भाग न बॉँचे कोय...!

सुनील देशपांडे
सोमवार, 25 जानेवारी 2021

पुस्‍तकातून पडद्यावर
 

‘‘माझं ऐका, चित्रपटाचा शेवट बदला. नायक-नायिकेची ताटातूट होतेय, हा शेवट लोकांना आवडणार नाही. त्या दोघांच्या मीलनावरच चित्रपटाचा शेवट करा...”

राज कपूर आपल्या निर्माता मित्राला आणि बरोबरच्या दिग्दर्शकाला तळमळीने सांगत होते. चित्रपटाचे शूटिंग संपले होते. सहा वर्षे रखडलेला चित्रपट काही दिवसांत प्रदर्शित होणार होता. अशा टप्प्यावर राज कपूर यांनी ही सूचना केली होती. पण निर्माता आणि तो तरुण दिग्दर्शक मूळ कथेतला शेवट कायम ठेवण्यावर ठाम होते. शेवट बदलल्यास कथेचा आत्माच हरवेल, या त्यांच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य होते. अखेर हा चित्रपट ठरलेल्या शेवटासहच प्रदर्शित झाला. दुर्दैवाने तो तिकीट बारीवर आपटला. पुढल्याच वर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मात्र त्याचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देऊन बहुमान करण्यात आला. पण निर्मात्याने तोवर जगाचा निरोप घेतला होता...

मूळ कथा शोकांत, त्यावरचा चित्रपटही शोकांत, प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवणे हे दुर्दैव आणि शासनदरबारी मिळालेला सन्मान पाहायला त्याचा निर्माताच या जगात नसणे ही तर दुर्दैवाची परमावधीच! शोकांताने वेढलेल्या या काळ्याकुट्ट पार्श्‍वभूमीवर समाधानाची एकच धवल रेषा होती. ती म्हणजे एका नितांतसुंदर कथेवर तेवढ्याच उत्कृष्ट दर्जाचा हिंदी चित्रपट तयार झाला होता. निवडक प्रेक्षकांनी का असेना, त्यावेळी तो बघितला. पुढेही अनेक चोखंदळ प्रेक्षकांनी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा तो बघितला. हिंदी लेखक फणीश्‍वरनाथ रेणू यांच्या ‘मारे गये गुलफ़ाम’ या कथेवर तयार झालेल्या ‘तीसरी कसम’ या चित्रपटाची ही दुर्दैवी कहाणी.. 

रेणू यांच्या कथेवरच्या या चित्रपटाचे निर्माते होते गीतकार शैलेंद्र. तर दिग्दर्शक होते बिमल रॉय स्कूलमधून बाहेर पडलेले बासू भट्टाचार्य. बासूदांचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न 

होता. काळ होता साधारण १९६०चा. त्या काळात बासू आणि शैलेंद्र यांची जिवाभावाची मैत्री होती. दररोज ते भेटत. एकदा रेणू यांचा एक कथासंग्रह बासूंच्या हाती आला. त्यातल्या ‘मारे गये गुलफ़ाम’ या कथेने ते एवढे प्रभावित झाले की या कथेवर चित्रपट करायचा निर्णय त्यांनी त्याच रात्री घेतला. सकाळी शैलेंद्र भेटायला आले तेव्हा बासूंनी त्यांना ती कथा ऐकवून स्वतःचा मनोदय प्रकट केला. त्या कथेने शैलेंद्रसुद्धा एवढे प्रभावित झाले, की या चित्रपटाचा निर्माता होण्याची तयारी त्यांनी दर्शविली. 

बिहारमध्ये जन्म घेतलेल्या फणीश्‍वरनाथ रेणू (१९२१-१९७७) यांचे नाव हिंदी ग्रामीण साहित्याच्या प्रांतात मोलाची कामगिरी बजावणारा लेखक म्हणून आदराने घेतले जाते. कथा व कादंबरी या दोन्ही प्रकारांत त्यांनी यशस्वी कामगिरी केली. पन्नासच्या दशकात आलेल्या ‘मैला ऑँचल’ या कादंबरीद्वारे त्यांना खऱ्‍या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याच कादंबरीनंतर त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने गौरवण्यात आले होते. त्यांच्या लेखनात बिहारच्या ग्रामीण बोलीभाषेचा गंध आढळतो. विलक्षण अनौपचारिक आणि गोष्टीवेल्हाळ अशा शैलीद्वारे साहित्यप्रेमींमध्ये त्यांनी मानाचे स्थान पटकावले. ‘मैला ऑँचल’नंतर त्यांच्या ‘पॉँच लंबी कहानियॉँ’ या कथासंग्रहाने लक्ष वेधून घेतले. 

एका खेड्यातला साधाभोळा गाडीवान हिरामण आणि नौटंकीत काम करणारी प्रसिद्ध नृत्यांगना हिराबाई यांच्या प्रेमाची अनोखी कहाणी रेणू यांच्या या कथेत अनुभवायला मिळते. बैलगाडीतून माल वाहून नेत हिरामणची गुजराण चालत असते. घरात मोठा भाऊ, वहिनी आणि हा एवढे तिघेच. हिरामणचे लहानपणी लग्न झालेले, मात्र नांदायला येण्याच्या आदल्या दिवशीच त्याच्या नवरीचा मृत्यू ओढवलेला असतो. तेव्हापासून त्याने लग्न केलेले नसते. एकदा काळाबाजारातल्या मालाची वाहतूक करताना हिरामणसह इतर गाडीवान पोलिसांच्या जाळ्यात सापडतात. अंधारात पोलिसांची नजर चुकवून, गाडीपासून अलग केलेल्या बैलांसह हिरामण कसाबसा निसटतो आणि यापुढे काळाबाजारातला माल चुकूनही गाडीत घेणार नाही, अशी शपथ घेतो. दुसऱ्‍या एका घटनेत बांबू वाहून नेताना हिरामणच्या गाडीमुळे टांगागाडीला अपघात होतो आणि त्याला मार खावा लागतो. तेव्हापासून बांबूची वाहतूक करायची नाही, अशी ‘दुसरी कसम’ तो खातो. योगायोगाने एका सर्कस कंपनीतल्या वाघांची गाडी ओढून न्यायची अवघड कामगिरी हिरामण त्याच्या बैलजोडीसह फत्ते करतो आणि मिळालेल्या घसघशीत रकमेतून नवीन, छत असलेली बैलगाडी घेतो. छताची गाडी आल्यानं  मालाबरोबर ‘सवारी’ वाहतूकही सुरू करतो. याच वळणावर त्याला भेटते हिराबाई. नौटंकीत काम करणारी रूपवती. नावाप्रमाणेच हिऱ्‍यासारखी देखणी. वास्तविक हिराबाई तिची कंपनी सोडून गुपचूप दुसऱ्‍या कंपनीत जाणार असते. त्यामुळेच लोकांची नजर चुकविण्यासाठी बैलगाडीतून तिचा प्रवास. वीस कोसांच्या त्या प्रवासात दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. हिरामण तिच्या दिव्य सौंदर्यावर भाळतो, तर ती त्याच्या निर्मळ स्वभावावर, त्याच्या गाण्यावर मोहित होते. मुक्कामावर गेल्यानंतर हिरामण तिच्या आग्रहाखातर थांबतो. तिचे नौटंकीचे खेळ पाहतो. मार्गात येणारे अडथळे दूर सारून त्याच्यासोबत जाण्याचा तिचा निश्‍चय असतो. मात्र दोघांचे मार्ग भिन्न असल्याचे तिच्या ध्यानात येते. हिराबाई पुन्हा जुन्या नौटंकी कंपनीत परत जाते. रेल्वे स्थानकावर तिला निरोप दिल्यानंतर हताश मनाने हिरामण बैलगाडी हाकत माघारी जातो. मुक्या बैलांच्या पाठीवर काठी हाणत उद्विग्नपणे तो स्वत:ला बजावतो, ‘खा तिसरी कसम, पुन्हा कधी कंपनीच्या बाईला गाडीत घेणार नाही म्हणून!’ 

हिरामण आणि हिराबाई यांच्या निर्मळ प्रेमाची ही कहाणी रेणू यांच्या मूळ कथेत ज्या तरलपणे सामोरी येते त्याला तोड नाही. रेणू यांची शैलीच वाचकांना गुंगवून सोडते. बिगरहिंदी भाषकांना समजायला ती जरा कठीण असली तरी नेटानं वाचायला घेतले की या कथेचे सौंदर्य मनाला भिडते. 

त्यातले एकेक पदर उलगडत जातात. हे पदर जसे भाषेचे, तसेच ग्रामीण लहजाचेही. हिराबाईच्या आवाजाला हिरामण ‘फेनू-गिलासी’ हे विशेषण देतो. ‘फेनू-गिलासी’ म्हणजे फोनोच्या (ग्रामोफोन) तबकडीतून येणाऱ्‍या आवाजाप्रमाणे. हिराबाई हिरामणला ‘मीता’ या नावाने संबोधत असते. 

दोन व्यक्तींच्या नावांत जेव्हा साम्य असते तेव्हा एकाने दुसऱ्‍याला ‘मीता’ अशी हाक मारायची असते, हे गुपित तिच्याकडून उघड होते. कंपनीच्या बाईची सवारी आहे, याचा सुगावा लागू नये म्हणून, वाटेत कुणी विचारले तर गाडीत ‘बिदागी’ (सासरी जाणारी लेक) असल्याचे सांगून हिरामण वेळ मारून नेतो. 

निर्माता व दिग्दर्शक हे दोघेही मूळ कथेच्या प्रेमात पडले असल्याने ‘तीसरी कसम’ कथेला अधिकाधिक न्याय देणारा ठरतो. विशेषतः चित्रपटाचे संवाद लिहिण्याची कामगिरी रेणू यांच्यावरच सोपवल्याने कथा आणि चित्रपट यांच्यात एकरूपता आलेली आहे. मूळ कथेत नसलेले दोन प्रसंग चित्रपटात दिसतात. हिराबाईच्या रूपात आपल्या गाडीत कुणी डाकीण, जखीण तर बसलेली नाही, या भयाने हिरामण देवळासमोर गाडी उभी करून देवाची करुणा भाकतो हा एक प्रसंग. तर पटकथेत नव्याने समाविष्ट केलेली व्यक्तिरेखा होती जमीनदाराची, जो पैशाच्या जोरावर हिराबाईला वश करू पाहतो. 

एकदा हिराबाई उत्सुकतेने विचारते, ‘इकडे ज्याच्या-त्याच्या ओठांवर गाणं खेळत असतं, हे कसं काय?’  त्यावर हिरामण उत्तर देतो, ‘अजी, फटे कलेजा गाओ गीत... दुख सहने की यही है रीत!’ हा संवाद मूळ कथेत नसला तरी हिरामणच्या व्यक्तिरेखेला गहिरेपण देऊन जाणारा.

...आणि खरोखरच ‘तीसरी कसम’मधली गाणी चित्रपटाच्या आकर्षणात भर टाकणारी होती. मूळ कथेतल्या काही छोट्या-छोट्या गीतांना शैलेंद्र यांनी पूर्णरूप दिले होते. ‘सजन रे झूठ मत बोलो’, ‘सजनवा बैरी हो गये हमार’, ‘लाली लाली डोलिया में’, ‘मारे गये गुलफ़ाम’... अशी ती गाणी होती. शंकर जयकिशन या त्या वेळी सर्वोच्च स्थानी असलेल्या संगीतकार जोडीने आपल्या शैलीत काम करूनही या विषयाला पुरेपूर न्याय दिला होता. खरे तर ‘तीसरी कसम’च्या संगीतावर वेगळेच लिहायला हवे.

चित्रपट सुरू करण्याआधी शैलेंद्र यांनी राज कपूरना ही कथा ऐकवली तेव्हा राज उत्स्फूर्तपणे उद्‍गारले, यातला हिरामण मी रंगवणार! शैलेंद्र यांना तर आभाळ ठेंगणे झाले. दिग्दर्शक बासू भट्टाचार्य मात्र राज कपूरला घेण्याबाबत नाखूश होते. खुद्द राज कपूर यांनी बासूंना यामागचे कारण विचारले तेव्हा हिरामणची देहयष्टी, त्याचा वर्ण पाहता गुबगुबीत देहाचे, निळसर डोळ्यांचे राज या भूमिकेशी विसंगत ठरतील असा युक्तिवाद बासूंनी केला. त्यावर ‘चलता है, अ‍ॅक्टिंग में संभाल लेंगे,’ असे उत्तर राजनी दिले. पण ते काही असले तरी राजने हिरामण समरसून रंगवला यात शंका नाही. तीच गोष्ट हिराबाई रंगवणाऱ्‍या वहिदा रेहमानची. अनेकदा तिचे डोळेच बोलून जातात. वहिदाच्या उत्कृष्ट भूमिकांमध्ये हिराबाईची गणना करावी लागेल. 

एकोणीसशे बासष्ट साली सुरू झालेला ‘तीसरी कसम’ पडद्यावर झळकायला ६६ साल उजाडावे लागले. पैसा उभा करण्यासाठी शैलेंद्र यांना वेगवेगळ्या मार्गांनी कर्ज उभारावे लागले. व्यसनाधीनतेपायी ते उत्तरोत्तर कर्जाच्या सापळ्यात अडकत गेले. देणेकऱ्‍यांना, हितचिंतकांना चुकवताना त्यांची अक्षरशः ससेहोलपट झाली. रखडत रखडत चित्रपट पूर्ण झाला खरा, पण राज कपूर, वहिदा रहमान, शंकर जयकिशन यांसारखी नावे असूनही प्रेक्षक या चित्रपटाकडे फिरकले नाहीत. दिल्लीत हा चित्रपट झळकला तेव्हा देणेकऱ्‍याला चुकविण्यासाठी प्रीमियरला गैरहजर राहण्याची नामुष्की शैलेंद्रवर ओढवली. प्रदर्शनानंतर सहा महिन्यांतच शैलेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला. ते जगले वाचले असते तर कदाचित त्यांनीसुद्धा हिरामणसारखी  ‘कसम’ खाल्ली असती- पुन्हा चित्रपट निर्मितीच्या फंदात  न पडण्याची!

संबंधित बातम्या