भोगले जे दु:ख...

सुनील देशपांडे
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

पुस्तकातून पडद्यावर

कितीही घरं बदलली तरी स्त्रीच्या आयुष्यात फरक पडत नसतो. झोपायचा पलंग बदलेल, स्वयंपाकघर बदलेल, पुरुषांचे मुखवटेही बदलतील... पण पुरुष तोच असेल...  ‘सांगत्ये ऐका’ हे आत्मचरित्र आणि त्याचं पडद्यावरचं रूप असलेला ‘भूमिका’ या दोन्ही कलाकृतींनी हे सत्य विदारकपणे समोर आणलं...

सर्वसामान्य स्त्रीच्या वाट्याला येणारे भोग व तिची पिळवणूक यांचं सिनेमातून झालेलं चित्रण बऱ्‍याचदा भडक पद्धतीनं केल्याचं पाहायला मिळतं. मग खुद्द सिनेव्यवसायातल्या स्त्रियांच्या - अर्थात अभिनेत्रींच्या वाट्याला आलेलं ओढगस्तीचं जिणं चित्रपटांतून मांडायचा प्रयत्न कितीही संयमानं केला तरी तो बटबटीत वा ‘मेलोड्रामॅटिक’ ठरण्याचीच शक्यता असते. जुन्या काळातला ‘सोने की चिडिया’ (नूतन) किंवा अलीकडचा ‘डर्टी पिक्चर’ (विद्या बालन) हे नट्यांच्या जीवनावरचे चित्रपट कलाकृती म्हणून उजवे असले तरी अतिरंजित असल्याची टीका झाली. अशा परिस्थितीत अतर्क्य घटनांनीच भरलेल्या आयुष्याची कहाणी एखाद्या अभिनेत्रीनं कितीही प्रामाणिकपणे लिहिली तरी त्यावर कोण विश्वास ठेवेल? आणि अशा आत्मकथेवर कुणी चित्रपट काढला तर त्याला अतिरंजित ठरवलं जाणार नाही, हे कशावरून?...

श्रेष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या ‘भूमिका’ या चित्रपटावरही हा आक्षेप आला असता. पण तो आला नाही, याचं कारण वास्तव कहाणी कितीही दाहक असली तरी ती पडद्यावर मांडताना संयम आणि कलात्मक भान दाखवण्याची बेनेगल यांची हातोटी.

हंसा वाडकर (१९२३-१९७१) ही एकेकाळची प्रख्यात मराठी अभिनेत्री. बोलपटांच्या आरंभीच्या काळातली. पन्नाशीच्या आतलं आयुष्य लाभलेल्या या अभिनेत्रीचं जीवन कमालीच्या वादळी घटनांनी भरलेलं होतं. एका बाजूला इतरांनी केलेले शारीरिक व मानसिक अत्याचार, तर दुसऱ्‍या बाजूला स्वतःच्या व्यसनासक्त, बेबंद जगण्यातून केलेली स्वतःची दैना अशा विलक्षण आवर्तात सापडलेलं तिचं जीवन... निवृत्तीनंतर ही कहाणी जगासमोर मांडणारं ‘सांगत्ये ऐका’ हे त्यांचं आत्मचरित्र पन्नास-साठ वर्षांपूर्वी प्रकाशित झालं आणि साहजिकच खळबळ उडाली. ‘सांगत्ये ऐका’ (१९५९) हा हंसा वाडकरांचा प्रचंड गाजलेला चित्रपट. पुण्यातल्या एकाच थिएटरात सलग १३१ आठवडे चालण्याचा विक्रम त्यानं केला. त्यामुळे आपल्या आत्मकथेला त्यांनी हेच नाव देणं स्वाभाविकच. नाट्यपूर्ण जीवन आणि कोणताही आडपडदा न ठेवता प्रामाणिकपणे केलेलं कथन असा संयोग असलेल्या या छोटेखानी पुस्तकानं त्या काळात अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. त्यावर चित्रपट निघाला नसता तरच नवल!

हंसा वाडकरांचं ‘सांगत्ये ऐका’ हे आत्मकथन १९६६ साली साप्ताहिक ‘माणूस’मध्ये चार भागांमध्ये प्रसिद्ध झालं. पुढं १९७०च्या सुमारास ते राजहंस प्रकाशनातर्फे पुस्तकरूपानं प्रकाशित झालं. या पुस्तकासाठी हंसा वाडकर यांना त्या वर्षीचा राज्य सरकारचा वाङ्‍मय पुरस्कार मिळाला. हंसाबाईंच्या मुलाखती घेऊन त्यांचं शब्दांकन करण्याचं काम मुख्यतः पत्रकार अरुण साधू यांनी केलं होतं. मुळातला मजकूर बराच त्रोटक असल्यानं त्यात आणखी भर घालण्याची प्रकाशकाची इच्छा हंसाबाईंच्या आजारपणामुळं पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आहे त्या रूपातच पुस्तक प्रकाशित करणं भाग पडलं. पुढं वर्षभरातच हंसाबाईंचं निधन झालं.

सत्तरच्या दशकात ‘अंकुर’ आणि ‘निशांत’ या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनी लक्ष वेधून घेणारे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं या आत्मकथेकडे लक्ष गेलं, तेव्हा त्यांनी हंसाबाईंची कहाणी पडद्यावर आणायचं ठरवलं. त्यातूनच साकारला १९७७ सालचा ‘भूमिका’. स्मिता पाटील या प्रतिभावान अभिनेत्रीच्या कारकिर्दीतला एक महत्त्वाचा चित्रपट. बेनेगल यांना मराठी वाचता येत नसलं तरी त्यांनी हे पुस्तक मराठी जाणणाऱ्‍या गिरीश कर्नाड आणि पंडित सत्यदेव दुबे यांच्याकडून समजून घेतलं असावं. कारण पुढं पटकथा लेखनाची जबाबदारी या दोघांवरच सोपवण्यात आली. याशिवाय स्वतः बेनेगल यांचाही पटकथेत सहभाग होता. हिंदी संवादलेखन सत्यदेव दुबे यांनी केलं. (‘सांगत्ये ऐका’ या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद खूप नंतर, २०१४ मध्ये प्रसिद्ध झाला.)

‘या चित्रपटातील सर्व पात्रे काल्पनिक असून वास्तवातील कोणत्याही व्यक्तीशी त्यांचा संबंध नाही,’ या आशयाची टीप देतानाच तो हंसा वाडकरलिखित ‘सांगत्ये ऐका’ या पुस्तकावरून प्रेरित असल्याचंही सुरुवातीला स्पष्ट करण्यात आलं होतं. अर्थात काही किरकोळ बदल सोडले तर हा चित्रपट बहुतांश या पुस्तकावरच आधारित असल्याचं ध्यानात येतं.  

हंसाबाईंचं घराणं कलावंतिणीचं. त्यांची पणजी बायाबाई साळगावकर कलावंतीण होती. हंसाचा जन्म मुंबईचा असला तरी हे कुटुंब मूळचं सावंतवाडीचं. तमासगिरांमध्ये लग्न करण्याची परवानगी नसली, तरी हंसाचे वडील भालचंद्र यांनी त्या काळात लग्न करून खळबळ उडविली होती. हंसाचं खरं नाव रतन, मात्र घरात तिला ‘बेबी’ म्हणत असत. कलावंतिणीचं घर असल्यानं हंसाला गाणं-बजावणं लहानपणीच शिकावं लागलं. तिच्या घराशेजारी राहणाऱ्‍या जगन्नाथ बंदरकरचा या कुटुंबाशी घरोबा होता. 

हंसाच्या वडिलांच्या अकाली निधनानंतर उघड्यावर आलेल्या या कुटुंबाला सावरण्यासाठी हंसानं सिनेमात काम करावं असा प्रस्ताव जगन्नाथ मांडतो. एवढंच नव्हे, तो स्वत: तिला मुंबईला नेतो. ‘विजयाची लग्ने’ या चित्रपटातून तिचा अभिनय प्रवास सुरू होतो. रतन साळगावकर हे मूळ नाव टाकून तिला ‘हंसा वाडकर’ हे नाव धारण करावं लागतं. इथून पुढे हंसाचा अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू होतो. याच काळात जगन्नाथविषयीच्या आकर्षणातून ती त्याच्याशी लग्न करायचं ठरवते. लग्नानंतर मात्र मूळचाच संशयी असलेला जगन्नाथ विकृत रूप प्रकट करतो. अन्य कलाकारांसोबतचं तिचं वावरणं, त्यांच्यासोबत काम करणं, शूटिंगहून उशिरा घरी येणं... या ना त्या कारणावरून तो तिला शिव्या देतो. मारहाणही करतो. ती घर सोडायचा पवित्रा घेते, पण त्याच वेळी गर्भपात झाल्यानं तिचा विचार बदलतो. दोन वेळा गर्भपात झाल्यानंतर तिसऱ्‍या वेळी तिला मुलगी होते...

कोल्हापुरातल्या एका हॉटेलवर मुक्कामाला असताना समोरच्या खोलीत राहणाऱ्‍या माणसाशी तिची ओळख होते. घरदार विसरून हंसा त्याच्या सहवासात रममाण होते. त्याच्यासोबत, मुंबई, बंगळूर अशी हिंडत मराठवाड्यातल्या त्याच्या गावी त्याच्या वाड्यावर जाऊन राहू लागते. तब्बल तीन वर्षं ती या वाड्यात राहते. जीव घुसमटू लागतो तशी एकदा गुपचूप पत्र लिहून एका बाईच्या हातून जगन्नाथला पाठवते. जगन्नाथ पोलिसांना घेऊन येतो नि तिची सुटका करतो. मुंबईला परतल्यानंतर ती पुन्हा सिनेमात काम करू लागते. (हा काळ साधारण १९५५-५६चा) जगन्नाथचा छळवाद पुन्हा पहिल्यासारखा सुरू होतो. हंसा पुन्हा एकदा घर सोडून जाते. गावोगावी भटकंती करत मुंबईला परत येते. एका हॉटेलवर जाऊन राहू लागते. आता ती दारू सोडते. चित्रपटासोबत ‘लग्नाची बेडी’, ‘बेबंदशाही’ यासारख्या नाटकांमध्ये अभिनय करते. पुन्हा घरी न्यायला आलेल्या नवऱ्‍याला ती कायमचा नकार देते. प्रेमविवाह केलेली तिची मुलगी तिला आपल्या घरी नेऊ पाहते तेव्हाही ती नकार देते. आता एकटी राहण्याचा तिचा निर्धार असतो...

वर म्हटल्याप्रमाणे चरित्रनायिका व अन्य पात्रांच्या नावांत केलेले बदल सोडता चित्रपटांतले बहुतेक प्रसंग मूळ आत्मकथेशी इमान राखणारे आहेत. (आत्मकथेत जमीनदाराच्या वाड्यातून नायिकेची सुटका झाल्यानंतर दंडाधिकाऱ्‍यासमोर जबाब देण्याच्या वेळी हा नराधम अधिकारी तिच्या नवऱ्‍याला गाफील ठेवून तिच्यावर अत्याचार करतो. एवढा एक प्रसंग चित्रपटात वगळला आहे. कदाचित अतिरंजितपणा टाळण्यासाठी...)  

चित्रमाध्यमावरची बेनेगल यांची पकड या ठिकाणी विलक्षण ताकदीनं प्रकट होते. अनेक प्रसंग फ्लॅशबॅक पद्धतीनं सादर होतात. सेपिया रंगात भूतकाळातली दृश्यं आणि वर्तमानकालीन प्रसंग नेहमीच्या रंगात, अशी विभागणी प्रभावी ठरली होती. विशिष्ट काळ सूचित करण्यासाठी दाखवलेले जुन्या चित्रपटांच्या शूटिंगचे प्रसंग, गाणी, रेडिओच्या बातम्यांद्वारे सहजपणे कानावर येणाऱ्‍या घडामोडी यांनी वातावरण निर्मिती चांगली साधली होती.

स्मिता पाटील, अमोल पालेकर, अनंत नाग, नासिरुद्दीन शाह, सुलभा देशपांडे आदी कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, वनराज भाटियांचं वेगळ्या धाटणीचं संगीत (‘तुम्हारे बिन जी ना लगे घर में’), गोविंद निहलानी यांचं अप्रतिम छायाचित्रण यासारखी बलस्थानं या चित्रपटाला उंचीवर नेणारी ठरली. 

‘रुपेरी पडद्यावर आतापर्यंत मी साकारलेल्या भूमिकांमध्ये श्याम बेनेगल यांच्या ‘भूमिका’मधली हंसा वाडकरांची भूमिका ही सर्वात अवघड भूमिका होती. कदाचित त्यामुळेच ती माझी सर्वात आवडती भूमिका असावी. खरं पाहता कोणत्याही अभिनेत्रीनं मोहात पडून सहजपणे स्वीकारावी अशी ती भूमिका होती, मात्र आपल्याला ती कितपत जमेल याविषयी मी सुरुवातीला साशंक होते. पण दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्यावर असलेली माझी श्रद्धा इथं कामाला आली. दिग्दर्शक म्हणून त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे हे मला चांगलं कळतं आणि अभिनेत्री म्हणून मी कोणत्या मर्यादेपर्यंत जाऊ शकते हे ते जाणतात...’ असं या चित्रपटाविषयी बोलताना स्मिता पाटील एका मुलाखतीमध्ये म्हणाली होती,  या चित्रपटासाठी स्मिता पाटील हिला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. हा तिचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार. याशिवाय पटकथेसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार गिरीश कर्नाड, सत्यदेव दुबे आणि श्याम बेनेगल या त्रयीनं पटकावला. तसंच फिल्मफेअर पुरस्कारांमध्येही ‘भूमिका’नं त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून बाजी मारली.

आत्मकथेच्या शेवटच्या प्रकरणात हंसाबाई काहीसा उपदेशाचा सूर लावतात. चित्रपटात मुलींना काम मिळावं यासाठी धडपडणाऱ्‍या आई-बापांना त्या सांगतात, ‘शहाणे असाल, मुलीचं हित करायचं असेल तर चुकूनही तिला फिल्म लाइनकडे फिरकू देऊ नका.’ चित्रपटातली नायिकादेखील शेवटी तिच्या मुलीपाशी हाच सूर लावते. आयुष्य पोळून निघाल्यामुळे असेल, तिचा तो सूर खरा वाटतो. मोजकेच पण धारदार शब्द असलेले या चित्रपटातले संवाद पकड घेणारे आहेत. नायिका जमीनदाराच्या घरात राहत असताना त्याची आजारी पत्नी नायिकेला म्हणते, ‘कितीही घरं बदलली तरी स्त्रीच्या आयुष्यात फरक पडत नसतो. झोपायचा पलंग बदलेल, स्वयंपाकघर बदलेल, पुरुषांचे मुखवटेही बदलतील... पण पुरुष तोच असेल... ’ तिचं हे बोलणं मनात घर करून जातं... 

संबंधित बातम्या