स्पाइक की दुसरी लाट...?

-योगीराज प्रभुणे
गुरुवार, 25 मार्च 2021

कव्हर स्टोरी

गेल्या वर्षी मार्चपासून राज्यातील कोरोना विषाणू महाभयंकर उद्रेक आपण अनुभवत आहोत. सप्टेंबरपर्यंत प्रत्येक दिवशी प्रचंड वेगाने वाढणारी रुग्णांमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. त्यानंतर जानेवारीपर्यंत कमी होणाऱ्या रुग्णसंख्येचा आलेख आता पुन्हा वाढत आहे. सध्या दिसणारे रुग्णांचे भीतीदायक आकडे हे फक्त तत्कालीन ‘स्पाइक’ आहे, की ‘सेकंड वेव्ह’ आहे, यावर सार्वजनिक आरोग्य खात्याने बारकाईने लक्ष ठेवल्याचे दिसते.

जग आता ‘ग्लोबल व्हिलेज’ झाले आहे. जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था आणि उदारीकरण या त्रिसूत्रीमुळे आंतरराष्ट्रीय दळण-वळण वाढले. त्याची गती वाढली. त्याच बरोबर जगाच्या एक टोकाला उद्रेक झालेला संसर्गजन्य आजार सहजतेने दुसऱ्या टोकालाही पोहोचू लागला. कोरोनाचा वुहानपासूनचा प्रवासही याच ‘नेटवर्क’मधून सुरू होतो. 
कोरोना उद्रेकावर दृष्टिक्षेप
कोरोना हा विषाणूंचा एक समूह आहे. मानवावर आक्रमण करणारा हा या विषाणूंच्या समूहातील काही पहिला विषाणू नाही. माणसाला होणाऱ्या साध्या सर्दीपासून ते सार्स किंवा मार्सपर्यंतचे गंभीर आजार कोरोना विषाणूच्याच संसर्गामुळे होतात. पण, चीनमधील वुहान शहरात २०१९मध्ये जो कोरोना आढळला तो यापूर्वीच्या कोरोना विषाणूंपेक्षा वेगळा असल्याचे प्रयोगशाळेत निष्पन्न झाले. त्यामुळे या विषाणूचे ‘नॉव्हेल कोरोना व्हायरस २०१९’ (nCov) असे नामकरण करण्यात आले. वुहानमध्ये उद्रेक झाल्यानंतर तेथून वीस वर्षांची एक मुलगी गेल्या वर्षी जानेवारीच्या २३ तारखेला केरळमधील आपल्या घरी आली. चार दिवसांनी तिला सर्दी, खोकला झाला. त्रास खूपच वाढला म्हणून तिला थ्रिसुर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी या मुलीच्या घशातील आणि नाकातील द्रावाचे नमुने तपासण्यासाठी पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे, एनआयव्हीकडे, पाठविले. तपासणीनंतर २७ जानेवारीला तिला कोरोना झाल्याचे निदान करण्यात झाले. ही देशातील कोरोनाची पहिली रुग्ण. नंतर महिन्याभराने दुबई येथे सहलीसाठी गेलेले एक दांपत्य पुण्यात परतले. त्यांना कोरोनाची स्पष्ट लक्षणे दिसल्यावर त्यांना पुणे पालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान करणारा प्रयोगशाळा अहवाल ‘एनआयव्ही’ने मार्चच्या ९ तारखेला दिला. महाराष्ट्रातील ही पहिली केस. मार्चअखेरपर्यंत राज्यात कोरोनाबाधीतांची संख्या दोनशेचा आकडा ओलांडून पुढे गेली होती. देशभरातल्या रुग्ण संख्येने तोपर्यंत हजाराचा आकडा ओलांडला होता. जगात हाच आकडा काही लाखांच्या घरात होता, आणि त्याचा सर्वात मोठा फटका बसला होता युरोपला.  ही घटना वर्षभरापूर्वीची.

उद्रेकाची पहिली लाट 
गेल्या वर्षीचा गुढीपाडवा आला तो लॉकडाउन घेऊनच. मार्चच्या २५ तारखेला देशभरात एकवीस दिवसाचा पहला लॉकडाउन जाहीर झाला. कोरोनाचा संसर्ग होतो म्हणजे एका माणसापासून तो आजार दुसऱ्याला होतो. कोरोनाच्या या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात न येणे महत्त्वाचे ठरते. त्याला आता आपण ‘सोशल डिस्टन्‍सिंग’ किंवा शारीरिक अंतर राखणे म्हणतो. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाच्या साखळी तोडण्यात यश येते. पर्यायाने साथरोगावर नियंत्रण मिळविता येते. 

साथीच्या रोगाचा उद्रेक मोजण्यासाठी ‘आर नॉट’ या पद्धतीचा वापर केला जातो. कोरोनाच्या विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउनसारख्या उपाययोजनांचा आपण वापर केला. पण, कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण तसाच समाजात फिरत राहिल्यास त्याच्यामुळे एका महिन्यात ४६५ जण बाधित होतात. गेल्या वर्षीच्या मार्चअखेरपर्यंत महाराष्ट्रात ‘आर नॉट’ चार होता. म्हणजे एका कोरोनाच्या रुग्णांकडून किमान चार जणांना संसर्ग होत असे. लॉकडाउन केल्यानंतर गर्दी होणारी सगळी ठिकाणे बंद केली गेली. विनाकारण रस्त्यावर फिरण्यावर निर्बंध घातले गेले. त्यामुळे महाराष्ट्राचा हा ‘आर नॉट’ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात चार वरून २.५ पर्यंत खाली आला. पुढे जून अखेरीस राज्यात हे प्रमाण १.२३ लोक एवढे कमी करता आले.

दुसऱ्या लाटेचा धोका
लॉकडाउन, ठप्प झालेली अर्थव्यवस्था, जाणाऱ्या नोकऱ्या, बंद पडणारे व्यवसाय, हाताला काम न उरल्याने घरी परतणाऱ्यांचे लोंढे, कोरोना नावाचे संकट आपल्याही दारात उभे राहू शकते ह्याची सतत जाणीव करून देणारी वाढती रुग्णसंख्या, वाढणारा मृत्युदर, रुग्णालयात आधी जागेसाठी आणि मग उपचारांसाठी वणवण करणे आणि या सगळ्यासह अनिश्चिततेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हेलकावणाऱ्या लंबकासह तब्बल नऊ महिन्यांनंतर नवे वर्ष उजाडले ते काहीशी आशा घेऊन. जानेवारी २०२१ संपत असताना महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे आणि मृत्यूचे प्रमाणही प्रकर्षाने कमी झालेले होते. ‘मिशन बिगीन अगेन’च्या या टप्प्यावर मरणाची भीती, लॉकडाउनमुळे झालेले आर्थिक नुकसान या साऱ्याच्या परिणामांतून आपण जरा कुठे सावरत असताना, एकेक करून आयुष्य पुन्हा सुरू होत असताना पुन्हा मळभ दाटून आल्यासारखे दिसते आहे. हा आपल्या सर्वांसाठीच इशारा आहे. कारण, २०२० संपत असताना आणि काळजीच्या अमलाखाली का असेना पण २०२१च्या स्वागताची तयारी सुरू असताना जगातील काही देशांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसलेला स्पष्टपणे दिसतो. ब्रिटन, फ्रान्स, ब्राझील येथे रुग्णसंख्या वाढली. जगातील काही देशांनी दुसरे लॉकडाउन जाहीर केले. आता गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रातील कोरोनाबाधीतांची संख्याही वाढत आहे. मुंबई-पुण्यासह अनेक शहरा-गावांमध्ये पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत, विदर्भातल्या काही मोठ्या जिल्ह्यांमध्ये जनता कर्फ्यू पाळले गेले, रात्रीची संचारबंदीही आहेच.

परदेशातील दुसऱ्या लाटेची कारणे 
युरोपातील काही देशांमध्ये पहिल्या लाटेनंतर काही महिन्यांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला. त्याला कोरोनाची दुसरी लाट म्हटले जाते. ही दुसरी लाट त्या देशांमध्ये का आली? आणि ती आपल्याकडे येण्याची शक्यता आहे का? ह्या प्रश्नांनी विचार करणाऱ्या प्रत्येक मनाभोवती सध्या फेर धरला आहे. मात्र, युरोपीय देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्यामागे काही विशिष्ट कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. युरोपीय देशांमध्ये हिवाळा सुरू असताना दुसरी लाट आली. हिवाळ्यात तापमान उतरत जात असते, तसेच हवेतील आर्द्रताही कमी असते, असे वातावरण कोरोना विषाणूंच्या संसर्गासाठी पोषक ठरते, असे तज्ज्ञ स्पष्ट करतात.

राज्यातील रुग्णवाढ
नवे वर्ष उजाडताना लॉकडाउन शिथिल झाल्याचा आनंद अक्षरशः गगनात मावेनासा झाला होता. एकमेकांच्या घरी जाऊन भेटी-गाठी सुरू झाल्या. लग्न-समारंभ पूर्वीच्याच झोकात होऊ लागले, मंगल कार्यालयांमधून पुन्हा गर्दी उसळली. शहरा- गावांतील बाजारपेठांमधली गर्दीही जणू मधल्या काळात काही घडलेच नाही अशी वाढत होती. साधारणतः जानेवारीपर्यंत राज्यातील सर्वच शहरांमध्ये थोड्या फार फरकाने ही स्थिती होती. याच काळात ‘कोरोना संपलेला नाही. तो आहे,’ या आरोग्य खात्याच्या इशाऱ्यांकडे सोईस्कर दुर्लक्ष झाले. गर्दीमुळे कोरोना वाढणार ही भीती आता सत्यात उतरत आहे.  

राज्यात दुसरी लाट आहे का?
युरोपातील देशांमध्ये पहिली लाट संपल्यानंतर रुग्णसंख्या कमालीची कमी झाली होता. त्यानंतर पुन्हा ही कोरोनाबाधीतांची संख्येने वेगाने उसळी मारली. तेथे पहिल्या उद्रेकानंतर रुग्णसंख्येचा आलेख कमी झालेला दिसतो. त्यानंतर दुसऱ्या लाटेत पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याचे जाणवते. भारतात मात्र, पहिली लाट नेमकी कधी संपली हे नेमकेपणाने सांगता येत नाही. कारण, दिल्ली, त्या पाठोपाठ केरळ आणि आता पुन्हा महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या राज्यांमधून कोरोनाचे रुग्ण सातत्याने आढळत आहेत. त्याचा अर्थ ही दुसरी लाट नाही, असे ‘प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसीन’मधील (पीएसएम) तज्ज्ञ सांगतात. 

तुलनात्मक दृष्टीने उद्रेकाचे गांभीर्य
राज्यात सद्यःस्थितीत गेल्या वर्षीप्रमाणेच रुग्णांची संख्या वाढत आहे, हे वास्तव स्वीकारले पाहिजे. अर्थात, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. रुग्णसंख्या वाढत असली तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप कमी आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये कोरोनाच्या साथीने महाभयंकर रूप धारण केलेले असतानाची रुग्णसंख्या आणि अलीकडच्या आठवड्यांमधली रुग्णसंख्या यात फारसा फरक दिसत नाही. मात्र आरोग्य खात्याकडून मिळणारी गेल्या वर्षीची आकडेवारी आणि आताची आकडेवारी पाहिली तर त्या वेळी अतिदक्षता विभागात, आयसीयूमध्ये, असणाऱ्या; व्हेंटिलेटरची गरज पडलेल्या रुग्णांच्या तुलनेत आत्ता ‘आयसीयू’त, व्हेंटीलेटरवर असणाऱ्या रुग्णांची संख्या खूप कमी असल्याचे दिसते.रुग्ण संख्या वाढत असल्याच्या धोक्याला असलेली ही चंदेरी किनार आणखी रुंद करत नेणे हे या काळात फक्त आपल्या सगळ्यांच्या सद्सदविवेकबुद्धीवर अवलंबून आहे.

पुढे काय?
 देशात महाभयंकर उद्रेकानंतर आता कोरोनाचे रुग्ण आढळत असले तरीही त्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. पण, ही तात्पुरती वाढलेली रुग्णसंख्या आहे की, खरोखरच दुसऱ्या लाटेची सुरुवात आहे, यावर सार्वजनिक आरोग्य खात्यातील तज्ज्ञांचे बारकाईने लक्ष आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या विषाणूंचा नवीन स्ट्रेन अजूनपर्यंत सापडलेला नाही. आतापर्यंत आढळत असलेलाच हा विषाणू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थिती अजून हाताबाहेर गेलेली नाही. पण, उद्रेकाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही.

स्पॅनिश फ्लूसारख्या साथीचे उद्रेक पाच-सहा वर्ष सातत्याने होत होते. पण, आता आपल्याकडे कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. मोठ्या संख्येने लसीकरण केल्यास डिसेंबर २०२१ पर्यंत हा उद्रेक नियंत्रणात येईल. त्यासाठी बहुसंख्य लोकांना लस देण्याची गरज आहे.

 अकरा वर्षांनंतर आजही स्वाइन फ्लू आढळतो. कारण, तो आता आपल्यासाठी इतर फ्लूसारखाच एक आजार झाला आहे. कोरोनादेखील पुढील काही वर्षांमध्ये देशातीलच नाही तर जगभरातील नियमित आजार होईल. त्याच्या निदानासाठी सातत्याने चाचण्या चाचण्या कराव्या लागतील. 

प्रत्येक विषाणू स्वतःमध्ये सातत्याने बदल करत असतो. साथीच्या या महाभयंकर उद्रेकानंतर विषाणूंमधील बदलांवर सातत्याने लक्ष ठेवावे लागत आहे. त्यासाठी प्रयोगशाळा, उपकरणे आणि तज्ज्ञ मनुष्यबळाची कस लागणार, हे निश्चित! त्यातूनच विषाणूंमधील बदल आणि त्यांचा जनुकीय अभ्यास करता येईल.

संबंधित बातम्या