‘वावटळी’तून तरलेला चित्रपट

सुनील देशपांडे
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

पुस्तकातून पडद्यावर

एकाच कथासूत्रावर दोन वेगवेगळ्या लेखकांकडून कादंबरी आणि पटकथा किती प्रभावीपणे लिहिली जाऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणून ‘काली आँधी’ व ‘आँधी’ या दोन कलाकृतींचा उल्लेख करता येईल.

ते वर्ष खासच होतं, असं म्हणायला हवं. कारण एक लेखक आणि एक दिग्दर्शक त्या वर्षात एका नव्हे तर दोन चित्रपटांसाठी एकत्र आले होते. त्यातला एक चित्रपट त्या वर्षातल्या पहिल्याच आठवड्यात झळकला, तर दुसरा चित्रपट वर्ष संपता संपता पडद्यावर आला. लेखक होते कमलेश्वर आणि दिग्दर्शक होते गुलजार. पहिला चित्रपट होता ‘आँधी’, तर दुसरा होता ‘मौसम’... आणि ते वर्ष होतं - १९७५.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पडद्यावर आलेला ‘आँधी’ पाच-सहा महिने जोरात चालला. जूनच्या शेवटाला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली आणि त्यानंतर आलेल्या ‘बंदी’च्या वरवंट्याखाली हा चित्रपट सापडला. ‘आँधी’चं कथानक राजकीय पार्श्वभूमी असलेलं होतं आणि त्यातल्या नायिकेचा तोंडवळा इंदिरा गांधी यांच्यासारखा होता, एवढी कारणं त्यावर बंदी घालायला पुरेशी होती. सुमारे वर्षभर ‘बंदीवासा’त अडकल्यानंतर ‘आँधी’ची मुक्तता झाली. काही किरकोळ कट्स आणि एक-दोन दृश्यं नव्यानं समाविष्ट केल्यानंतर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला. ‘आँधी’चं हे ‘रामायण’ आता सर्वज्ञात आहे.

एखादी साहित्यकृती आणि आणि त्यावर आधारित चित्रपट (पुढल्या काळात मालिका) यांच्यात एकाच्या लोकप्रियतेचा फायदा दुसऱ्‍याला होत असतो हा सामान्यतः अनुभव आहे. ‘आँधी’ चित्रपट गाजल्यानंतर तो ज्यावर बेतला होता, त्या कमलेश्वर लिखित ‘काली आँधी’ या कादंबरीचंही नाव झालं. ‘आँधी’ आणि ‘काली आँधी’ यांचं नातं सर्वतोमुखी असताना काही वर्षांपूर्वी गुलजार यांनी मात्र ‘आँधी’ चित्रपट कमलेश्वर यांच्या कादंबरीवर आधारित नाही, अशी ‘गुगली’ टाकत चित्रपटप्रेमींना धक्काच दिला. लेखक विजय पाडळकर यांनी खास गुलजार यांच्याच चित्रपटांवर लिहिलेलं ‘गंगा आये कहाँ से’ आणि सबा महमूद बशीर लिखित ‘गुलजार्स आँधी’ या दोन्ही पुस्तकांमध्ये स्वतः गुलजार यांनी ही बाब उघड केली आहे. गुलजार म्हणतात, ‘‘आँधी’च्या श्रेयनामावलीत तो कमलेश्वर यांच्या कादंबरीवर असल्याचा उल्लेख असला तरी वस्तुस्थिती जराशी वेगळी आहे. घडलं ते असं, १९७४च्या सुमारास मी कमलेश्वर यांच्या ‘आगामी अतीत’ या कादंबरीवर ‘मौसम’ हा चित्रपट करत असताना आमच्या नियमित भेटी होत असत. माझे सहकारी व मित्र भूषण वनमाली हेसुद्धा आमच्या सोबत असत. एकदा गप्पांच्या ओघात वनमालींनी ‘आँधी’ची कथाकल्पना आम्हा दोघांना ऐकविली. या कल्पनेवर एकाच वेळी कमलेश्वर यांनी कादंबरी व मी चित्रपटाची कथा लिहायला सुरुवात केली. आम्ही दोघे एकमेकांशी व वनमालींशी चर्चा करत असू. कल्पनांची देवाणघेवाण होत असे. मात्र आम्ही दोघेही स्वतंत्रपणे काम करत होतो. त्यामुळे मुख्य पात्रे आणि घटना सारख्या असल्या तरी कादंबरी आणि चित्रपट वेगवेगळ्या पद्धतीने विकसित होत गेले....’ (असो, ‘आँधी’वर आत्तापर्यंत बरेच वाद झाले असल्यानं आणखी खोलात जायला नको.)

चाकोरीबद्ध जीवन सोडून वेगळ्या मार्गानं जगू पाहणारी, नव्हे राजकारणात करिअर करणारी विवाहित स्त्री आणि त्यापायी तिच्या वैवाहिक आयुष्याची झालेली परवड हे ‘आँधी’चं कथासूत्र सर्वांना माहीत आहे. ज्यांनी तो पाहिला नाही त्यांनादेखील त्याचं कथानक ठाऊक असतं. गुलजार यांच्या सर्वोत्तम चित्रपटांमध्ये तो गणला जातो. हिंदी साहित्याच्या वाचकांमध्येही ‘काली आँधी’ कादंबरी लोकप्रिय आहे. कमलेश्वर प्रसाद सक्सेना अर्थात ‘कमलेश्वर’ (१९३२ – २००७) हे लेखक आणि पत्रकार म्हणून एकेकाळी वलयांकित असलेलं नाव. कथा, कादंबरी, पटकथा या क्षेत्रांतली भरीव कामगिरी, ‘सारिका’ या हिंदी मासिकाचं दीर्घकाळ भूषवलेलं संपादकपद, दूरदर्शनवर एकेकाळी गाजलेली ‘परिक्रमा’सारखी मालिका, उर्दू आणि डोगरी भाषांतील साहित्याचे हिंदी अनुवाद अशी चौफेर कारकीर्द लाभलेल्या कमलेश्वर या नावाला म्हणूनच मोठी प्रतिष्ठा आहे. ‘काली आँधी’ आणि ‘आगामी अतीत’ यांबरोबरच, ‘डाक बंगला’ आणि बहुचर्चित ‘कितने पाकिस्तान’ या कादंबऱ्‍या त्यांच्या नावावर आहेत.

एका धनाढ्य उद्योगपतीची लाडाकोडात वाढलेली एकुलती एक मुलगी मध्यमवर्गीय हॉटेल मॅनेजरबरोबर प्रेमविवाह करते. दोघांच्या संसारात एका गोड मुलीचं आगमन होतं. पती आणि मुलगी या दोघांचं करण्यात तिचा सारा वेळ जात असतो. काही काळानंतर तिला या चाकोरीतल्या आयुष्याचा कंटाळा येतो. पतीच्या घराचा त्याग करून ती राजकारणात पाऊल टाकते. काही वर्षांतच राजकारणाच्या पायवाटेवरून ती हमरस्त्यापर्यंत पोचते. एक निडर, मुरब्बी राजकारणी म्हणून प्रस्थापित होते. एका निवडणुकीच्या निमित्तानं तिला एका शहरात काही काळ मुक्काम करणं भाग पडतं. तिचा मुक्काम असलेल्या हॉटेलचा मॅनेजर तिचा पतीच असतो. त्या दोघांच्याही जीवनात पुन्हा एक वादळ येतं. दोघांचा मोडलेला संसार पुन्हा जुळण्याची शक्यता निर्माण होते. पण वेगवेगळ्या घडामोडींनंतर ती फोल ठरते. ती आपल्या मार्गानं निघून जाते. हा झाला कादंबरी आणि चित्रपटातला समाईक गाभा.

एकाच कथासूत्रावर दोन वेगवेगळ्या लेखकांकडून कादंबरी आणि पटकथा किती प्रभावीपणे लिहिली जाऊ शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणून ‘काली आँधी’ व ‘आँधी’ या दोन कलाकृतींचा उल्लेख करता येईल. अर्थात दोन्ही कलाकृतींमध्ये काही त्रुटी निश्चितपणे आहेत. त्या मान्य करूनही त्यांचा आनंद आपल्याला घेता येतो. दोहोंमध्ये काही फरक नक्कीच आहेत आणि ते असणं स्वाभाविक आहे. पुस्तकात मुख्य पात्रांची नावं मालती आणि जगदीश वर्मा ऊर्फ ‘जग्गीबाबू’ असणं व चित्रपटात ती नावं आरती व ‘जे.के.’ असणं एवढ्यापुरताच हा फरक मर्यादित नाही. इतरही भेद आहेत. महत्त्वाचा भेद हा की कादंबरी मालतीचा विश्वासू साहाय्यक असलेल्या गुरुशरण नामक व्यक्तीच्या निवेदनातून उलगडत जाते. हा गुरुशरण मालतीबरोबरच जग्गीबाबूंच्याही जवळचा आहे. चित्रपटात असा ‘कोणी’ही निवेदक नाही. किंबहुना त्याची गरजच नाही. गुरुशरण हा मालतीच्या वडिलांकडे पूर्वीपासून राहत आलेला आहे. ते काही असलं तरी त्याला निवेदकाच्या भूमिकेत बसवण्याची कल्पना पटत नाही. त्यामुळंच नायिकेच्या लग्नाआधीचा तपशील कादंबरीत येत नाही. याउलट गुलजार यांनी निवेदक हा प्रकारच ठेवला नसल्यानं त्यांना नायिकेचं ‘जे.के.’सोबतचं प्रेम आणि लग्नानंतरचा काही भाग नीट मांडता आला आहे. यात खास ‘गुलजार शैली’चे अनेक प्रसंग आहेत. 

पुस्तकात नायिकेचे वडील तिच्या लग्नानंतर लगेच मरण पावतात असा उल्लेख आहे. चित्रपटात मात्र तिचे वडील बराच काळ हयात असतात, एवढंच नव्हे, ते तिला राजकारणात जाण्याचा सल्ला देतात, ज्यायोगे ती नवरा आणि मुलगी यांना सोडून कायमची वडिलांकडं जाते. (आरतीचे वडील ‘अशी चार भिंतींमध्ये स्वतःला कोंडून घेऊ नकोस’ असा सल्ला देत असतात, त्या प्रसंगात मागं पंडित नेहरू आणि कन्या इंदिरा या दोघांचा फोटो दाखवण्याच्या दिग्दर्शकाच्या कल्पकतेला दाद द्यायला हवी.)

नायिका नगरपालिकेच्या निवडणुकीपासून टप्प्याटप्प्यानं खासदारपदापर्यंत पोचते, तो प्रवास कादंबरीत नीटसपणे दर्शवला आहे. चित्रपट इथं कमी पडतो. आरतीदेवी कोणती निवडणूक लढवते आहे, तिचा मतदारसंघ कोणता हे चित्रपटात स्पष्ट होत नाही. वडिलांच्या पश्चात मालतीला राजकारणाचे प्राथमिक धडे तिचा नवराच देतो, पण ती एकेक पायरी चढत जात असताना तो राजकारणापासून हळूहळू दूर होत जातो, असं कादंबरीत आहे. याउलट चित्रपटातल्या ‘जे.के.’ला सुरुवातीपासूनच राजकारणाचा तिटकारा असल्याचं दिसतं. मालतीचा जुना नोकर बिंदा कायम तिच्या बरोबर असतो. चित्रपटात या बिंदाला ‘जे.के.’च्या दिमतीला दिलाय. नायिका व तिचा पती यांच्यातल्या संबंधावरून विरोधी उमेदवार गलिच्छ प्रचार करतात. त्याला उत्तर देण्यासाठी ती स्वतः जाहीर सभा घेते, असा महत्त्वाचा प्रसंग कादंबरीत आहे. चित्रपटात नायिका विरोधी उमेदवाराच्या सभेत प्रकट होत त्याच्याच व्यासपीठावरून आपल्या पतीची ओळख करून देते, असं नाट्यपूर्ण पद्धतीनं दाखवलंय. जे.के. आपल्या मुलीला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवतो असं चित्रपटात दाखवून दिग्दर्शकानं एका व्यक्तिरेखेला कात्री लावलीय. पुस्तकातल्या मालतीची तिच्या मुलीशी भेट होते व दोघींमध्ये हृद्य संवादही होतो. चित्रपट अनेक अंगांनी सरस वाटण्यामध्ये गुलजार यांच्या पटकथा व दिग्दर्शन कौशल्याचा मोठा हात आहे. हलक्याफुलक्या आणि गंभीर अशा दोन्ही प्रसंगांत त्यांच्या लेखणीची जादू अनुभवायला मिळते. त्या सर्वच प्रसंगांचा आढावा घेणं इथं शक्य नाही. आरतीच्या भूमिकेत ‘ममता’नंतर जवळजवळ दहा वर्षांनी हिंदी चित्रपटात अवतरलेली सुचित्रा सेन आणि ‘जे.के.’ झालेला संजीव कुमार या दोघांमध्ये डावा-उजवा कोण हे ठरवणं कठीण जावं एवढी त्यांची कामगिरी सरस झालीय.

आर. डी. बर्मनचं सुमधुर संगीत हेही ‘आँधी’चं ठळक वैशिष्ट्य होतं. यातली तीनही युगुलगीतं आज साडेचार दशकांनंतरही तेवढीच ताजी वाटतात. गाण्यांबरोबरच पार्श्वसंगीतात वापरलेली थीम ट्यून दीर्घ काळ लक्षात राहणारी.

‘आँधी’ हा इंदिरा गांधी यांच्यावरचा चित्रपट नाही असं गुलजार यांनी अनेक वेळा स्पष्ट केलं असलं, तरी आजही त्यांना तो प्रश्न हटकून विचारला जातो. एखाद्या व्यक्तिरेखेनंच चित्रपटाची अशी ‘ओळख’ निर्माण केली असेल तर हे होणारच!

संबंधित बातम्या