले स्मृती प्रतिष्ठान’तर्फे दरवर्षी समाजसेवी व्यक्तींसाठी एक पुरस्कारही दिला जातो. आतापर्यंत असे ९ पुरस्कार दिले आहेत. तसेच शालेय जीवनात विशेष गुण मिळवणाऱ्या मुलींचादेखील बक्षीस देऊन सत्कार केला जातो.  

माझी मुलगी गेली तेव्हा ‘सकाळ’ वर्तमान पत्रात माझा ‘नो मोर टिअर्स मम्मा’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. तो वाचून मंगेश तेंडुलकरांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मीदेखील त्यांच्यासोबत अपघात टाकण्यासंदर्भात नळ स्टॉपच्या चौकात पत्रक वाटायला यावे असे सांगितले. तो माझ्यासाठी खरंच विशेष दिवस होता. आज तेंडुलकर सर नाहीत पण ते पत्रक वाटण्याच काम त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आम्ही सुरू ठेवले आहे.

मामाचा गाव मोठा, नाही आनंदाला तोटा!
आम्ही ‘अंघोळीची गोळी’ या संस्थेचे सर्व सदस्य एकत्र येऊन ग्रामीण, दुष्काळी भागातील, गरीब आदिवासी मुलांसाठी ‘मामाच्या गावाला’ हा उपक्रम राबवत आहोत. खरे तर हा उपक्रम मला करावासा वाटला, कारण ५ वर्षांपूर्वी मी ‘अंघोळीची गोळी’च्या प्रसारासाठी बीडला गेलो होतो. पण मी जेव्हा बीड जिल्ह्यातील बरीच गावे फिरलो, तेव्हा जाणवले की यांना प्यायलादेखील पुरेसे पाणी मिळत नाही आणि आपण अंघोळ करू नका म्हणून काय सांगतोय. याच दरम्यान त्याच भागातील ‘इनफंट इंडिया’ या अनाथ आश्रमात मी गेलो. तिथल्या मुलांची अवस्थादेखील अशीच होती. तेव्हा ठरवले, की ‘पाणी वाचवा’चा तर प्रचार करायचाच शिवाय ज्यांना पाणी मिळत नाही त्यांना पाणी मिळावं म्हणून पाठपुरावा करायचा. पण हे लगेच होणे शक्‍य नाही, त्यामुळे आपल्याला जमेल त्या परीने या गरीब मुलांसाठी काहीतरी करायचे. यातून ‘मामाच्या गावाला’ या संकल्पनेचा उदय झाला. गेली ३ वर्षे आम्ही हा उपक्रम करत आहोत. यामध्ये १५-२० मुलांना आम्ही पुण्याला घेऊन येतो. हा उपक्रम आम्ही उन्हाळ्यातच करतो, कारण तेव्हा मुलांना शाळेला सुटी मिळालेली असते आणि यानिमित्त काही मुलांचे तरी मामाच्या गावाला जाण्याचे स्वप्न पूर्ण होते. ज्या मुलांना या उपक्रमांतर्गत पुण्यात आणले जाते, त्या मुलांची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जसे की, शनिवार वाडा, लाल महाल, सिंहगड अशा ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे, बागेत फिरायला घेऊन जाणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही कार्यक्रम घेणे, वेगवेगळे खेळ घेणे इत्यादी. बऱ्याचदा काही कलाकार मंडळींनादेखील त्या मुलांशी संवाद साधण्यासाठी आम्ही बोलावतो. या मुलांमध्ये या कलाकारांविषयी खूप आकर्षण असते. पण ही मंडळीदेखील त्यांच्यासारखीच आहेत, हे बघितल्यावर त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढतो आणि ती मोकळेपणाने वागू, बोलू लागतात. यात माझ्या एवढाच माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या मित्रांचाही मोलाचा वाटा आहे.

ही आदिवासी पाड्यातील मुले जेव्हा इथून परत गावी जातात, तेव्हा एक वेगळाच हुरूप घेऊन जातात. आपलापण मामा, दीदी, ताई पुण्यात आहेत, याचा खूप आनंद असतो त्या मुलांना. ही मुले जरी एकदाच भेटली असली, तरी त्या आठ एक दिवसात ती आपलेस करून टाकतात आणि कधीच न तुटणार नाते निर्माण करतात. इथून परत गेल्यावर ती या मामाला आवर्जून पत्रही लिहितात. ‘आम्ही चांगला अभ्यास करतोय, हे सांगतात, तेव्हा मिळणारे समाधान शब्दांत पण मांडता न येण्यासारखे आहे.
 

संबंधित बातम्या