स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

सायली काळे 
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

करंट अफेअर्स
 

राष्ट्रीय

‘सुरंगा बावडी’ला जागतिक पातळीवर मान्यता

 • अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील जागतिक स्मारक निधी (World Monument Forum) या स्वयंसेवी संस्थेने भारतातील प्राचीन भूमिगत जलप्रणाली असणाऱ्या सुरंगा बावडीला ‘जागतिक स्मारक निरीक्षण यादी २०२०’मध्ये समाविष्ट करून घेतले आहे.
 • ‘दख्खन पठारावरील प्राचीन जलप्रणाली’ या श्रेणीत सुरंगाची नोंद झाली असून पुढील दोन वर्षे या बावडीच्या जीर्णोद्धारासाठी डब्ल्यूएमएफ आर्थिक साहाय्य पुरविणार आहे.
 • बावडीच्या जीर्णोद्धारासाठी स्थानिक प्रशासन आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांसह डब्ल्यूएमएफ काम करणार आहे. 
 • जागतिक स्मारकांच्या २०२० या वर्षीच्या यादीत जगभरातून एकूण २५ स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.

सुरंगा बावडी

 • ही बावडी कर्नाटक राज्यातील विजय्पुरा येथे असून ती प्राचीन कारेज प्रणालीवर बांधण्यात आली आहे.
 • इ. स. पू. पहिल्या शतकात पर्शिया येथे कारेज प्रणालीचा शोध लागला असून यामध्ये भूमिगत कालव्यांच्या जाळ्याद्वारे संपूर्ण शहरास पाणी पुरवठा केला जातो.
 • सुरंगा बावडीची निर्मिती इ. स. १६व्या शतकात आदिल शहा (पहिला) याने केली असून त्याचा उत्तराधिकारी इब्राहिम शहा (द्वितीय) याच्या काळात त्यात अनेक संरचनात्मक बदल करून बळकट करण्यात आले.

आसामचे ‘शिशु सुरक्षा’अॅप 

 • बालदिनाचे औचित्य साधत १४ नोव्हेंबर रोजी आसाम राज्याच्या बाल संरक्षण आयोगाने ‘शिशु सुरक्षा’ नावाचे अॅप सुरू केले आहे.
 • हे ॲप म्हणजे ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेचा एक भाग असून यामध्ये बाल हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी एक ई-तक्रार बॉक्स आहे.
 • जनतेस भावी पिढ्यांची जबाबदारी घेण्यास सक्षम करणे हा या अॅपचा मुख्य उद्देश आहे.
 • हे अॅप अँड्रॉईड (Android) आणि अॅपल (iOS) या दोन्ही प्रणालींवर चालू शकणारे असून अॅपद्वारे नोंदवलेल्या तक्रारी थेट आसामच्या बाल हक्क संरक्षण आयोगाकडे जाणार आहेत.
 • बहुतेक लोकांना शिक्षण वा माहितीच्या अभावी आपल्या मुलांच्या हक्कांच्या उल्लंघनाच्या प्रकरणांबाबत तक्रार करण्याची प्रक्रिया समजू शकत नाही. त्यामुळे या अॅपद्वारे सोपे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे.

‘गर्वी गुजरात’चे उद्‍घाटन

 • दिल्लीमध्ये गुजरात राज्याचे दुसरे राजभवन ‘गर्वी गुजरात’चे उद्‍घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी व उपमुख्यमंत्री नितीन पटेलदखील उपस्थित होते.
 • दिल्लीतील अकबर मार्गावर तब्बल सात हजार चौ.किमी क्षेत्रफळाच्या भूखंडावर उभे राहिलेले राजभवन देशातील पहिले पर्यावरणस्नेही राजभवन आहे.
 • ‘गर्वी गुजरात’ हे नियोजित वेळेच्या तीन महिने आधीच तयार करण्यात आले असून यात नव्या व जुन्या दोन्ही वास्तुकलांचा वापर करण्यात आला आहे.
 • हे राजभवन १३१ कोटी रुपये खर्च करून उभे करण्यात आले असून गुजरातची शिल्पकला, पाककला तसेच संस्कृतीचे दर्शन घडवून आणणार आहे.

विज्ञान-तंत्रज्ञान
ब्रिक्स तरुण संशोधक पुरस्कार

 • ‘ब्रिक्स’तर्फे तरुण संशोधकांना देण्यात येणारा पुरस्कार भारताच्या रवी प्रकाश यांना मिळाला असून त्यांना आगामी संशोधनासाठी २५ हजार डॉलर्सची रक्कम देण्यात आली आहे.
 • अल्पभूधारक शेतकऱ्यांचे लहान प्रमाणावरील दुग्धोत्पादन लक्षात घेत रवी प्रकाश यांनी लहान आकारातील व स्वस्त दरातील दुग्ध शीतालयाचा (Milk Chilling Unit) शोध लावला आहे.
 • रवी प्रकाश हे नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटचे विद्यावाचस्पती (Ph.D.) असून २०१९ च्या चौथ्या ब्रिक्स युवा वैज्ञानिक मंचातील २१ प्रतिनिधींमध्येही त्यांचा समावेश होता.
 • जुलै २०१४ मध्ये झालेल्या ब्रिक्सच्या सहाव्या परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवा व नवप्रवर्तानावर जोर दिल्यानंतर ‘ब्रिक्स युवा वैज्ञानिक मंच’ निर्मितीच्या भारताच्या प्रस्तावास पाठिंबा मिळाला होता.
 • ज्या तरुण संशोधक अथवा उद्योजकाच्या संशोधनामुळे ब्रिक्स देशातील सामान्य जनतेच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडून येतो, त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

पर्यावरण
SU.RE. प्रकल्प

 • केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबई येथे वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या SU.RE. (Sustainable Resolution) प्रकल्पाचे उद्‍घाटन केले आहे. 
 • हा प्रकल्प म्हणजे स्वच्छ पर्यावरणाप्रती योगदान देण्याचा प्रयत्न असून वस्त्रोद्योग मंत्रालयाने सुरू केलेला हा पहिलाच उपक्रम आहे.
 • हा प्रकल्प भारतीय वस्त्र उत्पादक संघटना (CMAI), संयुक्त राष्ट्रसंघ, रिलायन्स आयएमजी आणि लॅक्मे फॅशन वीक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे.
 • वस्त्रोद्योगातून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करणे, कचरा व्यवस्थापन आणि जल व्यवस्थापन कार्यक्षमता वाढविण्यास मदत करणे ही यामागची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
 • या प्रकल्पाद्वारे २०२५ पर्यंत आपल्या वस्त्रोद्योग निर्मितीमध्ये शाश्‍वत कच्चा माल आणि प्रक्रियेचा वापर करण्याचा संकल्प १६ नामांकित रिटेल ब्रँड्सनी केला आहे.

आर्थिक
आयडीबीआय बँकेत भांडवली गुंतवणूक

 • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयडीबीआय बँकेत सरकारच्या भांडवली गुंतवणूक करण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे.
 • आयडीबीआय बँकेला नफा कमावताना सामान्य कर्जांचे वितरण करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरकारकडून सुमारे ४५५७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
 • आयडीबीआय बँकेच्या अनुत्पादित मालमत्तेत (NPA) जून २०१८ मध्ये १८.८ टक्क्यांनी वाढ, तर जून २०१९ मध्ये ९ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे बँकेस भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता होती.
 • सरकारकडून होणाऱ्या या भांडवली मदतीसाठी आयडीबीआय बँकेला ‘रिकॅप बाँड’ खरेदी करावे लागणार आहेत.

आंतरराष्ट्रीय
सुरक्षित शहर निर्देशांक २०१९

 • इकॉनोमिस्ट इन्टेलिजन्स युनिट या आर्थिक विश्‍लेषक आणि सल्लागार संस्थेने यावर्षीचा ‘सुरक्षित शहर निर्देशांक’ जाहीर केला असून यामध्ये जपानच्या ‘टोकियो’ शहरास प्रथम स्थान मिळाले आहे.
 • या निर्देशांकासाठी जगातील ५ खंडांमधील ६० शहरांतील डिजिटल सोयी, आरोग्य व पायाभूत सुविधा, वैयक्तिक सुरक्षा, आपत्कालीन यंत्रणा अशा विविध ५७ निकषांचा विचार करून अभ्यास करण्यात आला होता.
 • या ६० शहरांच्या यादीत दोन भारतीय शहरांचा समावेश असून त्यापैकी मुंबईस ४५ वे तर दिल्लीस ५२ वे स्थान मिळाले आहे.
 • या निर्देशांकातील पहिल्या १० स्थानांमध्ये मुख्यतः आशिया-प्रशांत क्षेत्रातील शहरांचा समावेश असून त्यात सीडनी, सोल, मेलबर्न यांना स्थान मिळाले आहे.
 • बांगलादेशची राजधानी ढाका या यादीत ५६ व्या, तर पाकिस्तानी शहर कराची या यादीत ५७ व्या स्थानावर आहे.
 • निर्देशांकातील पहिल्या १० क्रमांकांची शहरे : १) टोकियो (जपान) २) सिंगापूर (सिंगापूर) ३) ओसाका (जपान) ४) अॅम्स्टरडॅम (नेदरलँड्स) ५) सीडनी (ऑस्ट्रेलिया) ६) टोरोंटो (कॅनडा) ७) वॉशिंग्टन (युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) ८) कोपनहेगन (डेन्मार्क) ९) सोल (द. कोरिया) १०) मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)

संबंधित बातम्या