गीरच्या हिरकण्या

अपर्णा देसाई, अहमदाबाद
सोमवार, 8 मार्च 2021

कव्हर स्टोरी

पश्चिम गुजरातमधील सुप्रसिद्ध सासण गीर अभयारण्यात चित्र खूप वेगळे आहे. आशियाई सिंहांचे जगाच्या पाठीवरील एकमेव निवास स्थान असा लौकिक असलेल्या या अभयारण्याला नवी ओळख दिली आहे, ती तिथल्या महिला फॉरेस्ट रेंजर्सनी. भारतातील पहिल्या महिला फॉरेस्ट रेंजर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महिलांनी पारंपरिक क्षेत्र सोडून जंगलाची वाट धरली; त्यांनी बघता बघता वन्य प्राण्यांनाही आपलेसे केले, ते शक्तीने नव्हे तर त्यांना सन्मान देऊन...

‘‘सिंह कधीच स्वतःची मर्यादा सोडत नाही बेटा, पण जर माणसाने स्वतःची मर्यादा सोडली तर मात्र सिंह कुणालाही मानत नाही, चवताळतो आणि होत्याचं नव्हतं होतं.’ माझ्या वडिलांच्या तोंडून मी लहानपणी ऐकलेलं हे वाक्य नोकरीनंतर पहिल्यांदा गस्ती दरम्यान अचानक सिंह दर्शन झाल्यावर वीज चमकावी तसं  मनात चमकून गेले,’ सासण गीर जंगलात फॉरेस्टर म्हणून कार्यरत असणाऱ्या गीताबेन रातडीया बोलत होत्या. ‘ती  रात्र माझ्यासाठी खूप निर्णायक होती आणि त्या रात्रीनंतर माझी भीती कायमची निघून गेली. नोकरीच्या सुरुवातीला  सासण गीरमधील कमलेश्वर  रेंजमध्ये माझी रात्री गस्तीची ड्युटी होती. मी बाईक घेऊन एकटीच पेट्रोलिंग करत होते आणि माझ्या सोबत असलेले सहकारी थोड्या अंतरावर होते. नोकरीत मला सात वर्षे झाली होती परंतु तोपर्यंत भीती वाटावी असा कुठलाही अनुभव आला नव्हता. मध्यरात्रीची वेळ... मी बाईक घेऊन रस्त्याच्या मधोमध आणि अचानक दोन सिंहिणी त्यांच्या दोन बछड्यांना घेऊन माझ्या समोर. अगदी एक फुटावर. मी वॉकीटॉकीवरून माझ्या सहकाऱ्यांना बोलावू शकेन एवढाही वेळ माझ्याकडे नव्हता. मी पटकन बाईक रस्त्याच्या कडेला घेतली आणि बाइकचा दिवा बंद करून बघितले. पटकन बाईकच्या मागे जाऊन उभी राहिले. कुठलाही आविर्भाव न आणता, न हलता मी तशीच शांत उभी राहिले. मृत्यू समोर दिसत होता पण कुठेतरी सारखं वाटत होतं, उगाच नाही मारणार मला ती. माझ्या वडिलांनी वनखात्यात प्रदीर्घ काळ नोकरी केलेली. त्यामुळे सहज इच्छा झाली म्हणून कुणीही प्राणी माणसावर हल्ला करत नाही यावर त्यांचा पूर्ण विश्वास, किंबहुना हाच अनुभव.. आणि तसेच झाले. अर्ध्या पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर त्या सिंहिणी निघून गेल्या आणि माझ्या जीवात जीव आला,’ गीताबेन बोलत होत्या आणि बोलता बोलता त्यांच्या हातावर आजही रोमांच उभे राहत होते. त्या म्हणतात, ‘त्या रात्री मला या नोकरीतील सगळ्यात मोठे आव्हान समजले, ते म्हणजे संयम टिकवून ठेवणे.’

 गीरमध्ये जन्म झाला असला तरी गीताबेन यांचे बालपण आणि शालेय शिक्षण मामाच्या घरी झाले. खेळात त्यांना खूप रस होता. त्या म्हणतात, ‘शरीरयष्टी खूप धडधाकट नसली तरी मला हुंदडायला खूप आवडायचं.. खूप उत्साह होता.. मी अशा कुटुंबात जन्माला आले होते की जिथे मुलगी जन्माला आल्यावर पहिल्याच वर्षी तिचं लग्न ठरवलं जातं. माझंही लग्न ठरलं. आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ.. परिस्थिती बेताची. वडील वनखात्यात.. माझ्या इतर बहिणींना शिक्षणात फार रस नव्हता, पण मला शिकायची खूप आवड. शिक्षणाचा भर हलका व्हावा म्हणून मला मामाच्या गावी ठेवलं होतं. पण माझ्या वडिलांना खूप वाटायचं की मी मोठं कुणीतरी व्हावं.. वर्दी घालावी.’ त्यांचे वडील त्यांना अनेकदा जंगलात घेऊन जात असत आणि सिंहाच्या स्वभावाच्या वेगवेगळ्या छटा दाखवत असत. असा त्यांचा प्रवास सुरू झाला.

 बीए झाल्यानंतर बीएड केले. त्यांच्या आईची इच्छा होती की त्यांनी शिक्षिका व्हावे म्हणजे घर आणि नोकरी दोन्ही सहज सांभाळता येईल. पण काहीतरी वेगळे करण्याची जिद्द आणि वडिलांचा पाठिंबा यामुळे त्या लग्नानंतर फॉरेस्ट खात्यात रुजू झाल्या आणि वर्दी घातली. त्या म्हणतात, ‘जेव्हा वर्दी घालून मी जंगलात  नोकरीला जाते, तेव्हा माझ्या मुली कौतुकानं म्हणतात की आमची आई सिंहांना पकडते, आम्हाला पण नाही वाटत सिंहांची भीती.’ हे  सांगताना त्यांचे डोळे भरून आले. एकेकाळी  नजर वर करून घरातील मोठ्या मंडळींच्या किंवा अनोळखी लोकांच्या समोर बोलण्याची हिंमत नसलेल्या गीताबेनना वनखात्यातल्या वर्दीने फक्त सन्मानच नव्हे तर आत्मविश्वासही दिला.  

गेल्या पाच वर्षांपासून वनखात्यातील महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते आहे. कधी काळी फक्त चूल आणि मूल सांभाळणाऱ्या या महिला आज परीक्षा उत्तीर्ण होऊन जंगलात प्रवेश करत आहेत व अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत मोठ्या जिद्दीने काम करत आहेत. 

गीर पश्चिम जंगल क्षेत्रात क्षेत्रीय वन अधिकारी म्हणून कामगिरी करत असलेल्या जयश्रीबेन पटाट म्हणतात, ‘दुसऱ्यांना समजून घेणं, संयम आणि संवाद कौशल्य या महिलांना मिळालेल्या देणग्या आहेत, जंगलात काम करताना, खास करून बचाव काम करताना या देणग्यांचा खूप उपयोग होतो.’ जयश्रीबेन गीर भागातच मोठ्या झाल्या आहेत. त्यामुळे बिबट्या, हरिण, सिंह यांचा त्यांना लहानपणापासून परिचय होता. त्यांच्यासाठी आशियाई सिंह म्हणजे माहेरची माणसं. पण त्यांना अत्यंत जवळून सिंहदर्शन झाले ते वन खात्यात रुजू झाल्यानंतरच! त्या सांगतात, की त्यांना खरेतर शिक्षिका व्हायचे होते पण लहानपणापासून कुठेतरी जंगलाशी नाळ जोडली गेली होती. त्यामुळे वन खात्यातील भरतीची जाहिरात वाचली आणि त्यांनी ताबडतोब अर्ज केला. , ‘वन्य प्राण्यांचा सामना करताना त्यांचा  स्वभाव ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. वन्यजीव आणि माणसातल्या संघर्षाच्या घटना वाढताहेत. त्यात बऱ्याचदा दोघांपैकी कुणाचीच चूक नसते, पण चुकीच्या वेळी चुकीची कृती केल्यामुळे अपघात होतात. बचाव कामगिरीमध्ये लोकांचा आक्रोश व वन्य प्राण्याचे आक्रमक वर्तन, या दोन्ही गोष्टी हाताळताना खूप आव्हानात्मक वाटायचे. पण अशा वेळी संयम राखणे आणि परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लोकांना आवरणे खूप महत्त्वाचे असते. अशा वेळी सगळ्यांना सामावून घेण्याची आणि सगळ्यांना धरून चालण्याच्या महिलांच्या अंगभूत कौशल्यांचा खूप उपयोग होतो.’ असे त्या सांगतात. त्या पुढे म्हणतात, ‘एकदा स्त्री घराबाहेर पडली की तिने सर्वच बाबतीत आत्मनिर्भर होणे खूप गरजेचे आहे. स्वतःची संपूर्ण जबाबदारी घेणे, टीममध्ये काम करत असताना अहंकार बाजूला ठेवून शिकून घेणे आणि सूचनांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. शारीरिक व मानसिकदृष्ट्या जर स्त्री भक्कम असेल, तर ती कुठल्याही परिस्थितीचा आणि कितीही मोठ्या संकटाचा सामना करू शकते.’ 

‘वनखात्यातील नोकरी म्हणजे काही आरामदायी नोकरी नाही. इथे २४ तास सतर्क राहावे लागते. जंगलात राहून सिंहाचे संरक्षण, बचाव सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. परंतु या महिला वनकर्मींना या सगळ्या परिस्थितीत खंबीरपणे उभे राहिलेले पाहिले आहे,’ असे सासण गीर अभयारण्याचे उप वनसंरक्षक मोहन राम यांनी सांगितले. अनेक महिलांचा पारंपारिक घरातल्या गृहिणी ते सक्षम वनअधिकारी असा प्रवास त्यांनी पाहिला आहे, तो खरोखर अवाक करणारा आहे. वनखात्याकडून दिल्या गेलेल्या प्रशिक्षणाला महिलांनी जो प्रतिसाद दिला आहे, तो याला कारणीभूत आहे. राम म्हणतात, महिलांच्या जंगलातील प्रवेशामुळे आजूबाजूच्या गावात खूप मोठा सामाजिक बदल होत आहे. महिलांना आज घरात सन्मान  मिळत आहे. त्यांची मते विचारात घेतली जात आहेत.

फॉरेस्ट रेंजर्स म्हणून महिलांच्या सफळ कामगिरीनंतर गीर प्रशासनाने इको टूरिस्ट गाइड म्हणून मुलींना संधी देण्याचे ठरविले. याबाबत मोहन राम सांगतात, ‘या वेळी मात्र प्रवास खूप खडतर होता. आजूबाजूच्या गावातील वरिष्ठ मंडळींचा याला विरोध होता. पर्यटकांसोबत महिला एकट्या कशा जातील, त्यांची सुरक्षा असे अनेक मुद्दे समोर आले. पण वन प्रशासनाने ग्रामपंचायतींना बरोबर घेऊन गावातील ज्येष्ठ लोकांबरोबर चर्चा केल्या आणि त्यांना विश्वास दिला, की स्थानिक महिला दिवसातील फक्त तीन तास देऊन स्वनिर्भर होऊ शकतील. वनविभागाने भरती मेळावा जाहीर केला आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.’ आज गीरच्या जंगलात तीस स्थानिक महिला टूरिस्ट गाइड आहेत. घरी आलेल्या पाहुण्यांसारख्या पर्यटकांना गीर दर्शन घडवत आहेत.

बी.कॉमच्या शेवटच्या वर्षात असलेली कीर्ती सेवारा म्हणते, ‘आम्ही जंगलाच्या अवतीभवतीच लहानाच्या मोठ्या झालो, पण आम्हाला इथल्या सृष्टीसंपदेविषयी कधी कल्पनाच नव्हती. या नोकरीने मला खूप शिकवले. मी कधी हिंदीचं एक वाक्यही नव्हते बोलले, पण आज मी पर्यटकांशी हिंदी, वेळ पडली तर इंग्रजीमध्येसुद्धा बोलते.’ वनखात्याच्या प्रयत्नांतून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली म्हणजे, मुलींना रोजगार मिळाला, त्यांना बाहेरचे जग पाहायला मिळाले.

सर्वसामान्य घरातून आलेल्या आणि एकेकाळी बाहेरच्या जगात संकोचणाऱ्या या गीरच्या जंगलातील महिला वनकर्मींना आज समर्थपणे आपली कामगिरी करताना पहिले, की स्त्रियांमधील अंगभूत अचाट शक्ती आणि धैर्याची प्रचिती येते. या महिलांनी फक्त आजूबाजूच्या गावातील महिलांनाच नव्हे तर गीरला भेट देणाऱ्या पर्यटकांमधीलही कित्येक ध्येयवेड्या मुलींना कुठल्या ना कुठल्या रूपात प्रेरणा दिली असणार, हे नक्की.

संबंधित बातम्या