डोंगरकाठाडी ठाकरवाडी...

सुनील देशपांडे
गुरुवार, 25 मार्च 2021

पुस्तकातून पडद्यावर

‘जैत रे जैत’वरचा चित्रपट ही एक संगीतिका असेल हे मंगेशकर भावंडांसोबत जब्बार पटेल, ‘गोनीदां’, ना. धों. महानोर आदींची पहिली बैठक झाली तेव्हा निश्चित झालं होतं काय, हे सांगता येत नाही. मात्र चित्रपट जसजसा आकार घेत गेला तसतसा तो एक संगीतिका म्हणून घडत गेला हे निश्चित!

‘‘ऊतू नको, मातू नको. वाईट वकटा करू नको. कुणाच्या वाटी जाऊ नको. कुणी वाटी गेला, तर त्याला डंखल्याबिगार ऱ्‍हाऊ नको!’’

थोरल्या भगताच्या रूपात स्वतःच्या बापानं दिलेला मंत्र नाग्या नीट ध्यानात ठेवतो आणि तो तंतोतंत पाळतो. तरीदेखील त्याच्या आयुष्याचं नको तेवढं नुकसान होतं. वरवर दिसायला त्याचा ‘जैत’ होतो, पण अखेर नियतीच्या शत शत दंशांनी घायाळ होणंच त्याच्या नशिबी येतं...

गो. नी. दाण्डेकर लिखित ‘जैत रे जैत’ या कादंबरीच्या आणि त्याच नावानं निघालेल्या चित्रपटाच्या नायकाची ही दाहक शोकांतिका. ही शोकांतिका जेवढी वाचकांना भिडली तेवढीच प्रेक्षकांनादेखील भिडली असेल का? थोडक्यात, कादंबरीनं जेवढा आनंद वाचकांना दिला तेवढाच त्यावरच्या चित्रपटानं प्रेक्षकांना दिला का?... या प्रश्नाचं उत्तर यश आणि अपयश यांच्याकडे आपण कोणत्या नजरेनं पाहतो त्यावर अवलंबून आहे. ‘गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर’ (१९१६-१९९८) यांची ‘जैत रे जैत’ ही १९६५ सालात प्रकाशित झालेली कादंबरी. ‘गोनीदां’च्या अन्य साहित्यकृतींप्रमाणे याही कादंबरीला  वाचकांचं प्रेम लाभलं. एक दुर्गप्रेमी लेखक म्हणून ख्यातकीर्त असलेल्या ‘गोनीदां’नी ललित साहित्याबरोबरच ऐतिहासिक कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, धार्मिक व पौराणिक साहित्य अशा नाना प्रकारांमध्ये विपुल लेखन केलं. ‘मृण्मयी’, ‘मोगरा फुलला’, ‘पडघवली’, ‘शितू’, ‘दुर्गदर्शन’, ‘दुर्गभ्रमणगाथा’, ‘स्मरणगाथा’ या त्यांच्या साहित्यकृती कालजयी आहेत. शैलीच म्हणायची तर ती त्यांनी हरेक साहित्यकृतीबरोबर बदलली. जसा प्रदेश तशी साहित्याची बोली ठेवली. आपली लेखणी साचेबंद होऊ दिली नाही. जवळजवळ पन्नास वर्षे भटकंती करीत त्यांनी लेखन केलं. गडकिल्ले चढून जाण्याची गोडी इतरांमध्येही निर्माण केली. ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जैत रे जैत’, ‘देवकीनंदन गोपाळा’ आणि ‘माचीवरला बुधा’ या त्यांच्या कादंबऱ्‍यांवर त्याच नावांचे चित्रपट तयार झाले. या प्रदीर्घ ज्ञानसाधनेचं फळ त्यांना साहित्य अकादमीच्या पुरस्काराच्या रूपात मिळालं.

सह्याद्रीच्या कुशीतल्या कर्नाळ्यातली ठाकरवाडी आणि या वाडीत रंगणारी प्रेम आणि सुडाची अजब कहाणी ‘जैत रे जैत’ कादंबरीतून वाचकांनी अनुभवली. आगळंवेगळं कथानक, तेवढीच आगळी कथनशैली, उत्कंठा वाढवणारे प्रसंग, श्वास रोखायला लावणारा अंतिम संघर्ष आणि त्याच गतीनं झालेला, सुन्न करणारा शेवट असा या दीडशे पानी रोमांचकारी कथेचा बाज. ठाकरांच्या वस्तीतला नाग्या, त्याचे आई-बाप आणि नवऱ्‍याशी काडीमोड घेऊन नाग्याच्या आयुष्यात आलेली, ‘भर ज्वानीतली नार’ म्हणावी अशी चिंधी या चौघांभोवती फिरणारी ही गोष्ट. ती सांगताना ठाकरवस्तीचं जीवन, त्यांच्या जगण्याच्या चालीरीती, सुख-दु:खं, त्यांची व्यसनं, भोळ्याभाबड्या समजुती, अंधश्रद्धा... या सगळ्यांचा सुंदर गोफ स्थानिकांच्या बोलीत लेखकानं विणला, ज्यायोगे ही कथा वाचनीय झाली.

कथानायक नाग्याचा बाप हा ठाकरांच्या वस्तीचा ‘भगत’. पापभीरू वृत्तीचा निष्णात ढोलवादक. नाग्या आईच्या पोटात होता तेव्हापासूनच त्यानं बापाचं ढोल वाजवणं ऐकलेलं. जन्मल्यावर बापाचं ऐकत ऐकतच तो ढोल वाजवायला शिकतो आणि तरणा होईतोवर त्याने बापालाही मागं टाकलेले असते. कर्नाळ्यातला लिंगोबाचा डोंगर तर विशालच. पण या डोंगरावरचा दीडशे फूट उंचीचा कडा तर पाहणाऱ्‍याला ‘थक्कित’ करणारा. महादेवाच्या पिंडीसारखा दिसणारा हा कडा नाग्याला बालपणापासूनच मोहित करत असतो. कारण कड्याच्या ऐन गळ्याशी हाराप्रमाणे लगडलेली मधमाश्यांची भलंमोठी पोळी. शेकडो, हजारो मधमाश्यांचं वसतिस्थान असलेलं आग्यामोहळ. याच माश्यांमध्ये लपलेली असते ‘राणीमाशी’. सगळ्या मधमाश्यांची राणी! नाग्याला या राणीमाशीचं लहानपणापासूनच आकर्षण. पण त्याच्या बापाचं म्हणणं असं की राणीमाशी फक्त पुण्यवंतालाच दिसत असते. नाग्या आता ‘पुण्यवंत’ होण्याच्या इच्छेनं झपाटला जातो. बापाच्या सांगण्यावरून तो ‘भगत’ होण्याची दीक्षा घेतो. त्यासाठीच्या शपथा, आणाभाका घेतो. ‘‘कुणाच्या वाटी जाणार नाही आणि कुणी वाटी गेला, तर त्याला डंखल्याबिगार ऱ्‍हाणार नाही,’’ ही त्यातलीच एक. पण काही दिवसांनी नाग्याचा बाप सर्पदंशानं मरतो. देवाचा धावा करूनही बाप वाचला नाही, याचा त्याला धक्का बसतो. पुढे एकदा लाकडं तोडण्यासाठी गेलेल्या नाग्यावर झाडावरच्या मधमाश्या हल्ला करतात. त्याचा एक डोळा निकामी होतो. हे सगळं त्या ‘राणीमाशी’नं घडवल्याचा त्याचा समज होतो. सूडानं पेटलेला नाग्या शपथ घेतो, ‘मी बदला घेणार. त्या राणीमाशीला उडवून लावणार!’

याच काळात वस्तीतली चिंधी नाग्यावर भाळते. ही ‘बाजिंदी’ लग्न झालेली. पण नवरा अगदीच ‘खुळा’ म्हणून त्याला सोडून बापाकडं कायमची आलेली. ‘ढोलिया’ नाग्या तिच्या मनात भरतो. स्वतःच्या कमाईचे पैसे नवऱ्‍याच्या तोंडावर फेकून ती त्याच्याशी काडीमोड घेते नि नाग्याशी पाट लावते. मधमाश्यांच्या हल्ल्यात जायबंदी झालेल्या नाग्याला चिंधीच्या प्रेमळ वागणुकीनं दिलासा मिळतो. राणीमाशीला धडा शिकवायच्या नाग्याच्या निर्धाराला चिंधीचं पाठबळ मिळतं. अथक प्रयत्नांच्या जोरावर नाग्या लिंगोबाचा कडा चढून जातो. दोर लावून कड्यावरून खाली येत येत मधमाश्यांच्या वस्तीवर कोयत्यानं घाव घालून सारी पोळी नष्ट करतो. घोंगडं पांघरलेला नाग्या माश्यांच्या तावडीतून कसाबसा वाचतो, पण पायथ्याला थांबलेली चिंधी खवळलेल्या माश्यांच्या हल्ल्यात सापडून गतप्राण होते. नाग्याच्या कुशीत प्राण सोडताना त्याला दिलासा देण्यासाठी खोटंच सांगते, ‘नाग्या, तुझा जैत झाला! तू जिंकलास! देवीमाशी उडून गेलेली मी बघितली...!’ चिंधीचं कलेवर हातात घेऊन नाग्या किंकाळी फोडतो... इथंच कहाणी संपते.

‘गोनीदां’च्या आगळ्या कथनशैलीमुळे हृदयस्पर्शी झालेली ही गोष्ट रुपेरी पडद्यावर आणायचं मंगेशकर भावंडांनी ठरवलं. १९७६-७७ च्या सुमारास त्यांनी दिग्दर्शक जब्बार पटेल यांना ‘जैत रे जैत’ या कादंबरीवर चित्रपट तयार करण्याचा प्रस्ताव दिला. दहाएक वर्षांपूर्वी गोनीदांच्याच ‘पवनाकाठचा धोंडी’ या कादंबरीवर मंगेशकरांनी मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. निर्मात्या उषा मंगेशकर यांच्या ‘महालक्ष्मी चित्र’ या संस्थेसाठी अनंत ठाकूर (‘चोरी चोरी’ फेम) यांनी तो दिग्दर्शित केला होता. तत्कालीन ग्रामीण बाजाचं कथानक, चंद्रकांत, सूर्यकांत, जयश्री गडकर आदींच्या भूमिका आणि हृदयनाथ मंगेशकरांनी केलेली ‘पावनेर ग मायेला’ आणि ‘काय बाई सांगू’ यासारखी सरस गाणी असूनही त्या चित्रपटाचं त्या काळात यथातथाच स्वागत झालं होतं.

थिएटर अॅकेडमीसारख्या नाट्यसंस्थेची भक्कम पार्श्वभूमी आणि ‘सामना’ या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचं दिग्दर्शन एवढा अनुभव गाठीशी असलेल्या जब्बार पटेल यांच्याकडे ‘जैत’चं दिग्दर्शन मंगेशकर कुटुंबीयांनी सोपवलं तेव्हा या चित्रपटाबाबत त्यांच्या वेगळ्या अपेक्षा असणार हे उघड होतं. ‘दिग्दर्शक म्हणून तुम्हाला आमचं पूर्ण स्वातंत्र्य असेल, आमचा कसलाही हस्तक्षेप असणार नाही, एवढंच काय, आम्ही निर्माते आहोत म्हणून याचं संगीत हृदयनाथच करतील असाही आमचा आग्रह राहणार नाही,’ हे मंगेशकर भावंडांनी जब्बार यांच्यासमोर स्पष्ट केलं होतं. (अर्थात संगीत हृदयनाथ यांनीच केलं आणि गाणी हेच या चित्रपटाचं ठळक वैशिष्ट्य झालं तो भाग वेगळा.) या कथानकात एका उत्तम संगीतिकेची बीजं दडली आहेत, याची जाणीव जब्बार पटेल यांना झाली. हृदयनाथ मंगेशकरांसारखा वेगळी वाट चोखाळू पाहणारा संगीतकार आणि महानोरांसारखा अस्सल रानातला कवी सोबत असल्यानं पटेलांचं काम सोपं झालं. घाशीराम कोतवालसारख्या नाटकाला दिलेली ‘ट्रीटमेंट’ त्यांना ‘जैत’ला द्यायची होती. पण त्याबरोबरच हा चित्रपट म्हणजे ‘पडद्यावरचं नाटक’ वाटणार नाही याचंही भान ठेवायचं होतं. सतीश आळेकर आणि अनिल जोगळेकर यांनी पटकथा व संवादांची जबाबदारी सांभाळताना दिग्दर्शकाला हवं तसं परिमाण या कथेला दिलं. नाटकाप्रमाणे दोन सूत्रधार, चंद्रकांत काळे आणि श्रीराम रानडे, गाणं गात गात कथा उलगडून सांगतात असा एकूण बाज ठेवला गेला. चित्रपटात बाह्य चित्रीकरणास बराच वाव होता त्याचाही फायदा घेतला गेला. मूळ कथेत समुद्र नाही, मात्र समुद्राची काही दृश्यंही समाविष्ट करण्यात आली.

या चित्रपटातली गाणी अस्सल लोकसंगीतातली वाटावीत यासाठी हृदयनाथ मंगेशकर यांनी कर्नाळा व अन्य परिसरात प्रत्यक्ष जाऊन तिथल्या ठाकरांची गाणी ऐकली. मात्र चित्रपटाच्या दृष्टीनं या चाली एकसुरी वाटतील हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी स्वतंत्र चाली तयार केल्या आणि त्यांचा बाज लोकसंगीतासारखा राहील हे पाहिलं. थोडीथोडकी नव्हे, अठरा-एकोणीस गाणी या चित्रपटात होती. बहुतेक गाण्यांत समूह स्वराचा (कोरस) वापर केला होता. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर यांच्याबरोबरच नव्या पिढीतल्या रवींद्र साठे, चंद्रकांत काळे, वर्षा भोसले आदी गायकांचे स्वर या संगीतात घुमले. ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’, ‘नभ उतरू आलं’, ‘मी रात टाकली’, ‘आम्ही ठाकरं ठाकरं’, ‘डोंगरकाठाडी ठाकरवाडी’ या गाण्यांनी लक्ष वेधून घेतलं. ‘पीक करपलं....’ हे रवींद्र साठे यांनी गायलेलं एकमेव शोकार्त (आणि ‘कोरस’ नसलेलं) गाणं पहिल्या चार खेळानंतरच, चित्रपटाची गती खुंटतेय हे लक्षात घेऊन कापण्यात आलं.

‘जैत रे जैत’ १९७८ च्या आरंभी प्रदर्शित झाला. मात्र प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरविली. उत्तम कथा, जबरदस्त संगीत, स्मिता पाटील, मोहन आगाशे, निळू फुले आदी कलाकारांची सरस कामगिरी एवढ्या जमेच्या बाजू असतानाही हा चित्रपट तिकीट बारीवर अपयशी ठरला. अर्थात व्यावसायिक अपयश आणि चित्रपट मुळातच फसणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. मुळात मराठी चित्रपटांचा त्या काळातला प्रेक्षक अशा प्रायोगिक चित्रपटांना अनुकूल नव्हता. खुद्द ‘गोनीदां’ना हा चित्रपट फारसा आवडला नव्हता. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं होतं. याउलट वेगळं काही पाहू इच्छिणाऱ्‍या प्रेक्षकांना तो आवडला. एन.एस.डी.चे संचालक अल्काझी, कलाप्रेमी राजकीय नेते शरद पवार यासारख्या मंडळींनी या चित्रपटाचं आवर्जून कौतुक केलं.

‘जैत रे जैत’ या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत ‘‘प्रिय बाबा आणि सौ. इंदुवहिनी’’ असा मायना होता. हे आमटे दांपत्याला उद्देशून असल्याचं ‘गोनीदां’ना ओळखणाऱ्‍यांनी बरोबर ओळखलं. त्याखालीच ‘गोनीदां’नी आणखी लिहिलं होतं, ‘‘चिंधीची चित्ररेखा रेखीत असता मजपुढे होती आमची आशू.’ ही ‘आशू’ म्हणजे कथेतल्या चिंधीसारखीच बेडर, बेधडक अशी आशा भोसले होय, हे आप्पा दांडेकर आणि आशाताईंची घट्ट दोस्ती असणाऱ्‍यांनाच नेमकं कळलं.

संबंधित बातम्या