`फाल्कन हेवी'चे यशस्वी उड्डाण

वैभव पुराणिक, लॉस एंजलिस
शुक्रवार, 9 मार्च 2018

कव्हर स्टोरी
टेस्ला कंपनीचा मालक इलान मस्क याने रोडस्टर ही कार थेट अंतराळात पाठवून एक अचाट प्रयोग केला. सर्व जगाला विस्मयचकित हा प्रयोग नेमका कसा करण्यात आला. याविषयी...

सहा फेब्रुवारी हा दिवस अंतराळ संशोधनाच्या इतिहासात नोंदवला जाईल. या दिवशी इलान मस्कच्या स्पेस एक्‍स कंपनीने आपले फाल्कन हेवी हे रॉकेट चाचणीसाठी अंतराळात पाठवले. आजमितीला जगात कुठल्याही रॉकेटची ६४ मेट्रिक टन वजन वाहून नेण्याची क्षमता नाही. नासाच्या ‘सॅटर्न ५’  या रॉकेटची क्षमता फाल्कन हेवीपेक्षा जास्त होती. पण आज ते रॉकेट वापरात नाही. तसेच ते रॉकेट नासा या अमेरिकन सरकारी संस्थेने बनवलेले होते. परंतु आजपर्यंत कुठल्याही खासगी कंपनीने एवढ्या मोठ्या क्षमतेचे रॉकेट अंतराळात पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. जे अनेक बलाढ्य राष्ट्रांच्या सरकारांनाही जमले नाही, ते इलान मस्कच्या ‘स्पेस एक्‍स’ या कंपनीने करून दाखवले आहे!

इलान मस्क कुठलीही गोष्ट साधेपणाने करत नाही. या रॉकेटची चाचणी करण्यासाठी त्याने आपली ‘टेस्ला रोडस्टर’ ही गाडीच अंतराळात पाठवली ! सर्वसाधारणतः जेव्हा एखाद्या नवीन रॉकेटची चाचणी घेतली जाते तेव्हा त्यात एक मोठा काँक्रीटचा ठोकळा घालण्यात येतो. पण इलान मस्कला ते आवडले नाही. त्याने त्याऐवजी आपली एक जुनी गाडीच पाठवायचे ठरवले! या गाडीमध्ये ड्रायव्हरच्या जागी एक अंतराळवीरांचा पुतळा बसवण्यात आला आहे. आणि या अंतराळवीराला नावही देण्यात आले आहे - ‘स्टारमन’. डेव्हिड बोवी नावाच्या गायकाचे स्टारमन नावाचे प्रसिद्ध गाणे आहे.  १९७२ च्या या गाण्यावरून या पुतळ्याचे नाव ‘स्टारमन’ ठेवण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर या गाडीच्या डॅशबोर्डवर सुप्रसिद्ध ‘हिचहायकर्स गाइड टू. द गॅलॅक्‍सी’ या पुस्तकातील एक वाक्‍यही छापून ठेवले आहे. ‘डोंट पॅनिक!‘.  कारच्या सर्किट बोर्डवर ‘ऑन अर्थ बाय ह्यूमन्स‘ - पृथ्वीवर मानवाने बनवलेले - असेही लिहून ठेवले आहे! आणि इतकेच नव्हे तर कारमध्ये एक सीडी ठेवण्यात आली असून त्या सीडीमध्ये इझाक आसिमॉव्ह या प्रसिद्ध विज्ञानकथा लेखकाची पुस्तके डिजिटल स्वरूपात मुद्रित करण्यात आली आहेत! अनेक अमेरिकन प्रसारमाध्यमांनी या गाडीचे, त्यातील स्टारमनचे आणि त्या वाक्‍याचे रसभरीत वर्णन छापले आहे. या कारमध्ये कॅमेराही लावला असून रॉकेट अंतराळात उड्डाण करत असताना कारमधील दृश्‍याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले! यातूनच आपली दुसरी कंपनी टेस्लाची जाहिरात करण्यातही इलान मस्क यशस्वी झाला आहे. 

फाल्कन हेवीची चाचणी अनेक वेगवेगळ्या गोष्टींमुळे वैशिष्ट्यपूर्ण व ऐतिहासिक ठरली आहे. वर उल्लेखल्याप्रमाणे आजमितीला जगात वापरात असलेल्या रॉकेटपैकी हे सर्वांत मोठे व सर्वांत शक्तिशाली रॉकेट आहे. ते २३० फूट (७० मीटर) उंच असून उड्डाण करतेवेळी ते ५० लाख पाऊंड थ्रस्ट ( दाब) तयार करते. जवळ जवळ ६४ मेट्रिक टन वजन ते वाहून नेऊ शकते. भारताचे सर्वांत मोठे रॉकेट जीएसएलव्ही मार्क- ३ फक्त ४ मेट्रिक टन वजन वाहून नेऊ शकते. (ही तुलना करण्यामागे फक्त स्पेस एक्‍सच्या ऐतिहासिक यशाची वाचकांना कल्पना यावी एवढाच हेतू आहे. भारत भविष्यात मोठे रॉकेट बनवेल यात मला शंका नाही.)  फाल्कन हेवी रॉकेटला ३ बूस्टर बसवण्यात आले आहेत. अनेक वेळा बूस्टरला बूस्टर रॉकेट अथवा रॉकेटचे इंजिन असेही म्हटले जाते. रॉकेटला प्रचंड वेगाने अंतराळात घेऊन जाण्यासाठी या इंजिनांचा वापर केला जातो. रॉकेट बनवण्यासाठी लागणाऱ्या  एकूण खर्चापैकी बहुतेक खर्च बूस्टरवरच केला जातो. त्यामुळे स्पेस एक्‍सने या बूस्टरना पुन्हा वापरता येण्याजोगे बनवले आहे. नासाच्या रॉकेटमधील बूस्टर, रॉकेटच्या पेलोड (उपग्रह किंवा कार) ठेवलेल्या यानापासून वेगळे होऊन समुद्रात कोसळत असत. ते मग फेकून दिले जात असत. नासाने जेव्हा ‘स्पेस शटल’ बनवली तेव्हा पुन्हा वापरता येण्याजोगे बूस्टर बनवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यात ते अंशतः: यशस्वीही झाले. स्पेस शटलवरील बूस्टर समुद्रात कोसळत असत. त्यावर पुन्हा काम करून, त्यातील काही भाग बदलून मग ते पुन्हा वापरता येत. त्यावर काम करण्यासाठी बराच खर्च होई. परंतु त्यांच्यापेक्षा स्पेस एक्‍सचे यश नक्कीच मोठे आहे. स्पेस एक्‍सने या आधी एक वर्षापूर्वी आपल्या फाल्कन ९ रॉकेटमधील बूस्टर सुरक्षितपणे पृथ्वीवर लॅंड करून दाखवला. आणि हा बूस्टर समुद्रात कोसळला नाही, तो अलगदपणे समुद्रातील बार्जवर उतरला. आतापर्यंत एकवीस फाल्कन, ९ बूस्टर स्पेस एक्‍सने सुरक्षितपणे उतरवून दाखवले आहेत. फाल्कन हेवीच्या ३ बूस्टरपैकी दोन बूस्टर अलगदपणे पृथ्वीवर सुखरुपपणे उतरले. तिसऱ्या बूस्टरमधील इंजिन सुरू न झाल्याने तिसरा बूस्टर मात्र समुद्रात लॅंड होण्याच्या जागेच्या जवळपास कोसळला. तो बूस्टर बहुधा पुन्हा वापरता येणार नाही. आणि अशा प्रकारे बूस्टरचा पुन्हा वापर करता आल्याने फाल्कन हेवी वापरून उपग्रह किंवा इतर काही अवकाशात सोडण्यासाठी फक्त ९ कोटी डॉलर्सचाच खर्च येईल. नासाला अशा प्रकारच्या मिशनसाठी यापेक्षा जवळजवळ ३ पट जास्त खर्च येई. त्यामुळे स्पेस एक्‍सने नुसतेच मोठे रॉकेट बनवलेले नाही तर या रॉकेटचा वापर करून अवकाशात जाण्याच खर्चही प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी केला आहे.

फाल्कन हेवीच्या जास्त वजन उचलण्याच्या क्षमतेमुळे मोठे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी अथवा अनेक लहान उपग्रह एकत्र अवकाशात सोडण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. अमेरिकन एअर फोर्सला सुरक्षिते संबंधित मोठे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी फाल्कन हेवीचा वापर होऊ शकतो. त्यासाठी लागणारे सर्टिफिकेशन आपण करणार असल्याचे स्पेस एक्‍सने जाहीर केले आहे. अमेरिकन एअरफोर्सने स्पेस एक्‍स कंपनीच्या लहान रॉकेटला - ‘फाल्कन ९’ ला आधीच प्रमाणित केले आहे. त्यामुळे फाल्कन हेवीला प्रमाणित करण्यासाठी काही अडचण येईल असे मला वाटत नाही. प्रमाणित झाल्यावर एअर फोर्स फाल्कन हेवीचा वापर सुरू करू शकतो. त्याव्यतिरिक्त काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार तीन खासगी कंपन्यांनी आपले उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी फाल्कन हेवीचा वापर करण्याचे ठरवले आहे. गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस इलान मस्कने आपण फाल्कन हेवीचा वापर दोन व्यक्तींना चंद्राभोवती फिरवण्यासाठी करणार असल्याचे म्हटले आहे. स्पेस एक्‍स सध्या ‘ड्रॅगन’ नावाचे अंतराळवीरांना वाहून नेऊ शकणारे यान बनवण्यात गुंतले आहे. ‘ड्रॅगन’ हे नुसते अंतराळयान आहे. त्याला अंतराळात घेऊन जाण्यासाठी रॉकेटची आवश्‍यकता असते. फाल्कन हेवीचा त्यासाठी वापर केला जाईल. ड्रॅगन कॅप्सूलचा वापर सध्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला रसद पुरवण्यासाठी केला जातो. या कामाकरिता स्पेस एक्‍स आपले ‘फाल्कन ९’ हे छोटे रॉकेट वापरते. ड्रॅगनमध्ये अंतराळवीरांना वाहून नेण्यासाठी आवश्‍यक असलेले बदल मात्र अजून पूर्ण झालेले नाही. ते  २०१८ च्या अखेरीपर्यंत पूर्ण होतील असे स्पेस एक्‍सला वाटत आहे.

इथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्‍यक आहे की फाल्कन हेवीपेक्षाही जास्त वजन वाहून नेऊ शकणारे नवीन रॉकेट बनवायचे स्पेस एक्‍सने आधीच ठरवले आहे. इलान मस्कने त्याला मजेशीर नावही दिले आहे. ‘बीएफआर’ या रॉकेटचा उल्लेख ‘बीएफआर’ म्हणून सर्वत्र करणे त्याने सुरूही केले आहे. २०२२ पर्यंत या रॉकेटची अंतराळ चाचणी घेऊ असेही त्याने जाहीर केले आहे. या रॉकेटची माल वाहून नेण्याची क्षमता १३० मेट्रिक टन एवढी असेल! म्हणजेच फाल्कन हेवीच्या बरोब्बर दुप्पट वजन ते वाहून नेऊ शकेल. या रॉकेटचा वापर करून त्याला मंगळावर अनेक लोकांना एकत्र घेऊन जाण्याचा विचार आहे. एकावेळी शंभर लोकांना मंगळावर घेऊन जाऊन तिथे मानवाची वसाहत करण्याचे इलान मस्कचे स्वप्न आहे. फाल्कन हेवीच्या एका उड्डाणाला ९ कोटी डॉलर्स खर्च येतो तर ‘बीएफआर’च्या उड्डाणाचा खर्च त्याच्यापेक्षाही कमी करण्याचा इलान मस्कचा मानस आहे.

फाल्कन हेवीच्या यशस्वी उड्डाणामुळे मात्र अमेरिकेत एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकन सरकारची अंतराळ संशोधन संस्था सध्या ‘स्पेस लाँच सिस्टिम’ नावाचे रॉकेट बनवण्यात गुंतली आहे. या रॉकेटचा वापर करून अमेरिकेचा पुन्हा एकदा चंद्रावर पाऊल ठेवण्याचा मानस आहे. या रॉकेटची क्षमता  १३० मेट्रिक टन एवढी असेल. याच्या प्रत्येक उड्डाणाला चक्क एक अब्ज डॉलर्स इतका खर्च होईल! फाल्कन हेवीच्या यशस्वी उड्डाणामुळे अनेक लोकांना ‘बीएफआर’ रॉकेट प्रत्यक्षात येईल असे वाटत आहे.  आणि त्यातून ते नासाच्या ‘स्पेस लाँच सिस्टिम’च्या आधी बनेल व त्याच्या उड्डाणाचा खर्च स्पेस लाँच सिस्टीमच्या दहा पटीने कमी असेल असाही विश्वास अनेकांना वाटत आहे. मग अमेरिकन सरकारने स्पेस लाँच सिस्टिम बनवण्यात पैसे खर्च का करावेत असा प्रश्न काही लोक आता विचारायला लागले आहेत. हा पैसा लोकांच्या (करदात्यांच्या) खिशातून खर्च होत आहे. इलान मस्क आपले रॉकेट बनवण्यासाठी संपूर्णपणे खासगी गुंतवणूकदारांचे पैसे वापरत आहे. त्यातूनही वर उल्लेखलेला खर्च हा फक्त एका उड्डाणाचा खर्च आहे. स्पेस लाँच सिस्टीमच्या संपूर्ण उपक्रमावरील खर्च ३५ अब्ज डॉलर्सच्या घरात जाईल असे म्हटले जाते. या उलट इलान मस्कने फाल्कन हेवी रॉकेट फक्त ५० कोटी डॉलर्समध्ये बनवले आहे! त्यामुळे नासाचा खर्च कमी करून स्पेस लाँच सिस्टिम उपक्रम रद्द का करू नये असा प्रश्न आता लोक विचारायला लागले आहेत. 

चार ऑक्‍टोबर १९५७ ला रशियाने ‘स्पुटनिक’ उपग्रह अवकाशात सोडला आणि अमेरिकन जनता खडबडून जागी झाली. रशियाने अंतराळ संशोधनात अमेरिकेवर मात केली हे स्पष्ट झाले. अमेरिकन जनता व सरकार डिचवले गेले. याच रॉकेटचा वापर करून रशिया युरोप व अमेरिकेवर अण्विक बॉम्बही टाकू शकेल असे अमेरिकन सरकारला वाटले. आणि म्हणूनच अमेरिकेने रशियापेक्षाही जास्त मोठा अंतराळ संशोधन उपक्रम हाती घेतला. त्यापुढील कित्येक वर्षे अमेरिका व रशिया एकमेकांपेक्षा जास्त शक्तिशाली रॉकेट बनवण्याचा प्रयत्न करत राहिले. अमेरिकेला यात सर्वांत जास्त यश मिळालं. अमेरिकेने १९६९ मध्ये चंद्रावर पाऊल टाकण्यात यश मिळवले.  रशियाला अखेर तो नाद सोडून द्यावा लागला. इतिहासात आता या चढाओढीला ‘स्पेस रेस‘ असे नाव मिळाले आहे.  इलान मस्कच्या स्पेस एक्‍सने आता एक नवीन प्रकारची स्पेस रेस सुरू केली आहे. यात कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त शक्तिशाली रॉकेट बनवण्याची चढाओढ लागली आहे. सध्यातरी इलान मस्क त्यात पुढे आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या