खाद्ययात्रा आंब्यांची

उमाशशी भालेराव
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

आंबा विशेष    

भारतातील सर्वच प्रांतात वेगवेगळ्या जातीचा आंबा पिकतो व तेथील लोक तो आवडीने खातात. पण महाराष्ट्रात मात्र कोकणचा राजा ‘‘हापूस’’ आंबा हाच सर्वांच्या आवडीचा खास आंबा आहे.

उन्हाळा आला की आपण अगदी आतुरतेने आपल्या आवडत्या आंब्याची वाट पाहतो. उन्हाळ्यात कितीही उकाडा वाढला तरी आपण तो सहन करतो. कारण याच ऋतूत आपल्याला आपल्या आवडीचा आंबा खायला मिळतो. आंब्यामुळेच आपल्याला कडक उन्हाळाही सुसह्य होतो. भारतातील सर्वच प्रांतात वेगवेगळ्या जातीचा आंबा पिकतो व तेथील लोक तो आवडीने खातात. पण महाराष्ट्रात मात्र कोकणचा राजा ‘‘हापूस’’ आंबा हाच सर्वांच्या आवडीचा खास आंबा आहे. हापूस नंतर आपल्याला आवडतो ‘‘पायरी’’ आंबा. आमरस बनविण्यासाठी अगदी उत्तम! उन्हाळ्यात वरचेवर ‘आमरस पोळी’ वा ‘आमरस पुरी’चा बेत केला जातो. शिवाय आंब्याचे अनेक पारंपरिक पदार्थ आहेत. आंब्यापासून अनेक पुडींग्ज व डेझर्टस बनवले जातात. कोणत्याही स्वरूपात आंबा मस्तच लागतो.

मॅंगो मिल्क शेक
साहित्य : तीन कप दूध + अर्धा कप क्रीम, १ कप मॅंगो पल्प (आमरस), ४ चमचे साखर, क्रश केलेला बर्फ.
कृती : सर्व साहित्य एकत्र करून मिक्‍सरमधून फिरवून घ्यावे. फ्रीजमध्ये ठेवून थंड करून सर्व्ह करावे.

मॅंगो स्मूदी
साहित्य : तीन पिकलेल्या हापूस आंब्याच्या फोडी (फ्रीझरमध्ये ठेवून थंड करून घेणे), एका आंब्याच्या फोडी सजावटीसाठी, तीन कप थंड दूध, सहा टेबल स्पून थंड दही, ८ टेबल स्पून साखर, १०-१२ बर्फाचे खडे क्रश करून घेणे.
कृती : सजावटीसाठी असलेल्या आंब्याच्या फोडी सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करून मिक्‍सर वा ब्लेंडरमधून घुसळून घेणे. प्रत्येकाच्या ग्लासमध्ये ही स्मूदी ओतून त्यावर सजावटीसाठी थोड्या थोड्या आंब्याच्या फोडी घालून थंडगार सर्व्ह करावे.

मॅंगो लस्सी
साहित्य : एक कप मॅंगो पल्प (घट्ट आमरस), ३ कप दही, ४ चमचे साखर (आवडीप्रमाणे कमी अधिक), ४ चमचे चॉकलेट सॉस, थोडा सुकामेवा, १०-१२ बर्फाचे खडे क्रश करून घेणे. 
कृती : मॅंगो पल्प व साखर एकत्र मिक्‍सरमध्ये घुसळून घेणे. नंतर त्यात दही घालून पुन्हा घुसळावे. नंतर क्रश केलेला बर्फ घालून पुन्हा घुसळून घ्यावा. प्रत्येकाच्या ग्लासला आतल्या बाजूने कडेकडेने चॉकलेट सॉस लावावा. (ऐच्छिक) नंतर ग्लासमध्ये लस्सी ओतावी. वरती काजू, बदाम, पिस्ते यांचे काप घालून व आंब्याच्या फोडींनी सजवून सर्व्ह करावे.

आंबा श्रीखंड (जरा हटके)
साहित्य : दोन वाट्या चक्का, २ वाट्या साखर, २ वाट्या आंब्याच्या फोडी.
कृती : दोन वाट्या चक्का व दोन वाट्या साखर एकत्र कालवून ठेवावे. नंतर श्रीखंड पात्रातून गाळून घ्यावे. श्रीखंड पांढरेच ठेवावे. आंब्याचाच स्वाद यावा म्हणून दुसरा कोणताही स्वाद मिसळू नये. आंब्याच्या भरपूर फोडी त्यात मिसळाव्यात. प्रत्येक घासात श्रीखंडाबरोबर आंब्याची फोड यायला हवी. नेहमीच्या आम्रखंडापेक्षा हे श्रीखंड वेगळे दिसते व मस्त लागते.

आंब्याचा भात
साहित्य : दोन वाट्या बासमती तांदूळ, २ वाट्या आंब्याचा रस + २ वाट्या पाणी, १ वाटी हापूस आंब्याच्या फोडी, अडीच वाट्या साखर, १ वाटी खवलेला ओला नारळ (ऐच्छिक), ४ लवंगा, ४ वेलदोडे, १ दालचिनीचा तुकडा, साजूक तूप ४ चमचे, १ चमचा लिंबाचा रस.
कृती : तांदूळ दोन तास आधी धुवून निथळून ठेवावेत. नंतर ४ चमचे तुपात दालचिनीचा तुकडा व लवंग वेलदोडे घालून परतावे. नंतर तांदूळ घालून थोडे परतावे. २ वाट्या आमरस व २ वाट्या पाणी एकत्र करून गरम करून घ्यावे व तांदळावर ओतावे. हा भात कुकरमध्ये अथवा वरतीच गॅसवर मोकळा शिजवून घ्यावा. लगेच परातीत ओतून मोकळा करून ठेवावा. छान केशरी रंगाचा व आंब्याच्या स्वादाचा भात तयार होईल. दुसरीकडे एका पातेल्यात अडीच वाट्या साखर व थोडे पाणी घालून दोन तारी पाक करावा. त्यात एक चमचा लिंबाचा रस घालावा व वाटीभर खवलेला नारळ घालावा. नंतर त्यात मोकळा करून ठेवलेला भात घालून पुन्हा मंद आचेवर ठेवून झाकण ठेवून वाफ काढावी. वाढण्यापूर्वी आंब्याच्या फोडी त्यात मिसळून मग सर्व्ह करावे.

आंब्याचा शिरा
साहित्य : दोन वाट्या मध्यम जाड रवा, २ वाट्या आंब्याचा रस + २ वाट्या पाणी, २ वाट्या हापूस आंब्याच्या फोडी, दीड वाटी साखर, ४ टेबल स्पून साजूक तूप.
कृती : साजूक तुपावर रवा छान खमंग भाजून घ्यावा. त्याचवेळी दुसरीकडे आमरसात पाणी मिसळून उकळण्यास ठेवावे. रवा भाजून झाल्यावर हे आंबामिश्रित पाणी त्यावर ओतून मंद आचेवर रवा शिजवून घ्यावा. नंतर त्यात साखर मिसळून पुन्हा नीट ढवळून मंद आचेवर शिजवावे. नंतर झाकण ठेवून वाफ काढावी. केशरी रंगाचा हा आंबा शिरा छान मोकळा होईल. नंतर त्यात आंब्याच्या अर्ध्या फोडी मिसळाव्यात. शिरा बाऊलमध्ये काढल्यावर उरलेल्या आंब्याच्या फोडीने सजवून सर्व्ह करावे.

आंबा सांज पोळी
कृती : वरील प्रमाणे आंब्याचा शिरा करून घ्यावा. शिरा मोकळा न होता मऊ होण्यासाठी आमरसाचे प्रमाण थोडे वाढवावे. नंतर मऊ झालेला हा शिरा थंड झाल्यावर पुरणपोळीप्रमाणे पुरणाऐवजी हे सारण भरून पोळी लाटावी. दोन्ही बाजूने साजूक तूप सोडून छान खरपूस भाजून गरम गरम वाढावी. 

मॅंगो मालपोवा विथ मॅंगो रबडी
साहित्य : दीड कप गव्हाचे पीठ, १ मोठा चमचा मैदा, १ टीस्पून बडीशेप, १ टीस्पून पिठीसाखर, १ कप मॅंगो पल्प, १ वाटी साखर+ २ वाट्या पाणी (पाकासाठी)
कृती : गव्हाचे पीठ, मैदा, बडीशेप व पिठीसाखर एकत्र करून थोडे पाणी घालून एकजीव करावे. त्यात मॅंगोपल्प मिसळावा. हे मिश्रण डोशाच्या पिठाइतके पातळ असावे. १५ मिनिटे ठेवावे. नंतर तेल तापवून डावाने थोडे थोडे मिक्‍सर घालून पुरीच्या आकाराचे मालपोवा तळून घ्यावे. लालसर झाले की काढावे. दुसरीकडे १ वाटी साखर व २ वाट्या पाणी मिसळून एकतारी पाक करावा व त्यात एक एक मालपोवा घालून लगेच पाकातून काढून बाजूला ठेवावा. रबडीसाठी १ कप दूध व अर्धा कप कंडेन्स मिल्क एकत्र करून त्यात अर्धा कप मॅंगो पल्प मिसळावा. ही रबडी मॅंगो मालपोवावर घालून त्यावर सुकामेवाचे काप घालून सर्व्ह करावे.

आंबा फिरणी
साहित्य : दीड वाटी तांदळाचा रवा, २ वाट्या साखर, १ लिटर दूध, १ वाटी मॅंगो पल्प, सजावटीसाठी काजू, बदाम, पिस्त्याचे काप व थोड्या आंब्याच्या फोडी. 
कृती : दूध तापत ठेवावे. उकळी आल्यावर त्यात तांदळाचा रवा घालावा व नंतर थोड्या वेळाने साखर घालावी. सतत ढवळावे. शिजून घट्ट झाल्यावर व थंड झाल्यावर त्यात मॅंगो पल्प मिसळावा. हे मिश्रण काचेच्या वा चिनी मातीच्या खोलगट डिशमध्ये काढून त्यावर आंब्याच्या फोडी व सुकामेवाच्या कापांनी सजावावे. फ्रीजमध्ये ठेवून थंड करून मग सर्व्ह करावे.

मॅंगो पॅनकेक विथ मॅंगो सॉस
साहित्य : एक वाटी कणीक अथवा मैदा, २ अंडी, गरजेप्रमाणे दूध, ३ टेबल स्पून साखर, १ टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून व्हॅनिला इसेन्स, १ हापूस आंब्याच्या अगदी बारीक चिरलेल्या फोडी, बटर.
कृती : अंडी फोडून फेटून घ्यावीत. त्यात कणीक, साखर, बेकिंग पावडर व इसेन्स घालून सर्व एकत्र व्यवस्थित ढवळून घ्यावे. त्यात गरजेप्रमाणे हळूहळू दूध घालून सरसरीत भिजवावे. त्यात बारीक चिरलेल्या आंब्याच्या फोडी घालाव्यात. नॉनस्टिक पॅनवर थोडे बटर घालून जाडसर छोटे छोटे (पुरीएवढे) पॅनकेक बनवावेत. (पॅनकेक उत्तप्पाप्रमाणे जाड असतात). खालून लालसर झाल्यावर उलटावे. बटर घालून दोन्ही बाजूंनी छान लालसर करून घ्यावेत. मॅंगो सॉससाठी १ वाटी आमरस, पाव वाटी साखर व अर्धी वाटी क्रीम एकत्र फेटून सॉस तयार करावा व पॅनकेकवर हा सॉस घालून सर्व्ह करावे.

मॅंगो सूफ्ले
साहित्य : दीड टीस्पून जिलेटिन पावडर, ६ टेबल स्पून साखर, दोन कप मॅंगो पल्प (आमरस), १ कप क्रीम, सजावटीसाठी एक आंब्याच्या फोडी.
कृती : पाव कप गरम पाण्यात दीड टीस्पून जिलेटिन पावडर घालून विरघळून घ्यावी. आमरस व साखर एकत्र गरम करून साखर विरघळून घ्यावी. नंतर त्यात जिलेटीनचे मिश्रण हळूहळू मिसळावे. हे सर्व मिश्रण थंड करून घ्यावे. हे मिश्रण थोडे घट्ट होईल. नंतर क्रीम फेटून घ्यावे. आंब्याचे घट्ट झालेले मिश्रणही फेटून घ्यावे. त्यात फेटलेले क्रीम घालून एकजीव करावे. सर्व मिश्रण बाऊलमध्ये काढून त्यावर आंब्याच्या फोडींची सजावट करावी. फ्रीजमध्ये ३-४ तास ठेवावे. सर्व्ह करण्यापूर्वी १५ मिनिटे फ्रिजरमध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करावे.

मॅंगो ब्रेड डिलाइट
साहित्य : एक मोठा ब्रेड, ४ हापूस आंब्याच्या फोडी, गरजेप्रमाणे दूध, साखर व बटर.
कृती : ब्रेड स्लाईसेसना लोणी लावून त्यावर साखर नीट भुरभुरून ठेवावी. ब्रेडचे सर्व तुकडे भिजतील इतके दूध घालून ब्रेड भिजवून घ्यावेत व जरा कुस्करून घ्यावेत. बेकिंग डिशमध्ये लोण्याचा हात लावून प्रथम ब्रेडचा थर द्यावा. त्यावर थोड्या आंब्याच्या फोडी पसराव्यात. पुन्हा ब्रेडचा थर, पुन्हा आंब्याचा थर द्यावा. शेवटचा थर ब्रेडचा असावा. ओव्हनमध्ये १८० अंशावर ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यावे. गरम वा गार सर्व्ह करावे. आवडल्यास सर्व्ह करताना थोडे क्रीम घालून सर्व्ह करावे.

मॅंगो जेली कस्टर्ड
साहित्य : मॅंगो फ्लेवर जेली एक पाकीट, व्हॅनिला फ्लेवर कस्टर्ड पावडर २ मोठे चमचे, साखर ४ मोठे चमचे, दूध अर्धा लिटर, गरजेप्रमाणे क्रीम, २ हापूस आंब्याच्या फोडी (अंदाजे दोन कप).
कृती :  पाकिटावर दिलेल्या सूचनेप्रमाणे जेली बनवून घ्यावी व फ्रीजमध्ये सेट होण्यास ठेवावी. दूध, साखर एकत्र उकळण्यास ठेवावे. २ मोठे चमचे कस्टर्ड पावडर थोड्या थंड पाण्यात कालवून उकळत्या दुधात घालावे. सतत ढवळत शिजवावे. म्हणजे गाठी होणार नाहीत. घट्ट बासुंदीप्रमाणे झाले की गॅसवरून उतरवून थंड करून घ्यावे. सेट झालेल्या जेलीवर आंब्याच्या अर्ध्या फोडी ठेवून त्यावर गार झालेले कस्टर्ड ओतावे. सर्व नीट पसरून त्यावर उरलेल्या आंब्याच्या फोडी नीट सजवून ठेवाव्यात फ्रीजमध्ये ठेवावे. सर्व सेट झाल्यावर सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर क्रीम घालावे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या