स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स
सोमवार, 6 मे 2019
करंट अफेअर्स
राष्ट्रीय
क्षेपणास्त्र चाचणी : निर्भय
- अमेरिकी टॉम हॉक क्रूझ क्षेपणास्त्राच्या पार्श्वभूमीवर निर्माण करण्यात आलेल्या ‘निर्भय’ या क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशातील चंदीपूर येथे यशस्वीरीत्या घेण्यात आली.
- भारतीय बनावटीचे हे पहिलेच क्रूझ क्षेपणास्त्र असून २०१३ पासून एकूण सहा चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
- एक हजार किलोमीटरचा टप्पा गाठू शकणाऱ्या या क्षेपणास्त्राची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने केली आहे.
- जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणारे ३०० किलो वजनाचे हे क्षेपणास्त्र सर्व प्रकारच्या हवामानात काम करण्यास सक्षम आहे.
- भारताकडे ब्राह्मोस हे २९० किलोमीटर मारक पल्ला असणारे शक्तिशाली क्रूझ क्षेपणास्त्र असून येत्या काळात ८०० किलोमीटरचा मारक पल्ला असणारे ‘ब्राह्मोस ईआर’च्या विकसनाचे काम सुरू आहे.
कन्नाम्मा प्रकल्प
- उत्तर मद्रास रोटरी क्लबने शालेय विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्स पुरविण्यासाठी कन्नाम्मा प्रकल्प सुरू केला आहे.
- यापूर्वी ऑगस्ट २०१८ मध्ये उठंदी येथील सरकारी शाळेत ८२ विद्यार्थिनींसाठी याच संस्थेने या उपक्रमाची सुरुवात केली होती.
- आता या प्रकल्पामध्ये चेन्नईतील सरकारी शाळांमधील ३०० विद्यार्थिनींना समाविष्ट करून घेतले आहे.
- प्रकल्पातील सॅनिटरी नॅपकिन्स हे इरुला आदिवासी महिला कल्याण संस्थेकडून घेतले जातात. या संस्थेच्या महिला अरुणाचलम मुरूगनाथम या यंत्राद्वारे प्रतिदिन एक हजार सॅनिटरी नॅपकिन्सची निर्मिती करतात.
- लाकडाचा लगदा, कापूस अशा नैसर्गिक कच्च्या मालापासून तयार केलेले हे सॅनिटरी नॅपकिन्स आवारं या व्यावसायिक नावाने विकले जातात. या सॅनिटरी नॅपकिन्सच्या एका पाकिटाची किंमत केवळ दोन रुपये आहे.
- या प्रकल्पामुळे उपरोक्त संस्थेतील आदिवासी महिलांना मदत मिळत असून दरमहा १५ हजारांवर सॅनिटरी नॅपकिन्स विकले जाऊन त्यातून १२ महिलांचा घरखर्च भागत आहे.
विज्ञान-तंत्रज्ञान
मलेरियाची लस
- नुकत्याच २५ एप्रिलला झालेल्या जागतिक मलेरिया दिनाचे औचित्य साधत आफ्रिका खंडातील मालावी या राष्ट्राने जगातील पहिलीच मलेरियाची लस सुरू केली आहे.
- लसीचे नाव RTS,S, व्यापारी नाव : मोस्क्विरीक्स
- मालावी, घाना आणि केनिया या तीन आफ्रिकी राष्ट्रांतील दोन वर्षे वयाखालील बालकांकारिता सुरू असलेल्या लसीकरणाच्या प्रायोगिक कार्यक्रमांतर्गत ही लस सुरू करण्यात आली आहे.
- येत्या आठवड्यात हीच लस घाना आणि केनिया ही सदर लसीकरणाच्या कार्यक्रमातील उरलेली राष्ट्रेदेखील सुरू करणार आहेत.
- मलेरियाच्या लागणीचा सर्वाधिक धोका असणाऱ्या या परिसरात सदर लसीकरणाचा कार्यक्रम हा जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत असून या अंतर्गत प्रतिवर्षी सुमारे तीन लाख साठ हजार बालकांना ही मलेरियाची लस टोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
- या लसीची निर्मिती ब्रिटिश औषधनिर्माती कंपनी GlaxoSmithKline आणि PATH (मलेरियाच्या लसीसाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय बिगरनफा संस्था) यांनी एकत्रितरीत्या केली आहे.
- ही लस दोन वर्षे वयाखालील दर तीन बालकांमागे केवळ एका बालकाचे संरक्षण करण्याएवढीच सक्षम असून मलेरीयावरील इतर प्रतिबंधक उपायांना हातभार लावू शकणार आहे.
मलेरियाच्या उच्चाटनासाठी भारतात प्रयत्न
- जागतिक मलेरिया दिनाचे औचित्य साधत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने मलेरिया उच्चाटन संशोधन सहयोग (MERA) सुरू केला असून २०३० पर्यंत मलेरियाचे भारतातून पूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- या उपक्रमात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय सहभागी होणार आहे.
- भारतातील मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण २००० सालापासून आजपर्यंत ८० टक्क्यांनी कमी झाले असून या आजाराने मृत पावणाऱ्यांच्या प्रमाणात ९० टक्क्यांनी घट झाली आहे.
पृथ्वीसदृश उपग्रह
- नासाच्या टेस (ट्रांझिटिंग एक्झोप्लानेट सर्व्हे सॅटेलाइट) या मोहिमेतून आकाशगंगेतील आकाराने पृथ्वीएवढा असलेला ग्रह आढळून आला आहे. एचडी २१७४९ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे.
- या ग्रहाचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या ८१ टक्के असून त्याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या ७० टक्के आहे.
- दक्षिण ग्रहमालेच्या जाळ्यात असणारा हा ग्रह पृथ्वीपासून ५३ प्रकाशवर्षे दूर आहे. टेस मोहिमेद्वारे सापडलेला हा दहावा ग्रह आहे.
- एचडी २१७४९ सूर्याभोवती केवळ ७.८ दिवसांत प्रदक्षिणा पूर्ण करत असून सूर्याच्या सान्निध्यामुळे त्याचे तापमान अधिक आहे व त्यामुळेच येथे जीवसृष्टी असण्याची शक्यता पूर्णतः नाकारण्यात येत आहे.
पर्यावरण
दहा लाख प्रजातींना मानवी धोका
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार विविध मानवी कृत्यांमुळे जागतिक पातळीवर सुमारे दहा लाख पशू व वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होणाच्या मार्गावर आहेत.
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या या अहवालाचा मसुदा तयार असून तो ६ मे २०१९ रोजी प्रसिद्ध होणार आहे. २९ एप्रिल २०१९ रोजी १३० राष्ट्रांकडून याचे परीक्षण करण्यात आले आहे.
- संयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या निसर्गस्थिती मूल्यांकनाच्या १८०० पानी अहवालास संक्षिप्त स्वरूप देऊन हा सध्याचा ४४ पानी अहवाल तयार करणात आला आहे.
- निवाऱ्याच्या जागा कमी होणे, अन्नाच्या शोधात भटकावे लागणे, पशू अथवा वनस्पतीचा बेकायदा व्यापार, वाढते प्रदूषण व हवामानातील बदल ही अहवालात नमूद केलेली मुख्य कारणे आहेत.
आंतरराष्ट्रीय
शस्त्रात्रे व्यापार करारास अमेरिकेचा पाठिंबा नाही
- शस्त्रात्रे व्यापार करार हा संयुक्त राष्ट्रसंघ निर्मित शस्त्रात्रांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर अंकुश ठेवणारा करार असून अशा प्रकारच्या कोणत्याही कराराचे अमेरिका राष्ट्र पालन करणार नसल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.
- सदर करार हा २०१४ पासून अस्तित्वात आला असून यामध्ये लहान शस्त्रांपासून, रणगाडे, लढाऊ विमाने, युद्धनौका अशा सर्वांचाच समावेश करण्यात आला आहे.
- शस्त्रात्रे व्यापारातील बेकायदा व्यवहार रोखण्यासाठी शास्त्रात्रांच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी काही मानकेदेखील या करारात करण्यात आली आहेत.
- करारातील सभासद राष्ट्रांना आपल्या आंतरराष्ट्रीय शस्त्रात्रे व्यवहाराचा तपशील ठेवणे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन व नागरिकांवरील हल्ले या उद्देशाने केल्या जाणाऱ्या शस्त्रात्रे व्यवहारांस विरोध करणे बंधनकारक असते.
- सदर करारावर प्रथम १३० राष्ट्रांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मात्र, सध्या केवळ १०१ राष्ट्रांनीच या करारास संमती दर्शविली आहे.