वर्ल्डकप फिवर

समृद्धी धायगुडे
सोमवार, 27 मे 2019

विश्‍वकरंडक विशेष
इंग्लंडमध्ये ३० मे पासून सुरू होणाऱ्या क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धेची संपूर्ण जगभरात क्रिकेटचे असंख्य चाहते जय्यत तयारी करत आहेत. खेळाडूंची मेहनत असतेच, परंतु आपल्या लाडक्‍या संघाला आणि खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी चाहतेदेखील तितकेच तयारीत असतात. अशा क्रेझी फॅन्ससाठी बाजारात विविध ॲक्‍सेसरीज आल्या आहेत. परंतु, सध्या ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड असल्याने आयसीसी आणि बीसीसीआयच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये चाहत्यांना ऑथेंटिक आणि दर्जेदार वस्तू खात्रीने मिळतील. आपण या विश्‍वकरंडक स्पर्धेनिमित्त मिळणाऱ्या विविध वस्तूंची माहिती घेऊ.

ऑनलाइन विश्‍वातील दिग्गज कंपनी, अर्थात ॲमेझॉनवर या वर्षीच्या विश्‍वकरंडक स्पर्धेचा लोगो असलेले विविध टीशर्ट, हुडीज उपलब्ध आहेत. स्थानिक बाजारातदेखील काही तुरळक ठिकाणी नॉन ब्रॅंडचेपण विश्‍वकरंडकाचा लोगो, आवडत्या खेळाडूचे चित्र प्रिंट केलेले काही टीशर्ट मिळतात. 

आयसीसीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरमध्ये तुमच्या आवडत्या संघाचे, तसेच एकत्रित सर्व झेंडे असलेल्या विविध ॲक्‍सेसरीज उपलब्ध आहेत. यामध्ये विश्‍वकरंडकाच्या आकाराच्या किचेन्स, नुसती देशांच्या झेंड्यानुसार हेल्मेटची किचेन्स, कॅप्स, हेड वेअर, हॅट्‌स, वर्ल्डकप बुक, बॅग्ज, हुडीज, टीशर्ट, किड्‌स हॅंडबुक इत्यादी ॲक्‍सेसरीज उपलब्ध आहेत. हे स्टोअर इंटरनॅशनल स्तरावरील असल्याने जगभरात कुठूनही तुम्ही आपल्या लाडक्‍या देशाच्या ॲक्‍सेसरीज मागवू शकता. अर्थातच त्याचे पेमेंटदेखील डॉलर्समध्ये आहे, हे लक्षात असू द्या. 

चाहते अर्थातच या एका स्टोअरवर थांबणार नाहीत. त्यामुळे आपल्या जवळच्या कोणत्या दुकानात किंवा मॉलमध्ये क्रिकेट फिवरचे काय काय मिळते हे बघायला जाणारच. त्यामुळे तुमच्यासाठी मिंत्रा किंवा ॲमेझॉन सारख्या साइटवर भारताचे जर्सी, टीशर्ट मिळतात. लहान मुलांसाठीदेखील असे टीशर्ट आणि हुडीज बाजारात आले आहेत. 

घरात वर्ल्डकप स्पर्धेचा मोहोल निर्माण करण्यासाठी काही शोपीसदेखील उपलब्ध आहेत. जसे की, सेंट्रल टेबलवर पेपरवेट म्हणून ठेवण्यासाठी वर्ल्डकपच्या आकारातील मिनिएचर. शोभेच्या वस्तूंमध्ये आणखी एक महत्त्वाची वस्तू म्हणजे क्रिकेटचे संपूर्ण किट असलेला छोटासा सेट तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता.  

नामांकित स्पोर्ट्‌स वेअर्सच्या दुकानांमध्येदेखील कदाचित या सीझनमध्ये क्रिकेट ॲक्‍सेसरीजवर विविध ऑफर्स असण्याची शक्‍यता असते, त्यामुळे ऑनलाइन शॉपर्स त्यावर नक्की लक्ष ठेवा.  

या सीझनमध्ये हॉटेल्स किंवा मॉलमध्ये वर्ल्डकप फिवर म्हणून काही ऑफर्स सुरू असतात. त्यामुळे त्याचाही लाभ तुम्ही घेऊ शकता. घरात बसून वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्याच्या दिवशी किंवा भारताच्या पहिल्या लढतीला केक आणून आनंद साजरा करू शकता. यासाठी नामांकित बेकर्सदेखील तयार आहेत.    

संबंधित बातम्या