दूरसंचार क्रांती 

अतुल कहाते
सोमवार, 18 मे 2020

कव्हर स्टोरी
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मोबाइल आणि इंटरनेटमुळं जीवन जरासं सुसह्य झालं. कुठं कुठं अडकलेल्या नातेवाईक आणि आप्तेष्टांबरोबर संपर्कात राहणं दूरसंचार व्यवस्थेमुळं सोपं झालं. लॉकडाऊन काळात शिक्षणासह अनेक गोष्टी ‘ऑनलाइन’ होऊ लागल्या आणि लॉकडाऊन संपल्यानंतरही त्या कदाचित सुरू राहतील. आपल्या मनोरंजनासाठीही इंटरनेटच धावून आलं. हे शक्य झालं ते दूरसंचार क्रांतीमुळं. आजमितीला आपल्या जीवनात असलेलं इंटरनेटचं महत्त्व, दुष्परिणाम, पुढील काळात येऊ घातलेली आव्हानं यांचा वेध...
सतरा मे रोजी असलेल्या ‘जागतिक दूरसंचार दिन’ अर्थात ‘वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फोर्मेशन सोसायटी डे’च्या निमित्तानं...

आकडेवारीचा विचार करायचा, तर इंटरनेटवरच्या माहितीच्या म्हणजे ‘डेटा’च्या वापराच्या बाबतीत भारत आघाडीच्या काही देशांपैकी एक आहे. प्रति स्मार्टफोनवर वापरल्या जात असलेल्या ‘डेटा’चा विचार करायचा तर प्रतिमहिना ९.८ गिगाबाईट्स एवढ्या प्रमाणात भारतीय माणूस इंटरनेट वापरतो. दूरसंचार तसंच इंटरनेट यांच्या एकूण वापरकर्त्यांच्या आणि मोबाइल ॲप्सच्या डाऊनलोड्सच्या बाबतीत भारत जगात दुसरा आहे. भारताची लोकसंख्या १३० कोटी असताना भारतीय लोकांकडं सुमारे १२१ कोटी मोबाइल फोन्स आहेत आणि ४४.६० कोटी स्मार्टफोन्स आहेत.
ही आकडेवारी सांगायचं कारण म्हणजे कोरोना विषाणूच्या महाभयंकर संकटाच्या आधीपासूनच भारतीय लोक दूरसंचार, इंटरनेट, मोबाइल या प्रकारची तंत्रज्ञानं मोठ्या प्रमाणावर वापरतात. तांत्रिकदृष्ट्या याचे खरं म्हणजे दोन भाग पडतात: आवाज (व्हॉइस) आणि माहिती (डेटा). सोप्या शब्दांमध्ये सांगायचं, तर आपण जेव्हा कुणाला फोन करतो तेव्हा तो ‘आवाज’ प्रकारच्या तंत्रज्ञानाचा भाग असतो, तर इंटरनेट, व्हॉट्सॲप, इतर सगळी ॲप्स हे सगळं ‘माहिती’ प्रकारामध्ये मोडतं. मोबाइल फोनचा जन्म झाल्यापासून गेल्या काही वर्षांमध्ये आवाजी कामांसाठी म्हणजेच एकमेकांशी बोलण्यासाठी लोक मोबाइल फोनचा वापर जास्त करायचे. तुलनेनं इंटरनेट आणि तत्सम सुविधा यांचा वापर कमी असे. कालांतरानं यात बदल होत गेले आणि आवाजापेक्षा माहितीच्या आदानप्रदानाचं प्रमाण वाढत गेलं. आपलंच उदाहरण बघूया. आपल्यापैकी बव्हंशी जण फोनवर किती वेळ बोलतात आणि त्या तुलनेत व्हॉट्सॲप, फेसबुक, नेटफ्लिक्स आणि इतर सुविधा, इतर ॲप्स हे सगळं किती प्रमाणात वापरतात यांचा हिशेब मांडला, तर त्यातून माहितीच्या देवाणघेवाणीचं प्रमाण किती जास्त आहे हे आपल्या लक्षात येईल. आता तर कित्येकदा एकमेकांशी बोलण्यासाठीसुद्धा लोक व्हॉट्सॲप, गुगल ड्युओ, स्काईप यांच्यासारखी साधनं वापरतात. साहजिकच ‘आवाज’सुद्धा आता यांसारख्या ‘ॲप्स’मधूनच वाहून नेला जातो.
दूरसंचार तंत्रज्ञानामध्ये होत गेलेल्या बदलांमुळं वर उल्लेख केलेले वापरामधले बदल खरं म्हणजे शक्य होत गेले. अगदी सुरुवातीच्या मोबाइल फोनमध्ये फक्त दोन माणसांनी एकमेकांशी बोलण्याची सोय होती. त्यात ‘डेटा’ची भानगडच नव्हती. याचं मुख्य कारण म्हणजे तेव्हा मोबाइल फोन आणि इंटरनेट ही पूर्णपणे भिन्न तंत्रज्ञानं होती. ती एकमेकांना जोडली गेली नव्हती. साहजिकच मोबाइल फोन वापरून इंटरनेटला जोडलं जाण्याचा प्रश्नच नव्हता. मोबाइल फोनच्या तंत्रज्ञानात आणि क्षमतेत जसजशी वाढ होत गेली, तसतसं या तंत्रज्ञानाचा वापर फक्त आवाजासाठी न करता इंटरनेटच्या ‘डेटा’साठीसुद्धा करता येईल ही कल्पना जन्मली. तोपर्यंत इंटरनेट हे फक्त संगणकांद्वारेच वापरलं जाऊ शकत होतं. मोबाइल आणि इंटरनेट यांची जोडणी शक्य झाल्यावर मात्र बिनतारी मोबाइलद्वारे कुठूनही कुठंही इंटरनेट वापरणं शक्य झालं. त्याचा वेग सुरुवातीला कमी असला तरी ‘थ्री-जी’ त्यानंतर ‘फोर-जी’ अशी तंत्रज्ञानं आली आणि अत्यंत वेगानं आपण मोबाइल फोनद्वारे इंटरनेटचा वापर करायला लागलो. 

इतके दिवस तंत्रस्नेही नसलेले लोकसुद्धा आता कित्येकदा नाईलाजापोटी या तंत्रज्ञानाचा वापर करायला शिकत असल्याचं दिसतं. कोरोना संकटामुळं सगळी कुटुंबं आणि काही माणसं अनेक आठवडे जगापासून जवळपास तोडली गेल्यासारखी झाली. साहजिकच अशा भीषण काळामध्ये मोबाइल आणि इंटरनेट यांचा केवढा आधार सगळ्यांना जाणवतो आहे. कोरोनासारखं संकट २०-२५ वर्षांपूर्वी आलं असतं, तर काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही! एकमेकांशी फोनवर बोलून संपर्क ठेवण्याखेरीज दुसरं काही करता आलं नसतं. तेही जवळपास सगळ्यांकडं फक्त तारांची म्हणजेच ‘लॅंडलाइन फोन’ची सुविधा असल्यामुळं किती जणांशी संपर्कात राहता आलं असतं कुणास ठाऊक? आता मात्र परदेशांमध्ये राहणाऱ्या नातेवाइकांसकट भारतामधल्या असंख्य नातेवाइकांबरोबर लोक व्हॉट्सॲप, स्काईप, फेसबुक, झूम अशा तंत्रज्ञानांचा वापर करून गाण्याच्या भेंड्या, कोडी, विविध गुणदर्शन, गप्पा, कोडी, गेम्स अशा गोष्टींमध्ये पार रंगून गेले आहेत. भौतिक अंतर या सगळ्यामुळं जणू मिटल्यासारखं झालं आहे. कोरोनाची भीषणता यामुळं नक्कीच काही प्रमाणात कमी झालेली आहे. याशिवाय बॅंकांचे व्यवहार, ऑनलाइन खरेदी, महत्त्वाचे निरोप देणं यांसारख्या असंख्य गोष्टीसुद्धा दूरसंचार क्रांतीमुळंच या काळात सुसह्य झालेल्या आहेत. 

आता तर अनेक क्षेत्रांमध्ये ‘ऑनलाइन’चा बोलबाला आहे. कित्येक लोक घरी बसून आपलं कार्यालयीन काम केवळ दूरसंचार क्रांतीमुळंच करू शकले आहेत. आयटीमधल्या लोकांना अर्थातच ते सगळ्यात सहजपणे शक्य होतं; पण इतर अनेक क्षेत्रांमध्येही घरून काम करण्याचा हा नवा पायंडा कोरोनानंतरसुद्धा सुरू राहण्याची शक्यता आहे. टीसीएससारख्या कंपनीनं तर आपण इथून पुढं कायमच आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ७५ टक्के जणांना घरूनच काम करायला सांगणार असल्याचं जाहीर केलं आहे. याचे अनेक चांगले-वाईट परिणाम आपल्याला कोरोनापश्‍चात काळात बघायला मिळतील. उदाहरणार्थ, प्रवासाचा वेळ आणि प्रवासात येणारा शीण यापासून लोकांची सुटका होईल. अर्थातच त्यामुळं प्रदूषण कमी होईल. मोठमोठी कार्यालयं कदाचित लागणार नाहीत आणि त्याचबरोबर वाहतूक कोंडी, वातानुकूल यंत्रणा, वीज, पाणी, इतर सगळ्या व्यवस्था यांच्यावर येणारा ताणही कमी होईल. याच्याच जोडीला हे सगळं सुरू असतं म्हणून किंवा लोक कार्यालयात येऊन काम करतात म्हणून चालत असलेल्या असंख्य उद्योगांचं काय, हा मोठा प्रश्न आहे. व्यावसायिक वापरासाठी विकत घेतल्या गेलेल्या किंवा भाड्यानं दिल्या गेलेल्या जागांची गरज भविष्यात तितक्या प्रमाणात भासेल का, हा प्रश्न आहे. काही जणांच्या मते घरून केलेलं काम फारसं प्रभावी ठरत नसल्यामुळं कंपन्या पुन्हा आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये बोलावून घेतीलच. यामधलं नक्की काय होईल हे आत्ता सांगता येत नसलं, तरी एकूणच ‘वर्क फ्रॉम होम’चं प्रमाण निश्‍चित वाढणार यात शंका नाही. आपोआपच दूरसंचार तंत्रज्ञानाचा आणखी मोठा वापर त्यासाठी होईल. येऊ घातलेलं ‘फाइव्ह-जी’ तंत्रज्ञान, इंटरनेट आणखी वेगवान आणि सुसह्य करणारं असल्यामुळं हे काम अजूनच सुकर होईल.
तीच गोष्ट शिक्षण क्षेत्राची. पुढचे काही महिने आणि त्यानंतर कदाचित अधूनमधून मुलामुलींनी घरबसल्याच आपलं शालेय/महाविद्यालयीन शिक्षण घ्यावं अशी टूम निघत राहील. म्हणजेच शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही अशा प्रकारच्या शिक्षणाची सवय करून घ्यावीच लागेल. खेड्यांमध्ये आणि लोकांना न परवडणाऱ्या ठिकाणी कदाचित काही ठिकाणी जमून दूरस्थ शिक्षण घेण्यासाठीची केंद्र सरकारला उभी करावी लागतील. या सगळ्यामध्ये पुन्हा दूरसंचार क्षेत्राचं महत्त्व अनन्यसाधारण असेल.

काही बाबतींमध्ये तर आपण दूरसंचार क्षेत्रानं घडवलेले बदल आत्तासुद्धा अनुभवतोच आहोत. करमणूक आणि मनोरंजन या क्षेत्रांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये होत गेलेले बदल आता अगदी शिखरावर जाऊन पोचले आहेत. नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ॲमेझॉन प्राइम आणि इतर असंख्य सुविधा वापरून लोकांनी आपली करमणूक करून घेण्याचे मार्गच पूर्णपणे बदलून टाकले आहेत. चित्रपटगृहांमध्ये किंवा नाटकगृहांमध्ये जाऊन संबंधित कलाकृतीचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच असते हे मान्य करूनसुद्धा आता अगदी वैयक्तिक पातळीवर करमणूक करून घेण्याची सोय या साधनांनी आपल्याला करून दिली आहे. भविष्यात याचं प्रमाण आणखी वाढत राहील यात मुळीच शंका नाही. इंटरनेट आणखी वेगवान झालं आणि मोबाइल फोन्स अजून शक्तिशाली झाले, की त्यानंतर प्रत्येक माणसाकडं आपल्या मनोरंजनासाठीचं उपकरण असेल. कधी, कुठं, कसा त्याचा आस्वाद घ्यायचा हे तो माणूस आपल्यापुरता ठरवू शकेल. म्हणजेच ‘कुटुंबानं चित्रपटाला किंवा नाटकाला जाणं’ यांच्यासारख्या कल्पना काहीशा मागं पडतील. सगळ्यांना एकच चित्रपट किंवा नाटक बघण्यात रस नसेल, तर प्रत्येक जण आपापल्या आवडीचं जे असेल ते आपापल्या मोबाइलवर बघू शकतो!

या पार्श्‍वभूमीवर दूरसंचार तंत्रज्ञानाच्या गैरवापराविषयीसुद्धा बोललं पाहिजे. वैयक्तिक पातळीवर बोलायचं तर दूरसंचार सुविधांचा वापर करून बव्हंशी लोक व्हॉट्सॲप, चॅटिंग, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब अशांसारख्या गोष्टींमध्ये दिवसेंदिवस रिकामटेकड्यांसारखे बुडून गेलेले दिसतात. अक्षरश: बिनडोकपणे समोर दिसेल त्यावर विश्वास ठेवणं, ते फॉरवर्ड करणं, अंधश्रद्धा पसरवणं, आपली विचारसरणी इतरांच्या मनावर बिंबवणं, आपलंच म्हणणं खरं करत राहणं इथपासून ते लोकांची सामूहिक निंदानालस्ती करणं अशांसारखे प्रकार आपण वारंवार अनुभवतो. सतत ‘ऑनलाइन’ असल्याचे हे दुष्परिणाम अत्यंत गंभीर आहेत. वैयक्तिक आणि सामूहिक अशा दोन्ही पातळ्यांवर ते विलक्षण घातक आहेत. यामुळेच जगभरातल्या अनेक देशांमध्ये आपली प्रतिमा खोटं बोलत राहून उजळवणारे नेते सर्वोच्च पदांवर जाऊन पोचल्याचं हताश करून सोडणारं दृश्य दिसतं. आपल्या समर्थकांना चेतवत राहणं, खोटा प्रचार करणं या गोष्टी अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते अगदी बेदिक्कतपणे करताना दिसतात. लोकही अक्षरश: बिनडोक असल्यासारखे या सगळ्याला खतपाणी घालत राहतात आणि कसलाही विचार न करता त्यांच्या झुंडी ऑनलाइन विश्‍वात धुमाकूळ घालत राहतात.

याच्या जोडीला दूरसंचार क्षेत्राच्या अफाट प्रगतीमुळं अनेक लोकांना आणि खास करून लहान मुलं, युवक/युवती यांना या तंत्रज्ञानाचं भयंकर व्यसन लागण्याची समस्याही दिसत आहे. तहानभूक विसरून असंख्य लोक सातत्यानं आपल्या ‘स्क्रीन’मध्ये बुडून गेलेले असतात. विनाकारण इंटरनेटवर भटकत राहणं, व्हॉट्सॲपवर बिनकामाच्या संदेशांचा कचरा पसरवत राहणं, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांच्यावरच्या ‘लाइक्स’साठी वाटेल त्या थराला जाणं, दिवसभर ‘स्टोरी’, ‘स्टेटस’ पोस्ट करत किंवा बदलत राहणं हेच आपल्या जीवनाचं सार्थक असल्यासारखं किती तरी लोक वागतात. गेम्सच्या विळख्यानं या पिढीला आपल्या आवाक्यात घेतलेलं आहे. पाठ-कंबर-मान यांची दुखणी, डोकेदुखी, डोळे खराब होणं, शरीराची रचना बदलणं, पुरेसा/योग्य आहार न घेणं, सतत बसून किंवा झोपून ‘स्क्रीन’चा आस्वाद घेणं यामुळं जडणाऱ्या असंख्य व्याधी आणि मनाला आलेलं जडत्व हे मिश्रण भयंकर आहे. एक प्रकारची उदास निष्क्रियता या तरुण-तरुणींच्या डोळ्यांमध्ये आणि देहबोलीमध्ये दिसते. आपलं सगळं कर्तृत्व या सोशल मीडियावरच दाखवायचं असं त्यांना वाटतं. दूरसंचार क्षेत्र आणि मोबाइल फोन्समधल्या सातत्यानं होत असलेल्या सुधारणा यांचा हा परिपाक आहे.
मुळात दूरसंचार क्षेत्र अशा प्रकारचे बदल करून टाकेल हे एका शतकापूर्वी लोकांना स्वप्नवत वाटलं असतं. तेव्हा दूरध्वनी, तारायंत्र यांचा काळ होता. बिनतारी संदेशवहनच मुळात नवं होतं. दोन माणसांमध्ये तार नसताना त्यांच्यात संभाषण होऊ शकतं ही कल्पनाच भन्नाट होती. त्यानंतर एका शतकाचा काळ उलटून गेल्यावर या बिनतारी संदेशवहनाचा वापर करून एक आख्खा चित्रपट काही सेकंदामध्ये जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जाऊ शकतो ही गोष्ट खरोखरच कल्पनेपलीकडची आहे. 

इथून पुढं तर ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी)’ या तंत्रज्ञानामुळं फक्त संगणक आणि मोबाइल्सच नव्हे, तर आपल्या रोजच्या वापरामधली सगळी उपकरणंही इंटरनेटला जोडली जातील आणि एकमेकांशी संवाद साधू शकतील. यातून अशक्यप्राय गोष्टी साध्य होतील. उदाहरणार्थ, आपण घराबाहेर असताना आपल्या बागेमधल्या झाडांच्या मुळांशी असलेल्या आर्द्रतेचं प्रमाण तपासून त्यांना आपोआप पाणी घातलं जाईल. यासाठी तिथं बसवलेले सेन्सर्स इंटरनेटद्वारे आपोआप संदेशवहन करत राहतील. आपल्या घरासमोर काही संशयास्पद हालचाल होत असल्याचं जाणवलं, तर सुरक्षिततेसाठी बसवलेला कॅमेरा आपोआप पोलिसांना कळवून टाकेल आणि आपल्या मोबाइलवर या संदर्भातली अलर्ट पाठवेल. आपल्या शरीरात बसवलेला सेन्सर आपल्या शरीरामधल्या आरोग्याशी संबंधित असलेल्या सगळ्या घटकांची सतत तपासणी करत राहील आणि कुठं काही बिघडल्याचं जाणवलं की लगेचच त्या संदर्भात आपल्याला सावध करेल. गरज पडल्यास तो सेन्सर डॉक्टरांची अपॉइंटमेंटही घेऊन टाकेल. चालकरहित गाड्यांच्या चाचण्या अमेरिकेत सुरू झाल्या आहेतच; काही वर्षांनी अशाच गाड्या सगळीकडं दिसायला लागतील. यासाठी गाड्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर अद्ययावत माहिती लागेल. ही माहिती दूरसंचार यंत्रणाच त्यांना पुरवत राहील. हे फक्त काही नमुने झाले; अशा सगळ्या गोष्टींची यादी केली तर भविष्यातल्या जगाच्या कल्पनेनं आपण थक्कच होऊन जाऊ.

काही जणांना या कल्पनांच्या भराऱ्या वाटत असल्या तरी हे सगळं प्रत्यक्षात अवतरणार हे नक्की आहे. फक्त आपल्या पृथ्वीवरच्या अस्तित्वाच्या काळात हे घडू शकेल का नाही एवढाच प्रश्‍न आहे. विज्ञानकथांमध्ये केलेली कित्येक भाकितं आता प्रत्यक्षात अवतरलेली आपण बघतच असतो. या तर विज्ञानकथाही नाहीत. संगणक, मोबाइल आणि दूरसंचार यांच्या अद्‍भुत तंत्रज्ञानांनी घडवलेला हा चमत्कार आहे!

संबंधित बातम्या