अंटार्क्टिकवर आश्चर्यकारक तापमानवाढ 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 2 मार्च 2020

कव्हर स्टोरी
 

जागतिक तापमानवाढीचा जोरदार फटका आता अंटार्क्टिक खंडाला बसू लागला आहे. तिथल्या तापमानाने आत्तापर्यंतच्या काळात पहिल्यांदाच २० अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे. अंटार्क्टिकवरील सेमूर द्वीप या भागात असलेल्या मारामबिओ संशोधन स्थानकावर ९ फेब्रुवारीला २०.७५ अंश सेल्सिअस इतक्या उच्चतम तापमानाची नोंद झाली. याआधीचे उच्च तापमान इथल्या साईनी बेटावर १९८२ मध्ये नोंदविले गेले आहे. ही तापमानवाढ आश्चर्यकारक असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. अंटार्क्टिकवरील एस्परांज बेटावरील अर्जेंटिनाच्या संशोधन केंद्रावर या वर्षी सहा फेब्रुवारी रोजी १८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे वृत्त ब्रिटममधील ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने दिले होते. अंटार्क्टिकातील अत्यंत दूरच्या भागातील संशोधन केंद्रांवर दर तीन दिवसांनी तापमान नोंदविले जाते. जागतिक हवामान संघटनेचे (World meteorological organaisation) प्रवक्ते क्लेअर नेलिस यांनी १९७९ ते २०१७ या कालावधीत अंटार्क्टिकातील हिमावरण सहा टक्क्यांनी कमी झाल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी जुलै २०१९ मध्ये उत्तर ध्रुवावरील एल्समेअर बेटावरही २१ अंश सेल्सिअस इतके उच्च तापमान नोंदविले गेले होते. 

अंटार्क्टिक खंड हा पृथ्वीवरचा सगळ्यात थंड भूप्रदेश आहे. खंडावरील ‘वोस्टोक’ येथे ३,९०० मीटर उंचीवर उणे ८९ अंश सेल्सिअस इतके न्यूनतम तापमान आढळते. वृष्टीचा विचार करता हा सगळा भूप्रदेश शुष्क आणि कोरडा आहे. वर्षभरात इथे केवळ १६० मिमी वृष्टीची नोंद होते. खंडावरील हिम क्वचितच वितळते, त्यामुळे सगळीकडे बर्फाचे विस्तीर्ण आवरण असते. हिमाच्या प्रचंड दबावामुळे दक्षिण अंटार्क्टिकवरील हिमस्तर (ice shelf) समुद्र सपाटीखाली अडीज किमी धसल्याचे आढळून आले आहे. अंटार्क्टिकवरील बर्फ कमीत कमी चार कोटी वर्षे तरी जुने असावे असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. दीड किमीपेक्षाही जास्त जाडीचे सगळीकडे आढळणारे बर्फाचे आवरण हेच या भूप्रदेशाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. जगातल्या एकूण हिम आवरणापैकी ९० टक्के केवळ अंटार्क्टिकवरच आहे. त्यामुळेच जगातल्या एकूण गोड पाण्यापैकी ७० टक्के याच खंडावर आहे. अंटार्क्टिकवरचे सगळे बर्फ वितळले, तर आजच्या समुद्राची पातळी ६० मीटरने वाढेल इतके बर्फ या खंडावर आहे. अर्थात अंटार्क्टिकचे सगळे बर्फ वितळण्याची शक्यता निदान नजीकच्या भविष्यकाळात तरी अजिबात नाही. 

अंटार्क्टिकवर नोंद झालेले सर्वाधिक म्हणजे १४.५ अंश सेल्सिअस तापमान, होप बे आणि वांडा स्टेशन इथे सर्वांत आधी फार पूर्वी आढळले होते. खंडाच्या अंतर्गत भागात उणे ५७ अंश सेल्सिअस इतके सरासरी वार्षिक तापमान असून किनारपट्टीचे भाग तुलनेने थोडे जास्त उबदार आहेत. किनारपट्टीवर उणे २६ अंश सेल्सिअस तापमान दिसते. दक्षिण धृवावर आजपर्यंत आढळलेल्या सर्वाधिक तापमानाची नोंद उणे १२ अंश आहे. अंटार्क्टिकवर कमी तापमान हे अक्षवृत्त, उंची आणि किनाऱ्यापासूनचे अंतर यावर ठरते. 

पूर्व अंटार्क्टिकचा प्रदेश पश्चिम अंटार्क्टिकपेक्षा त्याच्या समुद्र सपाटीपासून असलेल्या जास्त उंचीमुळे नेहमीच थंड असतो. अंटार्क्टिकच्या द्वीपकल्पिय भागात दरवर्षी १६६ मिमीपेक्षा जास्त वृष्टी होते, तर अंतर्गत भागात दरवर्षी फक्त ५० मिमी वृष्टी होते. या खंडावर होणारी सगळी वृष्टी ‘हिमवृष्टी’ स्वरूपातच होते. अत्यल्प तापमानामुळे इथे आढळणारी निरपेक्ष आर्द्रतासुद्धा खूप कमी असते. अंटार्क्टिकवरच्या नित्याच्या हवेची स्थिती या सर्व गोष्टींमुळे सदैव बदलत असते. 

गेल्या दशकात पूर्व अंटार्क्टिकवरील बर्फाच्या थरात दरवर्षी दोन सेमी या वेगाने वाढ झाली आणि पश्चिम अंटार्क्टिकवरचा थर दरवर्षी नऊ मिमी या वेगाने वितळला. अंतर्गत भागातील हिमस्तर बऱ्याच प्रमाणात स्थिर असल्यामुळे त्याची हालचाल खूपच कमी असते. अंतर्गत भागातील हिमाचे प्रमाण एकूण हिमाच्या ९७ टक्के आहे. अंटार्क्टिकच्या किनारपट्टीवर मात्र सर्वत्र तरंगत्या हिमस्तरांचे साम्राज्य आहे. यांच्या तुटण्यामुळे किंवा वितळण्यामुळे समुद्र पातळीत काहीही बदल होत नाहीत. मात्र, या हिमस्तरात वारंवार बदल होत असतात. १९८९ या वर्षी वॉर्डी आईसशेल्फचा आकार एकाएकी कमी झाला. गेली ६,५०० वर्षे बर्फाने बंद झालेला प्रिन्स गुस्ताव हा प्रवाह १९९५ च्या वर्षात एकदम मोकळा झाला. लार्सन आईसशेल्फचा काही भाग १९९५ च्या जानेवारीत आणि २००१ मध्ये वितळून मागे सरकला. 

अंटार्क्टिकवरील १९५७ पासूनची हवेची निरीक्षणे असे सांगतात, की इथल्या हिमस्तरांचे तापमान एका दशकात एक दशांश अंश सेल्सिअस या वेगाने वाढते आहे. जगभरात होत असलेल्या जीवाश्म इंधनांच्या वापरातून तयार होणाऱ्या हरितगृह वायूंमुळे ही तापमान वाढ होत असल्याचे नासाचे निरीक्षण सांगते. अंटार्क्टिकवरील हवामान बदलाच्या सध्या सुरू असलेल्या अभ्यासातून असेही लक्षात येते आहे, की भविष्यात अंटार्क्टिकवर हिम वितळण्यापेक्षा हिमवृष्टीचे प्रमाण अधिक असेल. किनारी भागातले तापमान वाढत असल्याचे व अंतर्गत भागातले कमी होत असल्याचे दिसत असले, तरी अंटार्क्टिकच्या एकूण प्रदेशात तापमान वृद्धी होत आहे की तापमान घटते आहे हे सांगणे अजूनही कठीणच आहे. 

अंटार्क्टिकवरील वातावरणाच्या वरच्या थरात मात्र सातत्याने बदल होताना दिसून येताहेत. ओझोन थरात सतत घट झाल्यामुळे स्थिरांबराच्या तापमानातही घट झाली असावी. यामुळे दक्षिण ध्रुव प्रदेशातील भोवरा (Polar  Vortex) अधिक कार्यक्षम होऊन अंतर्गत भागातील तापमान घटत असावे. उपलब्ध आकडेवारी असे दर्शविते की हिम आवरणाचा जितका ऱ्हास आर्क्टिकवर झालाय तितका अजूनही अंटार्क्टिकवर झालेला नाही. 

जगातल्या सगळ्या महासागरांच्या सरासरी तापमानात सध्या वाढ होत आहे. समुद्राच्या सातशे मीटर खोलीपर्यंत एक दशांश अंश सेल्सिअसने वाढ जाणवते आहे. अंटार्क्टिकच्या द्वीपकल्पिय भागात समुद्राचे तापमान पाच दशांश अंश सेल्सिअसने वाढल्याचे दिसून आले आहे. पृष्ठीय तापमानात होणाऱ्या या वाढीमुळे हिम आवरणाचे खालचे थरही आता वितळू लागले आहेत. 

अंटार्क्टिकच्या तापमानातील वाढीचा नजीकच्या काळात जाणवू शकेल असा मोठा परिणाम म्हणजे जागतिक सागर पातळीतील वाढ. दरवर्षी तीन मिमी वेगाने ही वाढ होऊ शकते. हिम विलयन क्रियेमुळे जागतिक समुद्रात गोडे पाणी मोठ्या प्रमाणात मिसळून सगळ्या समुद्रांच्या पाण्याची क्षारता कमी होईल. वाढत्या उष्णतेमुळे आणि हिम विलयनामुळे अंटार्क्टिकच्या थंड प्रदेशात कधीही न आढळणारे पक्षी व प्राणी दिसू लागतील. आत्तापासूनच या खंडावरच्या पक्षांच्या काही प्रवृत्तीत बदल होऊ लागल्याचे पक्षीतज्ज्ञांचे निरीक्षण आहे. अंटार्क्टिकवरचे तापमान वाढू लागल्यावर आणि त्यामुळे बर्फ कमी होऊ लागल्यावर अनेक भाग बर्फाच्या आवरणातून मुक्त होतील व खंडावरील खनिजे काढण्याचे प्रयत्नही वाढतील!

अंटार्क्टिकवरील हवामान बदलाचे आकृतिबंध समजण्यासाठी खूप मोठ्या माहितीची अजूनही गरज आहे. अंटार्क्टिकचा एकूण विस्तार पाहता आज निरनिराळ्या देशांच्या इथे असलेल्या संशोधन केंद्रांतून मिळणारी हवामान विषयक माहिती पुरेशी नाही असे प्रकर्षाने जाणवते आहे! अमेरिकेतील बोल्डर, कोलोराडो येथील राष्ट्रीय हिम आणि बर्फ सांख्यिकी केंद्र (NSIDC :National Snow and Ice Data Center) यांनी अंटार्क्टिक खंडावरील हिमाच्या विस्तारात व साठ्यात मोठी वाढ झाल्याचे निरीक्षण २०१५ मध्ये नोंदविले होते. या निरीक्षणानुसार दक्षिण गोलार्धात, उन्हाळ्याच्या कालखंडात, हिम टिकून राहण्याची जी दूरवरची मर्यादा असते त्याहीपेक्षा अधिक अंतरापर्यंत अंटार्क्टिकवरील हिम टिकून शिल्लक राहिले असल्याची नोंद करण्यात आली होती. अशी घटना त्यापूर्वी २००३, २००८ आणि २०१३ मध्येही घडली असली, तरी ६ ऑक्टोबर २०१५ रोजी उपग्रह सर्वेक्षणातून लक्षात आलेला हा सगळ्यात मोठा हिम विस्तार होता. १५ सप्टेंबरच्या दिवशी या भागातील बर्फ साठ्यात फार मोठी वाढ झाल्याचे दिसून आले होतेच. वाढलेल्या हिमसाठ्याचे व हिम मर्यादेतील विस्ताराचे नेमके कारण अजूनही शास्त्रज्ञांना उमगत नसले, तरी यासंबंधी काही महत्त्वाची हवामानशास्त्रीय व पर्यावरणीय कारणे असावीत असे त्यांना नक्की वाटत आहे. काही हिमनद्या अभ्यासकांच्या मते, अंटार्क्टिकवरील वाऱ्यांचे बदलते आकृतिबंध हे हिमविस्ताराचे मुख्य कारण असावे. आर्क्टिकमध्ये एकूण वितळलेल्या बर्फाशी याची तुलना केली, तर असे लक्षात येते की हा विस्तार त्याच्या एक तृतीयांश इतकाच आहे! अंटार्क्टिकवरील हिमसाठे वाढतही असल्याची घटना हे नक्कीच सिद्ध करते, की सर्वत्र हिम विलयन क्रिया सुरूच आहे हे तितकेसे खरे नाही. अंटार्क्टिकवरील हिम पर्यावरणाची क्लिष्टता आणि विविधता अशा घटनांमुळे प्रकर्षाने अधोरेखित होते आहे. 

अंटार्क्टिकभोवती असलेल्या हिमाच्या विस्तृत आवरणामुळे त्यात वास्तविक पाहता जास्त वाढ होण्याची गरज नाही. पण अंटार्क्टिकचा विशिष्ठ भूगोल आणि आकार यामुळे हिम विस्ताराला चालना मिळत असावी. या खंडाभोवती कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही, त्यामुळे वाढलेल्या बर्फाची सीमा खूप दूरपर्यंत सहजपणे पसरू शकते हेही वास्तव आहेच. अंटार्क्टिकच्या दक्षिण अमेरिकेच्या दिशेने जाणाऱ्या द्वीपकल्पीय भागात तापमान वाढ होत असून त्याच्या पश्चिमेला बेलिंगशाउनशेन समुद्रातील हिम आक्रसू लागले आहे.

अंटार्क्टिकवरील तापमानवाढीच्या आणि हिम वितळण्याच्या प्रक्रियेविषयी आपल्याला अजूनही पुरेसे ज्ञान अवगत झालेले नाही असे अनेक शास्त्रज्ञांना वाटते. या घटनांतील आकृतिबंध समजण्यासाठी खूप मोठ्या माहितीची अजूनही नक्कीच गरज आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या