काळाचं न सुटलेलं गणित

सुनील देशपांडे
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

पुस्तकातून पडद्यावर

आशयदृष्ट्या संपन्न असूनही क्लिष्टतेच्या, दुर्बोधतेच्या जाळ्यात अडकलेल्या ‘कालाय तस्मै नमः’सारख्या नाटकाला अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचं काम अमोल पालेकर यांच्या ‘अनकही’ या चित्रपटानं केलं. धंदेवाईकपणाच्या, सवंगतेच्या आहारी न जाताही प्रेक्षकांना आवडणारी आशयसंपन्न कलाकृती करता येते, हे या चित्रपटाच्या निमित्तानं दिसून आलं...

‘‘या  माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका.

कारण ती ज्या वाटा चालते आहे

त्या आहेत तिच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या.

मोडून पडाल!’’

प्रतिभावंत, मनस्वी आणि ‘शापित’ लेखक चिं. त्र्यं. खानोलकर अर्थात कवी आरती प्रभू यांच्या एका कवितेतल्या या ओळी. पहिल्या ओळीत ‘कविते’ऐवजी कथा, कादंबरी अथवा नाटक असा उल्लेख केला असता तरी चाललं असतं. कारण यातला कोणताही साहित्यप्रकार सर्वसामान्य वाचकाच्या सहज पचनी पडेल अशा रीतीनं त्यांनी कधी हाताळला नाही. तो त्यांचा पिंड नव्हता.

कोकणातल्या एका छोट्याशा वाडीत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या चिंतामणी त्र्यंबक खानोलकर (१९३०-१९७६) यांचं केवळ साहित्यच नव्हे, तर आयुष्यदेखील गूढरम्य वाटावं असं होतं. त्यांच्या साहित्याचे अर्थ उलगडून दाखविण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. त्यांचं जन्मस्थान असलेली कोकणातली बागलांची राई, नंतर कुडाळ, वेंगुर्ले तसंच मुंबई अशा विविध ठिकाणी केलेलं वास्तव्य, शिक्षण अपुरं राहूनही लाभलेली अपार बुद्धिमत्ता, हलाखी आणि अस्थिरता अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही खानोलकरांच्या प्रतिभेची ज्योत सतत तेजाळत राहिली. त्यांच्या अकाली मृत्यूनंतरच ही ज्योत निमाली.

‘जोगवा’, ‘दिवेलागण’, ‘नक्षत्रांचे देणे’ हे कवितासंग्रह, ‘रात्र काळी घागर काळी’, ‘अजगर’, ‘कोंडुरा’, ‘त्रिशंकू’, ‘गणूराया आणि चानी’, ‘अगोचर’, ‘भागधेय’, ‘पाषाणपालवी’ इत्यादी कादंबऱ्‍या, ‘एक शून्य बाजीराव’, ‘अवध्य’, ‘कालाय तस्मै नमः’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘रखेली’ यासारखी नाटकं तसंच काही कथासंग्रह आणि विपुल स्फुटलेखन अशी भरीव कामगिरी अवघ्या सेहेचाळीस वर्षांच्या आयुष्यात खानोलकरांनी केली. त्यांचं अप्रकाशित व असंग्रहित साहित्य प्रसिद्ध करण्याचं काम गेली अनेक वर्षं सुरू आहे.

‘कालाय तस्मै नमः’ ही नाटककार म्हणून खानोलकरांची ताकद दाखवून देणारी नाट्यकृती. १९७२मध्ये ती पुस्तकरूपानं प्रसिद्ध झाली. पुढे या नाटकाच्या तीन आवृत्त्या निघाल्या. पुण्याच्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेनं १९७२मध्येच राज्य नाट्य स्पर्धेत हे नाटक सादर करून बहुतेक सर्व पारितोषिकं पटकावली. याच संस्थेनं त्याचे काही प्रयोग केले खरे, पण व्यावसायिक रंगभूमीवर हे नाटक रुजू शकलं नाही. कारण सर्वसामान्य प्रेक्षकांना न झेपणारी (सोप्या भाषेत - डोक्यावरून जाणारी) त्याची प्रकृती. असं असलं तरी नाट्यस्पर्धांमधून ते अजूनही सादर केलं जातं. दिग्दर्शक आणि कलावंत यांचा कस पाहणारी संहिता असल्यानं ‘स्पर्धेतलं नाटक’ ही त्याची वेगळी ओळख ठरली.  

मुंबईतले प्रख्यात ज्योतिषी होरारत्न विनायकराव यांच्या कुटुंबात घडणाऱ्‍या घटनेची कहाणी या नाटकात सांगितली आहे. सत्तरीला आलेल्या विनायकरावांनी ज्योतिषाचा व्यवसाय आता पूर्णपणे बंद केला आहे. यामागचं कारण ते कुणाला सांगत नाहीत, पण आपल्या निर्णयाशी ते ठाम आहेत. घरात ते, त्यांची पत्नी आनंदी आणि कमावता मुलगा मधू एवढीच माणसं. विनायकराव हे जुन्या वळणाचे. बोलताना सतत ‘श्रीहरी श्रीहरी’ असं नामस्मरण करणारे. त्यांच्या मते त्यांचं स्वतःचं आयुष्य नव्वद वर्षांचं आहे आणि त्यांच्या मृत्यूचा दिवस, वार, वेळ सगळं निश्चित आहे. त्यांची पत्नीदेखील जुन्या वळणाची. ती त्यांच्या शब्दाबाहेर जात नाही. मुलगा मधू मात्र आधुनिक विचाराचा अाहे. ज्योतिष वगैरे गोष्टींवर त्याचा विश्वास नाही. मात्र, वडिलांनी ज्योतिषात सांगितलेल्या सर्व गोष्टी अचूकपणे घडल्याची त्याला कल्पना आहे. मधूचं सुषमा नावाच्या परजातीतल्या मुलीवर प्रेम आहे आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे. सुषमा हुशार आणि दिसायला-वागायला चांगली असूनही विनायकरावांचा या लग्नास  विरोध अाहे. ती परक्या जातीतली किंवा हुंडा कमी मिळणार म्हणून नव्हे, तर दुसऱ्‍या एका  कारणासाठी. यामुळे त्या दोघांमध्ये तणावाचं वातावरण आहे. मधू जेव्हा लग्नाबाबत सोक्षमोक्ष लावण्यासाठी अडून बसतो तेव्हा विनायकराव ते कारण उघड करतात. त्यांच्या मते मधूच्या पत्रिकेत ‘द्विभार्यायोग’ असतो. ‘सुषमेशी तुझं लग्न झालं की पुढल्या अकरा महिन्यांत प्रसूतीच्यावेळी ती मरण पावणार हे निश्चित आहे,’ असं ते सांगतात. मधूला हे शास्त्र अमान्य असतं. ज्योतिषावर, एका अपुऱ्‍या शास्त्रावर मी विश्वास टाकणार नाही, मी विज्ञानयुगातला माणूस आहे, असं तो सांगतो. पण वडिलांच्या विरोधात जाण्याचं धाडस त्याच्यात नसतं.

याच सुमारास विनायकरावांचे कोकणातले जुने स्नेही बन्याबापू त्यांची मुलगी शकू हिला घेऊन त्यांच्याकडे राहायला येतात. शकूसाठी स्थळ बघावं या हेतूनं. बन्याबापूंना गाण्याची खूप आवड आणि शकूलाही त्यांच्याप्रमाणे चांगला गळा लाभलेला. मात्र ही शकू एकदम खेडवळ असते. बडबडी, थोडीशी बावळट नि किंचित वेडसरपणाची झाक असलेली. आजवर खेड्यात राहिलेली शकू मुंबईतल्या घरात छताला लागलेला पंखा फिरताना बघून, टेलिफोनची रिंग ऐकून घाबरते. लहानपणापासून तिचं हे वागणं बघून तिच्यात भुताचा संचार झाल्याचा सर्वांचा ग्रह झालेला असतो. तिची ही बाधा उतरवण्यासाठी वडिलांनी गंडेदोरे, मारझोड आदी सर्व प्रकारची उपाय केलेले असतात.  

वागण्या-बोलण्यातला दोष सोडला तर शकू नाकीडोळी नीटस, तरतरीत आणि लाघवी मुलगी असते. शिवाय ती उत्तम गाणारी. तिला बघून मधूच्या मनात वेगळा विचार येतो. खरंतर ती एक ‘खेळी’ असते. आपण शकूशी का लग्न करू नये? लग्नानंतर ती गरोदर राहिली म्हणजे बाबांच्या भाकितानुसार प्रसूतीच्यावेळी तिचा मृत्यू होईल, आणि मग सुषमाशी लग्न करण्याचा मार्ग मोकळा होईल, ही ती खेळी. त्याच्या दृष्टीनं शकू हा एक पूल असतो, सुषमा नावाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी.

मधूचा हा विचार आई-बाबांना तसेच सुषमालाही पसंत नसतो. पण त्याचा निर्धार पक्का असतो. त्या दृष्टीनं तो पावलं टाकत जातो. आपल्याशी लग्न झाल्यास शकूमध्ये सुधारणा होईल, हे आईला तसंच शकूच्या वडिलांना पटवून देण्यात तो यशस्वी होतो. विनायकरावांना यातली खरी गोम ठाऊक असली, तरी ते फार काही करू शकत नाहीत. त्यांच्या दृष्टीनं मधूचा निर्णय म्हणजे ‘शकूचा बळी’ देणं होय.

लग्नानंतर शकूमध्ये थोडा बदल होतो आणि बन्याबापूंचं खुंटलेलं गाणंही सुरू होतं. मधूनं ठरवल्याप्रमाणे शकू गरोदर राहते. मात्र या काळात मधूची मानसिक घालमेल सुरू होते. तो व्यसनाधीन होतो. तिकडं सुषमाच्याही मनात अपराधीपणाची भावना घर करते. सर्वांच्या ताणतणावाचा कडेलोट झाल्यानंतर सुषमानं आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी कानी येते. मधू उन्मळून पडतो. होरारत्न विनायकराव पराभूत भावनेनं उद्‍गारतात, ‘‘त्या दोघीही माझ्या भविष्याहून थोर ठरल्या... भविष्याला बगल देणाऱ्‍या या पोरी... मी तरी कोण? कोण मी? सांगा कुणीतरी.... कालाय तस्मै नमः!’’

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या नाटकाची जातकुळी प्रेक्षकांच्या सहज पचनी पडणारी नव्हतीच. मात्र ज्योतिषशास्त्र, श्रद्धा-अंधश्रद्धा, विवाहसंस्था यासारख्या मुद्द्यांना भाषणबाजी न करता खानोलकर स्पर्श करून जातात.

क्लिष्टतेच्या जाळ्यात अडकलेल्या या नाट्यकृतीला ‘माध्यमांतरा’द्वारे अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याचं काम निर्माता-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी ‘अनकही’ या चित्रपटातून १९८५ साली केलं. मूळ नाटकावरील दुर्बोधतेचे आक्षेप आपल्या कलाकृतीवर येणार नाहीत याची जणू खबरदारी घेतच पालेकरांनी हा चित्रपट केला असावा. अर्थात त्यामुळेच तो अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचला.

नाटकाप्रमाणे चित्रपटाची कथाही मुंबईत घडते. पात्रांची नावं तेवढी बदललेली. मधूऐवजी नंदू, शकूच्या जागी इंदू, होरारत्न विनायकरावांच्या जागी ज्योतिर्भास्कर पंडित सत्यनारायण चतुर्वेदी, कोकणातल्या बन्याबापूंच्या जागी अलाहाबादकडून आलेले अग्निहोत्री मिश्रा, आई आनंदीच्या जागी सावित्री ही पात्रं भेटतात. नंदूची प्रेयसी सुषमा मात्र त्याच नावानं भेटते.

माध्यमबदलामुळे पटकथेसाठी आवश्यक ते बदल करतानाच सिनेमाध्यमानं देऊ केलेले तंत्रातले फायदे घेत हा चित्रपट आकार घेतो. नाटकातल्या राजा मांजरेकर या अनावश्यक पात्राला चित्रपटात रजा देण्यात आली आहे.

नाटकाच्या शेवटी मद्यासक्त नायक उद्ध्वस्त झालेला दाखवलाय. चित्रपटाचा शेवट त्या तुलनेत सकारात्मक केलाय. इंदूची प्रसूती सुखरूप पार पडण्याच्या पार्श्वभूमीवर सुषमानं आत्महत्या केल्याची बातमी येते, तो प्रसंग धक्कादायक खराच, पण आता किमान या दोघांचा संसार सुखाचा होईल, ही भावना प्रेक्षकांना सुखावून जाते.

चित्रपटाच्या आरंभी नायकाच्या मित्राच्या पत्नीचा एका छोट्याशा शस्त्रक्रियेत मृत्यू होतो. पंडितजींनी आधीच तिची कुंडली बघून तिचा मृत्यू होणार, हे भाकीत केलेलं असतं. या निमित्तानं रुग्णालयातले डॉक्टर आणि पंडितजी यांच्यातला संवाद (नव्हे वादविवाद!) चित्रपटाची दिशा स्पष्ट करतो.

कमलेश पांडे यांनी लिहिलेले अर्थपूर्ण संवाद ही या चित्रपटाची जमेची बाजू असून काही पात्रांना दिलेल्या ‘स्वगत’वजा संवादांचं त्या त्या कलाकारांनी चीज केलंय. मग ते पंडितजी (डॉ. श्रीराम लागू) असोत, इंदू (दीप्ती नवल) असो, सुषमा (देविका मुखर्जी) असो वा नायक नंदू (अमोल पालेकर) असो. विशेषतः दीप्तीनं इंदूच्या भूमिकेला ज्या उंचीवर नेऊन ठेवलं त्याला खरंच तोड नाही. पंडितजी एका असहाय क्षणी ईश्वरापुढे करुणा भाकतात - ‘‘वापस ले ले तू मुझ से ये ग्रहों और नक्षत्रों के राझ... ये शून्य का गणित और ये अनागत की वाणी... और सिर्फ एक बार इस ज्योतिर्भास्कर की कही को अनकही कर दे. बस, एक बार...!’’ डॉ. लागूंनी या दृश्यात कमाल केलीय. आवर्जून उल्लेख करावा लागेल तो इंदूचे वडील साकारणारे बंगाली अभिनेते अनिल चटर्जी यांचा. त्यांच्या अभिनयातली सहजता दाद देण्याजोगी.

मूळ नाटकात खानोलकरांनी शकूच्या तोंडी कवितेच्या ओळी घातल्या होत्या. चित्रपटात मात्र इंदू आणि तिचे वडील हे दोघंही गायक असल्याचा फायदा घेऊन त्यांच्या तोंडी आशा भोसले आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातली, अस्सल शास्त्रीय बाज असलेली भजनं देण्यात आली. संगीतकार जयदेव यांचं या बाबतीतलं योगदान केवळ अतुलनीय असं होतं. भीमसेनजींची ‘रघुवर तुमको मेरी लाज’ आणि ‘ठुमक ठुमक पग’ तसेच आशाताईंची ‘कौनो ठगवा’ आणि ‘मुझको भी राधा बना ले’ ही गाणी बहारदार होती आणि त्यांचं चित्रीकरणही उच्च दर्जाचं होतं. ‘अनकही’साठी संगीतकार जयदेवजी आणि गायक भीमसेनजी या दोघांनाही राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलं.

खानोलकरांच्या ‘नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या’ एका कलाकृतीला रुपेरी पडद्यावर अजरामर करणारे अमोल पालेकर आणि त्यांचे सहकारी या सर्वांना सलाम!

 

संबंधित बातम्या