...आणि दबदबा वाढला!

अमित डोंगरे 
सोमवार, 27 मे 2019

विश्‍वकरंडक विशेष
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेला १९७५ पासून सुरवात झाली. या स्पर्धेने आजपर्यंत अनेक चढउतार पाहिले, तसेच भारतीय संघानेही ते अनुभवले. या स्पर्धेतील भारतीय संघाची कामगिरी कशी आहे, याचा लेखाजोखा. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर भारतीय संघाकडे लिंबूटिंबू म्हणूनच पाहिले जात होते. मात्र १९८३ च्या स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद मिळविले आणि तिथून खऱ्या अर्थाने भारतीय संघाचा जागतिक क्रिकेटवर दबदबा सुरू झाला. 
एकदिवसीय सामन्यांच्या मर्यादित क्रिकेट सामन्यांना सत्तरच्या दशकात सुरुवात झाली. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिजसारखे संघ क्रिकेटच्या या फॉरमॅटला लवकरच सरावले, मात्र भारतीय संघाला सातत्याने कसोटी क्रिकेट खेळल्यामुळे एकदिवसीय सामन्यांचा अनुभवच नव्हता. त्यामुळे १९७५ मध्ये झालेल्या पहिल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाची खूपच लाजिरवाणी कामगिरी झाली. त्यावेळी भारताचा भक्कम फलंदाज सुनील गावसकर यांनी एका सामन्यात सुरुवातीला फलंदाजीला येऊन अखेरपर्यंत नाबाद राहात केवळ ३६ धावाच केल्या. त्यावेळी गावसकरांवर सडकून टीका झाली होती. मात्र एकदिवसीय सामन्यांचा अनुभवच नसल्याने असे चित्र उभे राहिले होते. 

दुसरी स्पर्धा १९७९ मध्ये झाली. त्यावेळी मात्र भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांना चांगलाच सरावला होता. अर्थात पहिल्या स्पर्धेप्रमाणेच दुसऱ्या स्पर्धेतही वेस्ट इंडिज संघाने बाजी मारली. त्यावेळी वेस्ट इंडिजचा संघ सर्वांत बलाढ्य मानला जात होता. १९८३ मध्ये झालेली तिसरी विश्‍वकरंडक स्पर्धा मात्र भारतीय संघाने आपल्या बळावर जिंकत वेस्ट इंडिजच नव्हे, तर सर्वच संघांना पाणी पाजले. या स्पर्धेत पहिल्या फेरीत आपण वेस्ट इंडिजला पराभूत केले व अखेरच्या लढतीतही पराभूत करत क्रिकेट जाणकारांना अचंबित केले. खरेतर ही स्पर्धा सुरू होण्यापासून भारतीय संघाकडे कोणीही विजेते म्हणून पाहिले नव्हते. मात्र ‘अंडरडॉग’ असलेल्या भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकत एक इतिहास घडविला. भारताचा कर्णधार कपिल देव यांनी या स्पर्धेच्या अखेरच्या लढतीत सर व्हिवीयन रिचर्डस यांचा अफलातून झेल घेतला आणि तिथेच सामना भारताच्या बाजूने फिरला. हा झेल त्यावेळी चांगलाच गाजला. आजही क्षणचित्रांमध्ये हा झेल जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम झेल म्हणून दाखवला जातो. या सामन्यानंतर व विजेतेपदानंतर खऱ्या अर्थाने भारतीय संघाकडे क्रिकेटमधील ‘सुपर पॉवर’ म्हणून पाहिले जाऊ लागले. ही स्पर्धा भारताने जिंकली, तेव्हा भारतीय क्रिकेट मंडळाकडे खेळाडूंना बक्षीस देण्यासाठी पैसेच नव्हते. भारतीय संघाचे मायदेशी आगमन झाल्यानंतर त्यावेळचे मंडळाचे सर्वेसर्वा राजसिंग डुंगरपूर यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गाण्याचा कार्यक्रम करण्याची विनंती केली. या कार्यक्रमामुळे जी रक्कम गोळा झाली ती भारतीय संघातील खेळाडूंमध्ये समान वाटण्यात आली. या स्पर्धेनंतर भारतीय संघाचा आत्मविश्‍वास दुणावला व जागतिक क्रिकेटचे राजे होण्याकडे प्रवास सुरू झाला. १९७९ च्या स्पर्धेत किंवा त्यानंतरच्या अनेक स्पर्धांमध्ये भारतीय संघाला तशी कामगिरी करता आली नाही, मात्र परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानला सातत्याने पराभूत करण्याची कामगिरी भारतीय संघानी केली. ती परंपरा आजतागायत सुरू आहे. प्रत्येक विश्‍वकरंडक स्पर्धेत आजवर भारतीय संघ जितक्‍यावेळा पाकिस्तानशी खेळला त्या त्या वेळी भारताने त्यांना पराभूत करण्याची किमया साधली. आता येत्या ३० मेपासून २०१९ ची विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू होत आहे आणि तेच सातत्य राखण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. 

भारतात १९८७ ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा रिलायन्स कंपनीने प्रायोजित केली होती. या स्पर्धेपासून भारतीय क्रिकेट मंडळाकडे पैशांचा ओघ सुरू झाला व त्यानंतरच्या केवळ दशकभरातच भारतीय क्रिकेट मंडळ कोट्यधीश झाले. क्रिकेटमध्ये पैसा आला व तो सातत्याने कसा येईल हेदेखील डुंगरपूर आणि समितीने पाहिले. १९८७ च्या स्पर्धेनंतर क्रिकेटसम्राट सुनील गावसकर निवृत्त होणार होते, त्यावेळी त्यांना घेऊन दिनेश सूटिंग कंपनीने एक जाहिरात केली. तेव्हापासून खेळाडूंना जाहिरातींतून पैसे मिळायला सुरुवात झाली. 

आशिया खंडात भारत, पाकिस्तान व श्रीलंका संघांनी सातत्याने सरस कामगिरी करत आपली ओळख निर्माण केली. आजवरच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने पाकिस्तानला सातत्याने पराभूत केले आहे. हीच विजयी मालिका यावेळीही कायम राखण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारतीय संघाने १९८३ नंतर जवळपास २८ वर्षांनी मायदेशात झालेली विश्‍वकरंडक स्पर्धा जिंकली व मास्टर ब्लास्टर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याला एक अनोखी भेट दिली. सचिनने पाकिस्तानच्या जावेद मियाँदाद याच्या विक्रमाची बरोबरी केली व सर्वांत जास्तवेळा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा खेळण्याची कामगिरी नोंदविली. सचिनने भारतीय संघात धृवपद मिळविले होते. मात्र, त्याने खेळलेल्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाला विजेतेपद मिळविण्यात अपयश येत होते. अखेर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करत २०११ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले व सचिनला सर्व खेळाडूंनी एक अनोखी भेट दिली. 

या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघातील स्टार खेळाडू युवराज सिंग याला कॅन्सर झाल्याचे त्याने कोणालाही सांगितले नव्हते. या आजाराशी झुंजत त्याने या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यावेळी युवराज एका मुलाखतीत म्हणाला होता, की त्याला कोणालातरी विश्‍वकरंडक जिंकून एक अनोखी भेट द्यायची आहे. मात्र, ती व्यक्ती कोण हे त्याने व धोनीने कोणालाच सांगितले नव्हते. ही स्पर्धा जिंकल्यानंतर मात्र सर्व खेळाडूंनी सचिनला आपल्या खांद्यावर उचलून घेत हाच तो खेळाडू आहे, हे दाखवून दिले. या सामन्यानंतर युवराजने आपल्या आजाराची माहिती सगळ्यांना सांगितली व लगेचच उपचारांसाठी अमेरिकेला प्रस्थान केले. 

आज इंटरनेटच्या युगात सगळ्या गोष्टींची माहिती एका क्‍लिकवर मिळते. त्यामुळे या लेखात आम्हाला आकडेवारी देण्यात काहीही रस नाही. केवळ भारतीय संघाच्या कामगिरीचे विश्‍लेषण करत आहोत. 

त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडेदेखील पैशांची वानवा होती व इंग्लंड, ऑस्ट्रेलियाची क्रिकेट मंडळे जागतिक क्रिकेटवर राज्य करत होती. तिसऱ्या स्पर्धेनंतर मात्र ही परिस्थिती बदलली व भारतीय संघाचा दबदबा वाढला. भारतातील कंपन्या, विविध प्रायोजक क्रिकेटला हात देण्यासाठी सातत्याने पुढे येत होते. आजही भारतात याच खेळाला सर्वांत जास्त प्रायोजक मिळत आहेत असेच चित्र आहे. भारतीय उपखंडात आजतरी क्रिकेट हाच सर्वांत महत्त्वाचा खेळ मानला जातो, त्यामुळेच प्रायोजकांना आपला पैसा याच खेळावर लावण्याची सवय जडली आहे. अर्थात त्यामुळे क्रिकेटपटूंनाही बक्कळ पैसा मिळू लागला आहे. क्रिकेट मंडळ व खेळाडू आज गर्भश्रीमंत झाले आहेत ते डुंगरपूर व जगमोहन दालमिया या दूरदृष्टी असलेल्या क्रिकेट व्यवस्थापकांमुळे. दालमिया व डुंगरपूर आज हयात नसले, तरी त्यांनी आखून दिलेल्या वाटेवरूनच आज मंडळ वाटचाल करत आहे व आयपीएल तसेच विविध स्पर्धांद्वारे कोट्यवधी रुपये कमवत आहे. 

पहिल्या दोन स्पर्धांत वेस्ट इंडीजचा संघ विजेता ठरला होता. तिसऱ्या स्पर्धेत भारताने बाजी मारली. त्यानंतर मात्र विंडीजच्या संघाला ओहोटी लागली व जागतिक क्रिकेटवर ऑस्ट्रेलिया संघाचे वर्चस्व निर्माण झाले. या संघाने चौथी स्पर्धा जिंकली व विजेत्यांच्या यादीत स्वतःचे नाव समाविष्ट केले. त्यानंतर झालेल्या १९९२ च्या स्पर्धेत इम्रान खानच्या पाकिस्तान संघाने विजेतेपद मिळविले व भारताच्या पंक्तीत स्थान मिळविले. त्यानंतरच्या १९९६ च्या स्पर्धेत अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघाने अद्‌भुत कामगिरी करत विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत श्रीलंकेत जाऊन खेळण्यास बऱ्याच संघांनी नकार दिला होता. त्यावेळी श्रीलंकेत यादवीचे वातावरण होते. अनेक संघांना तिथे खेळणे धोक्‍याचे वाटत होते, मात्र तरीही श्रीलंका संघाने तळातून वर येत सरस कामगिरी करत विजेतेपद मिळविले. यानंतर मात्र जागतिक क्रिकेटवर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व निर्माण झाले. त्यांनी १९९९, २००३ आणि २००७ अशा सलग तीन स्पर्धा जिंकत विक्रम केला. ॲलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली १९८७ ची स्पर्धा या संघाने जिंकली होती. १९९९ ची स्पर्धा स्टीव वॉच्या नेतृत्वाखाली, तर त्यानंतरची स्पर्धा रिकी पाँटिंग व मायकेल क्‍लार्कच्या नेतृत्वाखाली जिंकत जागतिक क्रिकेटचे राजे होण्याकडे वाटचाल सुरू केली. 

भारतीय संघाने त्यानंतर विविध एक दिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची कामगिरी सातत्याने केली. या बलाढ्य संघाला आपणच पराभूत करू शकतो असा संदेशही जागतिक क्रिकेटला दिला. मग ती ऑस्ट्रेलियातील मालिका असो वा कोणतीही अन्य मालिका भारतीय संघाने सातत्याने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. सचिनच्या कामगिरीने शारजातील मालिकाच नव्हे, तर कित्येक मालिकांमध्ये भारतीय संघाचेच पारडे जड राहिले आहे. सचिनला तर ऑस्ट्रेलियाचा संघ समोर आला, की काय करू आणि काय नको असेच होत होते. २०११ ची स्पर्धा सचिनची अखेरची स्पर्धा होती. त्यानंतर सचिन निवृत्ती घेणार होता. त्यावेळचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने युवराज व अन्य खेळाडूंच्या सहकार्याने सचिनला विश्‍वकरंडकाची अनोखी भेट देण्याचे स्वप्न पाहिले व साकारही केले. सचिनला सगळ्या खेळाडूंनी आपल्या खांद्यावर उचलून घेत या स्पर्धेचे विजेतेपद साजरे केले. २०१५ मध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने मायकेल क्‍लार्कच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा जिंकत पुन्हा एकदा आपला दबदबा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. 

भारतीय संघ आता इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. आज जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघाइतके दर्जेदार खेळाडू कोणत्याच संघात नाहीत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हा संघ विश्‍वकरंडक स्पर्धा पुन्हा एकदा जिंकणार अशीच परिस्थिती आहे. इंग्लंडचा संघ सध्यातरी भारतीय संघाला मोठे आव्हान देऊ शकतो, मात्र विश्‍वकरंडक स्पर्धेचा इतिहास पाहिला तर आजवर कधीही या संघाला सर्वांत जास्तवेळा अंतिम सामने खेळूनही विजेतेपद मिळविण्यात यश आलेले नाही. भारतीय संघ आज संभाव्य विजेता मानला जात असला, तरी या संघाला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका संघांचे आव्हान मोडून काढावे लागणार आहे. १९९२ ची स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने खेळविली गेली होती, त्याच धर्तीवर यंदाची स्पर्धादेखील खेळविली जाणार आहे. म्हणजेच या स्पर्धेत जितके संघ सहभागी होतील त्यांनी प्रत्येक संघांशी सामने खेळायचे आहे. त्यानंतर साखळीतील कामगिरी गृहीत धरून ज्या संघांचे गुण जास्त आहेत त्यांच्यात आणखी लढती होतील व त्यातूनच उपांत्यफेरीचे सामने होऊन अंतिम सामन्याचे संघ एकमेकांविरुद्ध उभे राहतील. या संघांत जो सामना होईल त्यातूनच विजेता ठरेल. 

यंदा होणारी विश्‍वकरंडक स्पर्धा ही बारावी स्पर्धा आहे. १९७५ च्या पहिल्या स्पर्धेनंतर आजपर्यंत भारतीय संघाने आपला दबदबा जागतिक क्रिकेटवर सिद्ध केला आहे, त्यामुळेच यंदाच्या स्पर्धेसाठी भारतीय संघालाच विजेता मानले जात आहे. आज भारतीय संघातील खेळाडूंची गेल्या दोन वर्षांतील कामगिरी पाहिली, तर कोणीही या संघालाच संभाव्य विजेता समजेल. एकतर भारतीय संघातील खेळाडू यंदाच्या इंडियन प्रिमिअर लीगच्या माध्यमातून कमी षटकांच्या सामन्यांना चांगलेच सरावले आहेत, त्यामुळे विराट कोहलीचा संघ तिसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्यासाठी उत्सुक बनला आहे. 

यंदाची स्पर्धा क्रिकेटचे जन्मदाते असलेल्या इंग्लंडमध्ये होत आहे. तेथील वातावरण लहरी असते. तरीही भारतीय संघाला तिथे लवकर दाखल होण्याचा फायदाही मिळणार आहे. तेथील वातावरणाशी जुळवून घेताना संघाला कोणतीही अडचण येणार नाही. तेथील मैदानेदेखील पूर्वीसारखी वेगवान गोलंदाजीला पूरक राहिलेली नाहीत. भारतीय उपखंडातील पाटा खेळपट्ट्यांप्रमाणेच तेथील खेळपट्ट्यादेखील फलंदाजीला पोषकच असतील असे क्रिकेटतज्ज्ञ बोलत आहेत. जर त्यांचे बोलणे खरे ठरले, तर सातत्याने पाटा खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव असलेला भारतीय संघ निश्‍चितच बाजी मारेल. भारतीय संघाने आजवर विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सरस कामगिरी केली असली, तरी आता यंदाच्या स्पर्धेतील विजेतेपद कोहलीला नक्कीच खुणावत असेल. त्याने यंदाची स्पर्धा खेळाडूंच्या साथीत जिंकली तर कर्णधार म्हणून या स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारा कपिल देव व धोनीनंतरचा तो तिसरा कर्णधार ठरेल. यंदाच्या स्पर्धेतील विजेतेपद भारतीय संघाला ‘जागतिक क्रिकेटचे राजे’ ही ओळख देणार आहे आणि या स्पर्धेतील विजय भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा निर्माण करणारा ठरणार आहे. 

संबंधित बातम्या