स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018
करंट अफेअर्स
राष्ट्रीय
जैविक शेतीसाठी नवी मोहीम
- महाराष्ट्र राज्य सरकारच्या ‘सेंद्रिय शेती विषमुक्त शेती’ या
- योजनेच्या परिणामात्मक अंमलबजावणीसाठी राज्य मंत्रिमंडळाने डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मोहीम राबविण्यास मंजुरी दिली आहे.
- विषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्न-धान्याच्या उपलब्धतेसाठी या मोहिमेच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रसाराबरोबर त्यातील शेती मालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे.
- पहिल्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांपासून योजनेच्या अंमलबजावणीची सुरुवात करण्यात येणार असून पुढील टप्प्यात ही मोहीम अन्य जिल्ह्यांमध्येही राबविण्यात येणार आहे.
मोहिमेची मुख्य उद्दिष्टे :
१) सेंद्रिय शेतीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे
२) पिकांचे अवशेष वापरून शेतातच सेंद्रिय खतं तयार करण्याची प्रणाली विकसित करणे
३) सेंद्रिय शेतीमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे
नौदलाच्या खरेदीप्रस्तावाला संमती
- संरक्षण मंत्रालयाने नौदलासाठी ४६ हजार कोटी रुपयांच्या लष्करी सामग्री प्रस्तावास मान्यता दिली असून हा निर्णय संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या (DSC) बैठकीत घेण्यात आला.
- यातून मुख्यतः १११ बहुद्देशीय हेलिकॉप्टर्स आणि १५० तोफा (Artilary Gun) खरेदी केल्या जाणार आहेत.
- १११ हेलिकॉप्टर्सच्या खरेदी करारासाठी सुमारे २१ हजार कोटी रुपये संमत असून सामरिक भागीदारी अंतर्गत संरक्षण मंत्रालयाचा हा पहिलाच प्रकल्प आहे.
- १५५ मिमीच्या १५० तोफांच्या खरेदीसाठी ३३६४ कोटी रुपये संमत असून संरक्षण विकास आणि संशोधन संस्थेच्या अंतर्गत या तोफांची भारतातच निर्मिती होणार आहे.
- याशिवाय १४ लंबरेषेत हल्ला करू शकणारी कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे मंजूर करण्यात आली आहेत.
विज्ञान-तंत्रज्ञान
विमानासाठी जैव इंधनाचा यशस्वी प्रयोग
- भारताच्या पहिल्या जैव इंधनप्रणीत विमानाचे २७ ऑगस्ट रोजी चाचणीदाखल घेतलेले उड्डाण यशस्वी ठरले.
- भारतात विमान सेवा पुरविणाऱ्या स्पाईस जेट या कंपनीने बाम्बार्डीयर क्यू ४०० या विमानाची जीव इंधनावर चाचणी घेतली.
- देहरादून येथून उड्डाण केल्यानंतर हे विमान दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरीत्या उतरले.
- विमानातील इंधन हे संपूर्णतः जैविक नसून ७५ टक्के एव्हिएशन टर्बाईन इंधन तर २५ टक्के जिब इंधन असे मिश्रण वापरण्यात आले होते.
- वर्ष २०१८ सुरुवातीस जगातील पहिल्या जैविक इंधनावर चालणाऱ्या विमानाने लॉस एंजेलिसपासून मेलबर्नपर्यंत प्रवास केला होता.
- आजवर केवळ कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या विकसित देशांनीच जीव इंधनावर विमान चालविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले होते, मात्र या यशस्वी चाचणीनंतर भारतही त्याच्या पंक्तीत बसण्यासाठी सज्ज झाला आहे.
- या इंधनावर अजून काही चाचण्या झाल्यानंतर प्रथम त्याचा वापर देशांतर्गत विमान प्रवाशांसाठी होऊ शकतो.
- पंचवीस टक्के जैव इंधनाच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जनात १५ टक्क्यांनी घट होत असल्याचे दिसून आले आहे.
आंतरराष्ट्रीय
ऑस्ट्रेलियाचे नवे प्रधानमंत्री
- ऑस्ट्रेलियाचे अर्थमंत्री स्कॉट मॉरीसन यांची प्रधानमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- गेल्या आठवड्यात टर्नबुल यांनी ऊर्जा कपातीसाठी एक प्रस्ताव आणला होता. त्यानुसार विजेचे दर कमी करतानाच हवामान बदलाला तोंड देण्यासाठी म्हणून कार्बन उत्सर्जनात कपात करण्यात येणार होती.
- यामुळे टर्नबुल यांच्या विरोधात स्वपक्षातूनच बंड निर्माण झाल्यामुळे हे राजकीय पदबदल घडून आले आहेत.
- गेल्या आठवड्यातील अविश्वास प्रस्थावानंतर लेबर पक्षाने पुन्हा सिनेटमध्ये माल्कम टर्नबुल यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करून पुनर्निवडणूकांची मागणी केली आहे.
शांतता मोहीम
- रशियातील चेर्बाकुल येथे ‘शांतता मोहीम २०१८’ अंतर्गत शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये (SCO) सहभागी असणाऱ्या सर्व देशांचा एकत्रित युद्धसराव २४ ते २९ ऑगस्ट दरम्यान पार पडला.
- दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठीच्या प्रशिक्षणाकरिता आयोजित करण्यात आलेल्या या सहा दिवसांच्या युद्ध सरावामध्ये प्रथमच भारत आणि पाकिस्तान लष्कराने एकत्र युद्ध सराव केला.
- यामध्ये रशियाचे , चीनचे , भारताचे तर पाकिस्तानचे सैनिक सहभागी झाले होते, तर भारतातून सहभागी झालेल्या सैनिकांमध्ये राजपूत रेजिमेंट आणि हवाई दलातील सैनिकांचा समावेश होता.
- सहभागी झालेल्या देशांना दहशतवादाविरुद्धच्या लढ्यातील आधुनिक तंत्र आणि इतर क्लृप्त्या शिकण्याची संधी या सरावातून मिळाली.
पंतप्रधान मोदींचा नेपाळ दौरा
- बिमस्टेकची चौथी शिखर परिषद ३० व ३१ ऑगस्ट रोजी नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित करण्यात आली होती.
- या परिषदेत पंतप्रधान मोदींनी सहभाग दिला असून प्रधानमंत्री पदावर आल्यापासून मोदींचा हा नेपाळमधील चौथा दौरा होता.
- या परिषदेस बंगालच्या उपसागारशी जोडल्या गेलेल्या भारत, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, भूतान आणि थायलंड या सर्वच देशांतील प्रतिनिधी उपस्थित होते.
- या परिषदेत प्रामुख्याने दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, सायबर गुन्हे तसेच परस्पर आर्थिक संबंधांचे बळकटीकरण यांवर भर देण्यात आला.
- भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरण आणि ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरण यांमुळे भारतासाठी बिमस्टेकचे महत्त्व अधिक आहे.
चीनचा पाकिस्तानमध्ये रहिवासी प्रकल्प
- चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत चीन आता पाकिस्तानातील ग्वादर येथे आपल्या नागरिकांसाठी एक शहर वसवत आहे.
- ग्वादर बंदराच्या बांधणी व विकसनासाठी तसेच तेथील पुढील व्यापारासाठी चीन आणि पाकिस्तान यांत करार झाला असून त्या अंतर्गत चीनने पाकिस्तान इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कडून ३६ लाख चौरसफुटांचे आंतरराष्ट्रीय बंदर खरेदी केले आहे.
- याच जागेत सुमारे १५ कोटी डॉलर खर्च करून रहिवासी प्रकल्प राबविला जाणार २०२२ पासून तेथे तब्बल ५ लाख कर्मचारी राहायला येणार आहेत.
- या रहिवासी भागात केवळ चीनी नागरिक काम करणार असून त्यांना फक्त ग्वादर बंदरात काम करता येणार आहे.
- यापूर्वी चीनने मध्य आशियातील देशांमधील, तसेच आफ्रिकेतील देशांमधील प्रकल्पांवर काम करणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी अशाच वसाहती बांधल्या आहेत तर भारतीय उपखंडातील चीनची ही पहिलीच वसाहत ठरणार आहे.
- भूतान व भारत वगळता भारतीय उपखंडातील सर्व देशांचा सीपीईसी प्रकल्पात सहभाग आहे.
आर्थिक
वॉरन बफेट यांची भारतात गुंतवणूक
- सुप्रसिद्ध अमेरिकी उद्योगपती वॉरन बफेट हे विजयशेखर शर्मा संस्थापित पेटीएम या भारतातील सर्वांत आघाडीच्या डिजिटल वॉलेट कंपनीत गुंतवणूक करणार आहेत.
- या गुंतवणुकीसाठी वॉरन बफेट यांच्या बर्थशायर हाथवे आणि पेटीएम यांच्यात बोलणी सुरू असून येत्या २ ते ३ आठवड्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
- बर्थशायर हाथवे पेटीएममध्ये २४४८ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ३ ते ४ टक्के समभाग खरेदी करणार आहेत त्यामुळे बर्थशायर हाथवेची गुंतवणूक असणारी पेटीएम ही भारतातील पहिलीच कंपनी ठरणार आहे.
- पेटीएममध्ये यापूर्वी चीनच्या अलिबाबा आणि जपानच्या सॉफ्ट बॅंकेच्या वन-कम्युनिकेशन या कंपनीची सुमारे १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे.
- जपानच्या सॉफ्ट बॅंकेने मागील वर्षी सुमारे ९ हजार कोटी रुपयांना पेटीएममधील २० टक्के भांडवल विकत घेतले होते.
- बर्थशायर हाथवेच्या गुंतवणुकीमुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी पेटीएमला अधिक बळ मिळणार आहे.