स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

सायली काळे 
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

करंट अफेअर्स
 

राष्ट्रीय

साक्षीदार सुरक्षा योजना

 • सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या ‘साक्षीदार सुरक्षा योजने’ला मंजुरी देत केंद्र व राज्य या दोन्ही सरकारला तिच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
 • साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने ही योजना विकसित केली होती.
 • सर्वोच्च न्यायालयानुसार केंद्र व राज्य सरकारद्वारे या योजनेचा कायदा होईपर्यंत ही योजना कलम व अंतर्गत कायदा म्हणून लागू होईल.
 • याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘विटनेस डीपोझीशन कॉम्प्लेक्‍स’ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

पर्यावरण
भारतीय जल प्रभाव संमेलन

 • नवी दिल्ली येथे ५ ते ७ डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय स्वच्छ गंगा मोहीम (NMCG), गंगा नदी पात्र व्यवस्थापन व शिक्षणकेंद्र यांच्या संयुक्त आयोजनातून ‘भारतीय जल प्रभाव संमेलन’ पार पडले.
 • सदर संमेलनात विविध १५ देशांतील २०० लोकांनी सहभाग घेतला असून त्यातील बहुसंख्य हे केंद्र, राज्य आणि नागरी प्रशासनाचे अधिकारी होते.
 • गंगा नदीचे पुनरुज्जीवन आणि गंगेच्या पत्राचे संवर्धन हा संमेलनातील चर्चेचा मुख्य विषय होता. 
 • वर्ष २०१२ पासून सुरू करण्यात आलेल्या या वार्षिक उपक्रमातील या वर्षीचे प्रमुख घटक - १. पाच राज्ये - उत्तराखंड, उत्तरप्रदेश, पश्‍चिम बंगाल, दिल्ली आणि बिहार या राज्यांतील जलसंवर्धनावर अधिक लक्ष पुरविणे २. गंगा वित्तीय मंच - सदर संमेलनात या मंचाचे उद्‌घाटन करण्यात आले असून ‘नमामि गंगा’ या कार्यक्रमास वित्तीय पुरवठा होण्याच्या दृष्टीने विविध  वित्तीय संस्था आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणण्याचे काम हा मंच करणार आहे. ३. नवकल्पना

मोहीम ‘क्‍लीन सी २०१८’

 • भारतीय तटरक्षक बलाने अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे यावर्षीच्या ‘क्‍लीन सी’ या अभ्यासाचे आयोजन केले होते.
 • या अभ्यासात तटरक्षक बलाच्या विश्वस्त, विजित, राजवीर आणि राजश्री या बोटी आणि टेहेळणी विमान डॉर्नियार व हेलिकॉप्टर चेतक हे सहभागी झाले होते.
 • निकोबार बेट आणि उत्तर सुमात्रा यांच्या दरम्यान असणारा १६० किलोमीटर रुंदीच्या ग्रेट चॅनेल या प्रवाहातून दिवसाला सुमारे २०० जहाजे जात असल्याने (जगातील सर्वाधिक व्यस्त समुद्री मार्ग) तेथे तेल गळतीचा धोका अधिक असल्याने हा सराव या क्षेत्रानजिक घेण्यात आला. 
 • या अभ्यासाद्वारे तेल गळतीला आळा घालण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या असणाऱ्या क्षमतेचे अवलोकन करण्यात आले.

आर्थिक
रिझर्व्ह बॅंकेची लोकपाल योजना

 • भारतीय रिझर्व्ह बॅंकेने येत्या वर्षात जानेवारी महिन्यात डिजिटल व्यवहारांसाठी लोकपाल योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.
 • डिजिटल व्यवहाराशी निगडित असणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण विनामूल्य करणारी यंत्रणा उभी करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
 • रिझर्व्ह बॅंकेच्या नियमनाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व सेवांचा समावेश या योजनेत करण्यात येणार असून यामुळे अनधिकृत डिजिटल व्यवहारांबाबत ग्राहकांचे दायित्व मर्यादित होणार आहे. 
 • या योजनेबाबतचे सर्व दिशानिर्देश हे बॅंक आणि क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या गैर-बॅंकिंग संस्थांना या महिन्याच्या अखेरपर्यंत दिले जातील.

विज्ञान-तंत्रज्ञान
‘OSIRIS-ex’ यानाने लक्ष्य गाठले

 • सप्टेंबर २०१६ रोजी ‘बेन्नू’ नामक लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नासाने प्रक्षेपित केलेले अंतराळात तब्बल १.८ अब्ज किलोमीटरचा प्रवास करत इच्छित ठिकाणी पोचले आहे.
 • या यानामार्फत बेन्नुचा आकार, पृष्ठभाग आणि वातावरण यांचा अभ्यास करण्यात येणार असून अशाप्रकारे लघुग्रहाचा अभ्यास करणारी नासाची ही पहिलीच मोहीम आहे.
 • लॉकहिड मार्टिन स्पेस प्रणालीद्वारे विकसित केलेले हे यान लघुग्रहावरील काही नमुन्यांसह वर्ष २०२३  पर्यंत पृथ्वीवर परतणे अपेक्षित आहे.
 • कार्बनने समृद्ध असणारा बेन्नू १९९९ च्या प्रकल्पात आढळून आलेला अपोलो समूहातील पर्वताच्या आकाराचा लघुग्रह आहे.
 • OSIRIS-Rex : Origins, Spectral Interpretation, Resource Idetification, Security- Regolith Explorer

अग्नी-५ ची चाचणी यशस्वी

 • दहा डिसेंबर रोजी ओदिशातील डॉ. अब्दुल कलाम बेटावरून अण्वस्त्र वाहक असणाऱ्या अग्नी-५ या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या करण्यात आली.
 • स्वदेशी बनावटीचे असणारे बॅलेस्टिक वर्गातील ‘अग्नी-५’ हे क्षेपणास्त्र सुमारे ५ हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्यास सक्षम असून ही या क्षेपणास्त्राची सातवी चाचणी होती.
 • या क्षेपणास्त्रांमुळे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे बाळगणारा भारत हा पाचवा शक्तिशाली देश बनला आहे. (इतर चार : अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स)

आंतरराष्ट्रीय
भारत-यूएई : चलन विनिमय करार

 • भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात झालेल्या १२ व्या आर्थिक आणि तांत्रिक सहकार्यासाठीच्या बैठकीत उभय देशांनी चलन विनिमय करारावर (Curency Swap Agreement) स्वाक्षऱ्या केल्या.
 • या करारामुळे भारत व युएई यांना अमेरिकी डॉलरसारख्या तिसऱ्या चलनाची मदत न घेता आपापल्या चलनात आयात व निर्यातीचा व्यापार करता येणार आहे.
 • स्थानिक चलनांना प्रोत्साहन देण्यासाठी केल्या जाणाऱ्या या करारामुळे उभय देशांच्या चलनातील असणाऱ्या अस्थिर किमतीतून उद्‌भवणाऱ्या अतिरिक्त खर्चास कमी करता येते.

एव्हिया इंद्र 

 • १० ते २२ डिसेंबर दरम्यान राजस्थानातील जोधपूर येथे भारत आणि रशियाच्या वायुसेनांमध्ये होणारा ‘एव्हिया इंद्र’ हा युद्ध सराव पार पडला.
 • २०१४ पासून सुरू करण्यात आलेला हा युद्धसराव दर दोन वर्षांनी आयोजित केला जात असून यावर्षी या युद्धसरावाची ही तिसरी आवृत्ती होती.
 • या युद्धसरावात चार महिला अधिकाऱ्यांसह भारतीय वायुसेनेचे ३० अधिकारी तसेच सुखोई-३०, सुखोई-२५, मिग-२९ आणि एमआय-२५ ही लढाऊ विमाने सहभागी झाली होती.
 • दहशतवादाविरोधात लढा देण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या या सरावात यावर्षी युद्धअभ्यासाशिवाय चर्चा आणि काही क्रीडा उपक्रमदेखील आयोजित करण्यात आले होते.

इंद्र नेव्ही 

 • आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथे नुकताच भारत आणि रशियाच्या नौदलांमध्ये ‘इंद्र नेव्ही’ हा युद्धसराव पार पडला.
 • या युद्धसरावाचे विभाजन दोन टप्प्यात करण्यात आले; यापैकी पहिला टप्पा हा विशाखापट्टणम येथे तर दुसरा टप्पा हा बंगालच्या उपसागरात पार पडला.
 • पहिल्या टप्प्यात योजना, व्यावसायिक संवाद, क्रीडा उपक्रम तसेच काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तर दुसऱ्या टप्प्यात पाणबुडीविरोधी युद्धसराव, हवाई संरक्षण ड्रील, शोधमोहीम, गोळीबार यांचा सराव करण्यात आला.
 • या सरावात भारतातर्फे क्षेपणास्त्र विनाशक आयएनएस रणवीर, स्वदेशी लढाऊ जहाज आयएनएस सातपुडा, स्वदेशी पाणबुडी-विनाशक प्रणाली असणारी आयएनएस कदमत, पाणबुडी आयएनएस सिंधुघोष, सागरी टेहेळणी विमान डॉर्निअर, लढाऊ विमान हॉक आणि आयएनएस ज्योती यांचा समावेश होता.
 • वर्ष २००३ पासून सुरू झालेल्या या नौदल सरावाची ही दहावी आवृत्ती असून या सरावाच्या आकार आणि क्षेत्रात उत्तरोत्तर वाढ होत गेली आहे.
 • उभय नौदलातील परस्पर संवादाला प्रोत्साहन आणि सागरी सुरक्षेत परस्पर सामंजस्य हा या युद्धसरावाचा मुख्य उद्देश आहे.   

संबंधित बातम्या