स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

सायली काळे 
सोमवार, 17 जून 2019

करंट अफेअर्स
 

राष्ट्रीय
आकाश क्षेपणास्त्र चाचणी

 • संरक्षण संशोधन व विकास संस्थेने ओडिशातील चंदीपूर येथील अवकाश तळावरून आकाश एमके-१ एस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
 • स्वदेशी बनावटीचे हे क्षेपणास्त्र सध्याच्या आकाश क्षेपणास्त्राची प्रगत आवृत्ती असून ते जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या वर्गातील आहे.

मालदीवी अधिकाऱ्यांना भारताकडून प्रशिक्षण

 • भारतातील अग्रगण्य नागरी सेवा प्रशिक्षण संस्था अशी ओळख असणाऱ्या राष्ट्रीय सुप्रशासन केंद्राने (National centre for good governance) मालदीव नागरी सेवा आयोगासोबत सामंजस्य करार केला आहे.
 • या करारान्वये एक हजार मालदीवी नागरी सेवा अधिकाऱ्यांना पुढील पाच वर्षांसाठी क्षमता वाढीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 • हा सामंजस्य करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालदीवची राजधानी येथे करण्यात आला असून यासाठीचा सर्व खर्च परराष्ट्र मंत्रालय करणार आहे.
 • यापूर्वी एप्रिल २०१९ मध्ये आपल्या राष्ट्रीय सुप्रशासन केंद्राने २८ मालदीवी नागरी सेवा अधिकाऱ्यांना यशस्वीपणे प्रशिक्षण दिल्याने हा करार करण्यात आला आहे.
 • याशिवाय राष्ट्रीय सुप्रशासन केंद्राने यापूर्वी बांगलादेश, म्यानमार, गॅंबिया येथेही असे प्रशिक्षण कार्यक्रम राबविले आहेत.

पर्यावरण
AN-32 विमानासाठी जैवइंधन

 • भारतीय हवाईदलाच्या एएन-३२ या विमानासाठी संमिश्र जेट जैवइंधन वापरण्यास अधिकृतरीत्या परवानगी मिळाली असून यासाठी CEMILAC ने ही हिरवा कंदील दिला आहे.
 • एएन-३२ या मालवाहू परिवहन विमानाची निर्मिती रशियाने केली असून यापूर्वी १७ डिसेंबर २०१८ रोजी या विमानावर जैवइंधनासह उड्डाणाची चाचणी घेण्यात आली होती.
 • या मंजुरीमुळे भारतीय हवाईदलाच्या विमानांत आता १० टक्के जैवइंधन तर ९० टक्के पारंपरिक इंधन असे मिश्रण वापरणे शक्‍य होणार आहे. 
 • CEMILAC : Centre for Military Airworthiness and Certification ही लष्करी विमाने व हवाई उपकरणांना प्रमाणित करणारी संरक्षण संशोधन व विकास संस्थेची (DRDO) अधिकृत प्रयोगशाळा आहे.
 • जेट जैवइंधनाची निर्मिती २०१३ मध्ये डेहराडून येथील CSIR-IIP च्या प्रयोगशाळेत सर्वप्रथम करण्यात आली होती. मात्र, परीक्षण सुविधांच्या अभावी त्याची व्यावसायिक चाचणी घेण्यात आली नाही.
 • जुलै २०१८ मध्ये वायुसेना प्रमुख बी. एस. धनोआ यांनी स्वदेशी इंधनाच्या चाचणी व प्रमाणीकरणाची घोषणा केल्यानंतर भारतीय वायुसेनेतील अभियंता आणि विमान परीक्षण दलांनी आंतरराष्ट्रीय मानकांच्या आधारे या स्वदेशी इंधनाच्या विविध चाचण्या घेतल्या होत्या.

चीनी प्रदूषण

 • पर्यावरणविषयक प्रसिद्ध अशा नेचर नियतकालिकाने चीन मॉण्ट्रीअल कराराचे उल्लंघन करत CFC  चे उत्सर्जन करीत असल्याचे समोर आणले आहे.
 • चीनने २०१० मध्ये मॉण्ट्रीअल करारावर स्वाक्षरी करून CFC बंदीची ग्वाही देणाऱ्या देशांमध्ये समावेश केला होता. तसे असूनही चीन CFC कारक रसायनांचा वापर करत असल्याचे म्हटले आहे.
 • वर्षभरापूर्वी झालेल्या एका अभ्यासात CFC  या वायूचे नवीन जागतिक उत्सर्जन नोंदविताना अनेक पर्यावरणीय गटांनी व शास्त्रज्ञांनी हे उत्सर्जन आशिया खंडातून होत असल्याचा संशय व्यक्त केला होता.
 • संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय संघाने केलेल्या नव्या निष्कर्षांनी संशयास्पद क्षेत्राबद्दल पुष्टी करून दावा केला आहे, की CFC  वायूचे उत्सर्जन पूर्व चीनमधून होत आहे.
 • या अभ्यासामुळे रसायनांच्या अवैध वापरास आळा घालण्यासाठी चीनी सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्यास मदत होणार आहे.

आर्थिक
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय

 • सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (NSSO) आणि केंद्रीय सांख्यिकी कार्यालय (CSO) यांचे एकमेकांत विलीनीकरण करून राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • भारताच्या अधिकृत सांख्यिकी प्रणालीशी संबंधित सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे कामकाज सुव्यवस्थित व भक्कम करण्यासाठी तसेच मंत्रालयातील प्रशासकीय कामांना एकीकृत करून त्यांच्यातील समन्वय वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • नवीन सांख्यिकी शाखा ही सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा अविभाज्य भाग असणार असून या मंत्रालयाचे सचिव NSO च्या अध्यक्षपदी असतील.
 • NSSO आणि CSO हे NSO चे घटक म्हणून कार्यरत असतील, तर विविध विभाग महानिर्देशकांमार्फत सचिवांना माहिती पुरविण्यात येईल.
 • याशिवाय डेटा प्रोसेसिंग नामकरण डेटा क्वालिटी ॲश्‍युरन्स असे करण्यात येणार असून सर्वेक्षण व गैर-सर्वेक्षण आकड्यांची गुणवत्ता सुधारण्याची जबाबदारी या विभागाकडे देण्यात येणार आहे.

रेल्वेसाठी कर्ज

 • भारताने रेल्वेमार्गांच्या विद्युतीकरणासाठी आशियायी विकास बॅंकेकडे केलेली मागणी मंजूर झाली असून भारतास ७५० दशलक्ष डॉलर्सचे (७५ कोटी डॉलर्स) कर्ज मंजूर झाले आहे.
 • या कर्जातून भारतातील रेल्वेमार्ग विद्युतीकरण प्रकल्पाअंतर्गत सुमारे ३३७८ किलोमीटर लांब रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे.
 • या करारान्वये आशियायी विकास बॅंकेकडून इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनला (IRFC) दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय
सुरक्षेची ‘चौकट’

 • थायलंडमधील बॅंकॉकमध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांत एक सुरक्षाविषयक अनौपचारिक बैठक झाली.
 • या चर्चेस चारही देशांचे उच्च अधिकारी उपस्थित असून हिंदी-प्रशांत महासागर विभागात मुक्त, पारदर्शक आणि सर्वसमावेशक व्यवहार होण्याकरिता होऊ शकणाऱ्या एकत्रित प्रयत्नांवर सल्ला मसलत करण्यात आली.
 • हिंदी-प्रशांत विभागातील सर्व व्यवहार नियमबद्ध असावेत यावर ही चारही राष्ट्रे सहमत असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला.
 • दक्षिण चीनी समुद्रासोबतच चीन हिंदी-प्रशांत महासागराच्या भागात आपले लष्करी अस्तित्व वाढवत असल्याने या भागाच्या संरक्षणासाठी येथील व्यवहार खुले ठेवावेत याबाबतही चर्चा करण्यात आली.
 • सध्या दक्षिण चीनी समुद्रात व्हिएतनाम, तैवान, ब्रुनी, फिलिपिन्स, मलेशिया या सर्व राष्ट्रांचे हक्क नाकारत चीन स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करत आहे.

G-20 परिषद 

 • जपानमधील फुकुओका शहरात ८ आणि ९ जून रोजी झालेल्या G-२० च्या वित्तमंत्री व केंद्रीय बॅंक गव्हर्नर बैठकीस भारतीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी उपस्थिती लावली.
 • याशिवाय याच दोन दिवसांत जपानच्या इबारकी येथील त्सुकुबा शहरात G-२० ची व्यापार आणि डिजिटल अर्थव्यवस्थेवरील मंत्रीय बैठकही पार पडली.

विज्ञान-तंत्रज्ञान
न्यू स्पेस इंडिया लिमिटेड

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आपल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) नामक नवीन व्यावसायिक शाखेचे बेंगळूरू येथे  उद्‌घाटन केले.
 • दुसरी व्यावसायिक संस्था म्हणून न्यू स्पेस इंडिया लिमिटेडची नोंदणी ६ मार्च २०१९ लाच करण्यात आली होती.
 • सप्टेंबर १९९२ मध्ये स्थापना झालेली अँट्रीक्‍स कॉर्पोरेशन लिमिटेड ही अंतराळ विभागाची पहिली व्यावसायिक शाखा असून या शाखेद्वारे इस्रोच्या उत्पादन व सेवांचे विपणन केले जाते.
 • अंतराळाच्या क्षेत्रामध्ये इस्रोद्वारे केल्या जाणाऱ्या संशोधन व विकास क्रियाकलापांचा व्यावसायिक उपयोग करून घेणे ही न्यू स्पेस इंडिया लिमिटेडची जबाबदारी असणार आहे.
 • न्यू स्पेस इंडिया लिमिटेडचे अधिकृत भाग भांडवल १०० कोटी रुपये असून या शाखेस १० कोटी रुपयांचे प्राथमिक भांडवल प्रदान करण्यात आले आहे.
 • न्यू स्पेस इंडिया लिमिटेडद्वारे भारतीय अंतराळ कार्यक्रमांमध्ये उद्योगांची भागीदारी वाढविणे हा प्रमुख उद्देश आहे. 

संबंधित बातम्या