बकालपणाचं अव्याहत ‘चक्र’

सुनील देशपांडे
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021


पुस्तकातून पडद्यावर

‘चक्र कादंबरीनं मला इतकं झपाटून टाकलं आहे की त्यावर चित्रपट पूर्ण केल्याशिवाय मी मरणार नाही,’ असं भारावलेल्या अवस्थेत जयवंत दळवी यांना सांगणाऱ्‍या रवींद्र धर्मराज यांनी जिद्दीनं हा चित्रपट पूर्ण केला. जानेवारी ’८१ मध्ये दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावून आलेला चित्रपट इतरत्र प्रदर्शित होण्याच्या आधीच, फेब्रुवारी ’८१मध्ये, धर्मराज यांचं आकस्मिक निधन झालं. एखादा चित्रपट खुद्द त्याच्या दिग्दर्शकालाच अर्पण करण्याची वेळ निर्मात्यावर आल्याचं हे अतिशय दुर्मीळ आणि चटका लावणारं उदाहरण असेल...

मराठी साहित्यात १९६०नंतरचा काळ नव्या जाणिवांचा आणि नव्या प्रवाहांचा मानला जातो. या ‘साठोत्तरी’ काळात कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललित लेखन, आत्मचरित्र, समीक्षा अशा सर्व अंगांनी मराठी साहित्य बहरून आलं. प्रतिभावान लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षकांच्या काही पिढ्या या कालखंडानं बघितल्या.

जयवंत दळवी (१९२५-१९९४) हे याच कालखंडातले एक आघाडीचे कादंबरीकार आणि नाटककार. तसं पाहिल्यास दळवी यांनी कथा आणि विनोदी लेखनही भरपूर केलं. विशेषतः ‘ठणठणपाळ’सारखं खुसखुशीत विनोदी सदर दीर्घकाळ चालवतानाच दुसऱ्‍या बाजूला ‘चक्र’, ‘स्व-गत’, ‘धर्मानंद’, ‘वेडगळ’, ‘अथांग’, ‘अंधाराच्या पारंब्या’ इत्यादी कादंबऱ्‍या आणि ‘सारे प्रवासी घडीचे’, ‘बॅरिस्टर’, ‘संध्याछाया’, ‘पुरुष’, ‘महासागर’, ‘सूर्यास्त’, ‘कालचक्र’, ‘नातीगोती’ यांसारखी आशयघन नाटकं त्यांनी लिहिली. ‘युसिस’ या अमेरिकी संस्थेत तब्बल तीन दशकं अधिकारपदाची नोकरी सांभाळत त्यांनी हे कसदार लेखन केलं, हे विशेष! दळवींच्या अनेक कादंबऱ्‍यांवर त्यांनी स्वतःच नाटकं लिहिली. कादंबरी आणि नाटक हे दोन्ही त्यांच्या जिव्हाळ्याचे साहित्यप्रकार होते.

‘चक्र’ ही जयवंत दळवी यांची पहिली कादंबरी १९६३ साली प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिच्या अकरा आवृत्त्या निघाल्या. मुंबईच्या झोपडपट्टीमधल्या जीवनाचं उघडं-वाघडं आणि अतिशय वास्तव चित्रण करणाऱ्‍या या कादंबरीनं तत्कालीन साहित्यविश्वाला खडबडून जागं केलं. ही कादंबरी त्या काळात खूपच गाजली आणि वादग्रस्तही ठरली. अफाट प्रशंसेबरोबरच ‘या लेखकाला चाबकाने फोडून काढले पाहिजे’ यासारख्या टोकाच्या प्रतिक्रिया ‘चक्र’च्या वाट्याला आल्या. प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार मिळाले. कादंबरी गाजल्यानंतर गुजराती, हिंदी व इंग्रजीमध्ये तिची भाषांतरं प्रसिद्ध झाली.

एक लक्षात घ्यायला हवं की ‘चक्र’ कादंबरीत चित्रण केलेली झोपडपट्टी ही साठ-सत्तर वर्षांपूर्वीची आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या ‘स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटात दाखवलेली झोपडपट्टी ही अलीकडची आहे. ‘चक्र’ कादंबरीतील झोपडपट्टी लेखकानं १९५० ते १९६० या दशकामध्ये बघितलेली आहे. १९४८ ते १९५० या काळात दळवी यांनी ‘प्रभात’ आणि ‘लोकमान्य’ या दैनिकांमध्ये वार्ताहर म्हणून नोकरी केली होती. हे काम करताना त्यांना मुंबईतल्या वाडीबंदर भागात हिंडावं लागे. त्या काळात वाडीबंदर आणि शिवडी येथे मोठी झोपडपट्टी होती. गिरगावच्या मध्यमवर्गीय वस्तीत राहणारे दळवी या झोपडपट्टीच्या परिसरात फिरत असत. इथं राहणाऱ्‍यांचं आयुष्य पाहून त्यांचं डोकं चक्रावून जात असे. जिला ‘नरक’ म्हणता येईल अशा वस्तीत ही माणसं कशी राहत असतील? अन्न, पाणी, हवा, निवारा, वस्त्र, शौचालयं यापैकी कोणतीही बाब धड मिळत नसताना या लोकांचा निभाव कसा लागत असेल? कुठून येत असतील ही माणसं आणि त्यांचे एकमेकांशी लागेबांधे कसे जुळत असतील?... असे नाना प्रश्न दळवी यांना पडत. यातूनच या झोपडपट्टीवासीयांच्या जीवनावर एक कादंबरी लिहायचा विचार त्यांच्या मनात आला. त्या सात-आठ वर्षांत त्यांनी अनेकदा लिहिण्याचा प्रयत्न केला आणि मनासारखं न जमल्यामुळे लिहिलेले कागद फाडून फेकून दिले. अखेर १९६२ साली ‘चक्र’ लिहून पूर्ण झाली.

कादंबरीत सांगितलेली कहाणी कोणा एकट्या-दुकट्या व्यक्तीची नाही. किड्यामुंग्यांप्रमाणे वावरणाऱ्‍या अनेकांची ती कहाणी आहे. रूढ अर्थानं या कथेला कुणी नायक अथवा नायिका नाही. पदपथालगत तयार झालेल्या या वस्तीचा निर्माता कोण हेही कुणाला ठाऊक नाही. फार पूर्वी कुठली तरी झोपडपट्टी सरकारनं उठवली, तेव्हापासून हे लोक इथं झोपड्या बांधून राहायला आलेले. कायम दारिद्र्यात राहणारे. आज इथं, उद्या तिथं असं प्रत्येकाचं भटकं जीवन. कुणीही आपली हयात दुसऱ्‍याबरोबर घालवली नव्हती. वेगवेगळ्या भाषा मिसळून प्रत्येकाची स्वतंत्र भाषा तयार झालेली.

अशा या वस्तीत राहणारी तिशीतली अम्मा, तिचा तरणा मुलगा बेन्वा, चोऱ्‍यामाऱ्‍या करत लहानाचा मोठा झालेला; अम्मानं जीव लावलेला मवाली लुका आणि ट्रकचा धंदा करत अधूनमधून अम्माकडे मुक्कामाला येणारा तिचा प्रियकर अण्णा यांच्याभोवती मुख्यतः कादंबरीतल्या घटना फिरतात. अम्मा मूळची विजापूरची. आई मरण पावल्यानं पोरकी झालेली. बांधकामावर मुकादम असलेला सुनका तिला पॉन्डिचेरीला पळवून नेतो. तिथं ती त्याच्याशी लग्न करते. एका मुलाला जन्म देऊन दोघं कसाबसा संसार करत असतात. कर्जाच्या वसुलीसाठी एकदा तिथला ठेकेदार तिच्यावर अतिप्रसंग करू पाहतो. सुनका त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करतो. तान्ह्या बेन्वाला घेऊन दोघं तडक मुंबई गाठतात. झोपडपट्टीत राहू लागतात. रेल्वे यार्डातून चोरीचा माल नेताना सुनका पोलिसांची गोळी लागून मरतो. अम्मा उघड्यावर येते. त्याच वस्तीत ती बेन्वाला लहानाचा मोठा करते. दोन-तीन महिन्यांनी कधीतरी येणाऱ्‍या ट्रकवाल्या अण्णाशी घरोबा करून ती घर चालवत असते. अधूनमधून लुकाही तिच्याकडे मुक्कामाला येत असतो. अण्णापासून चोरून ती लुकाशीही संबंध ठेवते. बेन्वाला आपल्या आईचे या दोघांशी संबंध आहेत हे ठाऊक असतं, पण तो त्याकडे दुर्लक्ष करत असतो. एकेकाळी लुकाची या भागात खूप दहशत होती. पण दंगलीत पोलिसांनी तडीपार केल्यापासून तो कल्याणला राहत असतो. कधीमधी आला तरी पोलिस ठाण्यावर रोजची हजेरी असल्यानं तो इथं मुक्काम करत नाही. पण लुका आला म्हणजे वस्तीत तेवढ्यापुरतं चैतन्य सळसळत राहतं. लुका स्वभावानं मोकळा-ढाकळा, छंदीफंदी वृत्तीचा, पण पोलिसांच्या रेकॉर्डवरचा. बेन्वावर त्याचा लोभ. त्याच्या संगतीत राहून बेन्वा अनेक गोष्टी शिकतो. बेन्वानं आपल्यासोबत हातभट्टीवर काम करावं असा त्याचा प्रयत्न असतो, पण पोलिसांची भानगड नको म्हणून अम्माचा त्याला विरोध असतो. बेन्वा काही दिवस बूट पॉलिशचा धंदा करून पाहतो, पण मुलांच्या भांडणात तो टिकत नाही. अण्णापासून अम्मा दुसऱ्‍यांदा गरोदर राहते. मध्यंतरी बराच काळ बेपत्ता झालेला लुका येतो तेव्हा रोगानं त्याचं शरीर पोखरलेलं असतं. त्याही स्थितीत तो बेन्वाचं लग्न झोपडीतल्याच एका मुलीशी जमवून देतो. घरात सून आली, आपल्यालाही दुसरं मूल होणार, आता या झोपडीतून बाहेर पडून स्वतःचं घर घ्यावं, असा अम्माचा विचार असतो. अण्णा काम करत असलेल्या धान्याच्या गोदामवाल्याकडे त्यांना खोपटं उभारण्यापुरती जागा मिळते. अम्माचं घराचं स्वप्न साकार होतं. पण नियतीची चक्रं उलटी फिरतात. रोगानं जर्जर झालेला लुका दुकानातून औषधं चोरून थेट अम्माच्या घरात लपतो. मागावर असलेले पोलिस लुका आणि बेन्वा या दोघांनाही बेड्या घालून नेतात. त्या झटापटीत पोटाला मार लागून अम्माचा गर्भपात होतो. पोलिसांचं लचांड नको म्हणून गोदामवाला आपल्या जागेतून अम्माचं बिऱ्‍हाड बाहेर काढतो. तिकडे जुनी झोपडपट्टीही रस्त्याच्या कामासाठी हटविली जाते. अम्मा पुन्हा रस्त्यावर येते. अस्थिरतेचं चक्र फिरत राहतं...

या कादंबरीला सलग कथानक नाही. तुकड्या-तुकड्यांनी प्रसंग येत राहतात. तरीदेखील ती वाचकाला अस्वस्थ करून सोडते. समीक्षकी अंगानं या कादंबरीची चिकित्सा करण्याची ही जागा नव्हे, पण केवळ निरीक्षण आणि कल्पनाशक्तीच्या बळावर दळवी यांनी या वस्तीच्या बकालपणाचं तटस्थपणानं केलेलं चित्रण विलक्षण प्रत्ययकारी झालं आहे. उण्यापुऱ्‍या पावणेदोनशे पानांच्या या कादंबरीत झोपडपट्टीतल्या लोकांचं जिणं, तिथलं पराकोटीचं दारिद्र्य, दैन्य, लाचारी, गुंडगिरी, रात्रीचे काळे धंदे, पोलिसांची दादागिरी, राजकीय लागेबांधे, कुणी मेल्यानंतर होणारा आक्रोश असे नाना पैलू लेखक बारीकसारीक तपशीलांसह समोर ठेवतो. 

‘चक्र’चा हिंदी अनुवाद वाचून अरुण कौल नावाच्या निर्मात्याने १९६९मध्ये दळवी यांची भेट घेतली आणि या कादंबरीवर चित्रपट करण्यासाठी करार केला. पण पुढे त्यावर काहीच घडलं नाही. मग १९७४ साली इंग्रजीत भाषांतरित झालेली ही कादंबरी वाचून रवींद्र धर्मराज हा नवखा दिग्दर्शक त्यांना भेटायला आला. त्यानंही ‘चक्र’वर चित्रपट करायची कल्पना मांडली. आधीच्या अनुभवामुळे दळवींनी त्याला जेवढ्यास तेवढा प्रतिसाद दिला. करारापोटी मिळालेले पैसे स्वीकारून ते गप्प बसले. काही वर्षं अशीच गेली. १९७८मध्ये रवींद्र धर्मराज पुन्हा दळवींना भेटला. आता त्यानं दुसऱ्‍या कंपनीमार्फत करार केला. यावेळी मात्र त्याचे प्रयत्न यशस्वी झाले आणि १९८०च्या अखेरीस चित्रपट पूर्ण झाला. स्मिता पाटील (अम्मा), नसिरुद्दीन शाह (लुका), रणजीत चौधरी (बेन्वा), कूलभूषण खरबंदा (अण्णा) तसेच अनेक नवोदित कलाकारांची फौज उभी करून धर्मराजनं ‘चक्र’ केला. कला दिग्दर्शक बन्सी चंद्रगुप्त यांनी मुंबईच्या एका मोकळ्या जागेवर खास झोपडपट्टीचा भलामोठा सेट तयार केला. सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम झाल्यानं चित्रपट सरस ठरला. मदहोश बिलग्रामी यांच्या आशयगर्भ गीतांना हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेलं संगीतही उत्कृष्ट होतं. ‘ऊदी आंखों में टूटी हुई नींद है.. रंग अलग सा है, अलग सी है जीवन की लय’ (गायक, भूपेंद्र सिंह) हे गाणं खोलवर भिडणारं ठरलं. ‘काले काले गहरे साये’ (लता मंगेशकर) हे अंगाईगीतही लक्षात राहणारं. स्मिता पाटील अपुऱ्‍या वस्त्रांनिशी रस्त्यावरच्या नळाखाली बसून अंघोळ करते, या दृश्याची त्या काळात खूपच चर्चा झाली होती. पोस्टरवर हे चित्र छापल्याबद्दल स्मितानं नापसंती व्यक्त केली होती. मात्र, या गोष्टी कलाकारांच्या हातात नसतात, असंही तिनं एका मुलाखतीत म्हटलं होतं.

एकदा करार केल्यानंतर दळवी यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातलं 

नाही. ते त्यांच्या स्वभावात नव्हतं. 

मुळात सिनेमावाल्यांशी त्यांचं फारसं कधी जमलं नाही. रवींद्र धर्मराजच्या निधनानंतर त्यांचा या चित्रपटाशी असलेला एकमेव दुवाही निखळला. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा दळवींना प्रीमियरचंदेखील निमंत्रण नव्हतं. त्यांनी तिकीट काढून सिनेमा बघितला. थोड्याफार त्रुटी सोडता चित्रपट चांगला झाल्याचं त्यांनी पुढे एका लेखात म्हटलंय. पटकथा लेखनात आपली मदत घेतली असती तर हा चित्रपट अधिक चांगला झाला असता, असंही त्यांनी नमूद केलंय.

काही वर्षं जाहिरातपटांच्या निर्मितीत घालवलेल्या रवींद्र धर्मराजचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. तो चांगला व्हावा यासाठी त्यानं खूप मेहनत घेतली. चित्रपटाचं स्वागत चांगलं झालं. स्मिता, नसीर आणि बन्सी चंद्रगुप्त यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. शिवाय स्मिताला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. मात्र हे सर्व मानसन्मान पाहायला दिग्दर्शक रवींद्र धर्मराज तोवर या जगात राहिला नव्हता...

संबंधित बातम्या