कौशल्यातून स्वविकास

सुरेश  वांदिले
मंगळवार, 28 जुलै 2020

आयटीआयमध्ये कौशल्य विकासाला चालना देणारे आणि तंत्र शिकवणारे असंख्य अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. ते तसे आधीपासूनच होते, मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हे अभ्यासक्रम स्वरोजगार आणि स्वविकासाबरोबरच महाराष्ट्राच्या मिशन बिगिन अगेन या मोहिमेस हातभार लावू शकतात.

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे अनेक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. भविष्यात आणखी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रादुर्भावाला थोपवण्यासाठी संचारबंदी किंवा लॉकडाउन घोषित करण्यात आले. त्यानंतर कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. यातील बरेच कामगार हे परराज्यातील त्यांच्या स्वगृही परतू लागले. त्यामुळे पुढील काळात वेगवेगळ्या कामांसाठी आवश्यक असणाऱ्या कुशल कारागिरांची मोठी गरज भासू शकते. 

याचे प्रत्यंतर लगेच आले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जून महिन्यात ५,६३७ कुशल/अकुशल कामगारांसाठी जाहिरात केली. यामध्ये गवंडी, सुतारकाम, फिटर, वेल्डर, रिगर, पाइप फिटर, क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन यासारख्या मनुष्यबळाचा समावेश आहे. ही आणि अशाच प्रकारची कामे रोजगार आणि स्वयंरोजगासाठी उपयुक्त ठरत आली आहेत. ही सर्व कामे अंगभूत कौशल्याला प्राधान्य देणारी आहेत. कौशल्यातून त्यातही तांत्रिक कौशल्याद्वारे स्वविकास साधता येणे शक्य असल्याची बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रात गेल्या ५० वर्षांपासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत म्हणजेच आयटीआयमार्फत प्रयत्न केले जात आहेत.

मोठी परंपरा
आयटीआय प्रशिक्षणाची महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्हे आणि तालुक्यांमध्ये शासकीय आयटीआय आहेत. सध्या ही संख्या ४१७ आहे. यामध्ये ९३ हजारांहून अधिक मुला-मुलींना प्रवेश दिला जातो. या आयटीआयमध्ये कौशल्य विकासाला चालना देणारे आणि तंत्र शिकवणारे असंख्य अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरणारे आहेत. ते तसे आधीपासूनच होते, मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हे अभ्यासक्रम स्वरोजगार आणि स्वविकासाबरोबरच महाराष्ट्राच्या मिशन बिगिन अगेन या मोहिमेस हातभार लावू शकतात.

उत्कृष्ट आणि दर्जेदार
राज्यातील शासकीय आयटीआय हे प्रयोगशाळा, यंत्रसामग्रीने युक्त आहेत. बहुतेक सर्वच ठिकाणी अनुभवी अध्यापक आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये सत्तर टक्के भाग हा प्रात्यक्षिकांसाठी राखीव असतो, तर तीस टक्के भाग हा सैद्धांतिक ज्ञान देण्यासाठी उपयोगात आणला जातो. आयटीआय स्थापन करताना संबंधित परिसरात असणारे छोटे-मोठे उद्योग आणि त्यांच्या गरजा लक्षात घेण्यात आल्या आहेत. संबंधित उद्योगांना स्थानिक प्रशिक्षित कुशल कामगार मिळावेत हा हेतू बऱ्याच अंशी साध्य झाल्याचे सध्याचे चित्र आहे. 

आयटीआयमधील विद्यार्थी तंत्रकुशलतेने परिपूर्ण होत असल्याचे निदर्शनास आल्याने बऱ्याच शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांना औद्योगिक घटकांमध्ये सुलभतेने सामावून घेतले जात आहे. प्रारंभी अर्धकुशल कामगार म्हणून संधी मिळाल्यावर, संस्थाअंतर्गत कुशल कामगारांकडून मिळणारे प्रशिक्षण/सराव आणि अनुभवानंतर त्यास कुशल कामगाराचा दर्जा व संधी दिली जाते. शिकावू उमेदवारी कायदा १९६१ नुसार आयटीआयमधून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संबंधित व्यवसाय/उद्योगांमध्ये रोजगार मिळण्यासाठी साहाय्य केले जाते.

उद्योगांचे सहकार्य
शासकीय आयटीआयची गुणवत्ता आणि दर्जा लक्षात घेऊन, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, महिंद्रा अँड महिंद्रा, सॅमसंग, मारुती सुझुकी, सिमेंन्स, टाटा ट्रस्ट, बॉश, फोक्सवॅगन, भारत फोर्ज, सँडविक, हिंदुस्थान इलेक्ट्रॉनिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, माझगाव डॉक, लो-रिअल, कोकण रेल्वे, स्लिंडलर यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी तंत्र  
शिक्षण मंडळाशी सामंजस्य करार केले असून ६२ कोटी रुपयांहून अधिक निधी आयटीआयआय अभ्यासक्रमांच्या उन्नतीकरणासाठी दिला आहे. विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग, अल्पमुदतीचे प्रगत प्रशिक्षण, अद्ययावत यंत्रसामग्री, उपकरणे, रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी या निधीचा वापर केला जातो. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, राजूरा, मूल, नागभीड, बल्लारपूर, पोंभूर्णा आणि लातूर जिल्ह्यातील लातूर, निलंगा, औसा, शिरुर अनंतपाळ आणि देवणी या ठिकाणी अत्यंत आधुनिक यंत्रसामग्री आणि सर्व सोईसुविधांनी युक्त अशा मॉडेल आयटीआय उभारल्या जात आहेत.

अशा आहेत सुविधा
प्रात्यक्षिकांसाठी हत्यार संच, एप्रन, कच्चामाल, स्टेशनरी, ग्रंथालय, पुस्तकपेढी, गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा, जाण्यायेण्यासाठी रेल्वे व बसच्या पाससाठी शिफारस, आदिवासी मुला-मुलांकरिता स्वतंत्र वसतिगृह, रोजगारासाठी नोंदणी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नियमानुसार सुविधा उपलब्ध करून दिली जाते. खुल्या संवर्गातील मुलामुलींना अत्यंत माफक शैक्षणिक शुल्क भरावे लागते. आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी अनुसूचित जाती, जमाती आणि भटक्या जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क भरावे लागत नाही. वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना दरमहा ६०० रुपये निर्वाह भत्ता, तर जे विद्यार्थी वसतिगृहात राहत नाही त्यांना दरमहा ५०० रुपये निर्वाह भत्ता दिला जातो. अनुसूचित जाती संवर्ग आणि अल्पसंख्याक संवर्गातील विद्यार्थ्यांना नियमानुसार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. आर्थिकदृष्ट्या मागास संवर्ग आणि नॉन क्रिमिलेयर इतर मागास वर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतनही दिले जाते.

असे आहेत अभ्यासक्रम 
वास्तुशास्त्र साहाय्यक, केमिकल प्लांट अटेंडंट ऑपरेटर, बेकर अँड कन्फेक्शनर, बेसिक कॉस्मेटॉलॉजी, सुतारकाम, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटनन्स, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, स्युईंग टेक्नॉलॉजी, डेंटल लॅबोरेटरी इक्विपमेंट, डेस्कटॉप पब्लिशिंग, डिजिटल फोटोग्राफर, ड्राफ्ट्समन सिव्हिल, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, ड्रेस मेकिंग, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लॅटर, सर्फेस आर्नामेंटेशन टेक्निक-एम्ब्रॉयडरी, फॅशन डिझाइन अँड टेक्नॉलॉजी, फायर टेक्नॉलॉजी अँड सेफ्टी मॅनेजमेंट, फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस असिस्टंट, फूड प्रॉडक्शन-जनरल, फाउंड्री मॅन, फ्रंट ऑफिस असिस्टंट, फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर, हॉस्पिटल हाऊस कीपिंग, इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट, इंटेरिअर डिझाइन अँड डेकोरेशन, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर, मेंटनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट, गवंडी, मेकॅनिक ॲग्रिकल्चरल मशिनरी, मेकॅनिक ऑटो बॉडी रिपेअर, मेकॅनिक ऑटो बॉडी पेंटिंग, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लायन्सेस, मेकॅनिक डिझेल, टेक्निशियन मेकॅट्रॉनिक्स, मेकॅनिक मशिन टूल्स मेंटनन्स, टेक्निशिअन मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक मोटार व्हेइकल, मेकॅनिक मोटारसायकल, मेकॅनिक ट्रॅक्टर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर, मल्टिमीडिया ॲनिमेशन अँड स्पेशल इफेक्ट्स, ऑपरेटर ॲडव्हान्स्ड मशिन टूल्स, पेंटर, फोटोग्राफर, फिजिओथेरपी टेक्निशियन, प्लॅस्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, प्लंबर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, रबर टेक्निशियन, आर्किटेक्चरिअल ड्रॉफ्टमनशीप, कॅबिनेट फर्निचर मेकर, जनरल फिटर कम मेकॅनिक, फूड अँड  बेव्हरेज गेस्ट सर्व्हिस असिस्टंट, शीट मेटल वर्कर, स्टेनोग्राफर- इंग्रजी, स्टेनोग्राफर- मराठी, सर्व्हेयर, टेक्निकल पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम्स, टेक्स्टाइल वेट प्रोसेसिंग टेक्निशियन, टूल अँड डाय मेकर-डाइज अँड मोल्ड्स, टूल अँड डाय मेकर- प्रेस टूल्स, जिग्स अँड फिक्सर्च्स, टर्नर, विव्हिंग टेक्निशियन, वेल्डर, वायरमन, मरिन फिटर.

सुवर्णसंधी
हे अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या जशा संधी मिळू शकतात, तसेच स्वयंरोजगारही सुरू करता येऊ शकतो. वेगवेगळे प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती एकत्रितरीत्या आवश्यक सेवासुद्धा पुरवू शकतात. स्वयंरोजगारासाठी आवश्यक असणारे कर्ज किंवा अर्थसाहाय्य वेगवेगळ्या शासकीय योजनांमधून मिळू शकते. सध्या कौशल्यप्राप्त मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करत आहेत. तरुणांची रोजगारक्षमता वाढावी, पर्यायाने उत्पादकता वाढावी यासाठी या प्रयत्नांना गती देण्यात आली आहे. त्यासाठी अनेक सवलती-सुविधाही देण्यात येत आहेत. त्याचा फायदा घ्यायला हवा. दहावीनंतर अकरावी व बारावी या मार्गाने जाण्याचा आखीव रेखीव मार्ग सर्वच विद्यार्थ्यांना खुणावत असतो. आयटीआयचा मार्गसुद्धा तसाच आहे. हा मार्ग विद्यार्थ्यांना कमी वयात आत्मविश्वास देणारा, रोजगारक्षम कौशल्य व तंत्राने युक्त करणारा असा आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या परिणामांमुळे या मनुष्यबळास अधिकाधिक संधी मिळू शकतात, असे भाकीत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवलेले आहे.

कामगार विनियम ब्यूरो
उद्योग विभागाच्याही लक्षात ही बाब फार लवकर आली. त्यामुळे उद्योगांना मनुष्यबळाची समस्या भेडसावू नये यासाठी औद्योगिक कामगार विनिमय यंत्रणा (ब्यूरो) स्थापण्याचा निर्णय सर्वोच्च पातळीवर घेण्यात आला. यासाठी कामगार विभाग, उद्योग विभाग आणि कौशल्य विभाग हे तीन विभाग या यंत्रणेच्या निर्मितीसाठी एकत्र आले आहेत. 

कामगार विनियम यंत्रणा/ब्यूरो ही वैशिष्ट्यपूर्ण अशी व्यवस्था ठरण्याची शक्यता आहे. यासाठी विशेष वेबपोर्टल तयार करण्यात येत आहे. त्याचे कामही लवकरच पूर्ण होईल. कुशल/अकुशल कामगार आणि उद्योजक यांच्यामध्ये या वेबपोर्टलच्या माध्यमातून संपर्क आणि समन्वय साधला जाईल. कामगाराने उद्योगाकडे आणि उद्योगाकडे कामगाराकडे सुलभ व सहजतेने जाण्याचा किंवा पोचण्याचा मार्ग या वेबपोर्टलमुळे उपलब्ध होईल. या वेबपोर्टलवर अकुशल, अर्धकुशल आणि कुशल कामगारांची वर्गवारी करण्यात येऊन त्यांची नोंदणी करण्यात येईल. 

वेगवेगळ्या भागातील उद्योगांची गरज लक्षात घेऊन अकुशल कामगारांना संबंधित उद्योगासाठी लागणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाईल. याची जबाबदारी कौशल्य विकास विभागाकडे सोपवण्यात आली आहे. उद्योगांच्या गरजेनुसार श्रमिकांची उपलब्धता करून देणारी ही महाश्रमिक योजना, देशातील पहिलीच योजना ठरणार आहे. कौशल्य विकास विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर विविध उद्योगांना लागणाऱ्या मनुष्यबळाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नव्या संधी
कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा कालावधी किती राहील हे सध्यातरी कुणालाही सांगता येत नाही. याबाबत सर्वत्र अनिश्चितता आहे. त्यामुळे पुढील काळात मास्क, सॅनिटायझर, स्वच्छतेच्या साधनांसह यांचा वापर अनिवार्य ठरणार आहे. मास्कची मोठीच गरज भासेल. ही बाब लक्षात येताच कोल्हापूर, औरंगाबाद, यवतमाळ, ठाणे इत्यादी ठिकाणाच्या स्वयंसहाय्यता गटातील महिलांनी एकत्र येऊन मास्क तयार केले. त्यातून त्यांना काही लाखांचे उत्पन्नही मिळाले. हे काम गावागावातील तरुण-तरुणी एकत्र येऊन करू शकतात. ही एक चांगली संधी आहे.

कोविड मार्शल, सॅनिटेशन मॅनेजर, टेलिमेडिसीन ऑपरेटर जनरल ड्युटी असिस्टंट्स टू ऑफिस प्रिमायसेस, वृद्धांसाठी केअर टेकर किंवा केअर गिव्हर यांसारख्या काही नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या सर्व बाबी लक्षात घेऊन ग्रामीण भागातील तरुण-तरुणींनी या बदलेल्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करायला हवा.

शिल्प कारागीर अभ्यासक्रम
आयटीआयमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ७९ रोजगारक्षम शिल्प कारागीर अभ्यासक्रम शिकवले जातात. यामध्ये अभियांत्रिकी गटातील २३ व्यवसाय अभ्यासक्रम हे एक वर्ष कालावधीचे आणि ३२ दोन वर्षे कालावधीचे आहेत. बिगर अभियांत्रिकी गटात एक वर्ष कालावधीचे २४ अभ्यासक्रम आहेत. ६८ अभ्यासक्रमांना दहावी उत्तीर्ण मुला-मुलींना प्रवेश दिला जातो. तर ११ अभ्यासक्रमांसाठी दहावी अनुत्तीर्ण मुला-मुलींना प्रवेश दिला जातो. हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण परिषद (नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग)चे राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र (नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट) दिले जाते. या प्रमाणपत्रास आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा मान्यता दिली जाते.

मुलींना प्राधान्य
आयटीआयमध्ये मुलींना प्राधान्य मिळावे व त्या रोजगारक्षम व्हाव्यात यासाठी केवळ मुलींसाठी १५ आयटीआय सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये ३,७३९ मुलींना प्रवेश दिला जातो. ज्या शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये सहा ते आठ व्यवसाय अभ्यासक्रम आहेत, त्या ठिकाणी दोन अभ्यासक्रम मुलींसाठी राखीव ठेवावे लागतात. चार अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांना एक अभ्यासक्रम महिलांसाठी राखीव ठेवावा लागतो.

संबंधित बातम्या