पूर्णान्न खिचडी

निर्मला देशपांडे
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

मूगडाळ तांदळाची खिचडी
साहित्य ः चार वाट्या तांदूळ, दीड वाटी मूगडाळ, ३ चमचे मीठ, ४ चमचे गूळ, काजू, कोथिंबीर, ओले खोबरे, कढीपत्ता, वाटीभर तेल, हिंग, मोहरी, हळद, 
मसाला ः ४ चमचे धने, २ चमचे जिरे, १ चमचा शहाजिरे, अर्धी वाटी सुका खोबरे कीस, दालचिनीचा तुकडा, ४ लवंगा हे सारे थोडे भाजून मिक्‍सरवर बारीक पूड करून.

मूगडाळ तांदळाची खिचडी
साहित्य ः चार वाट्या तांदूळ, दीड वाटी मूगडाळ, ३ चमचे मीठ, ४ चमचे गूळ, काजू, कोथिंबीर, ओले खोबरे, कढीपत्ता, वाटीभर तेल, हिंग, मोहरी, हळद, 
मसाला ः ४ चमचे धने, २ चमचे जिरे, १ चमचा शहाजिरे, अर्धी वाटी सुका खोबरे कीस, दालचिनीचा तुकडा, ४ लवंगा हे सारे थोडे भाजून मिक्‍सरवर बारीक पूड करून.
कृती ः खिचडी करण्याआधी एक तास डाळ व तांदूळ धुवून ठेवावेत. पातेल्यात तेल घालून मोहरी, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करावी. कढीपत्ता घालावा. मग त्यावर निथळलेले डाळ, तांदूळ घालून परतावे. डाळ तांदळाच्या दुप्पट गरम पाणी घालावे. अर्धवट शिजत आल्यावर तयार मसालापुडे घालावी. मीठ व गूळ चवीप्रमाणे घालावा. थोडे साजूक तूप सोडावे. काजू घालावेत. झाकण ठेवून मंद गॅसवर खिचडी शिजत ठेवावी व चांगली वाफ आणावी. वाढताना ओले खोबरे, कोथिंबीर घालावी.

वालाची खिचडी
साहित्य ः दीड वाटी बासमती तांदूळ, ५-६ चमचे तेल, मोडाचे वाल एक वाटी, ४ लवंगा, दालचिनी तुकडा, अर्धा चमचा बडीशेप, धने जिरे पूड १ चमचा, हिंग, मोहरी, हळद, चिंचेचा कोळ १ चमचा, गूळ, गोडा मसाला २ चमचे, कोथिंबीर, खोबरं कीस.
कृती ः कुकरमध्ये तेल, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. कढीपत्ता घालावा. अर्धा चमचा बडीशेप घालावी व परतावे. २ तास भिजत घालून १० मिनिटे निथळलेले बासमती तांदूळ घालावेत. धनेजिरे पूड घालून परतावे. चिंच, गूळ, गोडा मसाला घालून दुप्पट गरम पाणी घालून सहा शिट्या करून शिजवावे. कोथिंबीर, खोबरे भुरभुरावे. भरपूर साजूक तूप घालून खिचडी सर्व्ह करावी.

घोटा खिचडी
साहित्य ः तुरीची डाळ १ वाटी, तांदूळ पाऊण वाटी, तेल २ चमचे, धना जिरेपूड १ चमचा, तीन चार सुक्‍या लाल मिरच्या, हिंग, हळद, मोहरी, चवीप्रमाणे मीठ.
कृती ः कुकरमध्ये ४ वाट्या पाणी उकळत ठेवावे. त्यात मीठ, हळद, धने, जिरे पूड घालावी. डाळ, तांदूळ धुवून हलवावे. कुकरचे झाकण लावून तीन शिट्या कराव्यात. व मऊसर खिचडी शिजवून घ्यावी. ही खिचडी जरा सैलसर असते. कढईत तेल घालून मोहरी, हिंग, मिरच्या, कढीपत्ता घालून खमंग फोडणी करावी. देताना खिचडीवर तयार फोडणी कोथिंबीर घालून द्यावी. फारसे मसाले नसलेली ही खिचडी वेगळी छान चवदार लागते.

डाएट खिचडी
साहित्य ः वाटीभर भिजलेली मूगडाळ, हातसडीचा वाटीभर भिजवलेला तांदूळ, एक टीस्पून तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट प्रत्येकी एक वाटी गाजराच्या फोडी, चिरलेली फरसबी, एक चमचा धने व चिमूट मेथीदाणे जाडसर (कुटून) अर्धा चमचा हिंग, अर्ध्या लिंबाचा रस, एक मध्यम कांदा चिरून, चवीपुरते गूळ, एक चमचा आले चिरून, अर्धी वाटी फुटाणे, दोन चमचे तूप.
कृती ः कुकरमध्ये चार वाट्या पाणी घालून त्यात मूगडाळ, तांदूळ घालावे. तेल, तिखट, मीठ, हळद, तेल घालून शिजत ठेवावे. उकळत्या खिचडीत जाडसर मसाला पूड, अर्धा चमचा हिंग, लिंबाचा रस, गूळ घालावा. चिरलेला कांदा, आले, गाजर, फुटाणे घालावेत. दोन चमचे तूप घालावे. फरसबी, कोथिंबीर घालावी. झाकण ठेवून खिचडी शिजवून घ्यावी. कोथिंबीर भुरभुरुन सर्व्ह करावी. बरोबर कोशिंबीर द्यावी. उडीद पापड भाजून द्यावा.
कोशिंबीर ः प्रत्येकी एक टोमॅटो, एक छोटी ढोबळी मिरची, एक कांदा, कोथिंबीर चिरून एकत्र करावे. त्यात तिखट, मीठ, साखर घालून कोशिंबीर कालवून खिचडी बरोबर द्यावी.

मोडाच्या मेथीची खिचडी
साहित्य ः दोन वाट्या तांदूळ, अर्धी वाटी मोडाची मेथी, हिंग, मोहरी, हळद, तिखट, तेल, वाटण - एक छोटा कांदा उभा चिरून, ७ लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले तुकडा, पाव वाटी सुक्‍या खोबऱ्याचा कीस.
कृती ः तांदूळ धुवून ठेवावेत. आले, लसूण, खोबरे थोड्या तेलावर खमंग परतून मिक्‍सरवर फिरवून बारीक पूड करावी. भांड्यात, पातेल्यात ४ चमचे घालून मोहरी हिंगाची खमंग फोडणी करावी. सात/आठ कढी पत्त्याची पाने घालावीत. त्यात मोडाची मेथी घालून परतावे. नंतर त्यात धुतलेले तांदूळ, हळद, मीठ घालून परतावे. तिखट घालावे. 
वाटण ः मसाला पूड घालून परतावे व तांदळाच्या दुप्पट गरम पाणी घालून उकळी आणावी. मग झाकण ठेवून मंद गॅसवर खिचडी शिजवून घ्यावी. बारीक चिरलेली कोथिंबीर व ओले खोबरे, साजूक तूप घालून गरम सर्व्ह करावी.

सिंधी खिचडी
साहित्य ः सालासकट हिरवी मूगडाळ एक वाटी, तांदूळ अडीच वाट्या, दोन हिरव्या मिरच्या, धने जिरेपूड प्रत्येकी एक टीस्पून, एक बडी वेलची व एक तमालपत्र, मीठ चवीप्रमाणे. फोडणीसाठी तेल अगर तूप २ चमचे, जिरे, हिंग.
कृती ः तेल गरम करून त्यात मिरच्यांचे तुकडे, जिरे, मसाला, हिंग घालावा. धुवून निथळलेले डाळ, तांदूळ घाला व मंद गॅसवर ५ मिनिटे परतावे. मग धने, जिरे पूड, मीठ घालून परता. आधणाचे पाणी घालून शिजवा. ही खिचडी जरा कोरडीच असते.

कडधान्यांची खिचडी
साहित्य ः वाटीभर तांदूळ, प्रत्येकी अर्धी वाटी मोडाचे मूग व मसूर, पाववाटी मटार व हिरवे हरभरे, अर्धी टीस्पून मोडाची मेथी, पाव वाटी गाजराच्या फोडी, २ टीस्पून गरम मसाला, १ टीस्पून कच्चा मसाला, ओले खोबरे, २ चमचे दही किंवा लिंबाचा रस, कोथिंबीर, खोबरे, साजूक तूप, तिखट, मीठ.
कृती ः तांदूळ अर्धा तास भिजत ठेवावा. मग उपसून निथळत ठेवावा. कुकरमध्ये हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात सगळी कडधान्ये गरम, मसाला, तांदूळ, कच्चा मसाला, गाजर, मीठ, तिखट घालून परतावे. उकळते पाणी घालावे. दही घालून हलवावे. झाकण लावून तीन शिट्या कराव्यात मऊ खिचडी शिजवावी. कोथिंबीर, खोबरे, साजूक तूप घालून द्यावी.

मसूरडाळीची खिचडी
साहित्य ः दोन वाट्या तांदूळ, १ वाटी मसूर डाळ, २ टेबल स्पून तेल, ८/१० लसूण पाकळ्या, सोलून कुटून, धने जिरेपूड १ चमचा, गोडा मसाला १ चमचा, कच्चा मसाला १ चमचा, मीठ, गूळ चवीप्रमाणे, १ चमचा लाल तिखट, खोबरं कीस २ चमचे, कोथिंबीर, फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता. तेल अगर तूप, जिरे, हिंग.
कृती ः तेल गार करून त्यात मिरच्यांचे तुकडे, जिरे, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करावी. डाळ, तांदूळ धुवून थोडा वेळ निथळत ठेवावेत. फोडणीत कढीपत्ता घालावा. त्यावर डाळ, तांदूळ, कुटलेला लसूण, खोबऱ्याचा कूट, सगळे मसाले, तिखट, मीठ घालून परतावे. मंद गॅसवर २ मिनिटे परतून आधणाचे पाणी घालावे. आवडत असल्यास गूळ, साखर घालावी. कुकरमध्ये अगर पातेल्यात खिचडी शिजवावी. कोथिंबीर,साजूक तूप घालून गरमागरम खिचडी सर्व्ह करावी.

मूग-मेथी खिचडी
साहित्य ः एक वाटी मोडाचे मूग, दोन टीस्पून मोडाची मेथी, एक वाटी तांदूळ, दोन टीस्पून गोडा मसाला, एक टीस्पून कच्चा मसाला, चवीनुसार मीठ व गूळ, चार टीस्पून तेल, फोडणीचे साहित्य, कढीपत्ता, एक टीस्पून आले लसूण पेस्ट, सुक्‍या खोबऱ्याचा कीस, कोथिंबीर.
कृती ः तांदूळ एक तास भिजत ठेवावेत. एक तास निथळत ठेवावेत. प्रेशर कुकरमध्ये तेल घालून हिंग, मोहरी घालून खमंग फोडणी करावी. कढीपत्ता घालावा. त्यावर मोडाची मेथी, मोडाचे मूग, तांदूळ, दोन्ही मसाले घालून थोडे परतावे. आले लसूण पेस्ट घालावी. पाणी घालावे. मीठ व चवीपुरते गूळ घालावा. चांगले ढवळून झाकण लावावे. तीन शिट्या करून खिचडी मऊसर शिजवावी. खोबऱ्याचा कीस, कोथिंबीर, साजूक तूप घालून सर्व्ह करावी. बरोबर भाजलेला उडदाचा पापड, लिंबाचे लोणचे द्यावे.

दलियाची खिचडी
साहित्य ः दलिया एक वाटी, पाव वाटी तांदूळ, चमचाभर मोडाची मेथी किंवा वाटीभर मेथीची पाने, गरम मसाला १ चमचा, कच्चा मसाला एक चमचा, कढीपत्ता, तिखट मीठ, फोडणी करता तेल, हिंग, मोहरी, हळद, आवडत असल्यास चवीपुरते गूळ, लाल तिखट एक छोटा चमचा.
कृती ः कच्चा मसाला - धने, जिरे एकेक चमचा चिमूट शहाजिरे, २/३ लवंगा, दालचिनी तुकडा हे सर्व थोडे गरम करून घेऊन त्याची पूड करावी. दलिया सकाळी ४ तास कढत पाण्यात भिजत घालावा. तांदूळ धुवून पाण्यातच ठेवावेत. भिजलेला दलिया प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावा. तांदूळ उपसून निथळत ठेवावेत. गार झाल्यावर दलिया हाताने ताटात छान मोकळा करून घ्यावा. कुकरमध्ये तेल घालून खमंग फोडणी करावी. कढीपत्ता घालावा. कच्चा व गरम मसाला तिखट टाकून मंद आचेवर हलवावे व लगेच मोडाचे मूग, मोडीची मेथी अगर मेथी पाने, तांदूळ घालून परतावे. मोकळा झालेला दलिया घालावा. मीठ घालून हलवावे. आवडत असल्यास चवीपुरते गूळ किंवा साखर घालावी. देताना ओले खोबरे, कोथिंबीर, साजूक तूप घालून द्यावी.

कढी (गुजराथी)
साहित्य ः शंभर ग्रॅम दही, २० ग्रॅम बेसन, चमचाभर तेल, पाव चमचा मेथी सोलून, चमचाभर आल्याचा कीस, एक टेबल स्पून गुळाचे पाणी, मोहरी.
कृती ः दह्यात पीठ घालून फेटावे. पाणी, मीठ घालून सारखे करावे. मंद गॅसवर कढी शिजत ठेवावी. कढईत तेल, मोहरी घालून फोडणी करावी. कढीपत्ता घालावा. दह्याच्या मिश्रणात मेथीदाणे, लवंग,वेलची दाणे, आल्याचा कीस घालून गुळाचे पाणी घालावे. हिंगाचे पाणी घालून कढी शिजवून घ्यावी. वरून खमंग फोडणी घालावी.

एकूणच खिचडीबरोबर खूप वेळा कढी केली जाते. उडदाचा भाजलेला पापड, लिंबाचे लोणचे दिले जाते. त्यामुळे खिचडीप्रमाणे खाणे अधिक छान होते. चवदार होते. फक्त खिचडीही संध्याकाळच्या जेवणात विशेषतः हिवाळ्यात केली जाते. गरमागरम पिवळ्या खिचडीवर हिरवीगार कोथिंबीर पांढरेशुभ्र खोबरे आणि खमंग साजूक तूप म्हणजे प्रथम डोळ्यांनाही मेजवानीच असते. शिवाय बरोबर कढी, पापड, टोमॅटोची कोशिंबीर, लोणचे असा झक्क बेत कडाक्‍याच्या थंडीत अगदी मेजवानीच ठरतो. 
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या