दक्षिण काशी ः कोल्हापूर  

योगेश प्रभुदेसाई
बुधवार, 28 मार्च 2018

कोल्हापूर जिल्ह्याचे भौगोलिक स्थानच त्याचे वेगळेपण सिद्ध करते. महाराष्ट्राच्या पश्‍चिम आणि दक्षिण टोकाला असणारा कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक काळापासून एक महत्त्वाचे केंद्र आहे. त्याहूनही महत्त्वाचे ते कोल्हापूर शहर. मंदिरांचे आणि तळ्यांचे शहर म्हणून कोल्हापूरला नावाजले जाते. कोल्हापूरला करवीरक्षेत्र असेही म्हटले जाते, याला कारण म्हणजे कोल्हापूरला असणारा दक्षिण काशीचा दर्जा. प्राचीन काळी कोल्हापूर अर्थात करवीर क्षेत्राची यात्रा करणे हे काशीयात्रेप्रमाणेच मानले जात असे. त्यामुळे कोल्हापूरचे धार्मिक स्थान मोठे असणार, हे निश्‍चितच. कोल्हापूरची अंबाबाई तर भारतभर प्रसिद्ध पावलेले शक्तिपीठ.

कोल्हापूर जिल्ह्याचे भौगोलिक स्थानच त्याचे वेगळेपण सिद्ध करते. महाराष्ट्राच्या पश्‍चिम आणि दक्षिण टोकाला असणारा कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक काळापासून एक महत्त्वाचे केंद्र आहे. त्याहूनही महत्त्वाचे ते कोल्हापूर शहर. मंदिरांचे आणि तळ्यांचे शहर म्हणून कोल्हापूरला नावाजले जाते. कोल्हापूरला करवीरक्षेत्र असेही म्हटले जाते, याला कारण म्हणजे कोल्हापूरला असणारा दक्षिण काशीचा दर्जा. प्राचीन काळी कोल्हापूर अर्थात करवीर क्षेत्राची यात्रा करणे हे काशीयात्रेप्रमाणेच मानले जात असे. त्यामुळे कोल्हापूरचे धार्मिक स्थान मोठे असणार, हे निश्‍चितच. कोल्हापूरची अंबाबाई तर भारतभर प्रसिद्ध पावलेले शक्तिपीठ. अनेक राजवटींनी या पीठाला भेट आणि दान दिल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. सातवाहन काळापासून ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांपर्यंत अनेक ऐतिहासिक छटा लाभलेले कोल्हापूर एक दर्जेदार ऐतिहासिक स्थळ आहे. कोल्हापूरने काय नाही पाहिले? सातवाहनांची सत्ता पाहिली, बौद्ध धर्म पाहिला, जैन धर्म, शैव-शाक्त धर्म पाहिले, चालुक्‍यांची सत्ता पाहिली, यादवांचे साम्राज्य अनुभवले, इस्लामी सत्तादेखील पाहिल्या, मराठा साम्राज्य अनुभवले. असं अनेक अंगांनी परिपक्व कोल्हापूर दख्खनच्या इतिहासात वेगळे स्थान राखून आहे. जसा कोल्हापूरला इतिहास मोठा, तसेच इथली जैवविविधताही उल्लेखनीय. दाजीपूर अभयारण्य असो, वा घाटमाथे असोत, कोल्हापूरचे निसर्गसौंदर्य मोहवून टाकणारे आहे.

कोल्हापूरला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभला असल्याने इथे धार्मिक पर्यटनाला खूप वाव आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने इथे महालक्ष्मी मंदिर, नृसिंहवाडी, कुंभोज बाहुबली क्षेत्र, आजरा रामतीर्थ, दक्षिण केदारेश्‍वर जोतिबा ही महत्त्वाची आणि ऐतिहासिक धार्मिक केंद्रे आहेत. कोल्हापूरची अंबाबाई ही महाराष्ट्रातील साडेतीन आणि भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक. प्राचीन काळापासून या देवतेची महती आजही जनमानसावर आपला प्रभाव टिकवून आहे. ही एक स्वतंत्र देवता असून हिला आदिजननी मानण्यात आलेले आहे. कोल्हापूरपासून ६० किलोमीटरवर असणारे दत्त संप्रदायाचे एक मोठे आणि जागृत केंद्र म्हणजे नृसिंहवाडी. नृसिंह सरस्वती, जे श्रीपाद श्रीवल्लभांचे अवतार मानले जातात ते वाडी येथे पादुकारूपात वास्तव्य करून आहेत. त्यांनी संन्यासधर्माला आणि वर्णाश्रम धर्माला सुसंस्कृत करण्याचे कार्य सुमारे चौदाव्या शतकात केले. कोल्हापूरपासून साधारण २७ किलोमीटरवर असणारे कुंभोज बाहुबली क्षेत्र जैन धर्मीयांचे एक मोठे क्षेत्र आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हे क्षेत्र बाराव्या शतकापासून जैन धर्मीयांचे क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. श्रवणबेळगोळच्या धर्तीवर इथेही बाहुबलीची मूर्ती सुमारे १९६० च्या आसपास स्थापन करण्यात आली. तत्पूर्वी इथे जैन धर्म नांदत होता. कोल्हापूरपासून ७५ किलोमीटरवर असणारे आजरा येथील रामतीर्थ हे हिरण्यकेशी नदीवर असून इथे प्रभू रामचंद्र काही काळ राहिले होते, अशी आख्यायिका आहे. पावसाळ्यामध्ये हे क्षेत्र आवर्जून भेट द्यावे, असे आहे. हिरण्यकेशीचे भव्य रूप डोळे भरून पाहावे, असे असते. दक्षिण केदारेश्‍वर जोतिबा हा कोल्हापूर शहराच्या उत्तरेला डोंगरावर वास्तव्य करून आहे. याला अंबाबाईचा भैरव असंही म्हटलं जातं. देवस्थान प्राचीन असून इथे शैव आणि नाथ सांप्रदायिकांचा प्रभाव होता, असे पुरावे आहेत.

जोतिबाचं देवस्थान ज्या डोंगरावर आहे त्याला वाडी रत्नागिरी असे म्हटले जाते. जोतिबाची लोकप्रियता इतकी आहे की, या क्षेत्राला  जोतिबाचा डोंगर अथवा जोतिबा अशाच नावांनी ओळखले जाते.

ऐतिहासिक पर्यटनाच्या दृष्टीने अंबाबाई मंदिर, जे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असून आवर्जून भेट देण्यासारखे आहे. महालक्ष्मी मंदिर हे त्रिकुटप्रसाद असून इथे महाकाली, अंबाबाई, महासरस्वती अशा तीन देवतांची मंदिरे एकत्र जोडली गेली आहेत. दुसरे आवर्जून भेट देण्याचे ठिकाण म्हणजे खिद्रापूरचे कोपेश्‍वर मंदिर. स्थापत्त्याचा एक अजोड नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. नृसिंहवाडीपासून अवघ्या ११ किलोमीटरवर असणारे कोपेश्‍वर मंदिर शिल्पकलेने नटलेले आहे. उत्कृष्ट अशी शिल्पे कलाकारांना, अभ्यासकांना, जिज्ञासूंना आकर्षित करत असतात. कोल्हापूरच्या उत्तरेला असणारा जोतिबा हा तर महाराष्ट्र व कर्नाटकातील कित्येक लोकांचा कुलस्वामी आणि आराध्य आहे. अठराव्या शतकात शिंदे आणि चव्हाण घराण्यांनी जोतिबाचे विद्यमान मंदिर बांधून काढले. तरीही देवस्थान प्राचीन होते याचे पुरावे आहेत. या सर्व वारशांपासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात असणारा प्राचीन वारसा म्हणजे पळसंबेची एकाश्‍म मंदिरे. सुमारे इसवी सनाच्या सहाव्या शतकात खोदून काढलेली ही चार मंदिरे म्हणजे स्थापत्त्याचा आगळाच नमुना आहेत. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर अवघ्या ४८ किलोमीटरवर पळसंबे नावाच्या छोट्याशा गावामध्ये जलप्रवाहात ही मंदिरे अनेक शतके उभी आहेत. कोल्हापूरच्या प्राचीनतेचा पुरावा देणारे आणखी एक ठिकाण म्हणजे जोतिबा डोंगरात असणाऱ्या पोहाळे येथील बौद्ध गुहा. कोल्हापूरपासून १८ किलोमीटरवर असणाऱ्या या गुहा इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात खोदून काढल्या आहेत. या गुहांचे चैत्य आणि विहार असे विभाग असून, चैत्यामध्ये स्तूप आहेत. विहारामध्ये बौद्ध भिक्षूंसाठी खोल्या असून, मध्यभागी भले मोठे प्रांगण आहे. किल्ले पन्हाळा हा तर कोल्हापूरच्या इतिहासात शिरपेच म्हणावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेला हा किल्ला प्राचीन असून बाराव्या शतकामध्ये शिलाहार, यादव राजवटींनीही या किल्ल्यावर स्वामित्व गाजवले आहे. पावसाळ्यात या पन्हाळा परिसराचे सौंदर्य काही निराळेच असते.

निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने सुप्रसिद्ध आंबोलीव्यतिरिक्त राधानगरी - दाजीपूर अभयारण्याचे नाव घ्यावे लागेल. इथे असणारी जैवविविधता पाहण्यासाठी निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकार वर्णी लावत असतात. गगनबावडा घाट आणि तेथील निसर्ग हेदेखील निसर्ग पर्यटनाचे उत्कृष्ट ठिकाण मानावे लागेल. इथे वनस्पतींचे विविध प्रकार असून औषधी वनस्पती आणि दुर्मिळ वनस्पतींना हा परिसर समृद्ध आहे. दाजीपूर कोल्हापूरपासून ४६ किलोमीटरवर असून इथूनच जवळ असणारा राऊतवाडी धबधबाही एक प्रेक्षणीय स्थळ आहे.

कोल्हापूरचे पर्यटन वास्तविक विविध अंगांनी विकसित होऊ शकते. त्यातल्या त्यात धार्मिक अंगाने पर्यटन विकासाला प्रचंड वाव आहे. कोल्हापूरला प्राचीन काळी ‘दक्षिण काशी’ असा दर्जा होता. कालौघात अनेक तीर्थे आणि देवालये नष्ट झाली. तरीही प्राचीन पुराव्यांच्या आधारे पुनःसंशोधन करून कोल्हापूरची करवीर अर्थात दक्षिण काशी यात्रा पुनरुज्जीवित करता येऊ शकते. आज धार्मिक पर्यटनाद्वारे प्रगतीची अनेक द्वारे खुली करता येऊ शकतात इतकं कोल्हापूरजवळ समाजाला देण्यासारखे आहे. करवीर यात्राही अनेक प्रकारच्या आहेत. त्यातील संशोधनात्मक यात्रा पुढे आणल्या तर अनेक गोष्टी साध्य करून घेता येतील. कोल्हापूरला येणाऱ्या अनेक भाविकांना अंबाबाई मंदिर आणि देवी एवढं सोडल्यास करवीर क्षेत्राची महती माहीतच नसते. कोल्हापूर हे प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्र आहे. फक्त त्याची महती समाजापर्यंत नीट पोचली पाहिजे.

जसं धार्मिक पर्यटन हे एक अंग आहे तसं किल्ले अथवा दुर्ग पर्यटन हादेखील एक वेगळा मुद्दा होऊ शकतो. कोल्हापूरला पन्हाळा वगळता विशाळगडसह सामानगड, भुदरगड, रांगणा असे आणखीही किल्ले आहेत. त्या किल्ल्यांचे संवर्धन करून, संशोधन करून आज दुर्ग पर्यटनासारखा एक उपक्रम राबवता येऊ शकतो. त्या अनुषंगाने तिथे पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे ओघाने आलेच.

कोल्हापूरला ब्रिटिशकालीन अनेक इमारतींचा वारसा लाभला आहे. आज कित्येक इमारतींचे जतन होणे गरजेचे आहे. अनेक इमारती या ना त्या कारणाने वापरात असल्याने निदान त्यांचे संरक्षण तरी होत आहे. आज अशा इमारतींचा ‘हेरिटेज वॉक’ या सदरामध्ये समावेश करून स्थापत्य शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी खास भेटींचे आयोजन करता येऊ शकते. त्या अनुषंगाने ब्रिटिश स्थापत्य असलेल्या इमारतींचा अभ्यास, संशोधन आणि संवर्धन करता येईल.

वरील नमूद केलेले पर्यटनाचे पर्याय हे उदाहरणादाखल दिले असून अशा अनेक अंगांनी कोल्हापूरचे पर्यटन क्षेत्र विकसित करता येईल. कोल्हापूरचा वारसा सांगोपांग अभ्यास करून तो समाजापर्यंत आलाच पाहिजे. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या