हुकला तो संपला

डॉ. अविनाश भोंडवे 
सोमवार, 27 मे 2019

विश्‍वकरंडक विशेष
 

चतुर आणि सावध जो जो, तोच इथे रंगला I
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला II

कविवर्य शांताराम नांदगावकरांचे हे गीत. यातले सारे समर्पक शब्द क्रिकेटचा लिट्‌ल मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील गावसकर यांनी खास त्यांच्या शैलीत गायले आहेत. साधारणतः ऐंशीच्या दशकात हे गीत नेहमी ऐकू यायचे. क्रिकेट खेळणे म्हणजे जीवनातल्या चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव असा या गीताचा सूर होता. तसे पहिले, तर हे अगदी खरे आहे. कारण क्रिकेटमध्ये रोजच्या जगण्यातल्या प्रत्येक पैलूचे दर्शन होते. अगदी आरोग्याचेसुद्धा. क्रिकेट आणि आरोग्य? अनेकांना हा विरोधाभास वाटेल. अनेकांना हा खेळ म्हणजे निव्वळ ‘टाइमपास’ वाटतो. ‘हा तर मूर्खांचा खेळ. एका चेंडूमागे बावीस जण आळीपाळीने धावतात आणि बावीस लाख तो पाहतात.’ क्रिकेटची अशी अवहेलनाही केली जाते. पण वस्तुस्थिती पाहता, हा खेळ मनापासून खेळणाऱ्यांचे केवळ शारीरिक आरोग्यच नव्हे, तर मानसिक आणि सामाजिक आरोग्यदेखील सुधारते. एवढेच नव्हे, तर बौद्धिक चलाखपणा आणि भावनिक आरोग्याचे संतुलन यामध्येही सुधारणा होते. अनेक महान खेळाडूंच्या उदाहरणावरून हे दिसून येईल. क्रिकेट म्हणजे खेळाडूचे क्रीडाकौशल्य, त्याचे शारीरिक व मानसिक संतुलन, बौद्धिक चलाखी आणि मिनिटामिनिटाला वाढणारी उत्कंठा यांचा बहुपेडी संगमच असतो.  
कोणताही मैदानी खेळ आरोग्याला उत्तमच असतो. मग क्रिकेटच त्याला अपवाद का असेल? या बाबतीत गल्ली क्रिकेटपासून शास्त्रशुद्ध पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत कुठल्याही पातळीचे आणि कोणत्याही स्वरूपाचे बंधन नाही. म्हणजे ते २०-२०, एक दिवसीय, टेस्ट क्रिकेट, टेनिस बॉलचे क्रिकेट कुठलाही प्रकार घ्या. तुमच्या आरोग्याला काकणभर का होईना उपयुक्त ठरणारच. 
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वाढत्या स्पर्धेमुळे, खेळाडूंना आपला खेळ अत्युच्च दर्जावर नेण्यासाठी शारीरिक सामर्थ्य, मानसिक संतुलन आणि बौद्धिक कुवत विलक्षण वरच्या पातळीवर न्याव्या लागतात. हे शिखर गाठले, तरच त्यांची कारकीर्द यशस्वी होऊ शकते. अव्वल दर्जाचा आणि खेळात सातत्य राखणारा क्रिकेटर होण्यासाठी, ध्यास घेऊन काही विशेष व्यायाम करत वर्षानुवर्षे नियमितपणे सर्वांगीण साधना करावी लागते.  

शारीरिक आरोग्य
 स्टॅमिना : फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण म्हणजे क्रिकेट या मैदानी खेळाच्या मुख्य बाजू. या तिन्हींमध्ये खेळाडूला जबरदस्त शारीरिक क्षमता म्हणजेच स्टॅमिना असावा लागतो. फलंदाजीमध्ये धावा काढण्यासाठी अतिशय वेगाने पळावे लागते. शतक आणि द्विशतक हे महत्त्वाचे टप्पे पार पाडताना, तर न दमता दिवस-दिवस खेळपट्टीवर धावत राहावे लागते. एखादा फलंदाज जर दमला, तर तो किंवा त्याचा जोडीदार धावबाद होणार हे नक्की असते. विरुद्ध बाजूचा संघ त्याची वाटच बघत असतो.

सातत्य : गोलंदाजाला विशेषतः तो द्रुतगती किंवा मध्यमगती असेल, तर धावत जाऊन रनअप घ्यावा लागतो आणि विकेटपाशी येताना, तर जास्तीत जास्त वेगाने येऊन चेंडू टाकावा लागतो. लागोपाठ अनेक षटके टाकावी लागतात. त्यामुळे धावण्याचा स्टॅमिना गोलंदाजात असावाच लागतो. वयानुसार फिटनेस कमी होऊ न देता चेंडूचा आणि धावण्याचा वेग कायम राखावा लागतो.
एकवेळ फलंदाज लवकर बाद झाल्याने किंवा गोलंदाजाला दोन-चार षटकांनंतर विश्रांती दिल्यास दमण्याचा प्रश्न येत नाही. पण क्षेत्ररक्षणात मात्र क्रिकेट खेळाडूंच्या क्षमतेचा कस लागतो. क्रिकेटच्या ‘वन डे’ आणि विशेषतः ‘टेस्ट’मध्ये याची खरी कसोटी लागते. कारण पळत जाऊन चौकार अडवणे आणि दिवस-दोन दिवस सतत क्षेत्ररक्षण करत राहणे यामध्ये जेवढा स्टॅमिना लागतो, तेवढा फुटबॉल, हॉकी या नव्वद मिनिटांच्या खेळात लागतही नाही.

व्यायाम : आपली शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी क्रिकेटर्सना रोजचे चार ते आठ किलोमीटर मध्यमगतीने पळणे आवश्‍यक असते. (पोहण्याचाही वापर केला जातो.)   त्याचबरोबर एका वेळेस २० मीटर असे रोज २० ते ५० वेळा असे खूप जलद गतीने पळणे (स्प्रिंट मारणे) गरजेचे असते.
 क्रिकेट हा धावण्या-पळण्याचा खेळ असल्याने दिवसभरात खेळाडूच्या ३५० कॅलरीज नष्ट होतात. याचा फायदा त्यांच्या आरोग्याला मिळतो आणि आजच्या जीवनशैलीतल्या आजारांपासून तो दूर राहतो हा लाभ अलाहिदा. 

स्नायूंची क्षमता : आधुनिक जगातील क्रिकेटर्सना शरीरातील स्नायूंचे सौष्ठव वाढवण्यासाठी जिममध्ये वजनांचे व्यायाम करावेच लागतात. पण त्यातही पायांचे, घोट्याचे, पोटरीचे आणि विशेष करून मांड्यांचे स्नायू शक्तिशाली होण्यासाठी जिममध्ये विशेष व्यायाम करावेच लागतात. कारण फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टिरक्षण या साऱ्या अंगांत पायांच्या शक्तीचे महत्त्व आहेच. आजकाल प्रसिद्ध असलेल्या एन्ड्युरन्स क्रीडाप्रकारात जसे विविध व्यायाम केले जातात, त्याची एक छोटी आवृत्ती क्रिकेटर्सनादेखील नियमितपणे रोज करावी लागते. 
यासमवेत खांद्याचे, कोपऱ्याचे, मनगटाचे आणि पाठीचे व्यायाम करून ते स्नायू कणखर बनवावे लागतात. कारण गोलंदाजीत चेंडू १३० ते १६० किलोमीटर वेगाने टाकण्यासाठी किंवा स्विंग, कटर, स्पिन बॉलिंग करायला ते गरजेचे असतातच, पण फलंदाजीत चेंडू लांबवर सीमेच्या पल्याड टोलवायला आणि चौकार षटकार मारायला हे स्नायू भक्कम असावेच लागतात. आजच्या २०-२० किंवा एक दिवसीय सामन्यात या फटक्‍यांचे महत्त्व किती असते हे वेगळे सांगायला नकोच. 
क्षेत्ररक्षण करतानासुद्धा सीमारेषेवरून किंवा लांब अंतरावरून एकही टप्पा न पडता चेंडू यष्टींवर फेकणे यात केवळ कलाच नव्हे, तर खांद्याच्या स्नायूंची शक्तीसुद्धा सामील असते. नियमित क्रिकेट खेळण्याने स्नायू मजबूत बनतात हे नक्की. त्यामुळे एरवीच्या चालण्यावागण्यातही एक अनोखा आरोग्यदायी डौलदारपणा क्रिकेटरमध्ये निर्माण होतो. 

चापल्य : यष्टिरक्षण करणारा खेळाडू म्हणजे विकेटकीपर हा सर्वांत जास्त चपळ असावा लागतो हे सर्वविदित आहेच. समोरच्या फलंदाजाचे पाय कीजच्या बाहेर पडले, की झपाट्याने पुढे येत, निमिषार्धात बेल्स उडवत त्याला यष्टीचीत करायला कमालीचे चापल्य लागते. एखादा चेंडू फलंदाजाच्या बॅटला निसटता लागल्यावर डोळ्याचे पाते लवण्याच्या आत त्याचा झेल घेणे, वेळप्रसंगी सर्व अंग जमिनीवर झोकून देऊन तो झेल पकडणे यामध्ये कौशल्य तर असतेच, पण शरीराचे अद्वितीय चापल्य असते. ही चपळता प्राप्त करायला विशेष मेहनत घ्यावी लागते. एखाद्या जिम्नास्टसारखे व्यायाम करावे लागतात. फलंदाजीतील पदलालित्यासाठी फुटबॉल, नृत्यातील पदन्यास तसेच झेल घेण्याचे विविध खेळ खेळले जातात. 
फलंदाजीमध्ये चोरटी धाव घेताना, गोलंदाजीत चेंडू वळवण्यासाठी मनगटांची आणि बोटांची हालचाल करायला ते सांधे तसे वाकावे लागतात. क्षेत्ररक्षणात झटकन चेंडू अडवण्यासाठी डाव्या-उजव्या बाजूस झपकन वळायला चपळता लागतेच. एखादा मातब्बर फलंदाज नेत्रदीपक पण घणाघाती शॉट जमिनीलगत मारतो. त्यावेळेस आपल्या डाव्या किंवा उजव्या बाजूला वळत, त्यामध्ये हात घालून त्याचे झेलात रूपांतर करण्यासाठी किंवा तो फटका अडवून सहज होऊ शकणाऱ्या चार धावा वाचवायला अद्वितीय चापल्यच लागते. हे चापल्य दाखवणारा जॉण्टी ऱ्होड्‌स यामुळेच अजरामर झाला. 

 आहार : क्रिकेटर हा एक ॲथलिट असतो आणि एन्ड्युरन्स स्पोर्टसमन असतो. त्यामुळे त्याला आहार नुसता चौरस असून चालत नाही, तर त्यात उच्च दर्जाची प्रथिने, पालेभाज्या, फळे मुबलक असावी लागतात. चरबीयुक्त पदार्थ कमी, साखर आणि कार्बोहायड्रेट्‌स आवश्‍यकतेनुसार मर्यादित असावी लागतात. सर्व जीवनसत्त्वे, खनिजे, क्षार, कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असावी लागतात. त्याचबरोबर सामान्य व्यक्तींच्या दीड ते तीनपट अधिक पाणी त्यांना प्यावे लागते.
मनावर ताबा ठेवून फास्टफूड, जंकफूड, तळीव पदार्थ टाळावे लागतात. भारताचा आजचा कप्तान विराट कोहली अत्यंत तोलून मापून त्याच्या अशा विशेष डाएटचे कटाक्षाने पालन करत असतो. 

 दृष्टी : उत्तम फलंदाजाला खेळताना गोलंदाजाने टाकलेला प्रत्येक बॉल दिसावा लागतो. त्यासाठी तीक्ष्ण दृष्टी लागते. गोलंदाजालासुद्धा समोरच्या फलंदाजाचे पाय आणि बॅट कशी हलते याची एक दृष्टी असावी लागते. यामध्ये घारीसारखी तीक्ष्ण नजर आणि निरीक्षणाचा समावेश होतो. यष्टिरक्षकाला तर ही तीक्ष्ण दृष्टी जोपासावीच लागते. 
 फलंदाजी करताना, क्षेत्ररक्षण करताना डोळे आणि हातपाय यांचे एक जबरदस्त कोऑर्डिनेशन किंवा समन्वय क्रिकेटमध्ये शिकायला मिळते.  

मानसिक आरोग्य
मनाची एकाग्रता क्रिकेटच्या फलंदाजीमध्ये हा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. चेंडूवर सतत नजर कायम ठेवणे हे सर्वच बॉलगेम्समध्ये गरजेचे आहे. पण क्रिकेटमध्ये त्याला विशेष महत्त्व असते. शारीरिक फिटनेस, खेळातील कौशल्य आणि मनाच्या या एकाग्रतेतूनच सचिनसारखे विश्वविख्यात फलंदाज निर्माण होतात. 
असे म्हणतात की, जगातील सारी युद्धे ही सैन्याच्या शक्ती इतकीच मनाच्या कणखरतेवर खेळली गेली आहेत. क्रिकेट त्याला अपवाद नाही. आपण जिंकतोय म्हणून उगाचच वेडेवाकडे फटके मारून बाद होणे, आपण हरतोय म्हणून हातातले झेल सोडून देणे हे खेळाडूंचे मन अस्थिर झाल्याचे लक्षण असते. याची जराशीही जाणीव विरुद्ध संघाला झाली, तरी जिंकत आलेले सामने हरण्यात आणि हरत आलेल्या मॅचेस हातातून जातात. शतकाच्या उंबरठ्यावर बाद होणे, कमी चेंडूत खूप धावा हव्यात म्हणून अशक्‍य धाव काढण्याचा प्रयत्न करत आउट होणे ही सगळी ढळत्या एकाग्रतेची लक्षणे असतात. यासाठी आजकाल खेळाडूंच्या मनाच्या एकाग्रतेसाठी मेडिटेशन किंवा तत्सम ध्यानधारणा करणे अशी विशेष काळजी घेतली जाते. इंग्लंडचा माजी कप्तान माईक ब्रेअरली हा एक निष्णात मानसोपचार तज्ज्ञ होता. त्याने त्याच्या समुपदेशनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-० मालिका हरत आलेल्या इंग्लंडला ५-२ असे जिंकून दिले होते.

आपण चांगले खेळलो, शतक काढले म्हणून हवेत जाणारे आणि नंतर सतत शून्यावर किंवा कमी धावात बाद होऊन करिअर बरबाद करणारे असंख्य खेळाडू आहेत. त्याउलट शतकांमागून शतके साजरी करणारे पण जमिनीवर राहणारे गावसकर, वेंगसरकर, तेंडुलकर, द्रविड, कोहली यांच्यासारखी कित्येक उदाहरणे क्रिकेटच्या इतिहासात सापडतात. आनंदाने अकारण खूप खूष होणे आणि दुःखाने मन विदीर्ण करून निराश होणे, या दोन्ही गोष्टी मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. याचे वस्तुपाठ क्रिकेटमध्ये मिळतात.

क्रिकेटपटू ही आजच्या पिढीचे दैवते आहेत. त्यांच्या आयुष्यातील किरकोळ गोष्टींना प्रसिद्धी देण्याऐवजी क्रिकेट खेळतानाची त्यांची वागणूक कशी आहे हे सर्वांनी उमजून घ्यायला पाहिजे. कारण चारित्र्य हे लिहिण्या-बोलण्यातून नाही, तर वर्तनातून समजत असते. या खेळाच्या मागे एक जी सुसंस्कृत विचारधारा आहे, ती डोळ्यासमोर ठेवून हा खेळ खेळावा. म्हणजे एकाच सामन्याच्या दोनही डावांत पंचांच्या चुकीने बाद दिल्यावर राहुल द्रविड शांतपणे पॅव्हेलियनमध्ये परततो, यामागे केवढी साधना असते हे लक्षात येते. 

एखादा खेळाडू त्याच्या करीअरच्या वाईट कालखंडातून जात असेल, सतत ठराविक गोलंदाजांकडून बाद होत असेल, तर त्याला मानसिक समुपदेशन आणि काही विशेष उपचार केले जातात. यामध्ये जीवनातील भीती, आपल्याला काही अशक्‍य आहे अशी भावना तर समजावली जातेच, पण त्याचा खेळ आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान उंचवले जाते.

खेळत असताना जिंकण्यासाठीच खेळणे ही विजिगिषुवृत्ती क्रिकेटमध्ये उत्तम पद्धतीने रुजवली जाते. पण खेळात हरल्यावर तो खेळच होता आणि समोरचा माणूस आपल्यासारखाच खेळाडू आहे, आपला शत्रू नाही. आपण एक सामना हरलो म्हणजे आयुष्य बिघडले नाही, आपण मालिका हरलो म्हणजे आयुष्य संपले नाही, ही सम्यक भावना क्रिकेटच रुजवते. त्यामुळेच क्रिकेटला ‘जंटलमन्स गेम’ म्हणजे सभ्य लोकांचा खेळ समजले जाते. 
गेल्या सामन्यातील शंभर धावा आजच्या सामन्यात कामाला येऊ शकत नाहीत किंवा आजच्या शून्य धावा म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे. निराशा किंवा आशा या दोन्ही गोष्टी तितक्‍याच बिनमहत्त्वाच्या आहेत, हे नीट समजते. बाद नसताना बाद दिले जाणे यासारखा दुसरा अन्याय नसतो, पण अजिबात भावनाविवश न होता शांतपणे निघून जाण्याचा संयम क्रिकेट शिकवते.

 बौद्धिक पातळी : कोणत्याही पातळीवरचे क्रिकेट हे शारीरिक स्वास्थ्य, खेळातील कौशल्य याप्रमाणेच बौद्धिक पातळीवरही खेळले जाते. एखाद्या समरप्रसंगाप्रमाणे केली जाणारी क्षेत्ररक्षणातली व्यूहरचना, फलंदाजाचे दोष ओळखून करायचे क्षेत्ररक्षणातील तसेच गोलंदाजातील आणि त्यांच्या टप्प्यातील नाहीतर वेगातील बदल, विरोधी संघाला चिंतेत पाडणारे किंवा आश्‍चर्यात टाकणारे खेळातील बदल, संघातले दोष झाकण्यासाठी करायच्या गोष्टी यामध्ये बुद्धीचा वापर होतोच. समोरच्या व्यक्तीला काय वाटते आहे याचे यथार्थ ज्ञान करून घेण्याची कला क्रिकेटमधून मिळते. हा त्या खेळाडूच्या बौद्धिकच नव्हे, तर बाह्य आणि अंतर्गत व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवणारा असतो.    

सामाजिक आरोग्य
 वक्तशीरपणा : भारतासारख्या देशात जिथे कुणीही कधीही वेळेवर जात-येत नाही, कोणताही कार्यक्रम किंवा मीटिंग वेळेवर सुरू होत नाही, तिथे क्रिकेटचे सामने, सराव अगदी वेळेवरच सुरू होतात. सर्व खेळांबाबत असे म्हणता येईलच असे नाही.

 सांघिक भावना : आपण सारे एकच आहोत. सर्वांनी एकत्रपणे आपापले कार्य पूर्ण क्षमतेने मनापासून केले, तर आपण यशस्वी होऊ शकतो. एकट्या खेळाडूने कितीही चांगला खेळ केला, तरी त्याचा उपयोग होत नाही, हे क्रिकेट शिकवते. सगळ्यांना एकत्र ठेवणे, एखाद्याचे उणे-दुणे न काढणे, खेळातल्या चुका माफ करण्याची शिकवण क्रिकेट देते. 

याच बरोबर आपल्या तसेच इतर संघातील खेळाडूंशी मित्रभावना ठेवणे, खेळाडू म्हणून वेगळे असले, तरी माणूस म्हणून सारे समान आहेत यावर भर देणे, नीटनेटकेपणा, स्वच्छता, इतरांचा आदर ठेवणे, यशापयश वाटून घेणे, एखाद्या खेळाडूचा प्रश्न हा साऱ्या संघाचा प्रश्न समजणे, साऱ्यांना मदत करणे असे अनेक गुण या खेळातून शिकायला मिळतात. 

आजच्या भारतीय मुलांमधील खेळांबाबतची अनास्था दूर करण्यासाठी क्रिकेट हा उत्तम उपाय आहे. आज एका बाजूला मुले आणि तरुणवर्ग शारीरिक मेहनत, व्यायाम यांच्यापासून दूर चालला आहे. त्यामुळे स्थूलत्व, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, सांध्यांचे आजार यासारखे विकार वाढत चालले आहेत. दुसऱ्या बाजूला मानसिक संतुलनाचा प्रश्न सामाजिक आरोग्यात उभा राहतो आहे. या दोन्ही गोष्टी साध्य व्हायला क्रिकेटचा वापर करून घेता येईल. मात्र, त्यासाठी दूरदृष्टीने वेगळा विचार करून योजना आखायला हव्यात.

संबंधित बातम्या