पन्नाशीनंतरच्या शिवसेनेचा पक्षविस्तार

प्रकाश पवार 
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

कव्हर स्टोरी  
आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा धाडसी निर्णय घेणाऱ्या शिवसेनेची यापुढची वाटचाल कशी असणार याविषयीचे विश्‍लेषण...

शिवसेना पक्षाने पन्नाशी ओलांडली. त्या आधीच २०१४ मध्ये महाराष्ट्राचे राजकारण बदलले गेले. या बदलाचा मुख्य परिणाम म्हणजे शिवसेना व भाजप युतीच्या संबंधाची पुनर्रचना झाली. शिवसेना पक्षाचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान भाजपनंतरच उदयास आले. हा फेरबदल शिवसेना पक्षाच्या राजकीय जीवनातील खूपच मोठे व अवघड वळण ठरला. त्यानंतर शिवसेना पक्षाला त्यांची भाजपबरोबरची भूमिका निश्‍चित करावी लागली. शिवसेना पक्षाची भाजपबरोबरची भूमिका गेल्या चार वर्षांत सरळ राहिलेली नाही. मात्र त्या भूमिकेमध्ये सातत्याने तणाव दिसू लागले. भाजप बरोबरच्या तणावामुळे शिवसेना पक्षाची विविध राज्यांतील भूमिका बदलली. तसेच विविध राज्यांतील पक्षांबरोबरचे संबंध बदलत गेले. 

या पार्श्‍वभूमीवर शिवसेना पक्षाने स्थानिक शासन संस्थांच्या निवडणुका लढवल्या. तसेच भाजपबरोबर राज्यकारभार केला. या दोन्ही क्षेत्रात भाजप शिवसेनेच्या तुलनेत वरचढ ठरला. ही वस्तुस्थिती शिवसेना पक्षाच्या राजकीय जीवनातील असताना पक्ष पातळीवरील निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये २०१९ च्या निवडणुकांचा वेध घेतला गेला. म्हणून शिवसेना पक्षाच्या अंतर्गत संरचनात्मक फेरबदल झाले. हे फेरबदल महत्त्वाचे आहेत, कारण शिवसेना पक्षाने अर्धशतक पूर्ण केल्यानंतरचे हे बदल आहेत. याआधी फेरबदल झाले नाहीत, असा यांचा अर्थ नव्हे. या आधी बदल झाले. परंतु २०१८ मधील फेरबदल हे नव्या संदर्भांत घडलेले दिसतात. शिवसेना पक्ष काय होता. या पेक्षा सध्या कोणत्या पेचप्रसंगात आहे आणि तो पेचप्रसंग शिवसेना कशी सोडवते, हे समजून घेणे जास्त चित्तवेधक ठरते. 

संघटनात्मक फेरबदल 
जिल्हा शिवसेना प्रमुखांकडून शिवसेनेने वस्तुस्थितीचे अहवाल गोळा केले. त्यानंतर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली. शिवसेनेला ताकद संघटनेमधून मिळते. कारण शिवसेना पक्षाची संघटना समाजवास्तव व गरजेमधून घडत गेली. म्हणून वेळोवेळी संघटनेच्या संरचनेमध्ये बदल झाले. शिवसेनाप्रमुख ही पदरचना व्यक्तिकेंद्रित व दिव्यवलयी होती. या संरचनेवर संपूर्ण प्रभाव केवळ बाळासाहेब ठाकरे यांचा होता. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख या पदरचनेपेक्षा वेगळी संरचना स्वीकारली. सध्या शिवसेना पार्टी प्रमुख, शिवसेना नेते, शिवसेना उपनेते, समन्वयक, संघटक, सचिव, प्रवक्ते, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, कार्यालयप्रमुख अशी संरचना पक्षाने निर्माण केली. या पदाचा समावेश घटनेमध्ये करून निवडणुका घेतल्या गेल्या. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर हा सर्वांत मोठा बदल झाला. त्यामुळे या संघटनेवर उद्धव ठाकरे यांचे नियंत्रण आले. उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख या संरचनेसंबंधी कार्य करत राहिले. या दोन्ही संरचनांमध्ये सत्ता, अधिकार व अधिमान्यता या तीनही संदर्भांत फरक दिसतो. शिवसेना प्रमुख या पदाची सत्ता व अधिकारांची व्याप्ती अमर्याद मानली जात होती. त्यास शिवसेना नेते, उपनेते आणि कार्यकर्त्यांची मान्यता होती. शिवाय भाजपने त्यास सहमती दिली होती. शिवसेना पार्टी प्रमुख ही संरचना सत्ता, अधिकार व अधिमान्यता या तीनही संदर्भांत मर्यादित स्वरूपाची समकालीन दशकामध्ये आहे. निवडणूक आयोगाने पक्षांतर्गत निवडणुकांची प्रक्रिया राबविण्याचे बंधन घातले. त्यामुळे सर्व पदांना किंवा रचनांना घटनात्मक स्थान मिळाले. यामुळे शिवसेना नेते ही संरचना घटनात्मक झाली. आदित्य ठाकरे नेते झाले. ते टेक्‍नोसॅव्ही आहेत. शिवसेनेने तंत्रज्ञानाला महत्त्व देणारी संरचना उभी केली. तेरा नेते व २१ उपनेते  अशी संरचना औपचारिकपणे निवडणूक पद्धतीने जाहीर झाली. या शिवाय प्रवक्ते सचिव अशा संरचना निवडणूक पद्धतीने जाहीर झाल्या. शिवसेना नेते ही संरचना सत्ता आणि अधिकाराची सध्या दुसऱ्या स्थानावरील आहे. अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंद अडसूळ, एकनाथ शिंदे यांना नव्याने शिवसेना नेते केले गेले. मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, रामदास कदम, संजय राऊत, दिवाकर रावते, गजानन कीर्तिकर या जुन्या नेत्यांना स्थान या सरंचनेमध्ये शिवसेनेने दिले आहे. नेत्यांची संख्या पाचने वाढविण्यात आली. या संरचनेची तीन वैशिष्ट्ये दिसतात. एक, जवळजवळ महाराष्ट्रातील प्रत्येक विभागाला स्थान दिले गेले. शहरी भागाच्या बाहेर प्रथमच ग्रामीण भागाला शिवसेना नेते म्हणून नेमले गेले (अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंद अडसूळ). दोन, मुंबई शहर केंद्रीय शिवसेना नेते ही पदरचना असूनही मुंबई बाहेरील शहरातील नेते केले गेले (एकनाथ शिंदे). तीन, जुन्या व नव्या अशा दोन्हींचा समन्वय औपचारिकपणे घातला गेला आहे. २१ शिवसेना उपनेते अर्थातच शिवसेना नेते या संरचनेच्या नंतरची सत्ता व अधिकारांची संरचना आहे. शिवसेना नेते व शिवसेना उपनेते यांच्यामध्ये संवाद राहील अशी काळजी घेतली गेली. विठ्ठलराव गायकवाड, रघुनाथ कुचिड (कामगार सेना) हे नव्याने उपनेते केले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे झाले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचे स्थान शिवसेना उपनेते यांच्या वरचे झाले. शिवाय शिवसेना नेते म्हणून ते शिवसेना नेते संरचनेत समान परंतु अप्रत्यक्षपणे शिवसेना नेते या संरचनेचे प्रमुख झाले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या विरोधी शिवसेना नेते जाणार नाहीत. परंतु आदित्य ठाकरे यांना त्यांच्याशी जुळवून घेण्याची व सर्व शिवसेना नेतेदेखील आदित्य ठाकरे यांच्याशी जुळवून घेतील अशी संरचना घडली. सरतेशेवटी काही वाद-विवाद झाला तर निवाड्याचे स्थान शिवसेना पार्टी प्रमुख या स्वरूपात उद्धव ठाकरे कार्यशील आहेत. म्हणजेच ही संरचना आदित्य ठाकरे यांची स्वीकाहार्यता पक्षांतर्गत निर्माण करते. शिवाय उद्धव ठाकरे यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्याकडे नेतृत्वाची धुरा वळवण्याच्या प्रक्रियेतील हा मैलाचा दगड ठरणारी आहे. नेतृत्वामधील दोन पिढ्यांमध्ये वाद-विवाद घडणार नाही. समर्थकांमध्ये संघर्ष व असुरक्षितता राहणार नाही. यांची बरीच दखल घेतलेली दिसते. पक्षसंघटनेमध्ये प्रवक्ते ही संरचना जास्त महत्त्वाची झाली आहे. या संरचनेवर अरविंद सावंत, नीलम गोऱ्हे, अनिल परब, अमोल कोल्हे, मनीषा कायंदे यांना स्थान मिळाले. वृत्तवाहिन्यांमुळे प्रवक्ते हे पद जोखमीचे झाले आहे. वृत्तवाहिन्यांशी संबंधितांच्या नेमणुका या पदावर झाल्या. थोडक्‍यात शिवसेनेच्या अर्धशतकानंतरची पक्ष संघटना जुन्या संघटनेशी साधर्म्य असलेली दिसली, तरी तिच्या अंतर्गत फेरबदल झाले. शिवाय संघटनेचा हेतू व उद्दिष्ट जुन्या काळापेक्षा वेगळे दिसते. ही दूरदृष्टी शिवसेना पक्षाच्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे दिसते. समन्वयक व संघटक या दोन संरचनांची नव्याने निर्मिती केली गेली. शाखास्तरावरील कामाच्या नियोजनासाठी समन्वयक अशी संरचना तयार केली. कार्याची व्याप्ती वाढविण्याची जबाबदारी समन्वयक संरचनेवर आहे. मुंबई - ठाणे भागात शिवसेना पक्षाचा विस्तार केला. त्यामुळे पक्षविस्ताराला पाठबळ देण्यासाठी संघटक अशी संरचना शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये सामील केली गेली. सात नवे संघटक केले गेले. संघटक पदावर हेमराज शहा, अखिलेश तिवारी, विनय शुक्‍ला, गुलाबचंद दुबे, अण्णा मलाई, रवींद्र कुवेस्कर व गोविंद घोळवे यांना स्थान दिले. या पैकी बहुसंख्य अमराठी नेते आहेत. उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, कार्यालयप्रमुख यांच्या कामाचे नियोजन करण्याची जबाबदारी समन्वयकाची निश्‍चित केली आहे. उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, कार्यालयप्रमुख या संरचना सुरवातीसपासून क्रियाशील होत्या. मात्र या संरचनांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. पक्षाला यश मिळवून देण्यात या तीन संरचनांची महत्त्वाची भूमिका असते. त्या संरचनांना पक्षाने ताकद दिली आहे. एकूण शिवसेना पक्षाने पक्षसंघटनेची पुनर्रचना केली. पक्षसंघटनेला काळाशी सुसंगत केले गेले. शिवाय पक्षाच्या विस्ताराची त्यामध्ये दृष्टी ठेवली गेली. अर्थात हा सर्व बदल प्रत्यक्षात झाला आहे. परंतु या बदलामुळे यश किती मिळेल हा मुद्दा मात्र काळाच्या पोटात दडला आहे. 

शतप्रतिशत शिवसेना 
एकविसाव्या शतकामधील दुसऱ्या दशकांतील राजकीय परिस्थिती आणि आव्हाने लक्षात घेऊन शिवसेनेने शतप्रतिशतची घोषणा केली. त्यांनी लोकसभेच्या पंचवीस व विधानसभेच्या १५० जागाचे टार्गेट ठरवले. हे शिवसेना पक्षाचे मिशन आणि संघटनात्मक फेरबदल यांचा संबंध दिसतो. कारण निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी ताकद वेगवेगळ्या घटकांमधून एकत्र करावी लागते. त्यांचे नियोजन केले गेले. या नियोजनाची जबाबदारी एका अर्थाने युवा नेते म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे दिसते. युवक आणि शिवसेना नेते अशा प्रकारचा मतदारांना जोडणारा पूल बांधला गेला. तसेच शिवसेना प्रमुखांच्या काळातील कार्यकर्ते आणि आजची शिवसेना यांची सांधेजोड करणारा मनोहर जोशी-सुधीर जोशी अशी जुळवाजुळव झाली आहे. तर सत्ताधारी वर्ग आणि पक्षसंघटना यांच्यात संवादी भूमिकेचा पूल अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंद अडसूळ, एकनाथ शिंदे यांच्या जुळणीमधून उभा केला गेला. राजकीय पक्षांच्या यशापयशाचा कणा वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया अशा यंत्रणा आहेत. त्यांच्याशी संपर्काची यंत्रणा अरविंद सावंत, नीलम गोऱ्हे, अनिल परब, अमोल कोल्हे, मनीषा कायंदे यांच्या मार्फत उभी केली आहे. म्हणजेच युवक, शहरी मतदार, जुने कार्यकर्ते, नवे कार्यकर्ते, वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया अशा संरचनांमधून शिवसेनेने ताकद एकत्र करण्याची रूपरेषा तयार केलेली दिसते. या शक्ती संचयाच्या आधारे शिवसेना शतप्रतिशतची घोषणा करत आहे. म्हणजेच शिवसेना संघटनेने मिशन आणि संघटनात्मक फेरबदल यांचा एकत्रित विचार केलेला दिसतो. 

विचारप्रणालीची डागडुजी 
सध्या शिवसेना पक्षाने दृश्‍य आणि अदृश्‍य अशा दोन पातळ्यांवर विचारप्रणालीची व्यूहरचना केलेली दिसते. दृश्‍य पातळीवर शिवसेना भूमिपुत्र, हिंदुत्व, शेतकरी-शेतमजुरांचे हितसंबंध, स्त्रियांना समान संधी अशी विचारप्रणालीची चतुःसूत्री मांडते. भूमिपुत्र आणि हिंदुत्व या दोन संकल्पना शिवसेना पक्षाच्या विचारप्रणालीचा मध्यवर्ती कणा राहिल्या आहेत. मात्र गेल्या अर्धशतकामध्ये या दोन्ही संकल्पनांचे राजकीय व्यवहारात अर्थ सतत बदलत गेले. भूमिपुत्र संकल्पना मराठी माणसांची एकजूट करणारी आहे. एकविसाव्या शतकाच्या आरंभी शहरी भागांचा चेहरा खूपच बदलला. त्यामुळे शिवसेना पक्षाची भूमिपुत्र संकल्पना अंधूक झाली होती. भूमिपुत्र संकल्पना राजकीय यश फार मिळवून देऊ शकली नाही. त्यामुळे खुद्द शिवसेना पक्षाने अमराठी लोकांशी जुळवून घेतले होते. २०१४ नंतर अमराठी समूह भाजपकडे वळला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाला मराठी माणसांची एकजूट हा मुख्य कार्यक्रम वाटतोय. साहजिकच भूमिपुत्र ही संकल्पना मराठी-अमराठी असा अंतराय घडवते. या अंतरायामुळे शिवसेनेची मराठी मतपेटी घडेल, अशी अटकळ दिसते. या अर्थाने मराठी माणसांची एकजूट हा ठराव केला गेला. विचारप्रणालीशी संबंधित दुसरा महत्त्वाचा ठराव बिनभेसळीचा भगवा अशा आशयाचा आहे. हा ठरावदेखील शिवसेना आणि भाजप यांच्या हिंदुत्व संकल्पनेमध्ये फरक करणारा आहे. शुद्ध हिंदुत्वाचा दावा शिवसेना पक्षाचा दिसतो (गाईला मारणे हे पाप असेल तर थापा मारणे हे.., ). शिवसेनेच्या हिंदुत्वाचा संबंध शिवाजी महाराजांच्या प्रतिकाशी जोडला गेला आहे. परंतु या बरोबरच गेल्या वीस वर्षांत संभाजी महाराजांचे प्रतीक राजकीय रणमैदानात प्रभावी ठरते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचे शिल्पकार भाषावाचक किंवा प्रांतवाचक अर्थाने मराठा म्हणजेच ओबीसीदेखील होते. त्यामुळे शिवसेनेचे शिवाजी महाराज प्रतीक लक्षवेधक होते. परंतु संभाजी महाराजांचे प्रतीक मराठा- नवबौद्धवादाचे आहे. तसेच ज्ञानाच्या अधिकारांचे गेली दोन दशके झाले आहे. हा नवीन अर्थ शिवसेना पक्षाला त्यांच्या विचारांमध्ये समाविष्ट करण्यास अडचण येते. त्यामुळे शिवसेना त्याबद्दल घसरडी भूमिका घेते (संभाजी राजांच्या मृतदेहाचे तुकडे कोणी शिवले याचे श्रेय का घेता?). कारण ही भूमिका मराठा समर्थक आहे की मराठा- नवबौद्ध समर्थक आहे, हे स्पष्ट होत नाही. परंतु शिवसेना हिंदुत्वाचा अर्थ वेगळ्या संदर्भांत मांडते हे मात्र निश्‍चितपणे दिसते. महाराष्ट्रात शिवाजी महाराज हे राजकीय संघटनांचे आयकॉन आहेत. ही प्रतिमा शिवसेना स्पष्ट करते. परंतु २०१४ मध्ये भाजपने शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने अशी भूमिका घेतली होती. या पाच वर्षांत शिवाजी महाराजांशी संबंधित विविध प्रतिके भाजपकडे वळली आहेत. शिवाय संभाजी महाराजांचे प्रतीक धुव्रीकरण करत आहे. हे सर्वच शिवसेनेच्या दृष्टीने पेचप्रसंग आहेत. परंतु संभाजी महाराजांवरील मालिकेतील मुख्य कलाकार अमोल कोल्हे हा शिवसेनेचा प्रवक्ता आहे. म्हणजेच शिवसेनेने शिवाजी महाराजांच्या बरोबर संभाजी महाराज या आयकॉनशी जुळवून घेतले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात केवळ बाळासाहेब हिंदू हृदयसम्राट होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर दुसरे हिंदू हृदयसम्राट नरेंद्र मोदी झाले. त्यामुळे हिंदू हृदयसम्राट हा आयकॉनदेखील पेचप्रसंग निर्माण करतो. परंतु मूळ संकल्पनेचा दावा शिवसेना पक्षाचा दिसतो. शिवसेना पक्षाच्या विचारप्रणालीची तिसरी संकल्पना शेतकरी-शेतमजूरांशी संबंधित दिसते. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये छोटे शेतकरी, जिरायत शेतकरी, शेतमजूर हा शिवसेना पक्षाचा आधार होता. त्यामुळे शिवसेना शेतकरी- शेतमजुरांबद्दल भूमिका मांडत आली आहे. शिवसेना पक्षाची सहकार क्षेत्रातील- श्रीमंत शेतकरी वर्ग विरोध भूमिका होती. मात्र शिवसेना पक्षाने दोन वेगवेगळे ठराव मांडले आहेत. त्यांनी शेतमालाला हमीभाव आणि शेतमजुरांना निवृत्तिवेतन अशा दोन वेगवेगळ्या संकल्पना मांडलेल्या दिसतात. म्हणजे शिवसेना शेतकरी वर्गातील दोन्ही वर्गांच्या हितसंबंधाचा दावा करत आहे. थोडक्‍यात शिवसेना शेतकरी वर्गांतील वर्ग रचना दूर सारते. त्या ऐवजी शेतकरी समूहांमध्ये वर्गीय समझोता घडवते. अशी शिवसेनेची शेतकरी वर्गाबद्दलची नवीन भूमिका पुढे येते. महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त स्त्रियांची भागीदारी आहे. त्यामुळे स्त्रियांचे राजकीयीकरण झाले. शिवाय पन्नास टक्के मतदार महिला आहेत. त्यामुळे शिवसेना महिलांना समान संधी मिळावी अशी भूमिका मांडत आहे. थोडक्‍यात भूमिपुत्र, हिंदुत्व, शेतकरी-शेतमजुरांचे हितसंबंध, स्त्रियांना समान संधी अशी दृश्‍य स्वरूपातील चतुःसूत्री विचारप्रणाली शिवसेनेने सध्या आखलेली दिसते. अर्थातच हीच कायम राहील असे नव्हे. शिवसेना गरजेप्रमाणे बदल करत जाते. शिवसेनेची अदृश्‍य पातळीवरील विचारप्रणाली वेळोवेळी स्पष्ट झाली आहे. रियल इस्टेटची राजकीय छत्री आणि टेक्‍नॉलॉजी या दोन्ही क्षेत्रांशी शिवसेना जुळवून घेते. त्यामुळे शिवसेना रियल इस्टेटची राजकीय छत्री आणि टेक्‍नॉलॉजिकल समाज अशा दोन वर्गांच्या हितसंबंधांचा दावा करते. ही शिवसेनेची अदृश्‍य विचारप्रणाली आहे. परंतु शिवसेना नेते, शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते या तीन संरचनामध्ये शिवसेनेने अदृश्‍य विचारप्रणालीशी जुळवाजुळव केलेली स्पष्टपणे दिसते. 

चौरंगी, तिरंगी, दुरंगी 
शिवसेना पक्षाने संघटनात्मक, नेतृत्व, विचारप्रणाली आणि इश्‍यूमध्ये डागडुजी केली आहे. परंतु २०१९ ची निवडणूक चौरंगी, तिरंगी, दुरंगी पैकी कशी होईल याचे चित्र स्पष्ट झाले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआयचे दोन-तीन गट यांची एक आघाडी आकाराला येण्याची शक्‍यता आहे. दोन्ही काँग्रेसची मते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ३५.२० टक्के होती. इतर छोट्या पक्षांशी आघाडी आणि सरकार विरोधीचे जनमत या दोन्हीमुळे पक्षीय स्पर्धा जास्त घासून होईल. त्यामुळे शिवसेना, भाजप व आघाडी अशी तिरंगी स्पर्धेचे चित्र शिवसेनेच्या व्यूहरचनेमधून दिसते. परंतु पुढील एक वर्षातील भाजपची कामगिरी तिरंगी स्पर्धेचे समर्थन करेल की दुरंगी स्पर्धेचे हे भाजप ठरविणार आहे. चौरंगी पक्ष स्पर्धा घडण्याची शक्‍यता फार कमी आहे. तिरंगी किंवा दुरंगी अशी सत्तास्पर्धा होईल. तिरंगी पक्ष स्पर्धा शिवसेनेपेक्षा भाजपची जास्त कोंडी करणारी ठरावी, अशी शिवसेनेची आखणी दिसते. कारण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची मते २७.८० होती. परंतु त्यामध्ये घट होईल, अशी शिवसेनेची अटकळ दिसते. तर शिवसेना पक्षाची मते १९.३० टक्के होती. म्हणजे दोन्ही काँग्रेसच्या एकत्रित मतांपेक्षा भाजपची मते कमी आहेत. त्यामुळे भाजपच्या कोंडीची शक्‍यता दिसते. मुंबई-ठाणे, पुणे, नाशिक या त्रिकोणामध्ये सर्वांत जास्त मतदारसंघ आहेत. शिवाय हे मतदारसंघ शहरी आहेत. तेथे रियल इस्टेटची राजकीय छत्री आणि टेक्‍नॉलॉजिकल समाज या दोन घटकांचा विलक्षण प्रभाव आहे. मराठवाडा- पश्‍चिम विदर्भात शेतकरी- शेतमजुरांचा प्रश्‍न महत्त्वाचा ठरतोय. त्यामुळे शिवसेनेने शहरी भाग आणि मराठवाडा- पश्‍चिम विदर्भ असे रणमैदान आखलेले दिसते. या बरोबरच शिवसेनेने रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडचा विचार केलेला दिसतो. या रणमैदानावर शिवसेना मुख्य स्पर्धक असेल अशी शिवसेनेची व्यूहनीती दिसते. मात्र ऐनवेळी सत्ता स्पर्धा दुरंगी किंवा चौरंगी झाली तर शिवसेना या पेक्षा जास्त चांगली निवडणूक कामगिरी करेल, असेही तंत्र यामध्ये दिसते. त्यामुळे शिवसेना पक्षाने तिरंगी सत्ता स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. ही सत्ता स्पर्धा दुरंगी किंवा चौरंगी झाली तर शिवसेनेसाठी बोनस असेल. म्हणजे शिवसेनेसाठी तिरंगी सत्ता स्पर्धा हे आव्हान आहे. ते आव्हान पेलण्याची तयारी म्हणजेच शिवसेनेची २०१९ ची तयारी होय. शिवसेनेच्या सध्याच्या आकलनाप्रमाणे तिरंगी पक्षीय अंतराय असेल. लोकसभा आणि विधानसभा यांच्या एकत्र निवडणुका होण्याच्या शक्‍यता जास्त आहेत. त्यामुळे एकूण राजकारण भाजपकेंद्रीत घडण्याची शक्‍यता जास्त आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या दृष्टीने २०१९ ची निवडणूक तिरंगी म्हणजे अवघड आहे. परंतु शिवसेनेने २०१४ पासून अँटी इन्कम्बन्सी भाजपकडे वळवली आहे. शिवसेना सत्तेत आहे. परंतु सत्ताविरोधी जनमत मात्र शिवसेनाविरोधी घडू दिले नाही. हे शिवसेना पक्षाचे तंत्र सातत्याने दिसते. थोडक्‍यात शिवसेना पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या