स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

सायली काळे 
सोमवार, 27 मे 2019

करंट अफेअर्स
 

राष्ट्रीय
आयएनएस वेला

 • ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ‘प्रकल्प ७५’ या देशी बनावटीच्या सहा पाणबुड्यांची निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवून उभ्या केलेल्या प्रकल्पातील ‘आयएनएस वेला’ या चौथ्या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले.
 • फ्रेंच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बांधलेल्या या पाणबुडीच्या निर्मितीची सुरुवात २००९ मध्ये माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीमध्ये झाली होती.
 • सुरू वर्षात अजून काही चाचण्या घेतल्यानंतर ‘आयएनएस वेला’ पाणबुडीस भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केले जाणार आहे.
 • सोव्हिएत रशियाची ‘वेला’ पाणबुडी ३१ ऑगस्ट १९७१ रोजी भारतीय नौदलात सामील झाली होती. ‘वेला’ पाणबुडी ३७ वर्षांच्या सेवेनंतर २५ जून २०१० रोजी सेवानिवृत्त झाली; तिच्या नावावरून या पाणबुडीचे नामकरण करण्यात आले.
 • फ्रान्समधील नेव्हल ग्रुपशी २००५ मध्ये झालेल्या करारानंतर भारतात ‘प्रकल्प ७५’मध्ये निर्माण करण्यात आलेल्या स्कॉर्पियन 

श्रेणीतील यापूर्वीच्या पाणबुड्या:
क्र.    पाणबुडीचे नाव            जलावतरण (प्रथम चाचणी)
१.    आयएनएस कलवरी      २७ ऑक्‍टोबर २०१५
२.      आयएनएस खांदेरी     १२ जानेवारी २०१७
३.    आयएनएस करंज        ३१ जानेवारी २०१८

आयएनएस रणजीत सेवानिवृत्त

 • भारतीय नौदलात १५ सप्टेंबर १९८३ रोजी सामील झालेली आयएनएस रणजीत ही अण्वस्त्र विनाशिका ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाली आहे.
 • रशियन सोव्हिएत संघाने निर्माण केलेली ही विनाशिका काशिन श्रेणीतील असून या श्रेणीतील निवृत्त होणारी पहिलीच विनाशिका आहे.
 • रशियात आयएनएस रणजीतचे औपचारिक जलावतरण १६ जून १९७९ ला करण्यात आले होते व लोवक्‍ली हे तिचे रशियन नाव होते.
 • भारतात कॅप्टन विष्णू भागवत हे आयएनएस रणजीतचे पहिले संचालक असून ‘सदा रणे जयते’ हे तिचे ब्रीदवाक्‍य होते.
 • सध्या या काशीन श्रेणीतील एक विनाशिका रशियाच्या नौदलात असून काशीनचे रूपांतर करून निर्माण करण्यात आलेल्या राजपूत श्रेणीतील चार विनाशिका भारताकडे आहेत. (आयएनएस राजपूत, आयएनएस राणा, आयएनएस रणविजय, आयएनएस रणवीर)

सिम्बेक्‍स २०१९

 • सिंगापूर आणि भारत नौदालांमध्ये दरवर्षी घेतला जाणारा ‘सिम्बेक्‍स’ हा युद्ध सराव यावर्षी १६ मे ते २२ मे दरम्यान पार पडला.
 • नुकत्याच सिम्बेक्‍स-२०१९ मध्ये झालेल्या कोलकता विनाशिका श्रेणीतील आयएनएस कोलकता आणि आयएनएस शक्ती या भारतीय युद्धनौका यात सहभागी होणार आहेत.
 • उभय देशांच्या नौदालांतील परस्पर सहकार्य वाढीस लागण्याच्या दृष्टीने हा नौदल अभ्यास १९९३ मध्ये सुरू केला असून तो दरवर्षी घेतला जातो.
 • SIMBEX : Singapore India Maritime Bilateral Exercise

अरुणाचल प्रदेशात ३५% ग्रॅफाईट

 • भारतीय भूगर्भशास्त्र सर्वेक्षणाने सादर केलेल्या नव्या अहवालानुसार देशातील ३५ टक्के ग्रॅफाईटचे साठे एकट्या अरुणाचल प्रदेश राज्यात आहेत.
 • इटानगर येथे होणाऱ्या अरुणाचल प्रदेश राज्य शासनाच्या भूगर्भ, खान आणि उद्योग विभागाबरोबर झालेल्या वार्षिक बैठकीत या संबंधीचा अहवाल मांडण्यात आला.
 • सद्यःस्थितीत भारत खूप मोठ्या प्रमाणात ग्रॅफाईटची आयात करत असल्याने या खनिजाच्या साठ्यांचा हा नवा शोध महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

विज्ञान-तंत्रज्ञान
इस्रोच्या येत्या काळातील मोठ्या मोहिमा

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने येत्या काळातील सात मोठ्या मोहिमांची घोषणा केली असून संस्थेच्या कार्याचा येत्या ३० वर्षांचा आराखडा तयार केला आहे.
 • या सात मोहिमांपैकी १० वर्षांचा कालावधी असणारे 
 • चांद्रयान-२ हे जुलै २०१९ पर्यंत प्रक्षेपित करण्याचा संस्थेचा मानस आहे.
 • उर्वरित सहा मोहिमा या खालीलप्रमाणे दोन वर्गात विभागल्या गेल्या आहेत :
  १. सुस्पष्ट मोहिमा : एक्‍स्पोसॅट (२०२०) (विकिरणांचा अभ्यास), आदित्य L१ (२०२१) (सूर्याच्या भवतालाचा अभ्यास) 
  २. अस्पष्ट मोहिमा : या मोहिमांच्या आराखाड्यांवर काम सुरू आहे. मंगलयान-२ (२०२२), चांद्रयान-२ (२०२४), शुक्र मोहीम (२०२३), एक्‍झोवर्ल्डस (२०२८) (सूर्यमालेच्या बाहेरील जगाचा अभ्यास).

पर्यावरण
लेह-लडाखमध्ये आईस कॅफे

 • लेह-लडाख येथील एका गावात भारतातील पहिला नैसर्गिक ‘आईस कॅफे’ सुरू करण्यात आला असून हा कॅफे समुद्रसपाटीपासून तब्बल १४ हजार फूट उंचीवर आहे.
 • मनाली लेह महामार्गावर सुरू करण्यात आलेल्या या कॅफेला साकार करण्याच्या कामात ‘सीमा मार्ग संस्थे’चा (Border Road Organization) खूप मोठा वाटा आहे.
 • नैसर्गिकरीत्या निर्माण होणाऱ्या बर्फाच्या टेकड्यांना बौद्ध स्तूपाप्रमाणे आकार देऊन हा कॅफे तयार केला आहे.
 • लेह-लडाखमधील उन्हाळ्याच्या दिवसांतील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी प्रसिद्ध अभियंते सोनं वांगचुक यांनी प्रथम ही हिमस्तूपाची कल्पना पुढे आणली असून त्यासाठी त्यांना २०१८ मध्ये मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 • हिवाळ्यात सिंधू नदीच्या झऱ्यांचे पाणी हिमस्तूपाच्या स्वरूपात गोठवून ठेवल्यास वसंत ऋतूतील उन्हाने हे स्तूप वितळल्यावर शेती आणि पिण्यासाठी उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध होते.

अरुणाचल प्रदेशात सापाची नवी प्रजाती

 • अरुणाचल प्रदेश राज्यातील दक्षिण कामेंग जिल्ह्यात सापाची एक नवी प्रजाती सापडली असून लालसर तपकिरी रंगाचा हा साप पीट व्हायपर कुळात मोडणारा आहे.
 • सर्पअभ्यासक व शास्त्रज्ञ अशोक कॅप्टन यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील अभ्यासकांच्या एका पथकाने हा शोध लावला आहे.
 • रशियातील सर्पसंबंधी एका नियतकालिकाने या शोधाची दखल घेतली असून सध्या या प्रजातीतील एकच नर सर्प मिळाला आहे.
 • नव्याने मिळालेल्या प्रजातीचे वैज्ञानिक नाव : Trimeresurus Arunachalensis
 • भारतात पीट व्हायपर कुळात आढळणाऱ्या सापांच्या चार प्रजाती : मलाबार, हॉर्सशू, हिमालयी, हम्प नोझ

रुद्राक्ष वृक्ष लागवडीसाठी सामंजस्य करार

 • उत्तराखंड राज्यातील गंगेच्या खोऱ्यात दहा हजार रुद्राक्ष वृक्षांच्या लागवडीसाठी एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
 • या सामंजस्य करारात गंगा स्वच्छता राष्ट्रीय अभियान (NMCG), कला व सांस्कृतिक वारसा भारतीय राष्ट्रीय न्यास (INTACH) आणि एचएलसी वनीकरण संस्था सहभागी आहेत.
 • ही रुद्राक्ष लागवड ‘नमामि गंगे’ या अभियानाच्या औद्योगिक सामाजिक बांधिलकीच्या (CSR) अंतर्गत केली जाणार आहे.
 • स्थानिक जमातींच्या मदतीने गंगेच्या खोऱ्यात हरित परिसंस्था उभी करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
 • या उपक्रमात ९७ निमशहरे आणि ४,४६५ खेडेगावांना समाविष्ट करण्यात येणार आहे.
 • रुद्राक्ष वृक्षाचे वैज्ञानिक नाव : Eleocarpus ganitrus

आंतरराष्ट्रीय
क्रिकेट विश्‍वचषकात भ्रष्टाचार प्रतिबंध 

 • विश्‍वचषकाचे सामने स्वच्छतेने पार पडावेत यासाठी सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघास आपल्या सोबत पूर्णवेळ काम करणारा भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिकारी ठेवणे बंधनकारक असणार आहे.
 • हा नवा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) लवकरच येऊ घातलेल्या २०१९ च्या विश्‍वचषक सामन्यांपासून लागू केला आहे.
 • विश्‍वचषक सामन्यांत प्रवेश मिळालेल्या दहाही संघांसोबत असणारा हा भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिकारी आयसीसीकडून नेमण्यात येणार असून सुरुवातीच्या सराव सामन्यांपासून ते अंतिम सामन्यापर्यंत तो सतत या संघांसोबत असेल.
 • या अधिकाऱ्याची राहण्याची व्यवस्थाही खेळाडूंसोबत असेल, तसेच प्रवासादरम्यानही हा अधिकारी एकाच वाहनात असणे बंधनकारक असेल.
 • पूर्वीच्या प्रणालीमध्ये आयसीसीचे भ्रष्टाचार प्रतिबंधक पथक हे सामन्यांच्या ठिकाणी नेमलेले असे. त्यामुळे संपूर्ण दौऱ्यादरम्यान खेळाडूंना सतत अनेक वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागत असे. 

संबंधित बातम्या