दुग्ध व्यवसायातून आर्थिक स्वयंपूर्णता

विकास जाधव, सातारा    
सोमवार, 31 मे 2021

कव्हर स्टोरी

शेतमालास अपेक्षित किंमत मिळत नसल्याने अडचणीत येणाऱ्या शेतीला पर्याय म्हणून अनेक शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. मात्र पूरक म्हणून सुरू केलेल्या दुग्ध व्यवसायाने अनेक शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण केले आहे. सातारा जिल्ह्यातील राजाळे येथील संदीप ज्ञानदेव पवार यांचाही प्रवास असाच आहे. दोन गाईंपासून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय संदीप यांनी आता तब्बल पन्नास गाईंवर नेला असून, सध्या ते दिवसाकाठी अडीचशे ते पावणेतीनशे लिटर दूधउत्पादन घेत आहेत.  

दुधाचे सर्वाधिक उत्पन्न घेणारा तालुका म्हणून सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याची ओळख आहे. शेतीला पूरक म्हणून अनेक शेतकरी गाईंचे संगोपन करतात. फलटण तालुक्यातील राजाळे गावचे प्रगतशील शेतकरी संदीप ज्ञानदेव पवार यांचीही कथा काहीशी अशीच आहे. शिक्षणातला दहावीचा टप्पा पार केल्यानंतर संदीप यांनी नोकरी करायची नाही असे ठरवत शेती व दूध व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. २००३मध्ये त्यांनी साध्या पद्धतीने गोठ्याची उभारणी करून दोन गाईंवर व्यवसाय सुरू केला. त्याच्या जोडीला स्वतःच्या अडीच एकर क्षेत्रात चारा पिकाबरोबर ऊसही घेण्यास सुरुवात केली.

व्यवसायाचा विस्तार
दुधाच्या व्यवसायात कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची क्षमता असल्याचा विश्वास वाटल्याने त्यांनी व्यवसायाचा विस्तार सुरू केला. तीन वर्षांत गाईंची संख्या दहावर गेली. दरम्यान ‘गोविंद डेअरी’चे तत्कालीन कार्यकारी संचालक गणपतराव धुमाळ व जनरल मॅनेजर शांताराम गायकवाड यांनी संदीपना मुक्त संचार गोठा करण्याचा सल्ला दिला. कुटुंबातून विरोध होत असतानाही उपलब्ध साधनसामग्रीतून मुक्त संचार गोठ्याची उभारणी झाली. या गोठ्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहाण्याबरोबर कष्टही कमी होण्यास मदत झाली. सध्याच्या सुमारे दहा गुंठे क्षेत्रातल्या अद्ययावत मुक्त संचार गोठ्यामध्ये मोठ्या गाईंसाठी वेगळा विभाग असून लहान कालवडींसाठी वयानुसार तीन स्वतंत्र भाग आहेत. धरा काढण्यासाठी अद्ययावत यंत्रसामग्री तसेच आवश्यक सर्व साहित्य बसवले आहे. जनावरांच्या पौष्टिक चाऱ्यासाठी हायड्रोपोनिक तसेच अॅझोलाची निर्मिती केली जाते. त्यांच्या या आदर्श गोठ्यास आतापर्यंत राज्याच्या विविध भागातील चाळीस ते पन्नास हजार लोकांनी भेट दिली आहे.   

व्यवसायातून प्रगती
दुधाचे दर कमी जास्त झाले तरी व्यवसायावरील निष्ठा कमी न होऊ देता भांडवली खर्च कमी करत उत्पन्न वाढविण्यावर भर दिला. यातून पवार यांनी कुटुंबासाठी होणाऱ्या दैनंदिन खर्चाबरोबर आवश्यक असणारी कामेही केली आहेत. निव्वळ दुग्ध उत्पादनातून त्यांनी सर्व सोयींसह एक टुमदार घर बांधले आहे. त्याचबरोबर चारचाकी वाहन आणि शेतकामासाठी टॅक्ट्ररचीही खरेदी केली आहे. स्वतःच्या अडीच एकर क्षेत्राबरोबरच खंडाने करायला घेतलेल्या गावातल्याच जमिनीवर गाईंसाठी चारा पिकाबरोबर उसाचेही उत्पादन घेतले जाते. तरुणांनी नोकरीच्या न मागे लागता योग्य नियोजनातून दुग्ध व्यवसाय केल्यास कुटुंबाच्या उदरनिर्वाहसह जीवनात आवश्यक असणाऱ्या सर्व गरजा पूर्ण करण्याची क्षमता 
या व्यवसाय असल्याचे पवार सांगतात. 

संबंधित बातम्या