जुळ्यांची चौरंगी धमाल!

सुनील देशपांडे
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

पुस्तकातून पडद्यावर

गुलजार यांची मिश्कील लेखणी आणि संजीव कुमार व देवेन वर्मा यांची विलक्षण विनोदबुद्धी यांचा अनोखा प्रत्यय ‘अंगूर’मध्ये पदोपदी येत राहतो. चित्रपटाच्या अखेरच्या प्रसंगात जुळ्या भावांची ओळख पटते तेव्हा पहिला दुसऱ्‍याला विचारतो, ‘तुझ्या उजव्या खांद्यावर तीळ आहे का?’ दुसऱ्‍याने ‘नाही’ असं सांगताच पहिला ताडकन म्हणतो, ‘माझ्याही खांद्यावर तीळ नाही, म्हणजे आपण भाऊच की!’ या अशा व्रात्य प्रसंगांमुळे ‘अंगूर’ची आंबट-गोड चव वाढत जाते...

नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ शोधायचा प्रयत्न करू नये असं म्हणतात. त्याच धर्तीवर हिंदी सिनेमाच्या कथाकल्पनेचं मूळ शोधायच्या भानगडीत कुणी पडू नये, असंही म्हणता येईल. आता हेच पाहा, गुलजार यांचा ‘अंगूर’ हा चित्रपट शेक्सपिअरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ या नाटकावर बेतलेला आहे हे किमान तो चित्रपट पाहिलेल्या प्रत्येकाला माहीत आहे. कारण चित्रपटाच्या सुरुवातीलाच गुलजार यांच्या निवेदनातून ते स्पष्ट होतं. पण या कथेचा प्रवास शेक्सपिअरचं नाटक ते गुलजार यांचा चित्रपट एवढाच मर्यादित नाही. त्याआधीही वेगवेगळे थांबे घेत या कथेचा प्रवास झाला आहे. (‘अंगूर’नंतर गेल्या चाळीस वर्षांत पुन्हा या कथेवर चित्रपट तयार झाला नाही.) 

‘अंगूर’च्याही पंधरा वर्षं आधी या कथेवर ‘दो दुनी चार’ हा चित्रपट तयार झाला होता. पण किशोर कुमार प्रमुख भूमिकेत असूनही तो अजिबात चालला नाही, आणि ‘दो दुनी चार’च्या आधी, बंगाली लेखक व समाज सुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी १८६९मध्ये लिहिलेलं ‘भ्रांती बिलास’ हे बंगाली नाटक शेक्सपिअरच्या नाट्यकृतीचं पहिलं भारतीय रूपांतर मानलं जातं. याच ‘भ्रांती बिलास’ नाटकावर प्रसिद्ध अभिनेते उत्तम कुमार यांनी १९६३मध्ये त्याच नावाच्या बंगाली चित्रपटाची निर्मिती करून नायकाची भूमिका केली होती.

विल्यम शेक्सपिअरची नाटकं हा जगभरातल्या साहित्यप्रेमींच्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. त्यानं जवळपास चाळीस नाटकं लिहिली. त्यात शोकांतिकांबरोबरच ऐतिहासिक आणि विनोदी नाटकांचा समावेश आहे. पाच वर्षांपूर्वी त्याच्या मृत्यूला चारशे वर्षं पूर्ण झाली असली तरी शेक्सपिअर अजूनही कालबाह्य झालेला नाही. १५९४ साली आलेलं ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ हे शेक्सपिअरच्या आरंभीच्या नाटकांपैकी एक. जुळ्या मुलांच्या कथा आजवर अनेकदा येऊन गेल्या असल्या तरी जुळ्या मुलांच्या दोन वेगवेगळ्या जोड्या (एकूण चार पात्रं) या नाटकात दाखवल्या असून तेच त्याचं ठळक वैशिष्ट्य आहे. नाटकाची कथा साधारण अशी : एफिसस आणि सायराक्यूज या ग्रीक संस्थानांमध्ये कमालीचं वैर असतं. एफिससनं तर कायदाच केलेला असतो की सायराक्यूजचा एखादा नागरिक त्यांच्या शहरात आढळला तर त्याला एक हजार मोहरांचा दंड आणि ही रक्कम न भरल्यास थेट मृत्युदंड ठोठावायचा. एकदा ईजिअन नावाचा सायराक्यूजचा व्यापारी एफिससमध्ये हिंडताना रक्षकांना आढळतो आणि कायद्यानुसार त्याला एक हजार मोहरा किंवा त्या न दिल्यास मृत्युदंड ही शिक्षा सुनावली जाते. पण ईजिअनची दयनीय अवस्था पाहून त्याच्याविषयी करुणा निर्माण झालेला संस्थानिक त्याची कहाणी जाणून घेतो.

सायराक्यूजमध्ये राहणारा ईजिअन फार वर्षांपूर्वी व्यापारानिमित्त पत्नीला सोबत घेऊन परगावी गेलेला असतो. तिथं त्याची पत्नी दोन जुळ्या मुलांना जन्म देते. ते मुक्कामाला असलेल्या अतिथिगृहात एक गरीब स्त्री त्याच वेळी जुळ्या मुलांना जन्म देते. त्या महिलेची परिस्थिती हलाखीची असल्याने ईजिअन पती-पत्नी तिच्या जुळ्या मुलांना दत्तक घेतात. मोठेपणी ही जुळी मुलं आपल्या जुळ्या मुलांसाठी नोकर म्हणून ठेवता येतील हा त्यांचा हेतू असतो. गावी परत येताना ईजिअन दांपत्याचं जहाज भयंकर वादळात सापडतं. खडकावर आदळून या जहाजाचे तुकडे  होतात. ईजिअन व त्याची पत्नी यांची ताटातूट होते. ईजिअनपाशी त्याचा स्वतःचा एक मुलगा व त्या गरीब जुळ्या मुलांपैकी एक अशी दोन बाळं राहतात, तर हरवलेल्या पत्नीकडे दुसरी दोन बाळं उरतात. काळ उलटत जातो. ईजिअनचा मुलगा अठरा वर्षांचा झाल्यानंतर पित्याची परवानगी घेऊन आपली आई, जुळा भाऊ आणि आपल्यासोबतच्या मित्रवत नोकराचा जुळा भाऊ या तिघांचा शोध घेण्यासाठी नोकरासमवेत मोहिमेला निघतो. दोन वर्षं होऊनही ते परत न आल्याने स्वतः ईजिअन त्यांच्या तपासाला निघतो. तोसुद्धा आणखी पाच वर्षं जगातले अनेक देश पालथे घालतो. या दरम्यान तो एफिससमध्ये फिरत असताना पकडला जातो.

 ईजिअनची कहाणी ऐकून तो संस्थानिक त्याला दंडाची रक्कम उभी करण्यासाठी एक दिवसाची मुदत देतो. ईजिअन शहरात भटकू लागतो. योगायोगानं त्याचे दोन्ही मुलगे त्या वेळी याच शहरात आपापल्या नोकरांसमवेत वास्तव्याला असतात. मात्र त्यांच्यापैकी कुणालाच याची कल्पना नसते. या दोन मुलांचं नाव असतं अॅंटीफोलस, तर त्यांच्या नोकरांचं नाव असतं ड्रोमिओ. बऱ्‍याच नाट्यपूर्ण घटना व गमतीजमती घडल्यानंतर ईजिअनचे दोन्ही जुळे मुलगे, त्या दोघांचे जुळे नोकर आणि ईजियनची पत्नी हे सारे समोरासमोर येतात. त्यांची एकमेकांशी ओळख पटते. ईजिअनला आजवर भोगावे लागलेले कष्ट पाहून संस्थानिक त्याचा दंड माफ करतो. शेवट गोड होतो.

‘कॉमेडी ऑफ एरर्स’ला हिंदी चित्रपटाचं रूपडं बहाल करण्याचं श्रेय निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय यांना द्यावं लागेल. बिमल रॉय यांना १९५४साली प्रयाग येथे कुंभमेळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करायची होती. मात्र त्याच काळात बिमल रॉय यांची प्रकृती ढासळल्यानं त्यांना ती योजना रद्द करावी लागली. त्याऐवजी ‘भ्रांती बिलास’च्या कथानकावर ‘दो दुनी चार’ हा कमी खर्चाचा चित्रपट करायचा निर्णय त्यांनी घेतला. आपले सहायक देबेंद्र ऊर्फ देबू सेन यांच्यावर त्यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सोपविली. साहाय्यक दिग्दर्शक आणि संवाद लेखक म्हणून गुलजार यांची नियुक्ती केली. जुळ्यांच्या जोड्या म्हणून किशोर कुमार आणि असित सेन या दोघांची निवड करण्यात आली. अनेक अडचणी व तडजोडींना सामोरे जात या मंडळींनी चित्रपट पूर्ण करत आणला. मात्र जानेवारी १९६५मध्ये बिमल रॉय यांचं कर्करोगानं निधन झाल्यानं हा चित्रपट पुन्हा रखडला. अखेर कसाबसा पूर्ण झालेला हा चित्रपट १९६८मध्ये कोणताही गाजावाजा न करता प्रदर्शित केला गेला. एका आठवड्यातच तो सिनेमागृहातून उतरवलाही गेला आणि तेवढ्याच गतीनं विस्मरणात गेला.

‘दो दुनी चार’ अपयशी ठरला असला तरी त्याच्या कथानकानं गुलजार यांची पाठ सोडली नाही. म्हणूनच पंधरा वर्षांनी, १९८१मध्ये त्यांनी पुन्हा एकदा हा विषय ‘अंगूर’च्या रूपानं स्वतः पडद्यावर आणला. एव्हाना लेखक-दिग्दर्शक म्हणून गुलजार यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. गंभीर व हळुवार प्रकृतीचे चित्रपट त्यांनी केले असले तरी त्यातल्या संवादांमधून झरणारा सूक्ष्म आणि मिश्कील विनोद ही गुलजार यांची खासियत होती. त्यामुळेच ‘अंगूर’च्या निमित्तानं एक विनोदी चित्रपट करायची संधी त्यांना मिळाली तेव्हा तिचा पुरेपूर वापर करीत त्यांनी एक निखळ विनोदी कलाकृती सादर केली. कथेत महत्त्वाचं स्थान असलेल्या जुळ्यांच्या दोन जोड्यांसाठी अनुक्रमे संजीव कुमार आणि देवेन वर्मा यांची निवड करून गुलजार यांनी अर्धी बाजी जिंकली होती. याशिवाय ‘दो दुनी चार’चे दिग्दर्शक देबू सेन यांना यावेळी पटकथा लेखनात सहभागी करून घेत त्यांनी जुना ऋणानुबंधही जपला. मूळ कथेत वादळात जहाज सापडून कुटुंबाची ताटातूट होते, त्याप्रमाणेच चित्रपटाची सुरुवात होते. दोन जुळ्या मुलांपैकी एक आणि दोन गरीब जुळ्यांपैकी एक अशा दोन जोड्या वेगवेगळ्या ठिकाणी वाढतात. अशोक १ आणि त्याचा नोकर असलेला बहादूर १ हे दोघे एका शहरात, तर अशोक २ व बहादूर २ हे दोघे वेगळ्या शहरात वास्तव्याला असतात. अशोक १ हा व्यावसायिक असून घरात त्याची पत्नी सुधा, मेहुणी तनू, नोकर बहादूर आणि त्याची पत्नी प्रेमा असे राहतात. काही कामासाठी अशोक २ व बहादूर २ परगावी जातात जिथं अशोक १ व अन्य मंडळी राहत असतात. या छोट्या शहरात या चौघांच्या एकत्रित राहण्यानं जो गोंधळ उडतो, त्याची अतिशय धमाल मांडणी या चित्रपटात अनुभवायला मिळते.

अशोक १ याला मद्यपानाबरोबरच तपकीर ओढायची सवय आहे. लग्नाला काही वर्षं झाली असल्यानं पत्नीसोबत त्याचे खटके उडणं साहजिकच. सोन्याचा हार आणून देण्याची तिची इच्छा तो पूर्ण करत नसल्यानं भांडणाला निमित्त मिळत असत. तिकडे अविवाहित अशोक २ हा निर्व्यसनी असला तरी ‘जासूसी’ कादंबऱ्‍या वाचण्याचं त्याला भयंकर वेड आहे. त्याच्या या आवडीमुळे गमतीदार प्रसंग उद्‍भवत असतात. गुप्तहेर कथेतली गुन्हेगार पात्रं आपल्या अवतीभवती वावरत असल्याचा त्याला सतत संशय येत असतो. असे हे जुळ्यांचे दोन ‘संच’ एकाच शहरात आल्यानंतर त्यांना ओळखणाऱ्‍यांचा गोंधळ उडतो. कधी अशोक १ला बहादूर २ भेटतो तर कधी बहादूर १ अशोक २च्या समोर येतो. अशोक १ यानं बायकोसाठी करायला दिलेला हार सोनाराच्या माणसानं प्रत्यक्षात अशोक २च्या हातात देणं, त्या आधी अशोक २ व बहादूर २ यांनी अशोक १च्या घरात चुकून शिरल्यानंतर त्यांना तिथं अडकून पडावं लागणं यासारख्या गमती घडतात. अखेर दोन्ही जुळ्यांच्या दोन जोड्या समोरासमोर आल्यानंतर या घोटाळ्याचा उलगडा होतो आणि लहानपणी दुरावलेल्या भावांची व दोन्ही अशोकच्या आईची पुनर्भेट होते.

गुलजार यांनी या कथेची मांडणी विनोदी, प्रसंगी फार्सिकल ढंगानं केल्यानं आणि दोन्ही प्रमुख कलाकारांनी दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेलं टायमिंग अचूक साधल्यानं या चित्रपटाची रंगत उत्तरोत्तर वाढत जाते. शब्दनिष्ठ, प्रसंगनिष्ठ, स्वभावनिष्ठ असे विनोदाचे सारे प्रकार गुलजार यांनी इथं हाताळलेत. रेल्वे प्रवासात गुप्तहेर कथा वाचत असताना अशोक २च्या चेहऱ्‍यावरचे बदलत जाणारे भाव, गोळी झाडल्याचं वर्णन येताच ती चुकवण्यासाठी त्याचं डोकं बाजूला घेणं, रेल्वेच्या टॉयलेटच्या दाराचा आवाज ऐकून तिथं चोर दडल्याचा संशय येणं, हातात पिस्तूल घेतल्याचा आविर्भाव करत टॉयलेटमध्ये घुसल्यानंतर तिथं कुणीच नसणं, परगावी टॅक्सीनं हॉटेलवर जाताना ड्रायव्हरचा संशय येऊन आपण त्या हॉटेलवर फार वेळ थांबणार नसल्याचं सांगणं आणि त्याला कसा ‘बनवला’ या विचारानं स्वतःवर खूश होणं यासारखे अनेक प्रसंग संजीव कुमारनं धमाल रंगवले आहेत. (तुलनाच करायची तर इथं अशोक २ हा अशोक १ वर मात करताना दिसतो.) तीच गोष्ट बहादूरच्या दुहेरी भूमिकेतल्या देवेन वर्माची. साधे साधे संवाददेखील त्याच्या जबरदस्त टायमिंगमुळे त्या प्रसंगात जान आणतात. बहादूर १च्या पत्नीच्या तावडीत बहादूर २ सापडतो त्या दृश्यांमध्ये तर देवेन अक्षरशः धमाल करतो.

चित्रपटाच्या शेवटी अशोकची आई देवाची आभार मानताना म्हणते, ‘असा चमत्कार होईल असं कुणाला वाटलं असतं?’ त्या पाठोपाठ पडद्यावरचा शेक्सपिअर स्वतःकडे बोट दाखवत ‘माझ्याशिवाय दुसरा कोण’ असा मिश्कील आविर्भाव करताना दिसतो. भारतीय चित्रपटांमधल्या ‘लॉस्ट अँड फाऊंड फॉर्म्युला’चा जनक कोण, ही चर्चा शेक्सपिअरच्या कानी गेलीच तर त्या वेळीदेखील तो असाच डोळा मिचकावत म्हणेल, ‘माझ्याशिवाय दुसरा कोण?’

संबंधित बातम्या