स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

सायली काळे
गुरुवार, 24 मे 2018

करंट अफेअर्स
 

राष्ट्रीय
लष्कराची भागीरथी मोहीम

 • महिला अधिकाऱ्यांचा साहसी उपक्रमांतील सहभाग वाढीस लागावा म्हणून खास महिला अधिकाऱ्यांसाठी भारतीय लष्कराने हिमालय पर्वतातील ‘भागीरथी-II’ या शिखरावर गिर्यारोहण मोहीम सुरू केली आहे.
 • भागीरथी-II हे शिखर ६५१२ मीटर उंचीवर असून, गढवाल हिमालयातील गंगोत्री राष्ट्रीय उद्यानातील गंगोत्री हिमनदीच्या वरच्या भागात आहे.
 • या मोहिमेत ९ महिला अधिकाऱ्यांचा चमू २१००० फुटांच्या उंचीवर जाऊन ‘योग’ करण्याचा नवा विश्वविक्रम नोंदवणार आहेत.
 • या मोहिमेद्वारे महिला अधिकाऱ्यांची मानसिक क्षमता, गिर्यारोहणातील तांत्रिक क्षमता आणि शारीरिक धैर्य यांची चाचणी घेतली जाणार आहे.

भारत-बांगलादेश रेल्वेमार्ग

 • त्रिपुरातील आगरताळा आणि बांगलादेशाच्या चितगाव जिल्ह्यातील अखुरा यांच्यामधील ४५ किलोमीटरचे अंतर नव्या रेल्वेमार्गाने जोडण्यात येणार आहे.
 • या प्रकल्पाचे कंत्राट टेक्‍समाको या कंपनीने २०० कोटी रुपयांना घेतले असून १८ महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.
 • या प्रकल्पामुळे भारतास चितगाव बंदराशी सहज जोडता येणार असून आगरताळा आणि कोलकता यांतील अंतरही कमी होणार आहे.
 • याशिवाय उडान योजनेअंतर्गत सिक्कीममध्ये ‘पाक्‍योंग’ हे विमानतळ बांधले असून ते भारतातील १०० वे विमानतळ ठरले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल

 • अरुण जेटली यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्याकडील अर्थ खाते काही काळासाठी पियुष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
 • स्मृती इराणी यांच्याकडील माहिती आणि प्रसारण खाते क्रीडामंत्री असणाऱ्या राजवर्धन राठोड यांच्याकडे देण्यात आले आहे.
 • स्मृती इराणी यांच्याकडे आता केवळ वस्त्रोद्योग खात्याचा कारभार आहे.
 • जल व स्वच्छता मंत्री एस. एस. अहलुवालिया यांना त्यांच्या खात्यातून पदमुक्त करून त्यांच्याकडे इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान खाते सोपविण्यात आले आहे.

कावेरी व्यवस्थापनाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

 • कावेरी नदीच्या पाण्याचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात (कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी) सुयोग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या मसुद्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे.
 • केंद्र सरकारने आपल्या या योजनेची सूचना मॉन्सूनचा पाऊस 
 • सुरू होण्यापूर्वी द्यावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला 
 • आहे.
 • सर्वोच्च न्यायालयाने कावेरी पाणी प्राधिकरणाच्या च्या निवाड्यातही फेरफार केले असून यापुढे निर्णयासाठी वाढीव वेळ मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 • दक्षिण कर्नाटकी जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य देत कर्नाटकाचा पाण्याचा वाटा १४.७५ हजार दशलक्ष घनफुटांनी वाढविण्यात आला आहे.
 • यामुळे कावेरीच्या पाण्यातील तमिळनाडूचा वाटा कमी झाला असला तरी कावेरीच्या खोऱ्यातील १० हजार दशलक्ष घनफूट अतिरिक्त भूजल उपसण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पर्यावरण

कर्नाटकात बेडकाची नवी प्रजाती

 • कर्नाटकच्या किनारी भागातील एका लहानशा औद्योगिक परिसरात ‘मंगळूरू नॅरो माऊथ‘ (वैज्ञानिक नाव : Microrhyla kodial ) नावाची बेडकाची नवी प्रजाती सापडली आहे.
 • मंगळूरू शहरास तेथील कोकणी भाषेत ‘कोडिअल‘ म्हणत असल्याने त्यावरूनच या बेडकाच्या नव्या प्रजातीचे नाव ठेवण्यात आले असून दोन वर्षांपूर्वी ही प्रजाती प्रथम या शहरात पहावयास मिळाली होती.
 • सध्यातरी या प्रजातीचा वावर हा पूर्वी तेथील बंदराचे लाकडाचे कोठार असणाऱ्या आत्ताच्या रासायनिक औद्योगिक परिसरातच आढळून आला आहे.
 • हिरव्या पट्ट्यांचा करड्या-तपकिरी रंगाचा हा बेडूक आकाराने २ सेंटीमीटर लांब एवढाच असतो.
 • जनुकीयदृष्ट्या हा बेडूक भारतीय बेडकापेक्षा आग्नेय आशियायी बेडकाच्या जवळचा असल्याने म्यानमार, इंडोनेशिया, मलेशिया या देशांतील लाकडासोबत जहाजातून आला असल्याचा कयास आहे.

‘सागर’ चक्रीवादळ

 • भारतीय हवामान खात्याने तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि लक्षद्वीप बेटे यांना ‘सागर‘ चक्रीवादळाच्या धोक्‍याचा इशारा दिला असून अधिकृत सूचना जारी केली आहे.
 • अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार होऊन वाऱ्यांना वेग येऊन मध्ये खळग तयार झाल्याने हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे.
 • या हंगामातील भारतीय समुद्रातील हे पहिलेच चक्रीवादळ असून ते एडनच्या आखाताकडे सरकत चालले आहे.

आर्थिक

भारतात गुंतवणुकीसाठी चीनची विशेष तरतूद

 • बॅंक ऑफ क्रेडिट इंडस्ट्रिअल ॲण्ड कमर्शिअल बॅंक ऑफ चायना या चीनी सरकारी बॅंकेने केवळ भारताच्या सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी म्हणून ‘क्रेडिट सूस इंडिया मार्केट फंड’ या नावाने नवा फंड सुरू केला आहे.
 • या फंडाच्या आधारे भारतीय बाजारपेठेवर आधारित युरोप आणि अमेरिकेतील नोंदणीकृत (exchange) विनिमय बॅंकांमधून चीनी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येणार आहे.  या गुंतवणुकीमध्ये भारतीय आयटी कंपन्या, आरोग्य क्षेत्र आणि औषधउत्पादन कंपन्या, ऊर्जा क्षेत्र यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
 • वाढत्या भारतीय अर्थव्यवस्थेचा चिनी गुंतवणूकदारांना लाभ व्हावा यासाठीच या फंडाची निर्मिती करण्यात आली आहे.

पूर्वपरीक्षेच्या निमित्ताने...

भारत-युएई युद्धसराव

 • भारतीय आणि युएई तटरक्षक दलांचा युद्धकौशल्य देवाणघेवाणीसाठी एकत्रित युद्धसराव
 • भारतीय तटरक्षक दलाचे जहाज ‘समुद्र पावक’ दुबईच्या सदिच्छा भेटीवर जाऊन तेथील रशीद बंदरात नांगर टाकून होते.
 • जानेवारी २०१६ पासून कार्यरत असलेले भारतीय बनावटीचे ‘समुद्र पावक’ हे भारतीय तटरक्षक दलाच्या पर्यावरण नियंत्रक मालिकेतील तिसरे जहाज.

मलबार युद्धअभ्यास 

 • बंगालच्या उपसागरात १९९२ पासून दरवर्षी अमेरिका आणि भारतीय नौदलांमध्ये हा युद्धसराव होत आला आहे.
 • मलबार युद्धसरावाचे हे २१ वे वर्ष असून जपानच्या सहभागाचे हे चौथे वर्ष आहे.
 • मलबार २००७ : हा नववा मलबार युद्धसराव प्रथमच हिंदी महासागराच्या बाहेर जपानच्या सीमेत घेण्यात आला होता, त्यात ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरचाही समावेश होता.

इस्राईलमध्ये ब्लू फ्लॅग 

 • इस्राईलने ११ दिवसांसाठी ‘ब्लू फ्लॅग’ नावाचा देशाच्या वायुदलाच्या इतिहासातील आजवरचा सर्वांत मोठा लष्करी युद्धसराव आयोजित केला होती.
 • सरावामध्ये सहभागी देश, अमेरिका, ग्रीस, पोलंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, भारत
 • ‘ब्लू फ्लॅग’ लष्करी सरावाची सुरवात २०१३ मध्ये झाली असून यंदाची ही सरावाची तिसरी वेळ होती.
 • दर दोन वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या या सरावामध्ये भारत प्रथमच सहभागी होत आहे.

‘इगल’ युद्धसराव

 • अमेरिका आणि दक्षिण कोरियाने मोठ्या प्रमाणावर एकत्र युद्धसराव केला.
 • ‘इगल’ नावाचा हा युद्ध सराव उत्तर कोरियापासून वाढत्या धोक्‍याशी सामना करण्यासाठी करण्यात आला आहे
 • सरावादरम्यान दक्षिण कोरियाने अमेरिकेशी थाड (THAAD: Thermal High Altitude Area Defence) क्षेपणास्त्र प्रणाली संबंधित करार केला.

भारतीय नौदलाची जहाजे ऑस्ट्रेलियाच्या भेटीवर

 • ‘सागर’उपक्रमांतर्गत भारतीय नौदलाची ज्योती, शिवालिक आणि कोमार्ता ही जहाजे ऑस्ट्रेलियातील फ्रीमंटल येथे बंदर भेटीसाठी गेली होती.
 • या भेटीचा एक भाग म्हणून तेथे दोन्ही नौदलाची ‘AUSINDEX- १७’ ही द्विपक्षीय सागरी कवायत घेण्यात आली. 
 • SAGAR : Security And Growth for All in the Region

फोटो फीचर

संबंधित बातम्या