स्पर्धा परिक्षांचा गेटवे     

सायली काळे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

करंट अफेअर्स    

राष्ट्रीय
पश्‍चिम बंगालचे नामांतरण

 • पश्‍चिम बंगाल विधानसभेत राज्याचे नामांतरण ‘बांगला’ असे करण्यासाठीचा ठराव मंजूर झाला असून सर्व भाषांमध्ये हे नामांतरण लागू होणार आहे.
 • सदर ठराव गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असून तेथून मंजुरी आल्यानंतरच अधिकृत नामांतरण जाहीर केले जाणार आहे.
 • यापूर्वी २९ ऑगस्ट २०१६ रोजी मान्य झालेल्या ठरावात राज्याचे नाव बंगाली भाषेत ‘बांगला’ तर हिंदी आणि इंग्रजी भाषेत ‘बंगाल’ असावे असा प्रस्ताव होता.
 • त्यावेळी एकाच राज्याला तीन वेगवेगळी नावे देता येणार नसल्याचे कारण देत केंद्र सरकारने तो प्रस्ताव फेटाळला होता.

व्होडाफोन आणि आयडियाचे एकत्रीकरण

 • व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर यांच्या एकमेकांतील विलीनीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून या प्रक्रियेनंतर ती देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी ठरणार आहे.
 • दोन्ही कंपन्या एकत्र आल्यानंतर त्यांच्याकडे देशातील दूरसंचार उद्योगाचा ३५ टक्के बाजार हिस्सा राहणार आहे.
 • नव्या कंपनीची ग्राहकसंख्या ४३ कोटींवर जाणार असल्याने येत्या काळात व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांच्यात मोठे डेटायुद्ध छेडले जाण्याची सहायता आहे.
 • आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडियाद्वारे मोबाईल व्यवसायाच्या एकत्रीकरणासाठी दूरसंचार विभागाला एकत्रितरीत्या ७२६८.७८ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
 • या कंपन्यांच्या एकत्रीकरणाला केंद्र सरकारची अधिकृत मंजुरी ९ जुलैलाच मिळाली होती. मात्र प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी थकीत रक्कम भरण्याची अट लावण्यात आली होती.
 • या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेनंतर नव्या कंपनीमध्ये गैरकार्यकारी संचालक पदाची जबाबदारी कुमारमंगलम बिर्ला यांच्यावर येणार आहे.
 • व्होडाफोन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बालेश शर्मा आणि आयडियाचे मुख्य वित्त अधिकारी अक्षय मुंद्रा हे नव्या कंपनीत आपापल्या पदावर कायम राहतील.

आंतरराष्ट्रीय

मॅगसेसे पुरस्कारात भारतीय नावे
    आशियाचा नोबेल अशी ओळख असणारा मॅगसेसे पुरस्कारासाठी २०१८ यावर्षी एकूण ६ नावे जाहीर झाली असून त्यात २ भारतीय व्यक्तींचा समावेश आहे.
    अभियंत्री सोनम वांगचुक आणि मुंबईतील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवाणी यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.

पुरस्कार प्राप्त व्यक्ती :
क्र    व्यक्ती    देश    कार्य
१     सोनम  वांगचुक    भारत    लडाखसारख्या दुर्गम प्रदेशात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षक प्रशिक्षणासाठी ‘न्यू होप’ पाणी  टंचाई दूर करण्यासाठी हिमस्तूप इत्यादी
२    भरत वाटवाणी    भारत    रस्त्यावरील भटक्‍या मनोरुग्णांना उपचार व त्यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय, ‘श्रद्धा’ पुनर्वसन केंद्राची स्थापना
३    युक छांग    कंबोडिया    वंशसंहाराला कायमस्वरूपी मूठमाती मिळावी या उद्देशाने त्याच्या स्मृती जपल्या.
४    मारिया ईस्ट    तिमोर    सर्व वंश व वर्णाच्या लोकांना समानता मिळण्यासाठी कार्य
५    हार्वर्ड डी.    फिलिपाईन्स    सत्ताधाऱ्यांचा रोष पत्करून सामाजिक न्यायासाठी ५० वर्षे लढा
६    वो थी हुआंग येन रोम    व्हिएतनाम    स्वतःच्या अपंगत्वावर मात करून देशातील अपंग नागरिकांसाठी मोलाचे कार्य

 

विज्ञान-तंत्रज्ञान
खरिपात ज्वारी

 • कुपोषणाच्या समस्येला लक्ष्य करून खरीप हंगामात येऊ शकणारे ‘परभणी शक्ती’ (PVK १००९) हे ज्वारीचे नव्याने विकसित केलेले जैवसमृद्ध वाण हैदराबाद येथे प्रसारित करण्यात आले.
 • लोह आणि जस्त या पोषणद्रव्यांचे अधिक प्रमाण असणारे भारतातील हे पहिलेच वाण असून विशेषतः महिला व लहान मुलांमधील कुपोषण दूर करण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे.
 • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) आणि आंतरराष्ट्रीय अर्ध-कोरडवाहू उष्ण कटिबंधीय पीक संशोधन संस्था (हैदराबाद) यांच्या संयुक्त संशोधनातून हे वाण विकसित करण्यात आले आहे. 
 • या वाणामध्ये प्रतिकिलोग्रॅम लोहाचे प्रमाण ४४ ते ४६ मिलिग्रॅम आणि जस्ताचे प्रमाण ३२ ते ३३ मिलिग्रॅम असून त्याच्या भाकरीची प्रतही चांगली आहे.
 • या वाणाचे प्रति हेक्‍टरी उत्पन्न १०५ ते ११० क्विंटल असून दर हेक्‍टरी साधारणपणे ३६ ते ३८ क्विंटल उच्च प्रतीच्या कडब्याचे उत्पन्न निघू शकते.
 • याशिवाय खोड-माशी, खोड-कीड आणि काळी बुरशी अशा रोगांना हा वाण प्रतिकारक्षम आहे.
 • परभणी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरमोठ्या प्रमाणात बीजोत्पादन 
 • करून लवकरच हे वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

समस्या आणि ऊहापोह
पारपत्राचा व्यापार

 • पंजाब नॅशनल बॅंकेला ७ हजार कोटी रुपयांहून मोठा गंडा 
 • घालून भारतातून पसार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्‍सी याने मागील वर्षीच अँटिग्वाचे नागरिकत्व घेतल्याचे बातमी हाती लागली आहे.
 • चोक्‍सीच्या सध्याच्या पारपत्रानुसार (Passport) त्यास १३० हून अधिक देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळू शकणार असल्याने, त्याचा व्यवसाय अधिकच वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.
 • कायद्याच्या कचाट्यातून पोबारा करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांसाठी कॅरिबियन समुद्रातील अशी लहान-सहान बेटे ही लपून बसण्यासाठी सुरक्षेची नवी जागा झाली आहे.

कॅरिबियन बेटांचे आकर्षण

 • कॅरिबियन बेटांचा आश्रय घेणारा मेहुल चोक्‍सी हा पहिला भारतीय हिरेव्यापारी नसून काही वर्षांपूर्वी जतिन मेहता यानेही विविध भारतीय बॅंकांचे सुमारे ७ हजार कोटी रुपये घेऊन पत्नीसह पलायन करून सेंट किट्‌स ॲण्ड नेव्हिसचे नागरिकत्व घेतले होते.
 • आयपीएल सम्राट ललित मोदी यानेही पोबारा करण्याकरिता सेंट ल्युसियाचे नागरिकत्व मिळविण्याचा प्रयत्न केला होता.
 • इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९८४ मध्ये नागरिकत्व विक्रीचा वादातीत कार्यक्रम राबविणारे सेंट किट्‌स ॲण्ड नेव्हिस हे पहिले कॅरिबियन होते.
 • या लहानशा बेटवजा देशातल्या नागरिकांना केवळ एका पारपत्रावर २६ देशांचा व्हिसा मिळू लागल्याने येथे व्यापाऱ्यांची भरभराट झाली.
 • पाठोपाठ सेंट ल्युसिया, डॉमिनिका, ग्रेनाडा, अँटिग्वा-बार्बुडा या बेटांनीही गुंतवणुकीवर आधारित नागरिकत्वाचे कार्यक्रम राबविले. (citizenship-by-investment program)
 • पलायनाची पूर्वयोजना करून आर्थिक अफरातफर करणाऱ्यांना 
 • ही बेटे केवळ लपण्याची सुरक्षित जागाच नव्हे तर आकर्षक असे पारपत्रही देतात.
 • याशिवाय एखाद्या दूरवरच्या एकलकोंड्या बेटावर आयुष्य काढायचे नसल्यास साधारणपणे ५ वर्षांतून केवळ ५ दिवस त्या लहानशा बेटावर राहिल्यास नागरिकत्व कायम राहते.
 • नागरिकत्वाचा अर्ज करताना व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्जदाराच्या नावावर त्याच्या मायदेशी कोणताही गुन्हा नोंदवलेला असू नये. मात्र एकदा नागरिकत्व मिळाल्यानंतर नोंदवलेल्या गुन्ह्यांना विचारात घेतले जात नाही.
 • भारताव्यतिरिक्त बांगलादेशाच्या ४२, पाकिस्तानच्या २८ तर चीनच्या तब्बल ४७८ नागरिकांनी कॅरिबियन बेटांतील देशांचे नागरिकत्व घेतले आहे.

सद्य:स्थिती

 • कोट्याधीशांचा मोठा विसर्ग असणारा भारत हा चीन पाठोपाठ दुसरा देश असून २०१७ या वर्षापर्यंत भारतातून पलायन केलेल्या अति-श्रीमंतांची संख्या सात हजारावर पोहोचली आहे.
 • भविष्यातील भारतीय अर्थव्यवस्थेवरील संकट टाळावयाचे असल्यास, भारतीय शासन-प्रशासन, सीबीआय आणि आंतरराष्ट्रीय पोलिस महामंडळ (Interpol) यांनी एकमेकांत प्रामाणिक समन्वय राखून काम करणे आवश्‍यक आहे.

संबंधित बातम्या