स्पर्धा परिक्षांचा गेटवे

सायली काळे 
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

करंट अफेअर्स

राष्ट्रीय
साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

 • वर्ष २०१८ चे भारतीय साहित्य क्षेत्रातील मानाचे साहित्य अकादमी पुरस्कार ५ डिसेंबर २०१८ रोजी जाहीर झाले असून; यावर्षीच्या पुरस्कारांसाठी कादंबऱ्या, लघुकथा, समीक्षा, निबंध आणि  काव्यसंग्रहांची निवड करण्यात आली आहे.
 • इंग्रजीसह चोवीस भाषांतील उत्कृष्ट साहित्यासाठी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचे २९ जानेवारी २०१९ रोजी दिल्ली येथे वितरण होणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र व रुपये १ लाख असे आहे.
 • या वर्षी मराठी भाषेतील साहित्यासाठी म. सु. पाटील यांच्या ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या समीक्षा ग्रंथास हा पुरस्कार मिळणार असून ‘भाषा सन्मान’ पुरस्कारासाठी डॉ. शैलजा बापट यांची निवड करण्यात आली आहे.
 • डॉ. शैलजा बापट यांचे मुख्य लिखाण - ‘अ क्रिटिकल स्टडी ऑफ ब्रह्मसूत्राज’ (इंग्रजी ग्रंथ) हे आहे.
 • याशिवाय उर्दू साहित्यातील रहमान अब्बास लिखित ‘रोहजीन’ ही कादंबरी तर हिंदी साहित्यातील चित्र मुद्‌गल लिखित ‘पोस्ट बॉक्‍स नं. २०३ - नालासोपारा’ या कादंबरीचीही निवड झाली आहे.

पर्यावरण
‘रामसार’मध्ये नांदूर-मध्यमेश्वर समाविष्ट

 • गोदावरी व कादवा नदीच्या संगमावर नदीप्रवाहांच्या साचलेल्या गाळातून तयार झालेले ‘नांदूर-मध्यमेश्वर’ पक्षी अभयारण्य रामसार कराराच्या यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे.
 • पाणथळ जमिनींवरील जीवनसाखळ्यांच्या संवर्धनासाठी वर्ष १९७१ मध्ये करण्यात आलेल्या या करारात समाविष्ट झालेले महाराष्ट्र राज्यातील हे पहिलेच स्थळ ठरेल.
 • रामसारच्या निकषांपैकी किमान २० हजार पक्ष्यांच्या आगमनाचा निकष पूर्ण झाल्याने या अभयारण्याचा समावेश या यादीत करण्यात येणार आहे.
 • या अभयारण्यात सुमारे २०० प्रकारचे पक्षी, चारशेहून अधिक प्रकारच्या वनस्पती, याशिवाय विविध वन्यचर आणि जलाशयांत सुमारे २४ प्रकारचे मासे आढळून येतात.
 • रामसार यादीतील समावेशामुळे या अभयारण्यास आता आंतरराष्ट्रीय पातळीवरून विकास व संवर्धनासाठी निधी तसेच पक्षीमित्र व अभ्यासकांचा आधार मिळेल.

दिल्ली सरकारला प्रदूषणाचा फटका

 • दिल्ली येथील प्रदूषणास आळा घालण्यात तेथील शासनाने दिरंगाई केल्याने राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली सरकारला २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
 • दंडाची ही रक्कम सरकारी कोशातून न घेता सरकारी अधिकाऱ्यांकडून वसूल करून घ्यावी असे न्यायालयाने म्हटले आहे.
 • दंडाची रक्कम सरकार भरू न शकल्यास ती दरमहा १० कोटी रुपये याप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांच्या वेतनातून घेतली जाईल असा इशारा हरित लवादाने दिला आहे.
 • याशिवाय जे नागरिक प्रदूषणास जबाबदार ठरत आहे त्यांनाही दंड लागू करावा अशी सूचना न्यायालयाने दिली आहे.

आर्थिक
जागतिक सीमाशुल्क बैठक

 • जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या नीती आयोगाच्या ८०व्या सत्राचे आयोजन ३ डिसेंबर रोजी मुंबई येथे करण्यात आले होते.
 • या बैठकीचे आयोजन जागतिक सीमाशुल्क संघटनेद्वारे केंद्रीय अप्रत्यक्ष करांनी सीमाशुल्क मंडळ यांच्या सहकार्याने करण्यात आले.
 • या त्रिदिवसीय बैठकीत ३० देशांतील प्रतिनिधी सहभागी झाले, तर भारताचे प्रतिनिधित्व हे अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष एस. रमेश यांनी केले.
 • व्यवसाय, सहकार्य, वादग्रस्त कायदे, लहान द्वीपीय राष्ट्रांच्या समस्या हे या चर्चेचे मुख्य मुद्दे होते.

विज्ञान-तंत्रज्ञान

GSAT- ११ प्रक्षेपित

 • भारताचा सर्वाधिक अवजड उपग्रह असणाऱ्या GSAT-11 चे ५ डिसेंबर रोजी फ्रेंच गयाना येथून एरियन स्पेसद्वारे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले.
 • परस्पर दळणवळणासाठी निर्माण करण्यात आलेला हा उपग्रह सुमारे ६ हजार किलो वजनाचा असून पुढील १५ वर्षांकरिता तो कार्यरत राहील.
 • या उपग्रहांमुळे इंटरनेट सेवा अधिक वेगवान होणार असून प्रतिसेकंद संपर्कक्षमता १०० गिगाबाईटपेक्षा अधिक मिळणार आहे.
 • या उपग्रहांमुळे मुख्यतः ग्रामीण भागातील इंटरनेट सेवेमध्ये मोठी सुधारणा होणार आहे.
 • यापूर्वी मार्च महिन्यात प्रक्षेपित करण्यात आलेल्या ‘GSAT- 6A’ उपग्रहाच्या प्रक्षेपणात आलेल्या अडचणी आणि अपयशामुळे वर्षाच्या सुरुवातीस योजलेले ‘GSAT-11’ चे प्रक्षेपण वर्षाअखेरीस करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय
शिन्यु-मैत्री १८ 

 • शिन्यु-मैत्री हा भारत आणि जपान दरम्यान नव्याने सुरू करण्यात आलेला हवाई युद्धसराव असून याची पहिल्या आवृत्ती उत्तरप्रदेशातील आग्रा येथे झाली.
 • ३ ते ७ डिसेंबरमध्ये पार पडलेल्या या युद्धसरावाचा मानवतावादी सहकार्य आणि आपत्ती कार्यात साहाय्य हा मुख्य विषय होता.
 • या सरावात जपानतर्फे सी-2 प्रकारातील विमाने, तर भारतातर्फे सी-१७ आणि एन-32 ही विमाने; तसेच दोन्ही देशांचे हवाईदल कर्मचारी आणि पर्यवेक्षक सहभागी झाले होते.

कतार ‘ओपेक’बाहेर

 • ‘ओपेक’ या (OPEC) खनिज तेल उत्पादक पंधरा देशांच्या संघटनेचे सदस्यत्व जानेवारीपर्यंत सोडणार असल्याचे कतारने जाहीर केले आहे.
 • खनिज तेलाच्या जागतिक किमतीत घट होत असताना त्याचे उत्पादन कमी करणे हा संघटनेचा निर्णय कतारला मान्य नाही. याशिवाय देशातील नैसर्गिक वायूच्या उत्पादनावर भर देण्याचा कतारचा मानस आहे.
 • जून २०१७ मध्ये बहरिन, इजिप्त, सौदी अरेबिया आणि अन्य आखाती देशांनी कतारवर टाकलेला बहिष्कार व आखाती प्रदेशातील राजकीय अस्थिरता हेही कतारच्या या निर्णयाचे कारण आहे.
 • अवघी २६ लाख लोकसंख्या असणारा कतार जागतिक खनिज तेल व्यापारात रशिया व इराणनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
 • आगामी काळात कतारने खनिज तेलाचे उत्पन्न प्रतिदिन ४८ लाख बॅरलवरून ६६ लाख बॅरलवर नेण्याचे ठरवले आहे. नैसर्गिक वायूच्या निर्यातीतही प्रतिवर्षी सुमारे ३२ दशलक्ष टनांनी वाढ केली जाणार आहे.

आरआयसी शिखर परिषद

 • आरआयसी अर्थात रशिया, भारत आणि चीन या एकत्रित शिखर परिषदेचे आयोजन तब्बल १२ वर्षांनी अर्जेन्टिनाची राजधानी ब्युनॉस आयर्स येथे करण्यात आले.
 • ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान दक्षिण अमेरिकेत प्रथमच पार पडलेल्या तेराव्या G-20 सभेनंतर सदर शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती.
 • या परिषदेत आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य वाढवण्याच्या दृष्टीने ब्रिक्‍स आणि एससीओद्वारे परस्पर सहकार्य व्हावे यासाठी तिन्ही देशांत एकमत झाले.
 • तत्पूर्वी झालेल्या ‘G-20’ सभेमध्ये भारताने फरार गुन्हेगारांशी निगडित ९ कलमी योजना मांडली. तसेच इतरही अनेक राष्ट्रांसोबत द्विपक्षीय व त्रिपक्षीय चर्चेत सहभाग घेतला.

‘नाफ्टा’ची (NAFTA) पुनर्स्थापना

 • अमेरिका, कॅनडा आणि मेक्‍सिको यांच्यात मुक्त व्यापार उपलब्ध करून देणाऱ्या नाफ्टा अर्थात उत्तर अमेरिकी मुक्त व्यापार करार या २४ वर्षे जुन्या कराराची पुनर्स्थापना करण्यात आली आहे.
 • अर्जेन्टिना येथे पार पडलेल्या ‘G-20’ परिषदेनंतर हा महत्त्वाचा करार झाला असून यानंतर आता या तिन्ही देशांना आपापल्या राष्ट्रात काही कायदे मंजूर करून घ्यावे लागणार आहेत.
 • USMCA या  खंडांच्या नव्या करारामुळे तिन्ही देशामध्ये सुमारे १ ट्रीलीयन डॉलर्सचा व्यापार होणार असून अनेक तरतुदींमध्ये बदल होणार आहेत. 

संबंधित बातम्या