स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

सायली काळे 
सोमवार, 22 एप्रिल 2019

करंट अफेअर्स

राष्ट्रीय
मैत्री पूल : भारतीय लष्कराचा नवा विक्रम

 • भारतीय लष्कराने जम्मू-काश्‍मीर राज्यातील लेह येथे अवघ्या ४० दिवसांत २६० फूट लांबीचा झुलता पूल बांधून नवा विक्रम नोंदवला आहे.
 • देशातील सर्वांत लांब असणाऱ्या या पुलाचे बांधकाम भारतीय लष्करातील ‘साहस आणि योग्यता’ पलटणमधील युद्ध अभियंत्यांनी केले आहे.
 • विसाव्या कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधत १ एप्रिल रोजी लोकार्पण झालेल्या या पुलाचे नामकरण ‘मैत्री पूल’ असे करण्यात आले आहे. या पुलामुळे लडाखमधील चोगलासमर, चुचोट, स्टोक अशी दुर्गम गावे मुख्य भूमीशी जोडली जाणार आहेत.
 • सिंधू नदीवर बांधण्यात आलेल्या या पुलासाठी सुमारे ५०० टन वजनाचे साहित्य वापरण्यात आले आहे. या पुलामुळे लडाखमधील दुर्गम भागात सर्व प्रकारच्या हवामानात रस्ते वाहतूक सुरू ठेवण्यास मदत होणार आहे.

नरेंद्र मोदी यांना झायद पदक

 • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातीकडून तद्देशीय सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या झायद पदकाने गौरविण्यात येणार आहे.
 • मागील पाच वर्षांपासून उभय देशांतील धोरणात्मक, व्यापारी व सामरिक संबंध दृढ करण्यासाठी घेतलेला पुढाकार व सक्रिय प्रयत्न यांसाठी हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना दिला जाणार आहे.
 • झायद पदक हा संयुक्त अरब अमिरातीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राष्ट्रप्रमुखांना दिला जातो.
 • आजवर हा पुरस्कार बहुतांश वेळा पी-५ गटातील राष्ट्रांनाच (ब्रिटन, फ्रान्स, चीन, अमेरिका, रशिया) मिळाला असून प्रथमच हा सन्मान भारतास देण्यात आला आहे.

विज्ञान-तंत्रज्ञान
दक्षिण कोरियामध्ये 5G

 • इंटरनेटची 5G सेवा राष्ट्रभर पुरविणारे दक्षिण कोरिया हे जगातील पहिले राष्ट्र ठरले असून एलजी यू प्लस, केटी आणि एसके टेलिकॉम या तीन पुरवठादारांनी मिळून ही सेवा ३ एप्रिल रोजी रात्री ११ पासून सुरू केली.
 • इंटरनेटच्या 5G सेवेसाठी अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात स्पर्धा सुरू होती; त्याच दिवशी अमेरिकेतील व्हेरीझोनने शिकागो आणि मेनियापोलीस येथे आपली 5G सेवा सुरू केली आहे.
 • 4G सेवेच्या तुलनेत 5G सेवा २० पट वेगवान असून अर्थतज्ज्ञांच्या मते या सेवेमुळे २०३४ पर्यंत जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार आहे.

जपानचा हायाबुसा २

 • सौरमालेच्या उत्पत्तीच्या संशोधनार्थ प्रक्षेपित केलेल्या हायाबुसा २ या जपानी यानाने रीयुगु लघुग्रहावर यशस्वीरीत्या स्फोट घडवून आणून विवर तयार केले आहे.
 • या विवराच्या अंतर्गत भागातील रासायनिक रचनेचा अभ्यास करून सौरमालेची व्युत्पत्ती आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीची निर्मिती यांचा शोध घेतला जाणार आहे.
 • सदर लघुग्रह कक्षाभ्रष्ट होऊ नये याचा विचार करून स्फोट कमी तीव्रतेचा करण्यात आला. एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने आल्यास त्यावेळी उपयोग करता येईल असे संरक्षक तंत्र विकसित करण्यासाठीही या संशोधनाचा उपयोग होणार आहे.
 • यापूर्वी २००५ मध्ये नासाने ‘डीप इम्पॅक्‍ट’ मोहिमेद्वारे अशा पद्धतीने एका धूमकेतूवर विवर तयार केले होते. 

आंतरराष्ट्रीय
कोहिमा युद्धास ७५ वर्षे पूर्ण

 • नागालॅंड राज्याने १९४४ मध्ये झालेल्या ‘कोहिमा युद्धा’स ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात इंग्लंड आणि जपान या दोन्ही देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 • याप्रसंगी उभय देशांच्या प्रतिनिधींनी ‘स्मरण, सलोखा, पुनरुज्जीवन’ या विषयास अनुसरून भाष्य केले.
 • भारतात ब्रिटिश राजवट असताना दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, १९४४ मध्ये इंग्लंडच्या शत्रुपक्षात असणाऱ्या जपानने भारतातील कोहिमा व नजीकच्या प्रदेशावर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न केला होता.
 • त्यावेळी भारतातील ब्रिटिश राजवट व जपानी सैन्यात झालेले युद्ध ‘कोहिमा युद्ध’ म्हणून ओळखले जात असून हे युद्ध ३ एप्रिल ते २२ जून १९४४ दरम्यान तीन टप्प्यांत संपुष्टात आले.
 • जर्मनीने रशियावर Stalingrad येथे केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या भूमीवर झालेल्या या आंग्ल-जपानी युद्धास ‘पूर्वेकडील Stalingrad युद्ध’ असे संबोधले जाते.

‘सनराईज’ मोहीम

 • भारताच्या कोलकता व म्यानमारच्या सित्तवे या बंदरांना जोडणाऱ्या ‘कलादालन मल्टीमोडल ट्रांझिट’ या प्रकल्पावर हल्ल्याची तयारी करणाऱ्या दहशतवादी गटांचा खातमा करण्याच्या उद्देशाने भारत आणि म्यानमारने संयुक्तपणे ‘सनराईज’ मोहीम राबवली.
 • या मोहिमेत दहशतवादी तळ नष्ट झाले असून भारतीय लष्कराने प्रत्यक्ष म्यानमारच्या सीमेमध्ये न जाता मिझोरामच्या सीमेवरून कार्यवाही केली.
 • चीन पुरस्कृत काचीन इंडिपेंडन्स लष्कराकडून प्रशिक्षण घेतलेला ‘अरकान आर्मी’ नामक दहशतवादी गट हा या मोहिमेतील प्रमुख लक्ष्य होता.

इंड-इंडो कॉर्पट २०१९

 • भारत आणि इंडोनेशिया मधील संयुक्त सागरी गस्त सरावाचे आयोजन १९ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान अंदमान-निकोबार येथील पोर्ट ब्लेअर येथे करण्यात आले.
 • यावर्षी या गस्त सरावाची ही ३३ वी आवृत्ती तीन टप्प्यांत पार पडली असून सरावाचा शेवटचा टप्पा म्हणजेच समापन हे इंडोनेशियातील बेलेवन येथे झाले.
 • या सरावामध्ये उभय देशांच्या युद्धनौका आणि विमानांनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमेत सुमारे २३६ सागरी मैलांपर्यंत गस्त घातली.
 • या गस्त सरावात अंदमान-निकोबार कमांडचे नौदल अधिकारी आशुतोष रीधोकर यांनी भारताचे नेतृत्व केले.

आफ्रिकेत भारतीय कृषी संस्था

 • परराष्ट्र मंत्रालय आणि कृषी व ग्रामविकास राष्ट्रीय बॅंकेची मार्गदर्शन सेवा (NABCONS) यांच्यात एक सामंजस्य ठराव झाला असून या ठरावानुसार मालावी येथे एक कृषी व ग्रामविकास संस्था उभारण्यात येणार आहे.
 • IAIARD नावाने उभारण्यात येणाऱ्या या संस्थेत सर्व आफ्रिकी राष्ट्रांतील प्रशिक्षणार्थी लाभ घेऊ शकतील अशा प्रकारे क्षमता आणि संसाधनांची व्यवस्था केली जाणार आहे.
 • पहिल्या तीन वर्षांसाठी भारतातून जाणाऱ्या प्रशिक्षकांचा खर्च, प्रशिक्षणाचे मूल्य हे सर्व भारत सरकारतर्फे केले जाणार आहे.
 • सदर उपक्रमाद्वारे मालावी आणि आफ्रिकन युनियनशी असणारे संबंध दृढ करणे हा प्रमुख हेतू आहे.

अमेरिकेची येमेनमधून माघार

 • दीर्घ काळापासून सुरू असलेल्या येमेनच्या नागरी युद्धातून अमेरिकेने आपले अंग काढून घेण्याचा निर्णय घेतला असून अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहात या निर्णयाच्या बाजूने मताधिक्‍य मिळाले.
 • सदर विधेयक हे २४७ विरुद्ध १७५ मतांनी पारित झाले असून ३० दिवसांच्या आत अमेरिकेला येमेनमधील आपले सशस्त्र सैन्य मागे घ्यावे लागणार आहे.
 • यापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाच्या येमेनमधील कारवायांना समर्थन दिले होते.
 • त्यामुळे आत्ताचा हा निर्णय विरोधाभास ठरणार असून तो रद्द करण्यासाठी ट्रम्प विशेष नकाराधिकार (व्हेटो) वापरण्याची शक्‍यता आहे.

‘अस्ताना’चे नामांतरण

 • कझाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष कॅसिम जोमार्त तोकायेव यांनी राजधानी अस्तानाचे नामांतरण करून ‘नुरसुलतान’ करणार असल्याची अधिकृत घोषणा केली असून त्यांच्या संसदेनेही या नामांतरणाला मंजुरी दिली आहे.
 • कझाकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष असणाऱ्या नुरसुलतान नजरबायेव यांच्या सन्मानार्थ हे नामांतरण होत आहे.
 • नुरसुलतान यांनी २४ एप्रिल १९९० पासून १९ मार्च २०१९ पर्यंत सुमारे ३० दशके राष्ट्राध्यक्ष पदाचा भार वाहिला असून कॅसिम हे सध्या केवळ काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष आहेत.   

 

संबंधित बातम्या