कारोनोत्तर करिअर दिशा

सुरेश  वांदिले
मंगळवार, 28 जुलै 2020

कोरोना संकटामुळे आपले काय होणार याची काळजी करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने विचार करण्याला फाटा दिला पाहिजे. कौशल्यवृद्धीसाठी मानसिकता तयार करायला पाहिजे. ज्यांच्याकडे कौशल्ये असतील त्यांना संधी लवकर मिळतील.

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सर्वत्र उलथापालथ झाली आहे. अर्थव्यवस्थेची गाडी रुळावरून घसरली आहे. सामाजिक व्यवस्थेसाठी नव्या व्याख्यांची निर्मिती केली जात आहे. शैक्षणिक व्यवस्था काहीशी भांबावलेली दिसते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा नजीकच्या काळात संपुष्टात येणार नाही, असे आता जगातील सर्वच डॉक्टरांनी सांगून टाकले आहे. ते सारेजण आता औषधे आणि लशी शोधण्याचा मागे लागले आहेत. प्रयोगांना गती आली आहे. तथापि, पुढील एक दीड वर्ष तरी यावर हमखास इलाज मिळेल, याविषयी कुणीही खात्री देत नाही. त्यामुळेच आता काही काळ थांबलेल्या आणि थबकलेल्या सर्वच व्यवस्था सुरू करणे भाग आहे. राज्यातही तशी प्रक्रिया सुरू झालीच आहे. मिशन बिगिन अगेन हे महाराष्ट्राचे अभियान राज्याची अर्थव्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि शैक्षणिक व्यवस्था, नव्या संकल्पना आणि नव्या शक्यतांसह (न्यू नॉर्मल) सुरू झाल्या आहेत. हळूहळू ते आपल्या अंगवळणीही पडू लागले आहे.

शैक्षणिक व्यवस्थेचा मुख्य आत्मा हे विद्यार्थी असल्याने त्यांची सुरक्षितता ही सर्वाधिक महत्त्वाची असल्याचे शासनाने ठरवले आहे. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष हे काहीसे अनिश्चिततेचे असले, तरी कोणत्याही ज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सामाजिक अंतर ठेवण्याचे सूत्र हे पुढील काही काळ पाळणे आवश्यक राहील, असे सध्याचे चिन्ह आहे. त्यामुळे वर्ग आणि शिकवण्या यावर काही बंधने येतील.

वेगळी संधी 
कोरोनाबरोबरच शैक्षणिक वर्ष, अशी मनाची तयारी करावी लागेल. मात्र विद्यार्थी आणि पालकांनी घाबरून जाण्याचे वा भीती बाळगण्याचे कारण नाही. मुले अधिकाधिक घरी राहतील, तेव्हा त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे पालकांना शक्य होईल. विशेषतः यंदा दहावी व बारावीत गेलेल्या वा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण अभ्यास करण्याची वेगळी संधी यामुळे मिळेल. पालकांनीसुद्धा ही बाब लक्षात घ्यायला हवी.

दहावी व बारावीनंतर करिअरच्या दिशा निश्चित व्हाव्यात असे प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना वाटत असते. विशेषतः बारावीनंतर वेगवेगळ्या ज्ञानशाखेत प्रवेश घेऊन विद्यार्थी त्यादृष्टीने पहिले पाऊल टाकतात. यापैकी फार तर दहा टक्के विद्यार्थ्यांना त्यांनी ठरवल्यानुसार मनाजोगते करिअरचे द्वार उघडले जाते. इतरांना पुढील प्रवास चाचपडतच करावा लागतो. अगदी चांगल्या संस्थेमधून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळाली, की चांगली नोकरी सहज आणि सुलभतेने मिळेल, अशी स्थिती कधीच इतिहास जमा झाली आहे.

सध्या स्पर्धा अत्यंत वाढली आहे. या स्पर्धेला तोंड दिल्याशिवाय पर्याय नाही. आयआयटी, एनआयटी किंवा आयआयएमसारख्या उच्च श्रेणीच्या शैक्षणिक संस्थांमध्येसुद्धा प्लेसमेंट प्रकियेच्यावेळी अंतर्गत स्पर्धेच्या दिव्यातून विद्यार्थ्यांना जावे लागते. यात ज्यांची कामगिरी चांगली, त्यांना चांगली कंपनी व चांगले पॅकेज मिळण्याची शक्यता अधिक. इतरांना मात्र मनाजोगती कंपनी किंवा पॅकेज मिळेलच असे ठामपणे सांगता येत नाही. या बाबी विद्यार्थी आणि पालकांनी दहावी किंवा बारावी किंवा पदवीच्या पहिल्या वर्षापासूनच ध्यानात घ्यायला हव्यात.

परीक्षेत मिळणारे गुण जितके महत्त्वाचे ठरतात, तितकीच इतर कौशल्येही महत्त्वाची ठरतात. ही कौशल्ये हस्तगत करण्यासाठीचा पदवीपर्यंतचा कालावधी सत्कार्णी लावायला हवा.

पुढील तयारीच्या दिशा
पदवी मिळाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. काही प्रमाणात वैद्यकीय शाखेतील अपवाद वगळता बहुतेक ज्ञान शाखेतील विद्यार्थी (१) सार्वजनिक, खासगी, ग्रामीण आणि सहकारी बँका, (२) रिझर्व्ह बँक, (३) एलआयसी, जीआयसी, नाबार्ड, (४) रेल्वे, पोस्ट, (५) लष्कर, (६) स्टाफ सिलेक्शन बोर्ड परीक्षा, (७) एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा, (८) संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा, (९) एमबीए अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा, (१०) परदेशातील एमएस व पीएचडी अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी जीआरई - ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन आणि परदेशातील व्यवस्थापन विषयक अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी जीमॅट - ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट, या परीक्षा देतात.

या परीक्षांमध्ये थोड्याफार प्रमाणात पुढील बाबींवर प्रश्न विचारले जातात - (१) इंग्रजी शब्दसंग्रह, व्याकरणावरील प्रभुत्व, इंग्रजी उताऱ्यावर आधारित प्रश्न, इत्यादी. (२) तार्किकरीत्या विश्लेषण करण्याची क्षमता, कार्यकारण भाव शोधण्याची क्षमता. (३) डेटा इंटरप्रिटेशन- दिलेल्या सांख्यिकी माहितीचा उपयोग करून उत्तरे शोधण्याची क्षमता, (४) काळ, काम, वेग, अंतर, नफा-तोटा, सरळव्याज, चक्रवाढ व्याज, दिशा यावर आधारित प्रश्न. (५) इंग्रजीतून विचार प्रकट करण्याचे कौशल्य (निबंध लेखन), (६) सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी.

या सर्व बाबींचा अभ्यास किंवा सराव एक महिन्यात वा काही दिवसांत शक्य नसतो. त्यामुळे पदवीनंतर बघू किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असताना बघू, असा विचार करणाऱ्यांच्या दारात अपयशाचे आगमन झालेच म्हणून समजा. 

उपरोक्त नमूद अभ्यासक्रम किंवा विषय घटक ढोबळमानाने दिला आहे. या अभ्यासक्रमाचा पाया मजबूत करण्याची संधी प्रत्येक विद्यार्थ्याला पाचवी ते दहावी किंवा बारावीपर्यंत मिळत असते. इंग्रजी आणि गणित या विषयाच्या मूलभूत संकल्पना, व्याख्या स्पष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षा कठीण जात नाहीत. इतरांची मात्र दरवर्षी विकेट उडत राहते. इंग्रजी आणि सर्वसामान्य गणिताविषयी कितीही नाके मुरडून उपयोग नाही, हे कटू असले तरी वास्तव स्वीकारणे गरजेचे आहे. या दोन्ही विषयांकडे दुर्लक्ष केले तरी चालेल, अशी समजूत करणे किंवा जेव्हा कधी परीक्षा देण्याची वेळ येईल तेव्हा बघू अशी मनोवृत्ती ठेवणे, या दोन्ही बाबी घातक ठरतात.

आत्तापासून तयारी
त्यामुळेच पदवी अभ्यासक्रमापर्यंतच्या कालावधित उपरोक्त नमूद विषय घटकांचा अभ्यास सतत करत राहणे गरजेचे आहे. ही सवय आत्तापासून अंगी बाणायला हवी. पुढील चार ते पाच वर्षांनंतर ज्यांना चांगले करिअर घडवायचे आहे, त्यांच्यासाठी या बाबी अत्यावश्यक ठरणार आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये जेव्हा प्लेसमेंटसाठी परीक्षा किंवा ॲप्ट्यिूट्यूड टेस्ट घेतली जाते, तेव्हाही बहुतेक अशाच पद्धतीच्या, फक्त थोडी अधिक काठिण्य पातळी असलेल्या प्रश्नांचा सामना करावा लागतो.

राष्ट्रीय संस्थांमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या परीक्षांचाही हाच पॅटर्न (पद्धती) असतो. परदेशातील आणि त्यातही अमेरिकेतील सर्वोच्च २०० क्रमांकाच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवायचा असेल, तर जीआरई परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवावे लागतात. त्या परीक्षेचा पाया अशाच पद्धतीच्या मात्र अधिक काठिण्य पातळीच्या प्रश्नांवर आधारित असतो.

चौफेर ज्ञानार्जन
यंदा कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान चौफेर वाढवण्यासाठी विविध नियतकालिके, वेगवेगळ्या विषयांच्या समग्र विश्‍लेषणावर भर देणारी ‘सकाळ’सारखी वृत्तपत्रे वाचण्याची सवय अंगी बाणवायला हवी. केवळ मनोरंजनासाठी डिजिटल साधनांचा वापर न करता, आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या व कौशल्य शिकवणाऱ्या चित्रफिती (यूट्युब) बघणे, टेड टॉक ऐकणे, उपयुक्त माहितीचा साठा करून ठेवणे या बाबी अंगी बाणवाव्या लागतील. यासाठी पालक आणि शिक्षकांनी या काळात विद्यार्थ्यांची मनोभूमिका तयार करायला हवी.

नवी संधी
नॅशनल स्किल डेव्हलपमेंटचे कार्यकारी अधिकारी मनिश कुमार यांनी पुढील क्षेत्रांसाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची सर्वाधिक गरज भासेल याकडे लक्ष वेधले आहे.

१)    आरोग्य सुविधा ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाची भीती लोकांच्या मनात बसली असल्याने अधिकाधिक ऑनलाइन व्यवहार करण्याकडे त्यांचा कल दिसून येत आहे. विशेषतः या काळात औषधांची खरेदी मोठ्या प्रमाणावर डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे झाल्याचे डिजीप्रेक्स या आरोग्यविषयक सुविधा/औषधे/साहित्य ऑनलाइन पुरवणाऱ्या संस्थेने काढला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन घोषित झाल्यानंतर या प्लॅटफॉर्मवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत १०० टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आले. ट्रुमेड्स या अशाच पद्धतीच्या प्लॅटफॉर्मवरच्या विक्रीत ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. देशात सध्या अंदाजे ५० कोटींहून अधिक स्मार्टफोनधारक आहेत. ६५ कोटीहून अधिक मोबाइल्स हे ब्रॉडबँडनी जोडले गेले आहेत. त्यामुळे भविष्यात औषधांची अधिकाधिक विक्री ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून होण्याची चिन्हे आहेत. देशात सध्या अशा प्रकारे ऑनलाइन विक्री करणारे १९४ स्टार्टअप्स कार्यरत असल्याचे ट्रॅक्सन या कंपनीने निदर्शनास आणले आहे. ही कंपनी अशा स्टार्टअप कंपन्यांच्या वित्तीय आणि गुंतवणूकविषयक बाबींवर लक्ष ठेवून असते किंवा मागोवा घेत असते. गेल्या वर्षी भारतातील ऑनलाइन औषध विक्रीची उलाढाल ३६० मिलियन डॉलर्सपर्यंत पोचली. २०२३ पर्यंत यामध्ये १० बिलियन डॉलर्सची वाढ होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

    रुग्णालय प्रशासन, औषधनिर्मिती, वैद्यकीय पर्यटन (मेडिकल टुरिझम), टेलिमेडिसीन या क्षेत्रांमधील तज्ज्ञांची गरज वाढणार आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये देशातील आरोग्य क्षेत्राचा विस्तार आणि विकास करण्याचे तत्त्व समाविष्ट आहे. यापुढील काळात आरोग्य क्षेत्रावरील शासनाचा खर्च वाढता राहील. डिजिटल आरोग्य सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणावर होईल. विविध चाचण्या - औषधे - आरोग्य पत्रिका (हेल्थ कार्ड्स) - टेलिमेडिसीन अशी मोठी साखळी डिजिटल हेल्थ प्रणालीचा भाग होईल. शासनाचा पा‍ठिंबा असल्याने या क्षेत्राला गती मिळेल. त्यामुळे या क्षेत्रासाठी मनुष्यबळाची अधिक गरज भासेल.

२)    सायबर सिक्युरिटी ः कोरोना काळात अमेरिकेत नेटबँकिंग व्यवहारात २०० पटीने वाढ झाल्याचे सॉफ्टबँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अलोक सामा यांनी निदर्शनास आणले आहे. भारतावर सायबर हल्ला करण्यासाठी चिनी हॅकर्स covid2019@gov.in / ncov2019.gov.in या ईमेलचा वापर करत असल्याने त्यापासून सावधानता बाळगण्याचे महाराष्ट्र सायबर विभागाने जून महिन्यात निदर्शनास आणले असून सावधगिरीचा इशारा दिला आहे. चिनी हॅकर्सव्दारे २० लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सायबर विभागाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे सायबर सुरक्षेची गरज वाढली आहे.

    प्रत्येक उद्योगाचा अधिकाधिक ओढा डिजिटल पद्धतीने काम करण्याकडे राहील. डिजिटल युग सध्या अवतरलेच आहे. पण पुढील काळात या युगाचे नवे रूपांतरण होईल. त्यामुळे या युगाच्या सुरक्षिततेकडे अधिकाधिक लक्ष पुरवावे लागेल. तरच या व्यवहारास गती आणि त्यातून अधिक नफा मिळणे शक्य होईल. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचा पाठलाग करून त्यांचा छडा लावणारे तज्ज्ञ किंवा असे गुन्हे घडूच नयेत यासाठी दक्ष असणारे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागेल. 

३) ई-कॉमर्स ः कोरोना काळात ऑनलाइन खरेदी म्हणजेच ई-कॉमर्सला मोठीच चालना मिळाली. हिंदुस्थान लिव्हर, आयटीसी, पार्ले प्रॉडक्ट्स, एलजी, व्हीवो गोदरेज यांसारख्या कंपन्यांचा दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचा खप या कालावधीत दुप्पट झाला.

    पुढच्या काळात या क्षेत्राची अधिक झपाट्याने वाढ होईल. नागरिकांना प्रत्येक वस्तू/सेवा घरपोच कशी पोचवता येईल याकडे कंपन्या आणि उद्योग व्यूहरचना करतील. प्रत्येक बाब ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाईल. इंटरनेटचा प्रसार आणि वाढता वेग यामुळे या क्षेत्राचा विस्तार स्तिमित करणारा राहू शकेल. 

४)    आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग ः या तंत्र कौशल्यात प्रावीण्य मिळवणारे उमेदवार, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि रोबोटिक्स यांच्या बरोबरीने उत्कृष्ट संधी हस्तगत करू शकतात.

५)    बिझनेस ॲनालिटिक्स ः व्यवसाय वृद्धीसाठी विविध धोरणे ठरवावी लागतात. अचूक निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठीची पूर्व तयारी बिझनेस ॲनालिटिक्स या विषयातील तज्ज्ञ करू शकतात. कंपनी वा उद्योगांकडे येणारा, गोळा होणारा आणि इतरत्र पाठवला जाणारा डेटा किंवा माहितीचा साठा यावर लक्ष ठेवणे, त्याचे सतत विश्लेषण करणे, त्यातील कंपनीच्या हिताच्या बाबी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देणे, या विश्लेषणाद्वारे कंपनीच्या उत्पादकता वाढीसाठी आवश्यक असणारे प्रारूप किंवा आराखडा (मॉडेल) तयार करण्याचे सूत्र सुचवणे या बाबीसाठी हे तज्ज्ञ सहाय्यभूत ठरतात.

६)     क्लाऊड कॉम्‍प्युटिंग तज्ज्ञ ः यापुढील काळात बहुतेक सर्व व्यावसायिक संस्था आणि उद्योग हे क्लाऊड कॉम्प्युटिंगकडे वळण्याची दाट शक्यता आहे. हे तंत्रज्ञान वापरायला सहज-सुलभ, परवडणारे आणि प्रत्येकाची गरज आणि आवश्यकतेनुसार संरचित करता येणारे आहे. क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उद्दिष्ट्ये साध्य करण्याकडे कंपन्यांचा कल राहील. संसाधनाच्या वापराचे संनियंत्रण सुलभ करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होईल. संस्थात्मक प्रत्येक बाबी व प्रक्रियेकडे प्रभावीरीत्या लक्ष पुरवण्यासाठी या तंत्राचा वापर होईल. विक्री आणि विपणन प्रक्रियेतही महत्त्वाची भूमिका हे तंत्र बजावेल. 

७)    कंटेट डेव्हलपर/कंटेट क्रिएटर्स/व्हिडिओ एडिटर्स आणि ऑपरेटर ः यापुढील काळात सर्व मनोरंजन वाहिन्या आणि स्टुडिओ यांचा भर, थेट ग्राहकांकडे (डायरेक्ट टू कंझ्युमर) जाण्याचा भर राहील. त्यासाठी विविध आशय/विषय/प्रकार/पद्धतीचे कार्यक्रम तयार केले जातील. त्या अनुषंगाने व्हिडिओ, संगीत, गेमिंग कार्यक्रम यांची निर्मिती केली जाईल. यासाठी फाइव्ह-जी या तंत्राचे साहाय्य घेतले जाईल. लाइव्ह स्ट्रीमिंग म्हणजेच ग्राहकापर्यंत थेट कार्यक्रम पोचवणाऱ्या उद्योगाची मोठी वाढ पुढील काळात अपेक्षित आहे. या वाढीच्या गरजा भागवणाऱ्या तंत्रकुशल मनुष्यबळाची गरज भासेल.  

८)     सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ः पुढच्या काळात अनेक कंपन्यांची कामे डिजिटल स्वरूपाची होतील. हा प्रवाह किंवा ट्रेंड भविष्यातही तसाच राहू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या डिजिटल कामांसाठी आवश्यक असणारे सॉफ्टवेअर विकसित करण्याचे कौशल्य आणि तंत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांची अधिकाधिक गरज भासू शकते.

९)    ॲप डेव्हलपमेंट/डिझाइन ः कंपन्यांच्या विविध कामांसाठी आवश्यक असणारे ॲप विकसित करणे, त्यांचे डिझाइन करणे, मोबाइल ॲपसाठी कंटेट म्हणजेच आशय निर्मिती करण्याची क्षमता, कौशल्य आणि तंत्र हस्तगत केलेल्या उमेदवारांना अधिकाधिक रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतात.

१०)    डेटा सायंटिस्ट ः कंपन्यांकडे असणाऱ्या माहितीच्या साठ्याचे अचूक विश्लेषण करून कंपनीच्या हितासाठी आणि अधिक उत्पादकतेसाठी नेमके काय करायला हवे, याविषयी भाकीत करू शकणाऱ्या डेटा सायंटिस्ट किंवा माहिती विश्लेषकांना यापुढील काळात मोठी मागणी राहू शकते.

११)    ऑनलाइन शिक्षण ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीमुळे सामाजिक अंतर ठेवूनच पुढील काही महिने अथवा वर्षे शैक्षणिक संस्थांना कार्य करावे लागेल. त्यामुळे शैक्षणिक संस्थांचा कल ऑनलाइन अध्ययन/अध्यापन प्लॅटफार्म विकसित करण्याकडे राहील. नर्सरी शिक्षणापासून ते उच्चशिक्षणापर्यंत डिजिटल शिक्षणाचा विस्तार होईल. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची सोय आणि सुविधा महत्त्वाची ठरेल. शिक्षण शुल्कात कपात होऊ शकेल. त्यामुळे अधिकाधिक मुलांना शिक्षण घेण्याची सुविधा प्राप्त होऊ शकेल. त्यामुळे डिजिटल शैक्षणिक साधने, तंत्र आणि सुविधांचा प्रभावीरीत्या वापर करू शकणारे मनुष्यबळसुद्धा लागेल. 

१२)    विमा क्षेत्र/फायनान्शिअल ॲडव्हायझर्स/ब्रोकर्स ः कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जीवनाची अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांचा ओढा स्वतःला संरक्षित (आरोग्य/निवृत्ती/घर/दिवाळखोरी/कुटुंब) करून घेण्याकडे राहील. त्यामुळे विमा कंपन्या या आक्रमकरीत्या नागरिकांना विविध विमा योजनांकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करतील. 

१३)    रोबोटिक्स ः स्वयंचलन किंवा ऑटोमेशनकडे अधिकाधिक लक्ष पुरवले जाईल. ज्या क्षेत्रात आतापावेतो राबोंचा किंवा या तंत्राचा वापर केला जात नव्हता, त्या क्षेत्रातही याचा वापर केला जाईल. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी रोबाचे साहाय्य घेण्यात आले. मोठी सयंत्रे, सुरक्षा, ड्रोनचा वापर अशा विविध क्षेत्रात हे तंत्र वापरले जाईल. त्यामुळे या क्षेत्रातील तंत्रज्ञ आणि मनुष्यबळास रोजगाराच्या संधी मिळू शकतील. 

इतर क्षेत्रे ः (१४) कोविड मार्शल (१५) सॅनिटेशन मॅनेजर (१६) टेलिमेडिसीन ऑपरेटर (१७) जनरल ड्युटी असिस्टंट्स टू ऑफिस प्रिमायसेस, (१८) मास्क निर्मिती, (१९) विशेषतः वृद्धांसाठी केअर टेकर किंवा केअर गिव्हर, (२०) ई-वर्क फोर्स मॅनेजमेंट, (२१) कस्टमर सर्व्हिस, (२२) वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे कोचिंग आणि काउन्सेलिंग यासारख्या सेवा ऑनलाइन देण्यात ज्या व्यक्ती तज्ज्ञता प्राप्त करतील वा कौशल्य प्राप्त करतील, त्यांना रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराच्या संधीही मिळू शकतात.

शिकाल तर टिकाल
करिअरच्या संधीमध्ये किती आणि कसा फरक पडेल हे जरी आता ठामपणे सांगता येत नसले, तरी ज्या उमेदवारांकडे विविध प्रकारच्या व्यामिश्र (कॉम्प्लेक्स) समस्या सोडवण्याची क्षमता, नेतृत्वगुण, उत्तम संवाद कौशल्य आणि सध्याच्या काळातील विविध प्रकारची डिजिटल कौशल्ये असतील, त्यांना संधी मिळणे कठीण जाणार नाही. उलट अशा कौशल्य प्राप्त उमेदवारांकडे अधिकाधिक महत्त्वाच्या जबाबदाऱ्यासुद्धा टाकल्या जातील याकडे रामास्वामी यांनी लक्ष वेधले आहे.

तेव्हा, कोरोना संकटामुळे आपले काय होणार याची काळजी करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने विचार करण्याला फाटा दिला पाहिजे. कौशल्य वृद्धीसाठी मानसिकता तयार करायला पाहिजे. उपरोक्त नमूद कौशल्यासाठी प्रचंड बुद्धिमत्ताच पाहिजे अशातला भाग नाही. सतत सराव आणि अभ्यासानेसुद्धा ही कौशल्ये आत्मसात करता येतात. काही कौशल्ये ऑनलाइन शिक्षण प्रणालीद्वारे घरी बसल्या बसल्या प्राप्त करता येतात. सध्या तर काही कंपन्यांनी असे प्रशिक्षण मोफत देणे सुरू केले आहे. भविष्यात शुल्क लावले तरी फार असणार नाही. जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांना वेळ मिळेल, तेव्हा तेव्हा त्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा उपयोग केवळ नवे चित्रपट, संगीत अल्बम, गेम्स किंवा मालिका पाहण्यापुरता मर्यादित न ठेवता, किमान पन्नास टक्के वा त्याहून अधिक वेळ हा ऑनलाइन प्रशिक्षणासाठी द्यायला हवा.

रोजगार/स्वयंरोजगार क्षेत्रातील बदल
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णपणे जाणार नसल्याने रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडतील, याकडे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनिश कुमार यांनी पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्याच विषयात प्रावीण्य मिळवून चालणारे नाही, तर त्याला विविध प्रकारची कौशल्ये प्राप्त करावी लागतील. या कौशल्याचे सतत उन्नतीकरण म्हणजेच अपग्रेडेशन करावे लागेल, तरच यापुढील काळात विद्यार्थी रोजगारक्षम होईल आणि आणि त्याला स्वतःचा रोजगार टिकवून ठेवता येणे शक्य होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. पुढील काळात प्रत्यक्ष समोरासमोर बसून होणारे व्यवसाय वा रोजगार कमी होतील, पण डिजिटल प्लॅटफॉर्म्सना अधिकाधिक प्राधान्य देणाऱ्या नव्या संधी निर्माण होतील, या बाबीकडे केपीएमजीच्या भारतातील शिक्षण आणि कौशल्य विकास विभागाचे प्रमुख नारायण रामस्वामी यांनी लक्ष वेधले आहे.

इंग्रजीवर प्रभुत्व
सध्याच्या काळात आणि पुढच्याही काळात इंग्रजीतून उत्तम संभाषण करता येणे ही कला ज्यास साध्य करता येईल, त्याला एमबीए प्रवेश परीक्षेतील मुलाखती, समूह चर्चा आणि प्लेसमेंटच्यावेळी होणाऱ्या मुलाखती आणि समूह चर्चांमध्ये उत्तम गुण मिळणे सुलभ जाईल. अभियंत्यांना प्लेसमेंटच्यावेळी मुलाखतकर्त्यावर प्रभाव टाकता येईल. बँकांच्या परीक्षांमध्ये मुलाखतीच्यावेळी विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य/संभाषण कौशल्य जोखले जाते. शासकीय सेवेतसुद्धा ज्यांचे इंग्रजी लेखन व मौखिक कौशल्य प्रभावी असते, ते इतरांपेक्षा चार पावले समोर असतात, हे कटू सत्य स्वीकारणे भाग आहे.

मौखिक आणि लेखन कौशल्य ही शस्त्रे कायम तळपती राहतील याची खात्री आत्तापासूनच घेतली, तर विद्यार्थ्यांना क्वचितच अपयशाचा सामना करावा लागतो.

संगणकीय सादरीकरण कौशल्य म्हणजेच प्रेझेंटेशन स्कील्स, एक्सेल शीटमध्ये गतीने आणि प्रभावीरीत्या कार्य करण्यात मिळवलेली तज्ज्ञता, वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्यासाठी मिळवलेली तज्ज्ञता या बाबीही अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या आहेत.

संबंधित बातम्या