हॉटेल मॅनेजमेंट 

सुरेश  वांदिले
मंगळवार, 28 जुलै 2020

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सर्वाधिक फटका हॉटेल्स/उपहारगृहे/आतिथ्यशीलता या क्षेत्रांना बसला आहे. तथापि, एकूणच आपला बाहेर जाऊन खाण्या-पिण्याची मौजमजा करण्याचा स्वभाव आणि ऊर्मी लक्षात घेता, हे क्षेत्र नवी उभारी घेऊ शकते. उत्तम आणि दर्जेदार संस्थांमधून अभ्यासक्रम केल्यास पुढे अनेक संधी आहेत...

दिल्ली येथे असणारी द इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग अॅंड न्यूट्रिशन ही संस्था १९६२ मध्ये भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयामार्फत स्थापन करण्यात आली. आतिथ्यशीलता उद्योगाला लागणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाच्या गरजांची पूर्तता करण्याचा हेतू ही संस्था स्थापन करण्यामागे होता. गेल्या ५८ वर्षांत या संस्थेने या क्षेत्रातील शिक्षण - प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास चालना देणारी आपल्या देशातील क्रमांक एकची संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. या संस्थेतून देशातील नामवंत शेफ, पोषण आहार तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ, आतिथ्यशीलता (हॉस्पिटॅलिटी) उद्योगासाठी लागणाऱ्या तज्ज्ञांची निर्मिती झाली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि दर्जा यामुळेच हे यश या संस्थेला मिळू शकले आहे. 

 सर्वाधिक जुनी संस्था असल्याने या संस्थेचे विद्यार्थी सध्या देश-विदेशात मोठ्या पदांवर आहेत. अनेकांनी स्वत:चा व्यवसाय यशस्वी केला आहे. अशा विद्यार्थ्यांची मोठी साखळी या संस्थेकडे आहे. रुग्णालयातील पोषण आहारासंदर्भात या संस्थेने पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. अशा प्रकाराचा हा आपल्या देशातील एकमेव अभ्यासक्रम समजला जातो. या संस्थेने सातत्याने हा क्रमांक कायम ठेवला आहे. या संस्थेच्या अभ्यासक्रमांना, अध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेसाठी विविध पुरस्कार मिळाले आहेत. या संस्थेमार्फत पदवी, पदव्युत्तर पदवी आणि कौशल्य निर्मितीसाठी उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. 

सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार 
या संस्थेतील पदवी आणि पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या अखिल भारतीय चाळणी परीक्षेतून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी या संस्थेत निवडले जातात. संस्थेत सैद्धांतिक ज्ञानावर अधिक भर दिला जात नाही. विद्यार्थ्यांनी पुस्तकी किडे होऊ नये याकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यांना अधिकाधिक प्रयोगशीलतेचे धडे दिले जातात. हे धडे त्यांनी स्वत:हूनच गिरवावेत याकडे लक्ष पुरवले जाते. विद्यार्थ्यांना नामवंत हॉटेल्स, रेस्टॉरंट व अशाच प्रकारच्या संस्थांमध्ये इंटर्नशिप मिळावी व त्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी प्रयत्न केले जातात.

संस्थेचे अभ्यासक्रम 
१) एम.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी ॲडमिनिस्ट्रेशन - आतिथ्यशीलता उद्योगातील प्रशासकीय कौशल्यासाठी लागणाऱ्या उच्च श्रेणीच्या मनुष्यबळ निर्मितीसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. कालावधी - दोन वर्षे. तो चार सत्रांमध्ये शिकवला जातो. 
पात्रता : १) बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी अॅंड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा २) नॅशनल काउंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या तीन वर्षे कालावधीचा हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाची पदविका आणि कोणत्याही विषयातील पदवी किंवा ३) नॅशनल काउंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेच्या अंतर्गत केलेला तीन वर्षे कालावधीचा हॉटेल मॅनेजमेंटमधील डिप्लोमा आणि मान्यताप्राप्त तारांकित हॉटेलमधील दोन वर्षे कालावधीचा सुपरवायझरी म्हणजेच पर्यवेक्षकीय अनुभव.

या अभ्यासक्रमात सेवा क्षेत्राच्या गरजांवर ठळकरीत्या लक्ष केंद्रित करण्यात येते. या उलट एमबीए अभ्यासक्रमामध्ये उद्योजकीय बाबी आणि निर्मितीप्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्यात येते. त्यामुळे हा अभ्यासक्रम एमबीएपेक्षा आतिथ्यशीलता उद्योगांमध्ये वरिष्ठ श्रेणीच्या जबाबदाऱ्या मिळण्यासाठी अधिक फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे. या अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या सत्रामध्ये मनुष्यबळ विकास व्यवस्थापन किंवा विक्री आणि विपणन यांपैकी एक विषय स्पेशलायझेशनसाठी निवडता येतो. या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना पदवीस्तरीय परीक्षेमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत. बारावीमध्ये संबंधित उमेदवाराने इंग्रजीचा अभ्यास करायला हवा. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 'नॅशनल कांउसिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट' या संस्थेमार्फत जॉइंट एंट्रन्स टेस्ट घेतली जाते. ही परीक्षा ऑनलाइन घेतली जाते. दरवर्षी ही परीक्षा साधारणत: जुलै महिन्यात घेतली जाते. अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्ट महिन्यात होतो.
हा अभ्यासक्रम आणखी पुढील तीन शासकीय संस्थांमध्ये करता येतो. 

  इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, एस. जे पॉलिटेक्निक कॅम्पस शेषाद्री, बंगळूर - ५६०००१, संकेतस्थळ : www.ihmbangalore.kar.nic.in, ईमेल: ihmbengaluru@gmail.com, दूरध्वनी - ०८०-२२२६२९६०, फॅक्स -२२२६८५६२ 
     इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी अॅंड अप्लाइड न्यूट्रिशन फोर्थ, क्रॉसस्ट्रीट, सीआयटी कॅम्पस चेन्नई - ६००११३, दूरध्वनी - ०४४-२२५४२०२९, टेलिफॅक्स - २२५४१६१५, संकेतस्थळ : www.ihmchennai.org, ईमेल : ihmchen@dataone.in      इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी अॅंड अप्लाइड न्यूट्रिशन, लखनौ - २२६०२४, दूरध्वनी - ०५२२-४०७७४१४, फॅक्स- ४०७७४१५, संकेतस्थळ : http://www.ihmlucknow.com/ ईमेल : ihmlucknow@gmail.com या प्रत्येक संस्थेत प्रत्येकी २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

काय शिकाल? 
 या अभ्यासक्रमामध्ये हॉटेलसारख्या सेवा क्षेत्रांसाठी आवश्यक असणारी कौशल्ये आणि तंत्रांचा विशेषत्वाने समावेश करण्यात आला आहे. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारचे कौशल्य इतर अभ्यासक्रमांमधून अभावानेच उमेदवारांना प्राप्त करून दिले जाते. या अभ्यासक्रमाचा भाग असणाऱ्या टीम प्रोजेक्ट अंतर्गत हॉटेल उद्योग/व्यवसायातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे या क्षेत्रासाठी नेमके कोणते कौशल्य आणि गुणांची नितांत गरज आहे याची प्रत्यक्ष जाणीव उमेदवारांना होते. त्यामुळे त्यांची उद्योग क्षेत्रातील स्वीकारार्हता अधिक वाढते. प्रात्यक्षिकांवर अधिक भर असणाऱ्या या अभ्यासक्रमामुळे उमेदवारांना या उद्योगातील सध्याचे प्रवाह सुलभतेने आकलन होण्यास मदत होते. या उद्योगातील तज्ज्ञ मेंटॉर म्हणजेच मार्गदर्शक किंवा प्रोत्साहनकर्ते म्हणून भूमिका बजावतात. याचा फायदा करिअरला गती देण्यासाठी होतो.

करिअर संधी
हा अभ्यासक्रम उत्तमरीतीने उत्तीर्ण केल्यास पुढीलप्रमाणे करिअर संधी उपलब्ध होऊ शकतात. मोठ्या हॉटेल उद्योग समूहांमध्ये प्रशिक्षण, विक्री, विपणन आणि मनुष्यबळ या क्षेत्रांतील पर्यवेक्षीय (सुपरवायझरी) स्तरावर प्रवेश मिळू शकतो. त्यानंतर गुणवत्ता व परीश्रम या बळावर उच्च श्रेणीची पदे मिळू लागतात. हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग या विषयांचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये अध्यापनाचीही संधी मिळू शकते.

२) बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी अॅंड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन - या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा असून तो सहा सत्रांमध्ये शिकवला जातो. आतिथ्यशीलता उद्योगासाठी आवश्यक असणारे आधुनिक ज्ञान आणि तंत्र, व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य या अभ्यासक्रमाद्वारे उमेदवारांना प्राप्त करून दिले जाते. अन्नपदार्थ निर्मिती, अन्न आणि पेये निर्मिती आणि कार्यालयीन व्यवस्थापन आणि सेवा संनियंत्रण या घटकांचे सखोल ज्ञान दिले जाते. यामध्ये हॉटेल जमाखर्च/लेखा ताळेबंद, अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता, मनुष्यबळ व्यवस्थापन, सुलभता नियोजन, वित्तीय व्यवस्थापन, व्यूहात्मक व्यवस्थापन, पर्यटन विपणन आणि व्यवस्थापन या विषयांचा समावेश आहे. 
पात्रता : १ जुलै रोजी खुला आणि इतर मागासवर्ग संवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा २५ वर्षे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संवर्गासाठी वयोमर्यादा २८ वर्षे. दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादा नियमानुसार ठरवली जाते. सर्व संवर्गातील उमेदवारांची निवड एंट्रन्स परीक्षेतील गुणवत्ता यादीतील क्रमांक आणि त्यांनी निवडलेल्या केंद्रांच्या आधारावर केली जाते. कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण किंवा बारावीची परीक्षा देणारे उमेदवार या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. उमेदवारांच्या निवडीसाठी जॉइंट एंट्रन्स टेस्ट घेतली जाते. ही परीक्षा ऑनलाइन आहे. ही परीक्षा देशातील विविध शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे या केंद्रांचा समावेश आहे. परीक्षा साधारणत: दर वर्षी एप्रिल महिन्यात घेतली जाते. जुलै महिन्यात निकाल लावला जातो. अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्ट महिन्यात होतो. त्याद्वारे देशातील सर्वोत्कृष्ट अशा ५१ संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो. यामध्ये २१ संस्था या केंद्रीय अर्थसहाय्यित आहेत. १९ संस्था राज्य सरकारांच्या अखत्यारीत आहेत. एक संस्था सार्वजनिक क्षेत्रातील आहे. देशातील विविध भागांत असणाऱ्या नऊ फूड क्रॉफ्ट संस्था आहेत. हॉटेल उद्योगातील वेगवेगळ्या कार्यासाठी आवश्यक असणारे स्पेशलाइज्ड डिप्लोमा अभ्यासक्रम चालवतात. त्यासही या परीक्षेच्या गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. या परीक्षेद्वारे ७५८० जागा भरल्या जातात. संकेतस्थळ : www.ntanchm.nic.in 

करिअर संधी 
१) प्रवासी जहाजांवरील खानपान व आतिथ्य सेवा, २) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फास्टफूड साखळी उद्योगासाठी आवश्यक व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी आणि एक्झिक्युटिव्ह, रुग्णालये आणि मोठ्या कॉर्पोरेट संस्थांमधील आतिथ्य व खानपान सेवा, ३) हॉटेल आणि इतर सेवा क्षेत्रातील गेस्ट कस्टमर रिलेशन अधिकारी, ४) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फूड चेनमध्ये मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी किंवा एक्झिक्युटिव्ह, रुग्णालये आणि मोठ्या संस्थांमधील भोजनगृहे, ६) रिसॉर्ट व्यवस्थापक, हॉटेल आणि संबंधित उद्योगात व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी, ७) प्रारंभीच्या प्रशिक्षणानंतर मोठ्या हॉटेल समूहांमध्ये किचन व्यवस्थापक, ८) पर्यटन विकास महामंडळात विविध संधी, ९) हॉटेल व्यवसाय आणि इतर सेवा क्षेत्रातील विक्री व विपणन अधिकारी, (१०) हॉटेल व्यवसाय आणि इतर सेवा क्षेत्रांसाठी आवश्यक ग्राहकसेवा एक्झिक्युटिव्ह, (११) हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग महाविद्यालयातील अध्यापक, (१२) बहुराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटी कंपन्यांमध्ये व्यवस्थापक, (१३) हाऊसकिपिंग व्यवस्थापक, (१४) विमानसेवेतील फ्लाइट किचन आणि विमानांतर्गत सेवा, (१५) रेल्वे आतिथ्य आणि खानपान सेवा, (१६) रिसॉर्ट मॅनेजमेंट, (१७) स्वयंरोजगार, (१९) ॲकोमोडेशन मॅनेजर, (२०) केटेरिंग मॅनेजर, (२१) इव्हेंट मॅनेजर, (२२) भारतीय नौसेना आतिथ्य सेवा, (२३) फास्ट फूड रेस्टॉरंट मॅनेजर, (२४) हॉटेल मॅनेजर, (२५) पब्लिक हाऊस मॅनेजर, (२६) रेस्टॉरंट मॅनेजर. (२७) फ्रंट ऑफिस ऑपरेटर, (२८) पंचतारांकित हॉटेल्समध्ये फूड प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह (२९) फूड अँड बेव्हरेजेस सर्व्हिस, (३०) टूर मॅनेजर, (३१) रिटेल मॅनेजर.

डिप्लोमा इन बेकरी अॅंड कन्फेक्शनरी 
हा दीड वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात बेकरी उत्पादनाशी संबंधित विषयाचे सखोल ज्ञान दिले जाते. शिवाय व्यवसाय/स्वयंरोजगारासाठी आवश्यक असणारे संवाद कौशल्य, संगणकीय ज्ञान प्रदान केले जाते. दीड वर्षांपैकी एक वर्ष संस्थेत प्रशिक्षण दिले जाते. उर्वरित सहा महिने औद्योगिक घटकांमध्ये प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमाला १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गासाठी उच्चतम वयोमर्यादा २५ वर्षे, तर राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा २८ वर्षे आहे. कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या अभ्यासक्रमासाठी एंट्रन्स परीक्षा घेतली जात नाही. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची बारावीतील गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्याप्रमाणे प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्टमध्ये होतो.

क्राफ्ट्समनशिप कोर्स इन फूड प्रॉडक्शन 
या अभ्यासक्रमाचा कालावधी दीड वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमात कुकरी, बेकरी, पेस्ट्री निर्मिती, पदार्थनिर्मितीसाठी लागणारी स्वच्छता आणि यंत्र व साहित्यसामग्री व्यवस्थापन या विषयांचे सखोल ज्ञान प्रदान केले जाते. एक वर्षाचा अभ्यासक्रम संस्थेत केल्यावर सहा महिन्यांचे प्रशिक्षण नामवंत संस्थेत दिले जाते. या अभ्यासक्रमाला १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गासाठी उच्चतम वयोमर्यादा २५ वर्षे, तर राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा २८ वर्षे आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या उमेदवाराने दहावीमध्ये इंग्रजी विषयाचा अभ्यास केलेला असावा. प्रवेशासाठी एंट्रन्स परीक्षा घेतली जात नाही. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची दहावीतील गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्याप्रमाणे प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्टमध्ये होतो.

डिप्लोमा इन फूड अॅँड बेव्हरेजेस सर्व्हिस
 दीड वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमात अन्नपदार्थ आणि खाद्य-पेये सेवा क्षेत्रासाठी लागणारे तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. दीड वर्षांपैकी एक वर्ष संस्थेत प्रशिक्षण दिले जाते. उर्वरित सहा महिने औद्योगिक घटकांमध्ये प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमाला ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गासाठी उच्चतम वयोमर्यादा २५ वर्षे आहे, तर राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा २८ वर्षे आहे. कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या उमेदवाराने बारावीमध्ये इंग्रजी विषयाचा अभ्यास केलेला असावा. प्रवेशासाठी एंट्रन्स परीक्षा घेतली जात नाही. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची बारावीतील गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्याप्रमाणे प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्टमध्ये होतो.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायटेटिक्स अॅँड हॉस्पिटल फूड सर्व्हिस 
 या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष तीन महिन्यांचा आहे. यांपैकी तीन महिन्यांचे प्रशिक्षण नामवंत संस्थेत दिले जाते. २९ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.  पात्रता : गृहशास्त्र किंवा पोषण आहार विषयातील पदवी किंवा बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी अॅंड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा बी.एस्सी इन बायोमेडिकल सायन्स किंवा बायोलॉजिकल सायन्स किंवा बायोकेमिस्ट्री किंवा फूड टेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, अप्लाइड लाइफ सायन्स, लाइफ सायन्स, अप्लाइड सायन्स, फिजिकल एज्युकेशन अॅंड स्पोर्ट्स सायन्स, फूड सायन्स अॅंड टेक्नॉलॉजी, बीएचएमएस, बीएएमएस. प्रवेशासाठी एंट्रन्स परीक्षा घेतली जात नाही. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची पदवीतील गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्याप्रमाणे प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्टमध्ये होतो.
प्लेसमेंट : या संस्थेत शिक्षण-प्रशिक्षण घेणाऱ्या १०० टक्के विद्यार्थ्यांना दरवर्षी उत्तम प्लेसमेंट मिळाली आहे. बी.एस्सी इन हॉटेल अॅंड हॉस्पिटॅलिटी ॲडमिनिस्ट्रशन हा पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांनी कार्यकारी आणि व्यवस्थापकीय स्तरावरील पदे दिली आहेत. एम.एस्सी व इतर पदविका अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम प्लेसमेंट मिळाले आहे. गेल्या वर्षी ४० हून अधिक कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभाग घेतला. यामध्ये ॲम्बी व्हॅली, कॅफे कॉफी डे, सिनेपॉलीस, डॉमिनोज्, ड्युसीट, फॉर्च्यून पार्क, गोदरेज नेचर्स बास्केट, हयात, आयटीसी, हिल्टन, जेपी ग्रुप ऑफ हॉटेल्स, कॉफी डे बेव्हरेजेस, अण्णा हॉटेल्स, इसपी, कार्लसन रेजिदॉर, रॅपीड मेट्रो, पीव्हीआर, ॲकॉर पुल्लमन, हवेली ॲम्बियन्स, लेमन ट्री, मॅकडोनाल्ड्स, कॅश अॅंड कॅरी, ओल्ड वर्थ हॉस्पिटॅलिटी, सन्शा, स्टारबक्स, मॅरिएट, द ललित, द ओबेरॉय हॉटेल्स, क्लॅरिजेस, मार्क्‌स अॅंड स्पेन्सर, अरविंद लाइफ स्टाइल, एपिक इंडिया, इंटर काँटिनेंटल हॉटेल ग्रुप, रियालन्स रिटेल लिमिटेड, रिलायन्स, टोनी हिलफिगर, बेस्ट सेलर, पार्क, सॅमसंग. ही संस्था अडीच एकरहून अधिक परिसरात वसली आहे. या संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता आणि दर्जामध्ये सातत्याने वाढ व्हावी, यासाठी त्यांना संस्थेमार्फत देश विदेशातील विविध चर्चासत्रे, स्पर्धांसाठी पाठवले जाते. संस्थेमध्ये स्वयंशिस्तीला महत्त्व असून आजच्या स्पर्धात्मक काळातील रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी या बाबी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे अनेक विद्यार्थ्यांचे अनुभव आहेत. 
संपर्क : इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, लायब्ररी पुसा कॉम्पलेक्स, नवी दिल्ली - ११००१२, दूरध्वनी - ०११-२५८४१४११, फॅक्स - २५८४०१४७, संकेतस्थळ : www.ihmpusa.net, ईमेल : ihmpusa@rediffmail.com

फूड प्रॉडक्शन
हॉस्पिटॅलिटी उद्योगामध्ये प्रशिक्षित व्यवस्थापकांची गरज भासतच असते. पण त्याचबरोबर कौशल्यप्राप्त उमेदवारांची गरज अधिक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. ही गरज 'डिप्लोमा इन फूड प्रॉडक्शन' हा अभ्यासक्रम भागवत असतो. कोणत्याही विद्याशाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम करता येतो. हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना हॉटेल रेस्टॉरंट, फास्टफूड आऊटलेट, रिसॉर्ट, रेल्वे खानपान सेवा, एअरलाइन्स खानपान सेवा, जलवाहतूक खानपान सेवा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये संधी मिळू शकते. 

हा अभ्यासक्रम पुढील शासकीय संस्थांमध्ये करता येतो. प्रत्येक संस्थेत ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी दीड वर्षांचा आहे - इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - भूवनेश्वर (संकेतस्थळ : www.ihmbbs.org), डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - चंदीगड (संकेतस्थळ : www.ihmchandigarh.org), इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - चेन्नई (संकेतस्थळ : www.ihmchennai.org), इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - गुरुदासपूर (संकेतस्थळ : www.ihmgurudaspur.org), इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - गुरुदासपूर (संकेतस्थळ :www.ihmgwalior.net), इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - हाजीपूर (संकेतस्थळ : www.ihmhajipur.net), इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - लखनौ (संकेतस्थळ : www.ihmlukhnow.com), इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - श्रीनगर (संकेतस्थळ : www.ihmshrinagar.org), इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - तिरुअनंतपूरम (संकेतस्थळ : www.ihmctkovalam.org).

या उमेदवारांनी बारावीमध्ये इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. पहिल्या ३६ आठवड्यांत सैद्धांतिक बाबी शिकवल्या जातात. त्यानंतर २४ आठवड्यांमध्ये वेगळ्या कंपन्या/औद्योगिक घटक यांमध्ये प्रात्यक्षिक करावे लागते. या अभ्यासक्रमाचा प्रांरभ दरवर्षी जून महिन्यात होतो. बारावीमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित विद्यार्थ्यांची निवड केली जाते. इच्छुक विद्यार्थ्यांनी मे महिन्यापासूनच संबंधित संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देऊन माहिती घ्यायला हवी.

या अभ्यासक्रमात वाणिज्य (कमर्शिअल) स्वरूपाच्या अन्न पदार्थांच्या पाककृती निर्मितीचे तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. यामध्ये सर्वप्रकारच्या भारतीय, चायनीज आणि कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थ्यांच्या निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि मांस कापणे, फळे आणि भाज्या सजवून त्या ग्राहकांना देण्याचे प्रशिक्षण देऊन, त्याचा सराव केला जातो. तसेच कोठार व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. 

महत्त्वाच्या संस्था
वेगवेगळ्या संस्थांनी केलेले सर्वेक्षण आणि उद्योगजगताचा ओढा लक्षात घेता, गेल्या दोन-तीन वर्षांत देशातील हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या महत्त्वाच्या संस्था पुढीलप्रमाणे सांगता येतील - १) इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग अॅंड न्यूट्रिशन, पुसा - नवी दिल्ली, २) इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी अॅंड अप्लाइड न्यूट्रिशन - मुंबई, ३) इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी अॅंड अप्लाइड न्यूट्रिशन - चेन्नई, ४) इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी अॅंड अप्लाइड न्यूट्रिशन - हैदराबाद, ५) इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी अॅंड अप्लाइड न्यूट्रिशन - लखनौ, ६) इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी अॅंड अप्लाइड न्यूट्रिशन - कोलकता, ७) इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - ग्वाल्हेर, ८) इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी अॅंड अप्लाइड न्यूट्रिशन - भोपाळ, ९) इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी अॅंड अप्लाइड न्यूट्रिशन - डेहराडून, १०) वेलकम गॅज्युएट स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - मनिपाल, ११) बनारसीदास चांदीवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅंड केटरिंग टेक्नॉलॉजी दिल्ली, १२) आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅंड केटरिंग टेक्नॉलॉजी - बंगळूर, १३) डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, ख्रिस्त - डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी - बंगळूर, १४) स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अॅंड टुरिझम स्टडीज, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी - पुणे, १५) एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - चेन्नई, १६) भारती विद्यापीठाचे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅंड केटरिंग टेक्नॉलॉजी - पुणे, १७) ॲमिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी - लखनौ, १८) स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅंड केटरिंग टेक्नॉलॉजी, जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी - जयपूर, १९) गुरुनानक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - कोलकता, २०) श्री रामचंद्र कॉलेज ऑफ आर्ट्स अॅंड सायन्स - कोइम्बतूर, २१) चंदीगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅंड केटरिंग टेक्नॉलॉजी - चंदीगड, २२) इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - नवी दिल्ली, २३) एआयएमएस बंगळूर, २४) डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - बंगळूर, २५) एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅंड केटरिंग टेक्नॉलॉजी - पुणे.

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅँड केटेरिंग टेक्नॉलॉजी 
 मुंबईस्थित इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅंड केटेरिंग टेक्नॉलॉजी ही संस्था देशात कायम पहिल्या पाच क्रमांकात राहिली आहे. या संस्थेलाही पन्नास वर्षांहून अधिक शैक्षणिक कार्याचा अनुभव आहे. दिल्लीच्या संस्थेप्रमाणेच या संस्थेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देश आणि परदेशातील अनेक मोठी हॉटेल्स आणि पंचतारांकित हॉस्पिटॅलिटी क्षेत्रांत उच्चपदस्थ आहेत. या संस्थेमध्ये पुढील अभ्यासक्रम करता येतात.  बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी अॅंड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन - कोणत्याही ज्ञानशाखेतील बारावी उत्तीर्ण. अभ्यासक्रमाचा कालावधी - तीन वर्षे. निवड - जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशनद्वारे. 

     डिप्लोमा इन फूड प्रॉडक्शन - हा अभ्यासक्रम कोणत्याही ज्ञानशाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला करता येतो. कालावधी - दीड वर्षे. अभ्यासक्रमाचा प्रारंभ जुलै/ऑगस्टमध्ये होतो. इच्छुक उमेदवारांची खुल्या गटासाठी वयोमर्यादा २५ आणि राखीव संवर्गासाठी २८ वर्षे आहे. सर्टिफिकेट कोर्स इन कुकरी - कौशल्य निर्मितीला वाव देणारा हा १२ आठवड्यांचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारा विद्यार्थी प्रशिक्षण संपताक्षणी रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी सक्षम व्हावा यादृष्टीने अभ्यासक्रमांची संरचना करण्यात आली आहे. यामध्ये प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो. जुलै ते ऑक्टोबर आणि जानेवारी ते एप्रिल अशा दोन कालावधीत हा अभ्यासक्रम करता येतो. पात्रता - कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. 

     सर्टिफिकेट कोर्स इन बेकरी - जुलै ते ऑक्टोबर आणि जानेवारी ते एप्रिल अशा दोन कालावधीत हा अभ्यासक्रम करता येतो. अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारा विद्यार्थी प्रशिक्षण संपताक्षणी बेकरी व्यवसायातील रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी सक्षम व्हावा यादृष्टीने प्रशिक्षण देण्यात येते. पात्रता - कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. कौशल्य निर्मितीला वाव देणारा हा १२ आठवड्यांचा अभ्यासक्रम आहे.
 या संस्थेने अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी 'बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी अॅंड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कोणत्याही ज्ञानशाखेतील ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. अभ्यासक्रमाचा कालावधी - तीन वर्षे. या विद्यार्थ्याने किमान तीन वर्षे परदेशात वास्तव्य केलेले असावे. या कालावधीमध्ये अकरावी व बारावी केलेले असावे.

रोजगार से हुनर 
 आतिथ्य सेवा उद्योगास मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या कौशल्ययुक्त मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी संस्थेने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने 'रोजगार से हुनर' या उपक्रमांतर्गत अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. आठवी ते दहावी उत्तीर्ण उमेदवारांना हे अभ्यासक्रम करता येतात. हे अभ्यासक्रम दर दोन महिन्यांनी सुरू होतात. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत - 
     फूड प्रॉडक्शन - कालावधी - आठ आठवडे, वयोमर्यादा - १८ ते २८ वर्षे, 
     फूड अॅंड बेव्हरेजेस - कालावधी - सहा आठवडे/वयोमर्यादा - १८ ते २८ वर्षे, 
     बेकरी - कालावधी - आठ आठवडे, वयोमर्यादा - १८ ते २८ वर्षे, 
     हाऊसकिपिंग युटिलीटी - कालावधी - सहा आठवडे, वयोमर्यादा - १८ ते २८ वर्षे.
संपर्क : इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी अॅंड अप्लाइड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम) - मुंबई - ४०००२८, दूरध्वनी - ०२२-२४४५७२४१, संकेतस्थळ : ihmctan.edu, ईमेल : info@ihmctan.edu 

संबंधित बातम्या