कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटंट

सुरेश  वांदिले
मंगळवार, 28 जुलै 2020

कव्हर स्टोरी
 

इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी एक महत्त्वाची संस्था आहे. कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटन्सी या क्षेत्रातील शिक्षण-प्रशिक्षण देणारी व नियमन करणारी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची संस्था आहे. १९४४ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटन्सी या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज सातत्याने भागवली आहे. आतापावेतो या संस्थेतून पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. संस्थेची चार विभागीय केंद्रे (काउंसिल्स) आहेत. परदेशात १० केंद्रे कार्यरत आहेत.

संस्थेचे अभ्यासक्रम
सीएमए (कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट) फाउंडेशन कोर्स - पात्रता - बारावी उत्तीर्ण. 
इंटरमिजिएट अभ्यासक्रम - पात्रता - (१) सीएमए फाउंडेशन अभ्यासक्रम उत्तीर्ण, (२) कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर. यंदा पदवीची अंतिम परीक्षा दिलेले उमेदवार या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. (३)कोणत्याही शाखेतील अभियंते.

अभ्यासक्रम करण्याचे फायदे - (१) सध्याच्या औद्योगिक आणि आर्थिक गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. (२) विद्यार्थ्यांना उत्तम करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा अभ्यासक्रम आणि औद्योगिक जगताला उपयुक्त ठरतील असे सीएमए विद्यार्थी, असे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य आहे. (३) संगणकीय आणि व्यक्तिमत्त्व विकासाला उपयुक्त ठरणाऱ्या विषय घटकांचा या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. (४) व्यवस्थापन, व्यूहनीती, नियामक कार्यप्रणाली आणि वित्तीय अहवाल तयार करणे, या चार मुख्य घटकांचे ज्ञान प्रदान केले जाते. (५) औद्योगिक जगतास आवश्यक असणाऱ्या प्रात्यक्षिकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. 

प्रवेश प्रकिया  
फाउंडेशन आणि इंटरमिजिएट अभ्यासक्रमाला वर्षभर प्रवेश दिला जातो. मात्र ज्या विद्यार्थ्यांना जून महिन्यातील सत्रासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी ३१ जानेवारीपूर्वी अर्ज करणे आवश्यक असते. ज्या विद्यार्थ्यांना डिसेंबर सत्रासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी ३१ जुलैपूर्वी प्रवेश घेणे आवश्यक असते. अर्ज पोस्टाने पाठवता येतो. 

काय शिकाल?  
हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापकीय निर्णय प्रकिया, अर्थसंकल्पीय स्थैर्य, प्रभावी कार्यान्वयन आणि निर्मिती सेवा व्यवस्थापनाचे मूल्यांकन, नफ्यातील तफावतीची कारणे आणि जबाबदार घटकांचा शोध घेणे या बाबींचे ज्ञान प्रदान केले जाते. 

सीएमएच्या जबाबदाऱ्या  
व्यवस्थापकीय माहिती व नियंत्रण यंत्रणेचा सुयोग्य आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, मूल्य/किमतीच्या प्रकिया आणि पद्धतीचे नियोजन करणे, गणितीय आराखड्याचा उपयोग करून (वस्तू/उपकरणे/उत्पादने/इतर साहित्य यांच्या) यादीचे नियंत्रण करणे, गुंतवणूक विश्‍लेषण करणे, प्रकल्प व्यवस्थापन आराखडा तयार करणे, अंतर्गत लेखा परीक्षण करणे, किमतीविषयक लेखापरीक्षण करणे, आजारी उद्योगांच्या कारणांचा शोध घेणे, किमतीचे नियोजन करणे, व्यावसायिक माहिती व सांख्यिकी बाबींचे एकत्रीकरण करून त्यांचा अर्थ लावणे व त्याचा उपयोग अचूक व्यवस्थापकीय निर्णय घेण्यासाठी करणे, या जबाबदाऱ्या सीएमएला पार पाडाव्या लागतात.

उत्पादनांच्या किमती व व्यवस्थापकीय लेखा परीक्षणाविषयी जागृती निर्माण करणे, त्याविषयीची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणे, मूल्य/किंमत आणि व्यवस्थापकीय लेखापरीक्षणाबाबतची साक्षरता वाढवणे, राष्ट्रीय गरजांनुसार तरुणांमध्ये रोजगारक्षम कौशल्यांची निर्मिती करणे, हरित आणि स्वच्छ तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी साहाय्य करणे, शाश्‍वत आणि सर्वसमावेशक विकास प्रक्रियेत सहभाग देऊन अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी सहकार्य करणे या बाबींची अपेक्षा सीएमएकडून केली जाते.

कॉस्ट अकाउंटंटची गरज
सध्याच्या स्पर्धात्मक काळात प्रत्येक उद्योगाला कॉस्ट अकाउंटंटची गरज आहे. कारण या मनुष्यबळाकडे व्यावसायिक व्यूहनीती आणि मूल्य निर्धारणाचे कौशल्य व विशेष ज्ञान असते. कॉस्ट अकाउंटंटच्या ज्ञान व कौशल्यावर उद्योगाची उभारणी सक्षमरीत्या होत असल्याचे समजले जाते. या संस्थेच्या वैशिष्ट्यपूर्ण  

अभ्यासक्रमामुळे संबंधित उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाचा चौफेर विकास होतो. सीएमए हे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार व घडामोडीतील महत्त्वाचा घटक असतात. ते मूल्य निर्धारण करतात, मूल्याची उपयुक्तता वाढवतात, मूल्यांचे परीक्षण करतात आणि मूल्यांचे अहवाल सादर करतात. 

करिअर संधी
सीएमए यांना शासकीय आस्थापना, खासगी आस्थापना, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र विकास संस्था, शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्र यामध्ये मोठी मागणी आहे. या मनुष्यबळाकडे असणाऱ्या स्पेशलाइज्ड ज्ञानामुळे बऱ्याच खासगी आणि काही सार्वजनिक आस्थापनांमध्ये चेअरमन कम मॅनेजिंग डायरेक्टर, मॅनेजिंग डायरेक्टर, फायनान्स डायरेक्टर, फायनान्शिअल कंट्रोलर, चिफ फायनान्शिअल ऑफिसर, कॉस्ट कंट्रोलर, मार्केटिंग मॅनेजर, चिफ इंटरनल ऑडिटर यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्तीची संधी मिळू शकते. त्यामुळे आपल्या देशात आणि परदेशातील वेगवेगळ्या उद्योग व व्यवसाय व शासकीय आस्थापनांमध्ये तज्ज्ञ, प्रशिक्षित आणि अनुभवी सीएमए मनुष्यबळाची मागणी सातत्याने वाढत आहे. वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान आणि अनुभवाच्या बळावर सीएमए व्यावसायिकदृष्ट्या सर्वोच्च स्थानी पोचू शकतात. बऱ्याच सीएमएंनी स्वतःचा व्यवसाय वा उद्योग सुरू केला असून ज्ञानाच्या बळावर ते त्यात यशस्वी झाले आहेत. अनेक सीएमए हे मूल्याच्या बाबत सल्ला-सेवा देण्यात तज्ज्ञ झाले आहेत. बऱ्याच जणांना कॉस्ट आणि व्यवस्थापकीय लेखापरीक्षण या विषयाचे तज्ज्ञ म्हणून महाविद्यालयात शिकवण्यासाठी बोलावले जाते. 

कॉस्ट लेखापरीक्षण हे वित्तीय लेखापरीक्षणापेक्षा महत्त्वाचे ठरले आहे. औद्योगिक, वाणिज्यक आणि इतर क्षेत्रात सीएमए लेखापरीक्षक हे शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून कमाल उपयुक्तता साध्य करू शकण्यात सक्षम असतात. वित्तीय लेखापरीक्षक हे याबाबत डावे पडतात. वित्तीय लेखापरीक्षक त्यांच्याकडे आलेल्या सांख्यिकी माहितीवरून निष्कर्ष काढतात. तोपर्यंत संबंधित व्यवसाय/उद्योगात बऱ्याच घडामोडी घडून गेलेल्या असतात. कॉस्ट लेखापरीक्षक हे व्यवस्थापकांना निर्मिती क्रियान्वयन व निर्मिती प्रक्रियेचे नियमन करण्यासाठी साहाय्य करू शकतात. ही बाब वित्तीय लेखापरीक्षकांना शक्य होत नाही. सीएमए हे व्हॅट, एक्साइज, सेबी-सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, एनएसडीएल-नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, इतर नियामक संस्था, सल्लागार संस्था येथे लेखापरीक्षणाच्या सेवा देऊ शकतात. केंद्रीय अबकारी विधिनियम, सेवा कर कायदा, विविध राज्यांचे व्हॅट कायदे, केंद्रीय अबकारी कायद्याचे प्रमाणीकरण. कॉस्ट रेकॉर्ड्स मेंटेनन्स सल्लागार, स्पेशल ऑडिट अंडर कस्टम्स ॲक्ट, बँकेचे स्टॉक लेखापरीक्षण, बँक क्षेत्रासाठी वसुली सल्लागार इत्यादी क्षेत्रातही सीएमए स्वतंत्रपणे कार्य करू शकतात.

इतर संधी  
कॉस्ट अकाउंटिंग, फायनान्शिअल मॅनेजमेंट, फायनान्शिअल/बिझनेस ॲनॅलिस्ट, सिस्टीम ॲनॅलिस्ट अँड सिस्टीम मॅनेजमेंट, ऑडिटिंग, इंटर्नल कंट्रोल, टॅक्स मॅनेजमेंट, प्रोसेस ॲनॅलिसिस, बिझनेस इंटेलिजन्स प्रक्रियेचे निर्धारण, पायाभूत सुविधा निर्मिती करणाऱ्या कंपन्या, निर्मिती आणि सेवा उद्योग, विमा कंपन्या, ऊर्जा व बँकिंग क्षेत्र, संपूर्ण गुणवत्ता नियंत्रण, सांख्यिकी गुणवत्ता नियंत्रण, उद्योजकीय कामगिरी व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन, उद्योजकीय सुशासन या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठीही सीएमएचा विचार केला जातो.

सेवा सल्ला  
वित्तीय नियोजन आणि धोरण निर्धारण, कॉस्ट व्यवस्थापन आणि नियोजन, पुरवठा साखळी व्यवस्थापन, भांडवल व्यवस्थापन आणि नियोजन, कार्यकारी भांडवल व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल आणि सुसाध्यता अभ्यास, मार्केट संशोधन आणि पुरवठ्यांचा अभ्यास, अर्थसंकल्प आणि नियंत्रण, वस्तुसूची व्यवस्थापन, मूल्य विश्‍लेषण, संपूर्ण गुणवत्ता नियंत्रण, मूल्य नियंत्रण पद्धती आणि व्यवस्थापन, व्यवसाय प्रक्रियेनुसार कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेचा आराखडा, कर्मचाऱ्यांसाठी लाभ देणारे उपाय, गुणवत्तापूर्ण पर्यावरणीय आणि ऊर्जा लेखांकन, व्यावसायिक पुनर्रचनेचे मूल्यांकन, व्यूहात्मक रणनीती, कार्यप्रणाली विश्‍लेषण, निधीकोश व्यवस्थापनाबाबत सल्ला, कॉस्ट लेखापरीक्षकांना गुंतवणूक नियोजन, नफ्याचे नियोजन, प्रकल्प व्यवस्थापन आणि सर्वांगीण व्यवस्थापकीय निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते.

संपर्क - (१) वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल, रोहित चेंबर्स, फोर्थ फ्लोअर, जन्मभूमी मार्ग, फोर्ट मुंबई-४००००१, दूरध्वनी - ०२२-२२८७२०१०, फॅक्स - २२८७०७६३, ईमेल- wirc@icmai.in, संकेतस्थळ - www.icwai-wirc.org, (२) सीएमए भवन, १२ सुद्दर स्ट्रीट, कोलकता - ७०००१६, (३) सीएमए भवन, ३, इन्स्टिट्यूशनल एरिया, लोधी रोड, नवी दिल्ली - ११०००३, संपर्क भ्रमणध्वनी - ९३७२०७११२०, टोल फ्री क्रमांक - १८००३४५००९२, ईमेल - studies@icmai.in

संबंधित बातम्या