बुद्धिबळाचा डाव!

सुनील देशपांडे
सोमवार, 3 मे 2021

पुस्तकातून पडद्यावर

भारतीय चित्रपटाची पताका जगभरात उंचावण्याचं श्रेय निर्विवादपणे ज्यांना देता येईल असे महान दिग्दर्शक सत्यजित राय यांची जन्मशताब्दी २ मे रोजी साजरी होत आहे. त्या निमित्ताने या स्तंभात त्यांच्या एका कलाकृतीचा, ‘पुस्तकातून पडद्यावर’ येण्याच्या संदर्भात घेतलेला धांडोळा...

‘‘कोणत्याही साहित्यकृती-वरून चित्रपट करण्याची माझी पद्धत अशी, की ती साहित्यकृती मी एक-दोन वेळा नीट वाचतो. नंतर ती मिटवून ठेवून देतो. त्यानंतर मी माझ्या आकलनानुसार त्या कथेवर विचार करून माझ्या पद्धतीनं ती पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करतो...’’

साहित्यकृतीचं चित्रपटात रूपांतर करण्यासंबंधी महान दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे मनोगत त्यांनी वेळोवेळी दिलेल्या मुलाखतींवर आधारलेलं आहे. एखाद्या साहित्यकृतीवर चित्रपट करताना दिग्दर्शकानं मूळ कथेत मूलभूत स्वरूपाचे बदल करावेत का, या विषयावर अनेकदा चर्चा झडलेल्या आहेत. सत्यजित राय यांच्या बाबतीत ही चर्चा अधिकच झाली असावी. कारण राय यांच्या एकंदर ३४ चित्रपटांपैकी किमान २६ चित्रपट इतरांच्या कथांवर आधारित असून त्यातल्या बहुतेक कथांचे शेवट त्यांनी बदलले आहेत. याबद्दल जेवढ्या वेळा त्यांच्यावर टीका झाली तेवढ्या वेळा त्यांनी आपली भूमिका वर लिहिण्याप्रमाणे स्पष्ट केलेली आहे.

दोन मे १९२१ रोजी कोलकाता इथं जन्मलेल्या सत्यजित राय यांची ओळख ‘चित्रपट दिग्दर्शक’ एवढीच करून देणं अपुरं ठरेल. त्यांचं कर्तृत्व एवढ्या कमी शब्दात मांडता येणार नाही. दिग्दर्शन करतानाच पटकथा आणि संवाद लेखक, लघुपट व अनुबोधपट दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, संकलक, नियतकालिक संपादक, सुलेखनकार, रेखाचित्रकार, व्यंंग्यचित्रकार, चित्रपट समीक्षक, छपाई तंत्रातल्या नव्या अक्षरशैलीचा (फॉन्ट) जनक अशी बहुमुखी ओळख त्यांनी स्वतःच्या कर्तबगारीवर निर्माण केली. अर्थात जगाला राय यांची ओळख मुख्यतः आहे ती चित्रपट दिग्दर्शक म्हणून!

पंचविशीच्या उंबरठ्यावर असताना राय यांनी इटालियन दिग्दर्शक व्हिटोरिओ डिसिका यांचा ‘बायसिकल थीव्ज’ हा नववास्तववादी (neorealistic) शैलीतला चित्रपट पाहिला आणि त्या विलक्षण अशा अनुभवानं त्यांच्या जीवनाची दिशाच बदलून गेली. कमालीच्या भारलेल्या अवस्थेत त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित केलं, ते होतं चित्रपट दिग्दर्शक होण्याचं. याच अवस्थेत ‘पाथेर पांचाली’ हा पहिला चित्रपट त्यांनी केला. बंगाली लेखक विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या कादंबरीवरचा हा चित्रपट १९५५मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला देशविदेशातले अकरा पुरस्कार मिळाले. त्या पाठोपाठ ‘अपराजितो’ (१९५६) आणि ‘अपूर संसार’ (१९५९) या चित्रपटांद्वारे त्यांनी त्यांची विख्यात ‘अपू चित्रत्रयी’ पूर्ण केली. ‘जलसाघर’, ‘देवी’, ‘महानगर’, ‘चारुलता’, ‘कापुरुष-महापुरुष’, ‘नायक’ अशा अनेक चित्रपटांद्वारे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये त्यांच्या चित्रपटांनी वेगवेगळी ३२ पारितोषिकं पटकावली. चित्रपट जगतातला मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना १९८५मध्ये मिळाला. १९९२मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ किताब देऊन गौरवण्यात आलं आणि त्याच वर्षी ‘ऑस्कर’ पुरस्कार समितीनं विशेष पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं. दुर्दैवानं याच वर्षी त्यांचं देहावसान झालं.

सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात राय यांनी त्यांचा पहिला ‘बिगरबंगाली’ चित्रपट करायला घेतला – ‘शतरंज के खिलाडी!’ हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या तीन भाषांमधला हा चित्रपट जुन्या पिढीतले श्रेष्ठ हिंदी लेखक प्रेमचंद यांच्या कथेवर बेतला होता. (सत्यजित राय आणि प्रेमचंद हा एकत्रित योग १९८१ मध्ये ‘सद्गती’ या टेलिफिल्मच्या निमित्तानं पुन्हा एकदा जुळून आला.) नेहमीप्रमाणे राय यांच्या ‘शतरंज के खिलाडी’वरही उलटसुलट मतं व्यक्त केली गेली. अर्थात टीका झाली तरी एक ‘दखल घेण्याजोगा चित्रपट’ ही त्याची ओळख कुणाला पुसून टाकता आली नाही, हेही खरं.

विसाव्या शतकातले अग्रगण्य हिंदी लेखक म्हणून मुन्शी प्रेमचंद (१८८०-१९३६) यांचं स्थान वादातीत आहे. धनपतराय श्रीवास्तव हे त्यांचं मूळ नाव. ‘गोदान’, ‘कर्मभूमी’, ‘गबन’, ‘मानसरोवर’ यांसारख्या कादंबऱ्‍या आणि असंख्य कथा असं विपुल लेखन त्यांच्या नावावर आहे. प्रेमचंद यांच्या साहित्यकृतींवर ‘गोदान’, ‘गबन’, ‘सांच को आंच नही’ यासारखे चित्रपट तयार झाले. मात्र एकाही चित्रपटाला कलात्मक उंची गाठता आली नाही. अपवाद सत्यजित राय यांनी केलेल्या दोन चित्रपटांचा.

प्रेमचंद यांची ‘शतरंज के खिलाडी’ ही कथा सर्वप्रथम १९२४मध्ये ‘माधुरी’ या मासिकात प्रकाशित झाली. अवध संस्थानचा अखेरचा नवाब वाजिदअली शाह याच्या काळात घडणारी ही कथा. तत्कालीन राजधानी लखनौमधले मिर्झा सज्जाद अली आणि मीर रोशन अली या दोघा जहागीरदारांचं बुद्धिबळाचं वेड आणि या वेडापायी झालेली त्यांच्या आयुष्याची शोकांतिका यांचं प्रत्ययकारी चित्रण ही कथा करते. केवळ या दोघांच्या नव्हे तर एकूण अवधच्या अवनतीचं विदारक दर्शन या कथेतून घडत जातं. लखनौची समस्त प्रजा त्या काळात भोगविलासात बुडालेली. नृत्य, गायन, शेरोशायरी, हुक्का, मदिरा आणि अफू यांचं अखंड सेवन, कोंबड्यांच्या व मेंढ्यांच्या झुंजी, गंजिफा आणि शतरंजचे रंगणारे डाव यामध्ये जनता दंग झालेली. अन्य जगात काय घडतं आहे, याची गंधवार्तादेखील या लोकांना नसते. बुद्धिबळाचा डाव टाकून कायम या खेळात दंग झालेले मिर्झा आणि मीर हे तरी त्याला कसे अपवाद असणार? खेळापायी या दोघांचंही आपापल्या बेगमांकडे दुर्लक्ष होत असतं. कधी याच्या तर कधी त्याच्या हवेलीवर बुद्धिबळाचा डाव रंगत असतो. अन्य जगाची त्यांना फिकीर नसते. पण नवाबाची वक्रदृष्टी वळण्याच्या भीतीनं हे दोघं गोमती नदीकाठच्या एका जुन्यापुराण्या मशिदीत जाऊन आपलं बस्तान बसवतात. भल्या पहाटे बाडबिस्तरा आणि बुद्धिबळाचा पट घेऊन घर सोडायचं, कुणाच्या नजरेला पडू नये यासाठी गल्लीबोळांतून मार्ग काढत इच्छित स्थळ गाठायचं, पडक्या मशिदीत डाव मांडायचा, भूक लागेल तेव्हा मिळेल ते खाऊन पुन्हा खेळायला बसायचं असा खाक्या. इंग्रजांनी एकेक संस्थान खालसा करत अवधभोवतीचा फास आवळत आणल्याची कुणकुण त्यांना लागतेही. मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत ही दुक्कल त्यांचा खेळ सुरूच ठेवते. खेळातले ‘शह’, ‘मात’, ‘चाल’, ‘मोहरे’ हेच त्यांच्या लेखी महत्त्वाचे. इंग्रजांचे सैनिक नवाब वाजिदअली शाहला कैद करून घेऊन जाताना हे दोघं उघड्या डोळ्यांनी पाहतात, मात्र  दुसऱ्‍या क्षणी पुन्हा डाव मांडतात. मधूनच खेळातल्या वादातून दोघांमध्ये भांडण होतं. शब्दानं शब्द वाढत जाऊन एकमेकांच्या घराण्यांचा उद्धार होतो. हमरीतुमरीवर येत दोघं तलवारी उपसून एकमेकांवर वार करतात. दोघांचाही जागेवरच मृत्यू होतो.

कथेचा जीव छोटा असला तरी प्रेमचंद यांनी ती खुलवत नेली आहे. त्या काळातलं लखनौचं जनजीवन, मिर्झा आणि मीर यांचं पराकोटीचं बुद्धिबळ वेड, खेळ सोडून इतर सारं कस्पटासमान मानण्याची दोघांची वृत्ती, बेगमांना फसवण्याच्या त्यांच्या करामती, प्रत्यक्ष नवाब कैद होऊन जातानादेखील त्यांचं कमी न होणारं वेड हा सारा तपशील कथेत रंजकतेनं येतो. कधी मिश्कील तर कधी गंभीर होणारी प्रेमचंद यांची शैली कथेला प्रभावी करते. अशा या कथेला पडद्यावर आणताना सत्यजित राय यांनी त्यांच्या कारकिर्दीत प्रथमच अनेक ख्यातीप्राप्त मंडळी एकत्र आणली. व्यावसायिक हिंदी चित्रपटाला येणारा खर्च सोसण्याची निर्माता सुरेश जिंदाल यांची तयारी होती. त्यामुळंच संजीव कुमार, सईद जाफरी, अमजद खान, शबाना आझमी, फरीदा जलाल, वीणा, डेव्हिड, रिचर्ड ॲटेनबरो, टॉम अल्टर आणि (पडद्यामागचा निवेदक) अमिताभ बच्चन यांसारखे कलाकार राय यांनी गोळा केले. पटकथा, संगीत आणि दिग्दर्शन या जबाबदाऱ्‍या राय यांनी स्वतः सांभाळल्या होत्या. त्याबरोबरीनं पंडित बिरजू महाराज (नृत्य दिग्दर्शन), बन्सी चंद्रगुप्त (कला दिग्दर्शन), शमा जैदी (वेशभूषा व संवाद), सुमेंदु रॉय (छायाचित्रण) आदी मंडळी होती. एवढ्या गुणिजनांच्या सहभागानं ही कलाकृती किमान दर्जा राखणारी होणार यात नवल नव्हतं. मात्र दुर्दैवानं प्रेक्षकांनी तिच्याकडे पाठ फिरविली. अर्थात कोणत्याही चित्रपटाचं कलात्मक श्रेष्ठत्व आणि व्यावसायिक यशापयश या दोन वेगळ्या बाबी असतात.

निखळ कलात्मक निकषावर हा चित्रपट जोखला असता त्याला काही अधिक व काही उणे असे गुण द्यावे लागतात. जमेच्या बाजूविषयी बोलायचं तर कला दिग्दर्शकानं उभी केलेली वातावरण निर्मिती, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, लेखनावर घेतलेली मेहनत ही या चित्रपटाची बलस्थानं आहेत. तर टीकाकारांनी घेतलेल्या आक्षेपांमध्ये प्रामुख्याने राय यांनी बदललेला कथेचा शेवट, इंग्रज अधिकाऱ्‍यांची इंग्रजी भाषेतली प्रदीर्घ आणि कंटाळवाणी चर्चा, नवाब वाजिदअली शाहचं चुकीच्या पद्धतीनं केलेलं चित्रण (त्यातही या भूमिकेसाठी केलेली अमजद खानची निवड) या मुद्द्यांचा समावेश होता. मूळ कथेत मिर्झा आणि मीर शेवटी तलवारीनं एकमेकांचे प्राण घेतात. पण चित्रपटात त्यांच्यात भांडण झालं तरी थोड्या वेळानं ते पुन्हा खेळायला बसतात, असा शेवट राय यांनी केलाय. त्यांच्या मते कथेतला शेवट नाटकी आणि भडक वाटल्यानं तो आपण बदलला. शेवटी ते दोघं जेव्हा डाव मांडून बसतात तेव्हा तत्कालीन हिंदुस्थानी नव्हे, तर ब्रिटिश पद्धतीनं बुद्धिबळ खेळू लागतात असं राय यांनी दाखवलं. (या दोन्ही पद्धतींमधले बारकावे माहीत नसलेल्या प्रेक्षकांना हा शेवट कळला नाही.) प्रेमचंद यांच्या कथेचा शेवट वाचकाला विषण्ण करून सोडतो. त्या तुलनेत चित्रपटाचा शेवट उपहासगर्भ केल्यानं तो तेवढा भिडत नाही.

शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी हे या चित्रपटाचं महत्त्वाचं अंग होतं. शाश्वती सेन यांच्या नृत्यावर चित्रित झालेली ‘कान्हा मै तोसे वारी’ ही रचना तर खासच. इंग्रजांनी कैद केलेल्या वाजिदअली शाहनं लखनौ सोडून जाताना व्याकूळ होत ‘बाबुल मोरा’ ही भैरवीतली बंदिश गायली अशी आख्यायिका आहे. पण चित्रपटातला वाजिदअली शाह ‘बाबुल मोरा’ऐवजी दुसरंच गाणं (तेही अमजद खानच्या आवाजात) गात असल्यानं अनेकांचा अपेक्षाभंग झाला.

‘मूळ कथा मी वाचली असून तिची मला झालेली अर्थउकल (Interpretation) या पद्धतीची आहे,’ असं सांगत सत्यजित राय यांनी त्यांच्यावरच्या आक्षेपांना उत्तर दिलं. आक्षेप मान्य करूनही एक स्वतंत्र कलाकृती म्हणून ‘शतरंज के खिलाडी’चं स्थान मान्य करावं लागतं.

संबंधित बातम्या