भारत जिंकणार ‘कप ऑफ जॉय’?

किशोर पेटकर
सोमवार, 27 मे 2019

विश्‍वकरंडक विशेष
 

इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेची धमाल संपली आणि लगेच विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा ज्वर चढू लागला. ३० मेपासून इंग्लंडमध्ये होणारी ही स्पर्धा सर्वच बाबतीत महत्त्वाची आहे. स्पर्धेत यंदा दहा देशांचे संघ आहेत आणि सारे कसोटी दर्जाचे आहेत. यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सदस्य देशांना स्थान मिळालेले नाही. दोन वेळा जगज्जेतेपद मिळविलेल्या विंडीजला पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागला. १९८३ नंतर प्रथमच झिंबाब्वेचा संघ विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. साखळी फेरी पद्धतीने होणाऱ्या यावेळच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत प्रत्येक संघ सर्व सहभागी संघांविरुद्ध खेळेल. सारे संघ तुल्यबळ आहेत, अफगाणिस्तानलाही कमी लेखता येणार नाही. कारण त्यांच्यातही एखाददुसरा धक्कादायक विजय नोंदविण्याची क्षमता आहे. १४ जुलैला अंतिम लढतीत कोण खेळणार याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल. त्यात भारतीय संघाला संधी किती याबाबतही चर्चा राहील.             

स्पर्धा ३० मे रोजी सुरू होत असली, तरी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पहिला सामना पाच जूनला साऊदॅम्पटन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. स्पर्धेतील पहिल्या चार संघांना उपांत्य फेरीची संधी राहील. त्यामुळे ‘टीम इंडिया’समोर पहिले लक्ष्य बाद फेरीचेच असेल. चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाकडून उपांत्य लढतीत हार पत्करल्यामुळे २०११ मध्ये घरच्या मैदानावर पटकाविलेले जगज्जेतेपद महेंद्रसिंह धोनीचा संघ राखू शकला नव्हता. दोन वेळा विश्‍वकरंडक जिंकलेला भारतीय संघ यंदा यशस्वी ठरणार का यासाठी सहा जुलैपर्यंत थांबावे लागेल. भारताचा शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध लीड्‌सला होईल. कदाचित त्यापूर्वीही भारताची उपांत्य फेरी निश्‍चित होऊ शकते. १६ जून रोजी ओल्ड ट्रॅफर्डला पाकिस्तानला नमविल्यास, भारतीय चाहते वर्ल्डकप जिंकल्याचाच जल्लोष करतील. भारताच्या क्षमतेची चाचपणी ३० जून रोजी इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅमला होऊ शकते. ‘आयसीसी’च्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत सध्या इंग्लंड पहिल्या, तर भारत दुसऱ्या स्थानी आहे. तब्बल ३६ वर्षांपूर्वी इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्डस मैदानावरच भारताने सर्वप्रथम विश्‍वकरंडक जिंकण्याचा पराक्रम साधला होता. कपिल देवच्या नेतृत्वाखालील तेव्हाचा संघ मेहनती आणि जिगरबाज होता. आठ वर्षांपूर्वी धोनीच्या संघाने दुसऱ्यांदा मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर विश्‍वविजेते होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले होते. तो संघही बलाढ्य होता. चार वर्षांपूर्वी स्वप्न भंगले, पण आता नव्या उमेदीने संघ सज्ज झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली क्रिकेटमधील ‘कप ऑफ जॉय’ प्राप्त करण्याची मनीषा केवळ खेळाडूंनीच नव्हे, तर साऱ्या देशवासीयांनी बाळगली आहे.

आव्हान पेलण्याची कसोटी
 निवडक संघांत विश्‍वकरंडक स्पर्धा होत असल्यामुळे प्रत्येक सामना आव्हानात्मक असेल. इंग्लंडमध्ये पावसाची शक्‍यताही असते, त्यामुळे एखाद्या सामन्यातील चूक सारी समीकरणे बिघडवून टाकू शकते. विराट कोहलीच्या ‘टीम इंडिया’ला प्रत्येक पाऊल सावधतेनेच टाकावे लागेल. आयसीसीच्या क्रमवारीत आठव्या स्थानी असला, तरी विंडीज संघ धोकादायक आहे. बांगलादेश सातव्या, तर श्रीलंका नवव्या क्रमांकावर आहे, त्यामुळे त्यांना कमी लेखता येणार नाही. बांगलादेशने हल्लीच आयर्लंडमधील स्पर्धेत विंडीजला दोन वेळा नमविले. संक्रमणावस्थेत असलेला श्रीलंका संघ नव्याने तयारीस लागलेला आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड हे अन्य प्रतिस्पर्धी कडवे आणि धोकादायक आहे. काही महिन्यांपूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत चारीमुंड्या चीत केले होते, पण त्यानंतर कांगारूंच्या संघाने भारतात, तसेच पाकिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली होती. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव स्मिथ बंदीची शिक्षा भोगून परत संघात परतल्यामुळे पाच वेळच्या विश्‍वकरंडक विजेत्या संघाची ताकद वाढली आहे. यंदाची १२ वी विश्‍वकरंडक स्पर्धा आहे. इंग्लंडमध्ये पाचव्यांदा स्पर्धा होत आहे. इंग्लिश संघाला एकदाही जगज्जेतेपद मिळविता आलेले नाही. त्यांनी तीन वेळा अंतिम फेरी गाठली, पण प्रत्येक वेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ही उणीव भरून काढण्यासाठी इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील यजमान संघ यावेळेस निश्‍चितच प्रयत्न करेल. तशी त्यांना चांगली संधीही आहे. आयसीसीच्या मानांकनातील अव्वल स्थान, हल्लीच्या कालावधीतील या संघाची सफल कामगिरी लक्षात घेता ते विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार असतील. विशेष बाब म्हणजे, इंग्लंडच्या संघात भरपूर अष्टपैलू आहेत, त्यामुळे सामना कधीही फिरू शकतो. विराट कोहलीच्या संघासमोर इंग्लिश संघाचाच मोठा धोका असेल. इंग्लंडविरुद्धच्या साखळी लढतीत भारतीय संघाची कसोटी लागेल. 

अष्टपैलूची उणीव
 कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ मध्ये विश्‍वकरंडक जिंकला, तेव्हा त्या संघात दर्जेदार अष्टपैलू होते. इंग्लिश वातावरणात समर्पक मारा करणारे मध्यमगती गोलंदाज संघात होते. सध्याच्या संघात मोहिंदर अमरनाथच्या तोडीचा मध्यमगती गोलंदाज नाही हे सत्य आहे. एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने विजय शंकर याच्यावर अष्टपैलू या नात्याने खूप विश्‍वास दाखविलेला आहे, तो सार्थ ठरवण्याचा अतिरिक्त दबाव तमिळनाडूच्या खेळाडूवर असेल. हार्दिक पंड्याने आयपीएल स्पर्धेत आक्रमक फलंदाजी, तसेच मध्यमगती गोलंदाजीची चुणूक दाखविली. हार्दिकच्या कामगिरीने विराट नक्कीच सुखावलेला असेल. हार्दिक वगळता भारतीय संघात अष्टपैलूची वानवाच आहे. इंग्लिश वातावरणात फिरकी गोलंदाजी किफायतशीर ठरण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे उपयुक्त फलंदाजी करू शकणारा रवींद्र जडेजा, प्रभावी ठरणारा युझवेंद्र चहल, की मागे इंग्लंडमध्ये परिणामकारक ठरलेला कुलदीप यादव यापैकी एकाला निवडताना भारतीय संघ व्यवस्थापनास विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. सध्याच्या भारतीय संघाचे ‘शेपूट’ फार लवकर सुरू होते. हार्दिक पंड्यानंतर त्वेषाने फलंदाजी करणारा अष्टपैलू संघात नाही. या कारणास्तव, बिनीचे फलंदाज लवकर बाद झाल्यास तळात मोठी भागीदारी होण्याची शक्‍यता कमीच वाटते. ही पोकळी कर्णधार कोहलीसाठी डोकेदुखी असेल. अष्टपैलूंच्या जादा संख्येमुळे इंग्लंडचा संघ जास्त सखोल भासतो, परंतु तशी स्थिती भारताची नाही. वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमरा, महंमद शमी, भुवनेश्‍वर कुमार व हार्दिक यांना जास्त भार वाहावा लागेल.

फलंदाजी कमजोर भासते
 भारताने २०११ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली निव्वळ फलंदाजीतील ताकदीमुळे विश्‍वकरंडक जिंकला होता. स्वतः धोनी तेव्हा आक्रमकतेने भारलेला होता. याशिवाय सचिन तेंडुलकरसारखा महान फलंदाज संघाच्या दिमतीस होता. वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंग, विराट कोहली, सुरेश रैना असे धमाकेदार फलंदाज संघात होते. त्यामुळेच अंतिम लढतीत श्रीलंकेने २७५ धावांचे आव्हान दिल्यानंतरही भारतीय संघ डगमगला नव्हता. युवराजने फिरकी गोलंदाजीने यश मिळवत धोनीला दिलासा दिला होता. यावेळेस विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी केवळ विराट कोहलीभोवती केंद्रित आहे. प्रत्येक सामन्यात विराटनेच शतक करावे, त्यानेच संघाला जिंकून द्यावे ही सत्यस्थिती आहे. उपकर्णधार रोहित शर्मा जबरदस्त फलंदाज आहे, पण त्याला सातत्य बऱ्याच वेळा दगा देते. सलामीचा शिखर धवन म्हणजे ‘लॉटरी’च. मध्येच चुकीचा फटका मारून बाद होण्याची शिखरची सवय संघाला महागात पडते. शिखर अपयशी ठरला, तरच आयपीएलमध्ये अफलातून फलंदाजी केलेल्या के. एल. राहुलला संधी मिळेल. सध्याचा फॉर्म पाहता, राहुलला प्राधान्य मिळणे आवश्‍यक ठरते. पण संघाचे ‘गुरू’ रवी शास्त्री शिखरच्या अनुभवासमोर नमतील हे स्पष्ट आहे. विराट कोहलीनंतर भारताची फलंदाजी कमजोर भासते. धोनीची फलंदाजी अजूनही ‘मॅचविनर’ आहे, तरीही निवृत्तीकडे झुकलेल्या या ‘सेनापती’कडून फार मोठ्या अपेक्षा बाळगता येणार नाही. तळात इतरांची सक्षम साथ मिळाली, तरच धोनी धाडसी फलंदाजी करू शकेल. विजय शंकर, केदार जाधव हे समयोचित फलंदाजी करू शकतात, तरीही त्यांची गुणवत्ता बहुतेकवेळा बंधनात अडकते. हार्दिक पंड्यानंतर येणारे सारे गोलंदाजच. दिनेश कार्तिक हा राखीव यष्टिरक्षक असल्यामुळे तो खेळण्याच्या शक्‍यता कमीच आहे. निवड समितीने आक्रमक ऋषभ पंत याच्याकडे काणाडोळा केला, हे दुर्लक्ष भारतीय संघाला नुकसानकारक ठरू शकते.  
 यावेळच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळणाऱ्या संघावर नजर टाकता, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा अपवाद वगळता विश्‍वास टाकावा असे फलंदाज संघात दिसत नाहीत.  

साऱ्या अपेक्षा विराटवरच
 भारताने २००३ मध्ये उपविजेतेपद मिळविले, तेव्हा स्पर्धेतील अकरा लढतीत नऊ विजय मिळविले होते. सचिन तेंडुलकर, कर्णधार सौरव गांगुली, उपकर्णधार राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, महंमद कैफ असे कसलेले फलंदाज संघात होते. २००३ मध्ये भारताने अंतिम लढतीसह फक्त दोन सामने गमावले होते, दोन्ही वेळेस कमजोर फलंदाजीने दगा दिला होता. आता इंग्लिश वातावरणात टिच्चून फलंदाजी करण्याचे आव्हान आहे. १९९९ मध्ये इंग्लंडमध्ये शेवटच्या वेळेस झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत महंमद अझरुद्दीन, अजय जडेजा, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली हे फलंदाजीत आधारस्तंभ होते. तेव्हा सुपर सिक्‍स फेरीचेच समाधान मानावे लागले होते. यंदा फलंदाजीत धोकेच जास्त जाणवतात. इंग्लिश वातावरणाचा विचार करता, मध्य फळीत नांगर टाकू शकणारा अजिंक्‍य रहाणेही उपयुक्त ठरला असता. विराट कोहली एकहाती सामना फिरवू शकतो, त्यामुळे विश्‍वकरंडक जिंकण्याच्या मोहिमेत त्याला टिच्चून फलंदाजी करावी लागेल. तो जर लवकर बाद झाला, तर भारतीय संघ दबावाखाली येईल हे निश्‍चित आहे. चार वर्षांपूर्वी विश्‍वकरंडक स्पर्धेत धोनी, विराट, रोहित, शिखर, रहाणे, रैना असे अनुभवी फलंदाज संघात होते. उपांत्य लढतीत भारताला ऑस्ट्रेलियाने दिलेले ३२९ धावांचे आव्हान अजिबात पेलवले नव्हते. त्यामुळे इंग्लंडमध्ये एक-दोन फलंदाजांवर पूर्णपणे विसंबून राहाणे भारतासाठी हानिकारक असेल. त्यामुळे भारतासाठी कदाचित ‘कप ऑफ जॉय’ची प्रतीक्षा लांबू शकते.

विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी भारताचा संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), जसप्रीत बुमरा, युझवेंद्र चहल, शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, केदार जाधव, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्‍वर कुमार, महंमद शमी, हार्दिक पंड्या, के.एल. राहुल, विजय शंकर.

भारताचे वेळापत्रक
तारीख ५ जून, बुधवार : विरुद्ध दक्षिण आफ्रिका (साऊदॅम्प्टन)
तारीख ९ जून, रविवार : विरुद्ध ऑस्ट्रेलिया (द ओव्हल)
तारीख १३ जून, गुरुवार : विरुद्ध न्यूझीलंड (नॉटिंगहॅम)
तारीख १६ जून, रविवार : विरुद्ध पाकिस्तान (ओल्ड ट्रॅफर्ड)
तारीख २२ जून, शनिवार : विरुद्ध अफगाणिस्तान (साऊदॅम्प्टन)
तारीख २७ जून, गुरुवार : विरुद्ध विंडीज (ओल्ड ट्रॅफर्ड)
तारीख ३० जून, रविवार : विरुद्ध इंग्लंड (बर्मिंगहॅम)
तारीख २ जुलै, मंगळवार : विरुद्ध बांगलादेश (बर्मिंगहॅम)
तारीख ६ जुलै, शनिवार : विरुद्ध श्रीलंका (लीड्‌स)

विश्‍वकरंडक स्पर्धेत भारत
१९७३    साखळी फेरी
१९७९    साखळी फेरी
१९८३    विजेतेपद
१९८७    उपांत्य फेरी
१९९२    राउंड रॉबिन फेरी
१९९६    उपांत्य फेरी
१९९९    सुपर सिक्‍स फेरी
२००३    उपविजेतेपद
२००७    साखळी फेरी
२०११    विजेतेपद
२०१५    उपांत्य फेरी

संबंधित बातम्या