संग्रहालय कसे बघाल?

शाम ढवळे
सोमवार, 29 एप्रिल 2019

सुटी विशेष
 

म्युझियम(संग्रहालय) हा शब्द मूळ ‘मुसी’ या ग्रीक शब्दापासून निर्माण झालेला आहे. आपल्या ऐतिहासिक अवशेषांची शास्त्रशुद्ध पद्धतीने जोपासना व इतिहासाच्या क्रमवारीनुसार त्या वस्तूंची मांडणी आपल्या समोर ठेवून ‘संग्रहालये’ सांस्कृतिक शिक्षणाची एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत. समाजाला शिक्षण देणे हेच उद्दिष्ट व मनोरंजनातून शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संग्रहालयांद्वारे पार पाडले जाते. 

कोणत्याही शहराचे ऐतिहासिक व सांस्कृतिक मूल्य आपल्याला त्या शहरातील संग्रहालये पाहिल्यावर समजते. संग्रहालयांचा उपयोग संग्रह जमा करणे, संग्रहाचे जतन करणे, संग्रहाची इतिहासाशी सांगड घालणे, जमा केलेल्या संग्रहाचे सादरीकरण करणे, समाजाला माहिती व शिक्षण देणे, संशोधन करणे, माहिती व संशोधन प्रकाशित करणे इत्यादी प्रकारे अनेकविध भूमिका पार पाडत असतात. वैयक्तिक संग्रह व आवड, याद्वारेच संग्रहालये निर्माण झाली आहेत असे दिसून येते. 

संग्रहालयामध्ये संग्रहाचे जतन व त्याचबरोबर सादरीकरण हा पारंपरिक उद्देश आता मागे पडून सुसंवाद व दृश्‍य स्वरूपातील शिक्षण या उद्देशाकडे संग्रहालयांनी आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. कोणताही फायदा किंवा नफा मिळविणे हा संग्रहालयांचा उद्देश नसतो, तर आपल्या सांस्कृतिक व ऐतिहासिक मूल्यांची भावी पिढीला, पर्यटकांना माहिती व्हावी या उद्देशाने संग्रहालयाचे कार्य चालते. त्यामुळेच तर अभ्यासू विद्यार्थी, जिज्ञासू, इतिहास प्रेमी व तज्ज्ञ या सर्वांचीच गरज संग्रहालये पूर्ण करतात. त्यादृष्टीने कोणत्याही संग्रहालयाची मांडणी, त्याचे सादरीकरण, लेआऊट इत्यादी अनेक बाबींवर संग्रहालयाची परिणामकारकता अवलंबून असते. हे ही आपल्याला समजून घ्यावे लागते. 

अशा प्रकारे संग्रहालये हा मानवी जीवनातील व शहर विकासातील एक महत्त्वपूर्ण घटक असून वेळ जाण्याचे एक साधन म्हणून संग्रहालयाकडे पाहिले जाऊ नये. बऱ्याचदा एखाद्या शहरात आपण गेलो व २-३ तासाचा वेळ शिल्लक असेल, तर आपण चला एखाद्या जवळच्या संग्रहालयामध्ये चक्कर मारून येऊ असे काही वेळा घडते. नवीन शहरात फिरताना संग्रहालये पाहण्यास आपण फारसे प्राधान्य देत नाही. 

खरे तर संग्रहालयाला जर मनापासून भेट दिली व वेळ काढून तेथील सर्व तपशील पाहिले, तर आपल्याला अनेक विषयांचे ज्ञान मिळते. संग्रहालयाला भेट देताना सुरुवातीलाच त्या संग्रहालयात लावलेले संबंधित माहिती फलक वाचणे आवश्‍यक आहे. तसेच संग्रहालयासंबंधीची काही माहिती आपल्याला आधीच मिळाली, तर ती जरूर घ्यावी आणि आताच्या इंटरनेटच्या काळात, तर ही बाब खूपच सहज साध्य होऊ शकते. त्यानंतर संग्रहालयांमधील दालने पाहात असताना जर फोटो, व्हिडिओ काढण्यास परवानगी असेल, तर जरूर घ्यावेत. पण त्यामध्ये जास्त वेळ न घालवता जेवढे जास्तीत जास्त पाहता येईल, अनुभवता येईल ते पाहावे. वेळेनुसार कदाचित सर्व दालने तपशीलवार पाहता येणार नाहीत, तरीही त्यातील मोजकी काही दालने व त्यातील संग्रह आवर्जून तपशीलवारपणे पाहावीत.  

संग्रहालयामधील संग्रहाचे नुकसान होऊ नये, याची खबरदारी घेतानाच आपापसामध्ये मोठ्याने खूप काही चर्चा न करता शांतपणे मांडलेला संग्रह, त्यांचे विषय, आशय तेथे लिहिलेल्या माहितीचे वाचन करून समजून घ्यावेत. काही माहिती खूप महत्त्वाची वाटली, तर परवानगी असल्यास त्याची छायाचित्रे घ्यावीत. वस्तूसंग्रह यांचीही छायाचित्रे घ्यावीत. मध्येच काही दालने वगळून काही दालने पाहणे, असे करू नये. त्यामुळे संग्रहालयामधील संग्रह व त्याची अर्धवट माहिती घेऊन आपण बाहेर पडतो. कदाचित संग्रहालयामधील प्रत्येक दालनातील प्रत्येक गोष्ट आपण बघू शकणार नाही. पण जो काही भाग पाहू ते मनापासून व तपशीलवारपणे असे ठरवून पाहिले, की त्यातील गोष्टी आपल्या लक्षात राहतात आणि आपण त्या संग्रहालयासंबंधी किमान २-४ गोष्टी इतरांनाही खात्रीशीरपणे सांगू शकतो.   

एखाद्या शहरात अनेक विषयांची संग्रहालये असतात. त्यावेळी आपल्याला नेमके कोणते संग्रहालय आवडेल ते ठरवावे आणि ते मनापासून अभ्यासावे. संग्रहालयात किंवा कोणत्याही ठिकाणाला भेट देताना नेहमी आपल्यासोबात एक छोटीशी डायरी ठेवावी. जेणेकरून काही महत्त्वाच्या नोंदी आपण पटकन घेऊ शकू.  

बऱ्याच संग्रहालयांमध्ये अनेक प्रकारची पेंटिंग्ज, स्कल्पचर्स, लाकडी व धातूच्या कलाकृती असतात. ती समजावून घेऊन, त्या कलेबद्दल अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपल्या ज्ञानातही भर पडते. त्याचबरोबर आपली कला, परंपरा यांविषयी अभिरुची संपन्न होण्यास मदत होते. चित्र - शिल्पांची तयार करायची पद्धत, रंगसंगती, आकार, आशय, विषय इत्यादी अशा अनेक बाबींमुळे त्या कलेविषयी आपल्याला प्रेम व आदर वाटू लागतो. या सर्वांचा परिणाम म्हणून एक सांस्कृतिक व सामाजिक बंध निर्माण होतो. त्यामुळेच परदेशात लहान मुलांची सहल दिवसभरासाठी संग्रहालयामध्ये नेली जाते. तिथे त्यांची कार्यशाळा घेतली जाते. आपल्याकडेही असे उपक्रम राबविणे आवश्‍यक झालेले आहे. 

संग्रहालये पाहताना एखाद्या विषयाची माहिती आपल्याला अर्धवट वाटली किंवा समजली नाही, तर तेथील प्रमुखांशी संपर्क साधून माहिती विचारून घ्यावी. काही संग्रहालयामध्ये काही छोट्या फिल्म्स दाखवण्याचीही व्यवस्था असते. सहसा त्या फिल्म्स चुकवू नयेत. कारण त्यातूनदेखील बरीच माहिती मिळत असते. तसेच काही मनोरंजनात्मक कार्यक्रम असतात, त्यातदेखील अवश्‍य सहभागी व्हावे. 

संग्रहालयांसंबंधी सी.डी., ब्रोशर्स, पुस्तके इत्यादी जे काही साहित्य उपलब्ध असेल, ते आवर्जून घ्यावे. ज्यामुळे नंतरही कधी आपण त्या संग्रहालयाची जास्तीची माहिती घेऊ शकतो. तसेच हेड फोनची व्यवस्था असल्यास ते ही घ्यावेत. त्यामुळे प्रत्येक दालनामध्ये आपल्याला स्वतःला हवी ती माहिती हेडफोन ऑडिओद्वारे घेता येते. दालनांची क्रमवारी न चुकवता संग्रहालय पाहावे. गाइडची व्यवस्था असेल, तर खूपच उत्तम! मग गाइडच्या साथीने संग्रहालय पाहावे. माहिती ऐकावी, संग्रहालयामधील नकाशे, जुनी छायाचित्रे व एकूणच सर्व मूल्यवान दस्तऐवज इत्यादी सर्व व्यवस्थित अभ्यासल्यास आपण त्या काळात गेल्याचा अनुभव आल्यावाचून राहात नाही. 

खऱ्या अर्थाने संग्रहालये आपला सांस्कृतिक, ऐतिहासिक व सामाजिक ठेवा जतन करण्याचे काम मोठ्या जिकिरीने करीत असतात. त्यामध्ये आपल्या पूर्वजांपासून ते संग्रहालय उभे करण्यापर्यंत अनेकांचे हातभार लागलेले असतात. त्यामुळे त्यांचे स्मरण ठेवून कोणत्याही संग्रहालयास भेट द्यावी. आपला अमूल्य वारसा जतन करण्यास, तो समजून घेण्यास आपल्या व्यस्त आयुष्यातून काहीवेळ जरूर द्यावा. यातच मानव हित असून ते आपले कर्तव्यच आहे. 

संबंधित बातम्या