जैवतंत्रज्ञानाचे महत्त्व

सुरेश  वांदिले
मंगळवार, 28 जुलै 2020

कव्हर स्टोरी

जैवतंत्रज्ञान हा आधीपासूनच महत्त्वाचा विषय आहे. पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे त्याचे महत्त्व आणखी अधोरेखित झाले. जीवसृष्टीच्या संवर्धनासाठी जैवतंत्रज्ञान विषयाचा अभ्यास महत्त्वाचा ठरत आलाय. कृत्रिम जिवाची निर्मिती, स्टेमसेल (स्कंध कोशिका) संशोधन, जनुकांचे नकाशे या सर्व क्षेत्रात जैवतंत्रज्ञान आणि जैव-माहितीशास्त्र (बायोइन्फर्मेटिक्स) या ज्ञानशाखा महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आरोग्य, कृषी आणि पर्यावरणाशी संबंधित विविध उत्पादनांची निर्मिती या दोन शाखांमधील प्रगती आणि संशोधनामुळे होऊ शकली. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फर्मेटिक्स अँड बायोटेक्नॉलॉजी या संस्थेच्यावतीने पाच वर्षे कालावधीचा एम.एस्सी. इन बायोटेक्नॉलॉजी आणि सहा वर्षे कालावधीचा एम.टेक. इन बायोटेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. हा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम जैवतंत्रज्ञान उद्योगातील तज्ज्ञांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. या क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन अभ्यासक्रमात त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाते. जैवतंत्रज्ञान हा मोठ्या प्रमाणावर आंतरज्ञानशाखीय विषय असल्याने या अभ्यासक्रमात मूलभूत विज्ञानाबरोबर ॲप्लाइड किंवा उपयोजित विज्ञान घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या बहुआयामी क्षेत्रातील आव्हाने स्वीकारण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना प्राप्त होते. 

पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमात विविध संशोधन प्रकल्प, संशोधन निबंध/अहवाल आणि औद्योगिक घटक अथवा शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशिक्षण यावर भर देण्यात येतो. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सहाव्या वर्षात शिक्षण पुढे सुरू ठेवण्याची संधी दिली जाते. यामुळे या विद्यार्थ्यांना एम.टेक.ची पदवी मिळू शकते. सहाव्या वर्षात विद्यार्थ्यांना औद्योगिक संशोधन प्रकल्पावर अधिक काम करावे लागते. 

प्रवेश प्रकिया ः प्रत्येक बॅचला दरवर्षी प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन चाळणी परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा पुणे विद्यापीठाच्या परिसरात घेतली जाते. या चाळणी परीक्षेचा पेपर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो. या परीक्षेमध्ये दोन भाग असतात. सेक्शन एकमध्ये इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि कलचाचणी यावर २० गुणांचे प्रश्‍न विचारले जातात. सेक्शन दोनमध्ये एकूण प्रश्‍नांची संख्या ८० असते. त्याची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यात येते - गणित - १० टक्के, भौतिकशास्त्र - २५ टक्के, रसायनशास्त्र - २५ टक्के, जीवशास्त्र - ४० टक्के, असे प्रश्‍न विचारले जातात. संपर्क ः इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फर्मेटिक्स अँड बायोटेक्नॉलॉजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड रोड, पुणे- ४११००७, दूरध्वनी ः ०२०-२५६९१३३३, संकेतस्थळ ः http://www.unipune.ac.in/snc/institute_of_bioinformatics_and_biotechnology, ईमेल ः directoribb@unipune.ac.in

एम.एस्सी. इन व्हायरॉलॉजी ः या संस्थेत विषाणूशास्त्राशी संबंधित हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता येतो. सध्याच्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या विषाणूंचा अभ्यास आणि संशोधनाला प्राधान्य मिळू शकते. त्या अनुषंगाने हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. हा अभ्यासक्रम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. संस्थेच्या पुण्यातील पाषाण येथे असणाऱ्या कॅम्पसमध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जातो.

इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड बायोइन्फर्मेटिक्स 
या संस्थेमार्फत, एम.टेक. इन बायोटेक्नॉलॉजी आणि बायोइन्फर्मेटिक्स हा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे आहे. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना बायोटेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटेशनल बायोलॉजी/बायोइन्फर्मेटिक्स या विषयांमध्ये तज्ज्ञता प्राप्त होते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेण्यात येते. संपर्क - बायोटेक पार्क, इलेक्ट्रॉनिक्स सिटी फेज वन, बंगळूर - ५६०१००,  
दूरध्वनी ः ०८०-२८५२८९००, फॅक्स  ः २८५३८९०४, 
संकेतस्थळ ः https://www.ibab.ac.in/
डी. वाय. पाटील विद्यापीठ

या संस्थने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

(१) बी.टेक. इन बायोटेक्नॉलॉजी - या अभ्यासक्रमात जैवतंत्रज्ञान उद्योगाशी निगडित विविध कायदेशीर पैलूंची ओळख करून दिली जाते. या क्षेत्रातील तंत्र आणि साहित्य यांची गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठीचे कौशल्य शिकवले जाते. लेखन आणि मौखिक संवाद कौशल्याचे तंत्र शिकवले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा चतुरस्र विकास होतो. अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षे आहे.

(२) बी.टेक. इन बायोइन्फर्मेटिक्स - संगणकीय तंत्राचा वापर करून जैविक माहितीचे विश्‍लेषण, प्रकिया, व्यवस्थापन, साठवणूक आणि पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी जैवमाहितीशास्त्र ही ज्ञानशाखा कार्यरत असते. वैविध्यपूर्ण व मोठ्या प्रमाणावरील जैविक माहितीच्या साठ्याचे अचूक महत्त्व समजून घेण्यासाठी या ज्ञानशाखेत गणित, जीवशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान या शाखांचा एकत्रितरीत्या वापर केला जातो. औषधनिर्माण शास्त्र आणि विविध जैवतंत्रज्ञान क्षेत्रात बायोइन्फर्मेटिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. नव्या औषधांचा शोध आणि विकासासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. 

जागतिक पातळीवर या तंत्रज्ञानामधील औद्योगिक उलाढाल ही १० ते १२ बिलियन डॉलर्स असल्याचे, या क्षेत्रातील तज्ज्ञांचे सांगणे आहे. शासनाचे सहकार्य, विविध औषधांचा शोध, संशोधन आणि विकासामध्ये बायोइन्फर्मेटिक्सचा वाढलेला वापर यामुळे या क्षेत्राची झपाट्याने वाढ होत आहे. या अभ्यासक्रमात संगणकीय शास्त्र आणि जैविकशास्त्र या आंतरज्ञानशाखांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. औद्योगिक जगताच्या समस्या गतीने सोडवण्यासाठीचे तंत्र आणि कौशल्य विकसित करण्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते.

वैद्यकीय माहितीच्या साठ्याचा वापर आरोग्यविषयक सुविधांच्या निर्मितीसाठी केला जातो. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी हे माहितीच्या साठ्याचे विश्‍लेषण (डेटा सायन्स ॲनॅलिसिस) करण्यात तज्ज्ञता प्राप्त करतात. कालावधी चार वर्षे आहे.

(३) इंटिग्रेटेड एम.टेक. इन बायोटेक्नॉलॉजी - या अभ्यासक्रमामध्ये सैद्धांतिक ज्ञान आणि प्रात्यक्षिकांचा योग्य संगम साधण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि संवाद कौशल्य हस्तगत करणे सोपे जाते. याचा फायदा त्यांना रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी होतो. जैवतंत्रज्ञान घटकातील गरजा लक्षात घेऊन संशोधन आणि प्रकल्पकार्यास महत्त्व दिले जाते. नावीन्यपूर्ण विचारांना चालना मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. या क्षेत्रातील नवे संशोधन आणि तंत्रज्ञानाचे विश्‍लेषण करण्याची वैचारिक क्षमता विकसित केली जाते. वाणिज्यक वापरासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्य शिकवले जाते. जैवतंत्रज्ञानाशी संबंधित काही संवेदनशील नैतिक बाबींची ओळख करून दिली जाते. कालावधी पाच वर्षे आहे. 

(४) बी.टेक. इन फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी 
उपरोक्त नमूद चारही अभ्यासक्रमांची पात्रता - विद्यार्थ्यांना बारावी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि इंग्रजी या विषयात सरासरीने ५० टक्के गुण मिळायला हवेत. या विद्यार्थ्याने बारावीमध्ये गणित अथवा जीवशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यामध्येही त्याला किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय चाळणी प्रवेश परीक्षेतील गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातात. मात्र ज्या विद्यार्थ्यांना हे शक्य नसेल त्यांना संस्थेची चाळणी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.
संपर्क ः डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड बायोइन्फर्मेटिक्स, ५, सेक्टर १५, प्लॉट नंबर ५०, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई- ४००६१४, दूरध्वनी ः ०२२-२७५६७९४९, संकेतस्थळ ः dypatil.edu, ईमेल ः biosciences@dypatil.edu

प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी - 
या संस्थेने बी.एस्सी.-एम.एस्सी. इन मेडिकल बायोटेक्नॉलॉजी हा पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केला आहे. बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. बारावी विज्ञान शाखेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जातो. 
संपर्क ः लोणी- ४१३७३६, तालुका - रहाता, जि.- अहमदनगर, दूरध्वनी ः ०२४२२-२७१३४०, फॅक्स  ः २७३४१३, ईमेल ः biotechonlogy@pmtpims.org, संकेतस्थळ ः https://www.pravara.com/

तीन वर्षांनंतर विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमाच्या बाहेर पडण्याची मुभा आहे. अशा विद्यार्थ्यांना बी.एस्सी. इन मेडिकल बायोटेक्नॉलॉजी ही पदवी प्रदान केली जाते. 

संशोधनाची संधी
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या ‍डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत जैवतंत्रज्ञान या विषयात संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप ही योजना राबविण्यात येते.
पात्रता ः (१) एम.एस्सी./एम.टेक./एम.व्हीएस्सी. किंवा (२) इंटिग्रेटेड बी.एस.-एम.एस. (बॅचलर ऑफ सायन्स-मास्टर ऑफ सायन्स)/बी.ई./बायोटेक्नॉलॉजीच्या कोणत्याही शाखेतील बी.टेक./एम.एस्सी./एम.टेक. इन बायोइन्फर्मेटिक्स/कॉम्प्युटेशनल बायोलॉजी, एम.एस्सी. इन लाइफ सायन्स/बायोसायन्स/झूऑलॉजी/बॉटनी/ बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/बायोफिजिक्स. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ६० गुण व राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यासाठी कमाल वयोमर्यादा २८ वर्षे तर राखीव संवर्गातील विद्यार्थ्यासाठी कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे आहे.

ही फेलोशिप मिळालेले विद्यार्थी दोन वर्षांनंतर देशातील कोणत्याही विद्यापीठात पीएचडीसाठी नोंदणी करू शकतात. 

या फेलोशिपच्या निवडीसाठी संगणकाधारित बायोटेक्नॉलॉजी एलिजिब्लिटी टेस्ट घेतली जाते. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे ही परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. 
संपर्क ः संकेतस्थळ ः https://rcb.res.in/BET2020

बिग डेटा बायोलॉजी
जैविक आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या सांख्यिकी माहितीवर विश्‍लेषण करण्यासाठी डेटा सायंटिस्ट आणि डेटा इंजिनिअर्स या मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. ही गरज लक्षात घेऊन इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फर्मेटिक्स अँड ॲप्लाइड बायोटेक्नॉलॉजी या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिग डेटा बायोलॉजी हा अभिनव अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम बंगळूरस्थित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी या संस्थेने अर्थसाहाय्य केले आहे.

जैविक शास्त्रात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर विविध विषय घटकांमध्ये अभ्यास आणि संशोधन होत आहे. यामुळे अवाढव्य असा माहितीचा साठा निर्माण झाला आहे. त्यामुळे या माहितीच्या साठ्यातून योग्य माहिती आणि आकडेवारी योग्य त्या कार्यासाठी आणि वेळेवर उपलब्ध करून घेणे, त्याचे विश्‍लेषण करणे हे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे. 

बिग डेटा ॲनॅलिसिस या नव्या तंत्रामुळे औषधनिर्माण आणि आरोग्य सेवांवर महत्त्वाचा परिणाम झाला आहे. क्लाऊड कॉम्‍प्युटिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सचा उपयोग करून जैविक संशोधन व आरोग्य विषयक संशोधन अधिक प्रभावी व अचूकरीत्या होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हा अभ्यासक्रम आंतरशाखीय अभ्यासक्रम असून तो आरोग्य क्षेत्रातील प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या माहितीच्या साठ्याचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी आणि विश्‍लेषण करण्यासाठी कौशल्य आणि तंत्र प्रदान करणारा आहे.

काय शिकाल?
या अभ्यासक्रमात संगणकीय, सांख्यिकी आणि अभियांत्रिकी विषय घटकांचा समन्वय साधण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची संरचना ही या क्षेत्रातील सध्या कार्यरत असणाऱ्या उद्योजकीय तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. 

या क्षेत्रातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन संशोधन प्रकल्प कार्य करावे लागते. अभ्यासक्रमात जैविक माहितीसाठ्याचा अभ्यास आणि विश्‍लेषण करता येण्यासाठी मशिन लर्निंगचा विकास, प्रतिमांची प्रक्रिया आणि क्लिनिकल डेटा ॲनॅलिसिस यांचा ठळकपणे समावेश करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना १०० टक्के प्लेसमेंट मिळाली आहे. 
संपर्क ः बायोटेक पार्क, इलेक्ट्रॉनिक्स सिटी फेज वन, बंगळूर - ५६०१००, दूरध्वनी ः ०८०-२८५२८९००, फॅक्स  ः २८५३८९०४, संकेतस्थळ ः https://www.ibab.ac.in/

स्कूल ऑफ बायोसायन्स 
अपिजे सत्या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या स्कूल ऑफ बायोसायन्सची स्थापना जैवतंत्रज्ञान उद्योगाच्या गरजा आणि आवश्‍यकता लक्षात घेऊन करण्यात आली. यासाठी मार्टिन अँड हॅरिस प्रायव्हेट लिमिटेड, वॉल्टर बुशनेल हेल्थ केअर फाउंडेशन आणि एसजी बायोकेम या संस्थांचे सहकार्य घेण्यात आले. या स्कूलमार्फत पुढील अभ्यासक्रम चालविले जातात.

(१) इंटिग्रेटेड बी.टेक. अँड एम.टेक. इन बायोटेक्नॉलॉजी - हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. (२) बी.टेक. इन बायोटेक्नॉलॉजी, (३) बी.एस्सी. इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, (४)  एम.एस्सी. इन बायोटेक्नॉलॉजी,(५) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च अँड डेटा मॅनेजमेंट, (६) एम.एस्सी. इन क्लिनिकल रिसर्च, (७) पीएचडी इन बायोटेक्नॉलॉजी/बायोमेडिकल सायन्सेस/बायोइन्फर्मेटिक्स

करिअर संधी ः हे अभ्यासक्रम केल्यावर हेल्थ केअर इंडस्ट्री, न्यूट्रिशन अँड पब्लिक हेल्थ, ड्रग डिझायनिंग, बायोइन्फर्मेटिक्स, रिसर्च सायंटिस्ट, ॲनॅलिटिक्स अँड फॉरेन्सिस्ट, फार्मास्युटिक्स, बायोमेडिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रांमध्ये करिअर संधी मिळू शकतात.

प्रशिक्षण आणि प्लेसमेंट- 
हे अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलग दोन वेळा इंटर्नशीपची सुविधा मिळवून दिली जाते. संस्थेच्या प्लेसमेंटसेलद्वारे सर्व विद्यार्थ्यांना नामवंत बायोटेक कंपन्या, हेल्थ केअर उद्योग आणि संस्था यामध्ये प्लेसमेंट मिळावी यासाठी साहाय्य केले जाते. आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप मिळावी यासाठीही प्रयत्न केले जातात. देशातील नामवंत जैवतंत्रज्ञान उद्योग आणि कंपन्यांमध्ये संशोधनात्मक कार्य करण्याची संधी मिळवून दिली जाते. यामध्ये वेन्ता बायोसायन्स लिमिटेड, एशियन हॉस्पिटल, फॉर्टिस हेल्थ केअर, एसआरएल डायग्नोस्टिक्स, विप्रो, फिफझर, बीडी डायग्नोस्टिक्स, क्वेस्ट डायग्नोस्टिक्स, ॲबॉट हेल्थ केअर, मेदांता द मेडसिटी, मॅक्स हेल्थ केअर, एक्सेल लाइफ सायन्स, अर्न्स्ट अँड यंग, टिच फॉर इंडिया, बायोइनावॅट रिसर्च सर्व्हिस, मायलॅन, सन फार्मा, सेंटिस्स फार्मा, अमेरिकन एक्सप्रेस, डॉ. लाल पॅथ लॅब, राजीव गांधी कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर, नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी, इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल ब्यूरो ऑफ प्लँट जेनेटिक रिसोर्सेस, रिटपिडीआ, कॅपिटल फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रेमॅस बायोटेक, धर्मशीला कॅन्सर हॉस्पिटल, झायडस, डाबर, अपोलो हॉस्पिटल्स, रेलिगेअर, बायोडिझाइन स्कूल इत्यादींचा समावेश आहे.
संपर्क ः अपिजे सत्या युनिव्हर्सिटी, सोहना-पालवल रोड, सोना - १२२१०३, गुरुग्राम, हरयाणा, 
संकेतस्थळ ः https://university.apeejay.edu/

बायोस्टॅटिस्टिक्स आणि बायोइन्फर्मेटिक्समधील संशोधन
द इन्स्टिट्यूशन ऑफ रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी या संस्थेस इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा भारत सरकारने प्रदान केला आहे. जैवतंत्रज्ञान या विषयाशी संबंधित विविध पैलूंवर जागतिक दर्जाचे संशोधन कार्य करता यावे यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या अनुषंगाने संस्थेमार्फत बायोस्टॅटिस्टिक्स आणि बायोइन्फर्मेटिक्स या विषयातील पीएचडी अभ्यासक्रमासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी ग्लॅस्कोस्मिथ के-लाइन या जागतिक स्तरावरील मोठ्या औषध निर्माण कंपनीचे साहाय्य घेण्यात आले आहे. 
पात्रता ः (१) पीएच.डी. इन बायोस्टॅटिस्टिक्स - गणित किंवा सांख्यिकी या विषयामध्ये ६० टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी. (२) पीएचडी इन बायोइन्फर्मेटिक्स - कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटेशनल बायोलॉजी, बायोइन्फर्मेटिक्स या विषयांमध्ये ६० टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी. या पीएचडी अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी २३-२४ जुलै २०२० रोजी लेखी परीक्षा आणि मुलाखती घेण्यात येतील.  

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या दोन वर्षांसाठी दरमहा ४५ हजार रुपये आणि नंतरच्या तीन वर्षांसाठी दरमहा  ५० हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. ग्लॅस्कोस्मिथ के-लाइन या कंपनीच्या बंगळूर येथील केंद्रातील क्लिनिकल डेव्हलपमेंट ऑपरेशन्स सेंटरमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाते. 
संपर्क ः संकेतस्थळ ः https://www.rcb.res.in/ 
ईमेल ः registrar@rcb.res.in.

संबंधित बातम्या