रंग मेंदीचे...

सुप्रिया खासनीस
सोमवार, 9 ऑगस्ट 2021

कव्हर स्टोरी

श्रावणाचा पाऊस, हिरवागार शालू नेसलेली अवनी तसेच पाचूसारखी दिसणारी सृष्टी; त्यातच श्रावणात येणाऱ्या व्रतवैकल्याची चाहूल हे पाहून महिलांना मेंदीची आठवण येणारच. मेंदी हा समस्त महिला वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय. भारतात सर्वत्र प्रचलित असलेल्या प्राचीन परंपरेचे पालन म्हणून मंगलप्रसंगी मेंदी काढली जाते.

मेंदी हातावर काढली जाते तेव्हा हिरवी असते आणि रंगली की तिचा रंग लाल होतो. निसर्गातील झाडे, वेली, शेती यांच्या हिरव्या रंगामुळे वनसृष्टी शोभून दिसते. मनाला शांतता मिळते. हिरव्या रंगाच्या वस्त्रामुळे देवी लक्ष्मी शोभून दिसते. तसेच लाल रंगालाही उच्च स्थान आहे. शुभ, मंगलकार्यांसाठी लाल रंग व वस्त्राचा वापर अधिक केला जातो. देवदेवतांना लाल रंग, गंध, चंदन लावतात. त्यामुळे मेंदीच्या या हिरव्या व लाल रंगाचे स्थान ठळक दिसून येते. प्राचीन काळामध्ये शृंगारात लाल व हिरव्या रंगाला प्राधान्य दिल्याचे दिसते. या दोन रंगांमुळे स्त्रियांचे सौंदर्य अधिक खुलते. मेंदीचा साजशृंगारामध्ये समावेश झालेला दिसून येतो. हात-पाय रंगविणे हा एक शृंगाराचाच एक भाग आहे.

मेंदीचे झाड वाळवंटी प्रदेशातील असून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या भागांत आढळते. मेंदीची रोपे, बियांपासून तसेच छाट कलमाद्वारेही तयार केली जातात. मेंदीची झाडे काटेरी असतात. ही झाडे साधारण दीड ते तीन मीटर उंच वाढतात. एप्रिल ते जुलै या महिन्यात याला पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाची सुवासिक फुले येतात.

रामायणकाळी श्रीराम व लक्ष्मण यांच्या विवाहाचे वेळी पुष्परंगाच्या साहाय्याने त्यात औषधी रस मिसळून तयार झालेल्या मिश्रणाने हाता-पायावर विविध आकार साकारले होते. या सुगंधी मिश्रणाला ‘पत्रावळी’ असे म्हटले आहे. सणांच्यावेळी अयोध्या, वृंदावन इ. ठिकाणी मूर्तीचा शृंगार नैसर्गिक रंग व सुगंधी द्रव्य यांनी तयार झालेल्या ‘पत्रावळी’ने केला जातो. अजिंठा-वेरूळ येथे मेंदी रेखाटलेली शिल्प आहेत.

मेंदीचा जसा शृंगारामध्ये वापर केला जातो, तसा त्याचा आरोग्यासाठीही वापर केला आहे. सण आणि उत्सवात भारतीय संस्कृतीने मेंदीसारख्या वनस्पतीलाही जवळ केलेले आहे. मेंदी थंड असते आणि ती शरीरातील उष्णता शोषून घेते. त्वचा विकारांवरही मेंदी गुणकारी आहे. उन्हाळ्यात हात, पाय आणि मस्तक यावर मेंदीचा लेप लावणे लाभदायक ठरते. मेंदीचा वापर सौंदर्यप्रसाधनाबरोबर वस्त्रोद्योगात केला जातो. तसेच फुलांपासून ‘हीना’ नावाचे अत्तर तयार केले जाते. महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तरप्रदेश इत्यादी राज्यांमध्ये राखी, होळी, रंगपंचमी, रमजान ईद, करवा चौथ इ. महत्त्वपूर्ण सणासाठी हमखास मेंदी काढली जाते. मेंदीला सौंदर्यालंकार मानले आहे. पूर्वी स्त्रिया ठरावीक सणांसाठीच मेंदी काढत असत. त्यावेळी मेंदीच्या झाडांची ओली पाने पाट्यावर वाटून त्याने हातावर मेंदी रेखाटली जात असे. त्या मेंदीची रंगत काही औरच असे. नंतर काही काळाने मेंदीच्या झाडांची पाने वाळवून, कुटून त्याची मेंदी तयार करून काडीच्या साहाय्याने ती रेखाटली जाऊ लागली.  

मध्यंतरीच्या काळात वाटलेल्या मेंदीची जागा पूडरूपी मेंदीने घेतली. बाजारात मिळणारी तयार मेंदीची पावडर वापरली जाऊ लागली. ही मेंदी चांगली रंगण्यासाठी व टिकण्यासाठी त्यावर बरेच सोपस्कार केले जात. चांगली भिजल्यावर काडेपेटीच्या किंवा उदबत्तीच्या साहाय्याने हातावर रेखाटली जात असे. त्यात महिलांचे हस्तकौशल्य पणाला लागत असे. त्यातही महिलांना आनंद मिळे.

नैसर्गिक मेंदीचा वापर सर्वाधिक योग्य असला तरी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वेळेच्या अभावामुळे तयार मेंदी वापरणे अपरिहार्य झाले. कालांतराने हाताने काढण्याच्या मेंदीच्या जागी तयार प्लॅस्टिकचे आवरण असलेले कोन आले. या तयार कोनामुळे नोकरदार स्त्री वर्गाची वेळेची बचत होऊ लागली. त्यामुळे सणावारी, मंगलप्रसंगी मेंदी काढण्याची प्रथा जास्त रूढ झाली. बाजारात सध्या अरेबिक कोन, तयार रेखाटने मिळू लागलेली आहेत. निरनिराळ्या संस्थांमार्फत मेंदीबाबत कार्यशाळा आयोजित केल्या जातात. या कार्यशाळा व क्लासेसमुळे मेंदीची परंपरा टिकून ती विकसितही होऊ लागलेली दिसून येते. या कलेला विकसित करणे महत्त्वाचे आहे. मेंदी व्यवसायामुळे महिलांना रोजगार मिळालेला आहे. त्यामुळे निश्‍चितच या कलेला ऊर्जितावस्था प्राप्त होईल.

मेंदी कलाकृतींचे प्रकार

  •  जरदोसी मेंदी : या प्रकारात वस्त्रे आणि दागिने यांना शोभून दिसणाऱ्या कलाकृती काढल्या जातात. त्या दिसण्यासाठी, आकर्षकतेसाठी वर्ख, कुंदन इत्यादींनी सजविण्यात येतात. काही वेळा प्रथम हातावर नेहमीच्या मेंदीने कलाकृती काढतात व ती रंगल्यावर त्या सोनेरी किंवा चंदेरी रंगांनी रंगवितात. जरदोसी मेंदीचा आणखी एक प्रकार म्हणजे हातावर नेलपेंटने कलाकृती काढण्यात येते व त्यावर रंगांची पखरण केली जाते. 
  • ग्लिटर मेंदी : यासाठी ग्लिटर पेन व ग्लिटर ट्युबचा वापर केला जातो. त्याच्या साहाय्याने हातावर कलाकृती रेखाटण्यात येते. यासाठी वेळही कमी लागतो व ही कलाकृती पाण्याने सहज धुवून टाकता येते. 
  • छटांची मेंदी : यामध्ये आकृत्यांची बाह्यरेषा काळ्या रंगाने काढली जाते आणि आतील भाग नेहमीच्या मेंदीने विविध आकार काढून भरण्यात येतो. ती रंगल्यावर त्या मेंदीवर संबंधित स्त्रीने परिधान केलेल्या वेषभूषेतील कलाकृती आणि रंग यांना अनुसरून खडे, कुंदन लावतात.
  • नखांची मेंदी : हात-पाय आकर्षक दिसण्यासाठी नखांना मेंदी लावण्यात येते. 
  • स्टिकर टॅटू : सध्याच्या काळात हातावर मेंदी काढण्यापेक्षा मेंदीच्या विविधरंगी कलाकृती असलेल्या स्टीकर टॅटूचा वापर केला जातो.
  • आता तर मेंदीने लग्न, मुंज, सण यासाठी स्त्रियांप्रमाणे पुरुषांमध्येही वर्चस्व सिद्ध केलेले आहे. मेंदी स्त्रीच्या सौंदर्याला चार चाँद लावते. नववधूचा शृंगार मेंदीशिवाय अपूर्णच. त्यामुळे तिच्या शृंगारासाठी व्यावसायिक मेंदी कलाकारांमार्फत मेंदी रेखाटली जाते. त्या रेखाटनामध्ये विविधता दिसते. उदा. हातावरील सनई, चौघडे, डोलीमधून वरात, वधू-वरांची नावे, संदेश इ. नववधूची मेंदी जितकी जास्त रंगते तितके तिच्या पतीचे प्रेम असते असे म्हटले जाते आणि म्हणूनच..

‘मेंदीच्या पानावर, मन अजून झुलते गं...’

संबंधित बातम्या